अखेर मृत्यूशी चांगला तीन आठवडे लढा देऊन आमच्या विजया वहिनी (माझे आतेभाऊ, कै.रंगनाथ जानुजी रोडे उर्फ तात्या यांची पत्नी, राहणार अकोला) काल ८८ व्या वर्षी गेल्या.
खरं म्हणजे तीन आठवड्यापूर्वी वहिनींना अचानक ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो पर्यंत त्यांची दैनंदिन दिनचर्या शिस्तबध्द रित्या सुरू होती. पहाटे चार वाजता उठून योगासने करून त्यांची दिवसाची सुरुवात होत असे. पुढे दैनंदिन वृत्तपत्रांचे वाचन त्या मनापासून करीत. त्यांचा बोलका स्वभाव असल्याने त्यांना भेटण्यास येणाऱ्यांना खुप आनंद मिळत असे.
त्यांच्या जाण्याचे माझ्यासाठी अतीव दुःखाचे कारण म्हणजे माझ्या बालपणाशी दुवा असणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती राहिल्या होत्या. आज त्या ही गेल्या. खरं म्हणजे, त्या ऍडमिट झाल्या पासून त्यांना कधी एकदा भेटतो, असे मला वाटत होते. पण माझेच पोटाचे मोठे ऑपरेशन झाल्याने मुंबई सोडता येत नव्हते. त्यांची शेवटची भेट झाली नाही, ही रुख रूख कायमची अंतरी राहील. असो….
खरं म्हणजे आजची आर्थिकदृष्ट्या श्रीमंत पण दुर्मुखलेली माणसं, एकमेकांशी दुरावलेले नाते संबंध पाहिले की मला वहिनींविषयी खुप कौतुक, आदर वाटत असे. माझे आतेभाऊ, तात्या, हे काही फार शिकलेले नव्हते. पण वेल्डिंग काम मात्र शिकले होते. बरीच वर्षे ते नानोटी च्या कारखान्यात काम करीत होते पण मोठ्या मुलीच्या लग्नासाठी राजीनामा देऊन मिळालेल्या पैशातून त्यांनी तिचे लग्न करून दिले. पुढे मिळेल ते काम करत त्यांनी गुजारा केला.
अशा आर्थिक ओढाताणीच्या परिस्थितीतही वहिनींनी ना कधी देवाला दोष दिला ना नवऱ्याला दोष दिला. “सदा निभे” असे त्यांचे वागणे असे आणि चेहऱ्यावर सतत समाधान राही. अशा सर्व परिस्थितीत या दोघांनी आपल्या २ मुलांची, ३ मुलींची शिक्षण, लग्न कार्ये केलीत.
मला एका गोष्टीची नेहमी गंमत वाटत असे. खरं म्हणजे, त्यांची मोठी मुलगी रेखा आणि मी एकाच वयाचे होतो. तरी त्या मला नेहमी अहो, जाहो करीत. मी त्यांना नेहमी म्हणत असे, की वहिनी, मला अहो, जाहो करू नका बरं, मी तुमच्याहून वयाने किती लहान आहे, म्हणून. पण त्या लटक्या रागाने म्हणत, अरे वा, असे कसे ? तुम्ही लहान झाले म्हणून काय झाले ? माझे तर दिर आहात ना ?
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची स्मरणशक्ती, फार तल्लख होती. त्यामुळे मी भेटलो की, माझ्या लहानपणाच्या एकेक आठवणी त्या छान रंगवून सांगत. त्यामुळे मी साहजिकच पुन्हा लहानपणात जात असे. आपले पद, प्रतिष्ठा विसरून होणारा निर्भेळ आनंद त्यावेळी मिळत असे. आपण अजूनही कुणापुढे लहान आहोत, ही भावना खूप सुखकर वाटायची.
एक आनंदाची गोष्ट मला सतत समाधान देत आली, ती म्हणजे त्यांची दोन्ही मुले, प्रवीण आणि प्रनील, मुली सौ रेखा, सौ शशी, सौ मंजू तिन्ही जावई, सूना, नातवंडे यांनी त्यांची शेवटपर्यंत मनापासून काळजी घेतली. भाड्याच्या घरात आयुष्य गेलेल्या वहिनींना दोन्ही मुलांच्या स्वतःच्या घरात राहण्याचे सुख मिळाले. शेवटची वर्षे त्यांची पूर्ण आनंदात गेली. या सर्वांचेच मनःपुर्वक आभार. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.👃
— लेखन : देवेंद्र भुजबळ. निवृत्त माहिती संचालक. नवी मुंबई.
☎️ 9869484800