आयुष्यात पहिल्यांदाच एकटीने लांबचा प्रवास करायचा योग आला. खूपच गंमत वाटली. आनंदही झाला. चक्क कोणीच बरोबर नाही. सुचना सल्ले काहीच नाहीत. थोडे हिरमुसलेपणही आले. पण काही क्षणा पुरतेच. संवाद स्वतःचा स्वतःशीच. आपणच आपल्या मनाशी मनसोक्त गप्पा मारायच्या. आठवणींच कोलाज करायचं. किती छान. असा निवांतपणा क्वचितच मिळतो नाही का. खूप बरे वाटले. मनात आले अरे इतका साधा आनंद घ्यायला इतकी वर्ष का बरे लागली. सतत कोणत्या ना कोणत्या पाशात अडकलेलं आपलं मन अन् शरीर त्याच्या ही काही मागण्या इच्छा होत्याच ना ? किती दुर्लक्ष केलं आपण. कधी विचारच केला नाही. असे बरेच काही करायचे राहून गेले खरे. मन मागे वळून वळून बघू लागले कारण आता या वयात पुढे फार काही करण्यासारखे नव्हतेच ना.
अनेक मैत्रिणींचे सतत ऐकायला येणारे संवाद आठवू लागले. खर म्हणजे ना मला बँकेत नोकरी करायचीच नव्हती मला शिक्षिकाच व्हायचे होते. मी उगाचच engineer झाले. बाबा पाठीमागे लागले म्हणुन. नाहीतर काहीतरी वेगळेच केले असते. खूप कला होत्या ग अंगात. घर संसारात सगळ्या गंजून गेल्या बघ. चुलीत गेल्या. मीच मला विसरले. मला तर लग्नचं करायचे नव्हते. हे आणि असेच अनेक निःश्वास अन् सुस्कारे. कमालीची खंत. मन खिन्न झाले. विचारांचा भुंगा मन पोखरू लागला.
खरे म्हणजे या शब्दा मागे किती खोल अर्थ दडलेला आहे नाही का. आपण खोटे खोटे जगतो का ? की तस जगावच लागते ? खरे म्हणजे हा शब्द आपल्या आयुष्याचा एक अपरिहार्य आणि अविभाज्य भाग झाला आहे का ? की आपणच तो आपल्यासाठी कुंपण घालून घेतला आहे ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जबाबदार कोण ? आपणच आपले की इतर कोणी ? आपणच आपले. आपला स्वभाव आपल्या रूढी परंपरा संस्कार समाज बंधनांचा उगाचच केलेला बागुलबुवा. सतत कशाच्या तरी दडपणाखाली रहाण्याची आपली मानसिकता. सतत कोणाचे तरी ऐकायची सवय. मग तो नवरा, मुल, मैत्रिणी नातेवाईक अगदी शेजारीही कोणीही असोत. निर्णय घेण्याची भीती किंवा कमी पडलेला आत्मविश्वास. आणि प्रकर्षाने याची जाणीव या एकटे पणाने करून दिली. खूप हलकं हलक वाटल. एक नवी मी माझ्यातच मला दिसू लागले. सगळ जगच बदलून जाणार की काय असं वाटू लागलं. नकळतच हसू आल. खूप मोकळं मोकळं वाटल. मस्त गरमा गरम भजी खाल्ली. वर वाफाळलेला चहा घेतला. स्वतःची स्वतःलाच कंपनी. अहाहा क्या बात है मनात आल. इसकी मजा तो कोई औंरच है.
दारात उभ राहून धाड धाड जाणाऱ्या गाडीच्या वेगाचा ताल त्याबरोबर पाळणाऱ्या निसर्गाची लय आणि भन्नाट वाऱ्याचा स्वर पकडताना अविस्मरणीय आनंद मिळाला. जणू पंखात बळ आले होत. ते भरारी मारू पहात होत. मोकाट सुटल होत.. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्याचा सपाटाच लावला होता. कोणीतरी कुजबुजत होत. या वयात हे शोभत का. नुसतीच हसले मग त्यांच्याशीच जाऊन मस्त गप्पा मारल्या. गाणी पत्ते विनोद किस्से काय नाही ते सगळे झाले. कोणीतरी भेळ आइस्क्रीम मागवले. मनसोक्त आस्वाद घेतला. न लाजता परत मागून घेतले. असे कधी घडलेच नव्हते. कारण अनेक बंधने अनोळखी लोकांशी बोलू नये. प्रवासात फार खाऊ नये आणि जवळीक ती तर अजिबातच नको. कोण कसा हाच विचार कायम. आज सगळेच वेशीला टांगले. मुक्त झाले. चक्क वरच्या बर्थ वर जाऊन थोडी झोपही काढली. जमतच नव्हते तरी प्रयत्नांती परमेश्वर. फ्रेश झाले. प्रवास सकाळीच सुरू झाला होता. आता संध्याकाळचे ६ वाजायला आले होते. मन मागे वळून वळून बघत होत आणि पुढचे अनेक बेत आखत होते स्वप्न बघत होते स्वच्छंद पणाने.
फोन च्या रिंग ने तंद्री भंग पावली. भानावर आले. बहुतेक बराच वेळ फोन वाजत होता. गडबडीने घेतला. मिस्टर व मुल विचारात होती. गाडी वेळेत सुटली ना एकटीच आहेस कंटाळा नक्कीच आला असेल ना. काळजी घे. फार काही खाऊ नको कोणाशी जास्त बोलू नको. वगैरे वगैरे सूचनांचा गठ्ठा. लक्षात आले आज कधी नव्हे ते उलटेच घडले होते. तत्परतेने सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याच आहेत असे समजून अगदी लगेच तातडीने फोन करण्याचीही. हेच मी विसरून गेले होते. मला गृहीत धरणाऱ्या ना मीच गृहीत धरले होते. एक पाऊल पुढे पडले होते.आणि मला ते आवडले होते. बकेट लिस्ट मनातल्या मनात तयार होत होती. आणि नकळत फोन नंबर फिरवला गेला. ऍडमिशन confirm करण्यासाठी. अहो कसली काय विचारता व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा करायचा विचार बरेच महिने मनात होता. त्याचीच ऍडमिशन हो… आणि अंजू च्या msg ला ही रिप्लाय दिला बर. लिहून टाकल येत आहे ladies spl काश्मीर ला नाव दे.. मन गुणगुणू लागलं
एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
हरवेन मी हरपेन मी
तरी ही मला उमगेन मी
— लेखन : मीरा जोशी.
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800