स्त्रीने नोकरी करावी का नाही ? याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकेल. कुचंबणा, कुचंबणा, कुचंबणा आणि केवळ कुचंबणा. हेच जर नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या लग्नानंतरच फलित असेल तर “नको तो संसार एकटच कुठेतरी दूर जाऊन संन्यास घ्यावा, एकांतात अगदी एकटच राहून जीवन काढावं” किंवा हे जीवनच नको असं म्हणणाऱ्या कितीतरी स्त्रिया आहेत. याचा अर्थ काय ? परत एकदा स्त्रिया भरडल्या जात आहेत. फरक एवढाच की क्षेत्र किंवा स्वरुप बदललेलं आहे.
स्त्रीने नोकरी करावी का नाही ? याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. ते परिस्थितीवर व विचारसरणीवर अवलंबून असतं. बऱ्याच वेळा ते तिच्या स्वत:वरही अवलंबून असतं. आज प्रगतीसाठी आकाशही ठेंगण पडत असताना तिने घरात बसणं हे शक्यच नाही. किंबहूना तिच्यामध्ये खरी प्रगतीची बिजे आहेत. आज जवळजवळ सगळीच क्षेत्रे तिने काबीज केली आहेत
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने !
देवाने तिला बुध्दीमत्ता दिली आहे, त्याच बरोबर सहनशिलता, प्रेमळ अंत:करणही दिले आहे. त्या जोरावर तिने आकाश, पाताळ, जमीन सगळीकडे आपला ठसा उमटवलाही आहे. पण स्त्रियांवर एकीकडे कौतुकाचा वर्षाव होतो, तर एकीकडे ती भरडली जाते. १० – ६ ऑफिसमध्ये काम करणारी स्त्री सगळ्यानांच खुप सुखी, आनंदी वाटते. पण १० वाजता ती ऑफिसला येते म्हणजे तिला सकाळी ९- ९.३० ला घर सोडावेच लागते, किंबहुना काहींना याच्यापेक्षाही लवकर. तेही घरातली सगळी कामं उरकून. काही राहीलं नाही ना याची वारंवार खात्री करुन घ्यावी लागते. सकाळी ५ – ६ ला उठून ९ पर्यंत म्हणजे ३ – ४ तासात तिला दिवसभराचं सगळं घरकाम करायच असतं. सगळ्यांचे लाड, हट्ट पुरवायचे. शिवाय ऑफिसला येताना जेव्हा तिचं मुल आई ऑफिसला जाणार म्हणजे दिवसभर नसणार म्हणून तिच्याकडे केविलवाणे बघते व तिला आज जावू नकोस ना ! म्हणून सांगते. तिच्याकडे हट्ट धरते तेव्हा तिची घायाळ हरिणीसारखी होणारी स्थिती कुणालाच दिसत नाही.
त्या इवल्याशा चिमण्या जिवाला घरी सोडून जाणं तिच्या किती जिवावर येतं. दिवसभर तिच्या डोळ्यासमोर त्याचा इवलासा चेहरा दिसतो तेव्हा तिला किती त्रास होत असेल ह्याचा कुणी विचारही करत नाही. उलट दिवसभर बाहेर असते म्हणून तिच्या नोकरीवरच आक्षेप घेतला जातो. आता मला सांगा एवढसं मुल सोडून कुणालाही नोकरीवर जाण्याची हौस नसते, तर ती गरज आहे. कारण आजकालच्या या महागाईच्या जमान्यात एकटा नवरा सगळं कसं चालवू शकेल ? मुलांना उज्ज्वल भवितव्य द्यायचे असेल, चांगले शिक्षण द्यायचे असेल, त्यांना आपल्यासारखा जगण्यासाठी संघर्ष करावा लागू नये व सर्व सुख-सुविधा उपलब्ध व्हाव्यात व आपल्यामधल्या कलागुणांचा विकास व्हावा, म्हणून दोघांनी मिळून काम केलं पाहिजे, म्हणून ती नोकरी करत असते ना ?
बाहेरच्यांच एकवेळ जाऊ दे पण घरातल्याचं काय ? ती तर घरातल्यांसाठी त्यांचा गरजा पुर्ण व्हाव्यात म्हणून राब राब राबते. पण त्यांच्यालेखी तिच्या कष्टांना काहीच किंमत नाही. का तर चकाचक ऑफिसमध्ये खुर्चीवर जाऊन बसते, थंडगार ए. सी मध्ये चहा घेते, चांगले चांगले कपडे घालते, म्हणजे ती त्या ए.सी असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन काहीच काम करत नसेल का ? तिला फुकटच पगार मिळत असेल का ? आजकाल सख्खा भाऊ भावाला एक रुपया सोडत नाही. मग तो कंपनीचा मालक काय दानशूर कर्ण लागून गेलाय का ? की काही काम न करता फुकट पगार देईल आणि ते ठिक आहे, पण त्याच कंपनीत पुरुषसुध्दा काम करतात, त्यांना बाहेरचं काम काय असतं किती असतं हे माहीत असतं, तरी घरी आल्यावर आपल्या बायकोने काहीच काम केलं नाही ती बाहेर जाऊन सागरगोटे खेळून आलीय व आपण खुप मोठा डोंगर फोडून आलोय या अर्विभावात सोफ्यावर लोळत, टि.व्ही बघत आज्ञा देत असतात व नम्र सेवकाप्रमाणे बायकोने कुरकुर न करता व पटापट त्या ऐकल्या पाहीजेत हि अपेक्षा असते.
म्हणजेच घरात आपण पैसे न देता स्वत:च पैसे देणारी कायमस्वरुपी कामवाली मिळाल्यासारखं वागवत असतात. तिला घरची सगळी कामं उरकून यायला किंवा कधी बस चुकली म्हणून किंवा कधी इतर काही कारणांमुळे उशीर होतो तेव्हा झाली लगेच त्यावर चर्चा, लगेच लेटमार्क लावला जाणार. कधी मन मोकळं करण्यासाठी त्या दोघी बोलत असतील तर झालं त्यांना लगेच बोलायला सुरुवात करणार. कधी मुलांना बरं नाही म्हणून लवकर गेलं तर त्यावर लेक्चर ऐकावं लागत आणि घरी नाही गेलं तर इकडे हिचा जीव तुटत असतो.
म्हणजे बघा ना ! घरी जरा कुठे कमी पडली तर घरचे बोलणार व ऑफिसमध्ये काही कमी-जास्त झाले तर ऑफिसमधले बोलणार. स्त्रीसाठी खरी तर हि दोन विश्वच असतात. पण दोन्ही ठिकाणी जर कुचंबणा होत असेल, ती भरडून निघत असेल तर नको हे जीवन आता संन्यास घ्यावा व दूर निघून जावं असचं ती म्हणणार ना ?
असचं एक जिवंत उदाहरण माझ्या समोर आहे, अगदी उच्चशिक्षीत इंजिनिअर झालेली ती स्वत:च्या कामात खुप हुशार. बॉस तिच्या कामावर बेहद्द खुष. शिवाय तिचे लव्ह मॅरेज त्यामुळे नवराही प्रेमळ (प्रेमळ कि आपमतलबी कदाचीत) पण बायकोने नोकरी केलीच पाहिजे या मताचा शिवाय तिलाही नोकरीची आवड असल्याने तिचंही व त्यांचही फावलं. पण खरा प्रॉब्लेम तर पुढे होता. त्याच्या आई-वडिलांनी, भावांनी जे कर्ज केलं होतं ते या दोघांना फेडायला सांगतलं. तरीही तिने ते आनंदाने मान्य केलं. घरापासून ऑफिस खुपच लांब असल्याने तिला रेल्वेने प्रवास करावा लागतो. प्रवासात जवळ-जवळ २-२ तास यायला व जायला लागतात. १० वाजता ऑफिस चालू होते. म्हणजे तिला सकाळी ८ वाजता घर सोडाव लागतं. त्यात इंजिनियर असल्याने तिला प्रत्यक्ष साईटवर उन्हात उभं राहूनच काम कराव लागतं त्यामुळे ऊनं व प्रवासाची दगदग याचा खूप त्रास व्हायचा तिला. शिवाय सकाळी ऑफिसला जाताना घरातली सगळी कामं करुन जायचा असा दंडक होता. कामाला बाई तर अजिबात लावायची नाही. शिवाय सुट्टीचा दिवस म्हणजे आरामाचा, पण नाही तिच एवढं मोठं नशीब कुठे ? तिला त्या दिवशी दुप्पट-तिप्पट काम करायला लागतं. पण कुणाकडून साधी मदतीची अपेक्षाही करायची नाही उलट बोलणी मात्र ऐकुन घ्यायची. तरी पण ती कधीच बोलायची नाही. कुणावर रागवायची नाही, वैतागायची नाही. का तर कुणाचं मन दुखावू नये म्हणून.
असचं एकदा ऑफिसच्या कामानिमित्त तिला बाहेरगावी ४ दिवसांसाठी जायला सांगितले होते, तिला एका परदेशी इंजिनिअरकडून खुप काही शिकण्यासारखं होतं. पण स्त्रीने एकटीने कुठे जाणे अजूनही समाजास तितकसं मान्यही नाही व धोक्याचही आहे. तिने त्यांना प्रथम नकार दिला पण तिच्या वरिष्ठांचं म्हणणं होत की तु गेलंच पाहिजेस, तुझंच ते काम आहे, त्यामुळे मग तिने ऑफिसमध्ये सांगितलं की माझ्या सोबत मैत्रिण किंवा पती असतील तरच मी जाईन. तिचे पतीही तयार झाले. ऑफिसमधून तिची व तिच्या पतीची त्या गावी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. जायची सगळी तयारी झाली. निघायच्या ऐनवेळी तिच्या पतीने येण्यास नकार दिला. तिला अक्षरशः रडू कोसळलं, तिने त्यांना अनेक परीने समजवण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ ! त्यांनी तुसुध्दा जायचं नाही असं स्पष्ट सांगितलं. शेवटी नवऱ्यापुढे तिचं काहीही चाललं नाही. त्याला न जुमानता जाता आलं असतं पण पुढे भांडणे वाढली असती. त्यामुळे ति स्वत:च्या मनाला समजावत बसली. एका सुशिक्षीत पुरुषाने केलेला हा मानसिक छळच नाही का ? फक्त स्वरुप वेगळं. दारू पिऊन मारामारी करणारा नव्हता, एरवी तिची कितीही काळजी घेतली, रोज फोन करुन जेवली का हे विचारलं की झालं आणि जेव्हा खरी मदतीची प्रोत्साहनाची गरज असते तेव्हा मात्र तिला मागे खेचणं याचा काय उपयोग ?
ती दुपारी जेव्हा ऑफिसला गेली तेव्हा तिच्या बॉसने बेजबाबदार म्हणून सर्वासमक्ष तिला बोलले. तुम्हाला काम करायला जमत नसेल तर घरी बसा, या शब्दात तिला सांगितलं. जे वरिष्ठ तिच्या कामाची स्तुती करायचे तेच जेव्हा तिला बेजबाबदार म्हणून तिचा या शब्दात अपमान करतात, तेव्हा तिच्या इतके दिवस प्रामाणिकपणे काम केल्याचा काय उपयोग झाला. इथेही तिला बोलणीच खावी लागली. तेव्हा ती म्हणाली, की खरचं या जीवनाचा काय उपयोग… कुणासाठी काहीही केलं तरी कुणी आपला विचार करतच नाही. त्यापेक्षा दूर कुठेतरी निघून जावं व एकटच भरकटत फिरावं. खरचं या सगळ्यात तिचं काय चुकलं, नवऱ्याशी भांडुन ती एकटी गेली नाही हे की, आपला संसार टिकावा म्हणून वादावादी टाळली हे की, एका परदेशी माणसाकडून नविन काही शिकण्याची इच्छा मनात घेतली हे की, ती बाहेरगावी जायला तयार झाली हे की, ती हुशार आहे हे ? तिचं काय चुकलं असेल तर ते हे की तिने कधीच स्वत:चा विचार केला नाही, स्वत:च्या मताची किंमत केली नाही, स्वत:चा मनाचा कौल घेतला नाही व स्वत:च्या इच्छांना नेहमीच पायदळी तुडवले. कधी बाहेरच्यांसाठी तर कधी घरातल्यांसाठी.
हे आणि असचं जीवन जर एखाद्या सुशिक्षीत, उच्च शिक्षीत स्त्रीचं असेल तर अडाणी, गावंढळ म्हणून जगणचं चांगलच ना. कारण त्यामुळे आता जेवढा त्रास तिला होतोय तो तर झाला नसता. ही मुलगी आज कितीतरी जणीचं प्रतिनिधित्व करत आहे. आज प्रत्येक स्त्रियांना या परिस्थितीला समोरे जाव लागतं आहे. ह्या लिखाणाचा माझा उद्देश कुठलेही ऑफिस किंवा कुणाच्याही घराच्यांवर आरोप करण्याचा नाही, तर असा आहे की आज समाजातील जास्तीत जास्त स्त्रिया या नोकरी करणाऱ्या आहेत. तेव्हा ती स्त्री आपली कुणीतरी आहे, कुणाची बायको, मुलगी, बहीण, आई तसेच ती एक संवेदनशील व्यक्ती आहे. तिच्याकडे फक्त इंजिन म्हणून न बघता माणूस म्हणून पाहावे. ती लवचीक, प्रेमळ, वात्सल्यमयी, सहनशील आहे. तिला घरच्यांकडून प्रेमाचे चार शब्द व प्रोत्साहनाचा हात हवाय तर ऑफिसच्यांकडून आपुलकीचे चार बोल व मदतीची अपेक्षा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने ठरवून खरचं मनापासून प्रयत्न केले तर तिला खरच एक मानाचं स्थान मिळेल. जर ती समाधानी, आनंदी असेल तर निश्चित घराचा व समाजाचा विकास होईल, तिला आनंदी ठेवा आणि बघा तिच्या खळखळून हसण्याने अवघं विश्व आनंदाने बहरून जाईल. सारी सृष्टी परत नव्या नवरीसारखी हिरवीसुंदर वाटायला लागेल. तिच्या प्रेमळ बोलांनी पाषाणालाही पाझर फुटतो, तिच्या स्पर्शाने परीसाचेही सोने होते, तिला तुम्ही हात द्या जमेल नसेल कृपया पाय ओढू नका. तिची प्रगती लांबूनच बघत रहा.
मी अंगणातील जाई,
मी तुझीच रे आई
जाते सोडूनी जेव्हा तुजला,
होते भेटण्याची घाई
दिवसरात्र ही तुझ्याचसाठी
लढते ही लढाई
येईन जेव्हा धावत तेव्हा
म्हणशील का रे हळूच आई
सुखी असू दे घरकुल माझे
नमिते देवा तुझ्याच ठाई ॥

– लेखन : अलका माने, रत्नागिरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
Alka Mane apratim Lekh, true story, real situation all working women experience. Neatly draft and well said.
Thank you
🌹खूप सुंदर, स्पष्ट शब्दात आपण हा लेख लिहिला आहे. मोठा गहन विषयाला आपण हात घातला आहे. खरं तर स्त्री चा आदर करन हे आपले कर्तव्य आहे पण सहसा असं घडत नाही.
आज नारिशक्ती प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे पण दोन शब्द स्तुती चे सोडले तर तिच्या नशिबी चूल नं मुलं पाचीला पूजलं आहे.
जितके उच्चशिक्षित तितके मोठे प्रॉब्लेम असतात. जगाकडे एक नजर टाकली तर ही अडचण फक्त आशिया खंडात जास्त आहे.
आपण कितीही पुरोगामी म्हटलो तरी अजून स्त्री बंदिस्त आहे हे खेदान म्हणावं लागते. समान अधिकार अजून दिले काय समाजानं??? तर नाही पुरुष काही करुद्या त्यावर पांघरून घातलं जात पण स्त्री अजूनही घुंगट घालून आहे
आपण आपल्या घरातून सुरवात नाही करत तो पर्यंत अडचण अशीच राहणार.
अलका ताई खूप सुंदर लिहिले आपण. मत प्रदर्शन करावं एवढा अभ्यास नाही माझा
🌹अभिनंदन 🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
धन्यवाद अशोकजी
खुप सुंदर लिखाण मॅडम. या लेखातून आपण आजच्या स्त्री चे वास्तव दर्शी चित्र उभे केले. जे सहसा कोणाच्याही लक्षात येत नाही. पण घडत मात्र बहुतांशी घरात असत.
खूप छान लिहिलं आहे.. आजची परिस्तिथी अशीच आहे.. ☺️🥰
आजची स्त्री अनेक क्षेत्रांत कार्यरत असूनही ती मुक्त आहे का या प्रश्नावर लिहिलेला लेख विचार करायला लावतो
धन्यवाद सतीशजी