नमस्कार 🙏
“ओठावरचं गाणं” या नवीन सदरात सर्व रसिकांचं मन:पूर्वक स्वागत.
आजच्या गाण्याच्या गीतकार आहेत ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके, यांनी काव्याच्या प्रांतात मुशाफिरी करताना बालकविता, भक्तीगीतं, भावगीतं, प्रेमगीतं, नाट्यगीते, युवागीतं, देशभक्तीपर गीतं असे सर्व प्रकार समर्थपणे हाताळले आहेत.
त्यापैकी काही गाणी सांगायची झाली तर “अपर्णा तप करीते काननी”, “असता समीप दोघे” “एकटेच येणे येथे”, सजणा का धरिला परदेस”, किलबिल किलबिल पक्षी बोलती”, “तोच चंद्रमा नभात” दाटून कंठ येतो”, “मराठी पाऊल पडते पुढे” अशी अनेक गाणी जी सदैव आपल्या ओठांवर खेळत असतात.
आज मी शांताबाई शेळके यांनी लिहिलेल्या “हि चाल तुरुतुरु” या गाण्याचं रसग्रहण करणार आहे. जयवंत कुलकर्णी यांच्या खेळकर आवाजातील उडत्या चालीच्या या सदाबहार गाण्यानं रसिकांच्या ह्रदयाचा असा काही कब्जा घेतला कि वाद्यवृंद कोणताही असो
“ही चाल तुरुतुरु” या गाण्याच्या फर्माईशी शिवाय किंवा हे गाणं ऐकल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण झाला असं वाटत नसे.
ही चाल तुरुतुरु उडती केस भुरूभुरू
डाव्या डोळ्यावर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात नागीण सळसळली
संगीतकार देवदत्त साबळे यांचं संगीत सुरू झालं कि प्रथम ते आपल्या पायांचा ताबा घेतं आणि नंतर शांताबाईंचे शब्द आपल्या काळजात अक्षरशः घुसतात. कारण हे वर्णन आहे एका मदमस्त सुंदरीचं. जिची चाल पाहिल्यावर हजारो ह्रदयं घायाळ होतायत. पण ती मात्र स्वतःच्या तो-यात चालली आहे. हजारो ह्रदयं घायाळ करणाऱ्या या सुंदरीची चाल म्हणजे, संध्याकाळच्या उन्हात केवड्याच्या बनातून सळसळत जाणा-या नागिणीची चाल जशी क्षणभरासाठी मंत्रमुग्ध करते, तशीच या तरुणीची चालही आकर्षक आहे, मंत्रमुग्ध करणारी आहे.
इथं कुणी आसपास ना
डोळ्यांच्या कोनात हास ना
तू जरा माझ्याशी बोल ना
ओठांची मोहोर खोल ना
तू लगबग जाता मागे वळून पहाता
वाट पावलात अडखळली
या युवतीच्या चालीवर तिचा आशिक बनलेला हा प्रेमवीर तिला सांगतोय “राणी, मी तुझा पाठलाग करत असा तुझ्या मागे मागे आलोय. आपल्या दोघांशिवाय आत्ता इथे तिसरं कुणीही नाहीए तर जरा थोडंसं थांबून डोळ्यांच्या कोपऱ्यातून हळूच तिरपा कटाक्ष फेकत माझ्याशी मधाळ शब्दात बोललीस, तर तुझ्या ओठांची मोहोर माझ्यासाठी उघडल्याचं समाधान मला मिळेल. सुंदरी तू घाईघाईने जाताना नुसतं मागे वळून पाहिलंस ना तरी मी कृतकृत्य होईन. बघ, तू माझं ऐकलंस आणि जाताजाता माझ्याकडे कटाक्ष फेकल्यावर ही पायवाट देखील आता पावलांमधे अडखळायला लागली.
उगाच भुवई ताणून
फुकाचा रूसवा आणून
पदर चाचपून हातानं
ओठ जरा दाबिशी दातानं
हे सुंदर तरुणी, तू रागाने माझ्याकडे पहात असलीस तरी मला ठाऊक आहे तुझा हा वरवर दिसणारा रूसवा दिखाऊ आहे. कारण स्त्री सुलभ लज्जेमुळे तू मधेच पदर सारखा केल्याचा आविर्भाव करतेस, मधेच तो व्यवस्थित आहे की नाही हेही चाचपून पहात आहेस आणि चुकून आपल्या तोंडून प्रेमाचा एखादा शब्द बाहेर पडू नये म्हणून ओठही दाताखाली दाबून धरते आहेस.
हा राग जीवघेणा
खोटा खोटा ग बहाणा
आता माझी मला खूण कळली.
तुझा हा रागावल्याचा आविर्भाव आणि बाकी सा-या अदा पाहून माझा जीव उगाचच जळतो आहे, पण तुझ्या या सगळ्या आविर्भावातून मला मात्र माझ्या प्रेमाची खूण पटली एवढं अगदी नक्की.
जयवंत कुलकर्णी हे माझे आवडते गायक आहेत आणि संगीतकार देवदत्त साबळे यांनी फार थोड्या गाण्यांना संगीत दिलं आहे, पण शांता शेळकेंच्या या गाण्यानं रसिकांच्या हृदयात जे स्थान मिळवलं त्याला तोड नाही.

– लेखन : विकास मधुसूदन भावे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
अत्यंत योग्य आणि अर्थपूर्ण शब्दांचा वापर करून श्री. विकास भावे यांनी रसग्रहण केले आहे. आता हे गाणे ऐकतांना जास्तच मजा येईल. आणि विकास भावे हे गाणे फार छान गातात सुद्धा हे बऱ्याच जणांना माहिती नसेल.
अभिनंदन नव्या उपक्रमाबद्दल आणि शुभेच्छा!!
धन्यवाद अरूण 🙏
अत्यंत योग्य आणि अर्थपूर्ण अशा शब्दात गाण्याचे रसग्रहण श्री. विकास भावे यांनी केले आहे. त्यामुळे आता हे गाणे ऐकायला जास्तच मजा येईल. श्री. विकास भावे हे गाणे फार छान गातात सुद्धा हे बऱ्याच जणांना माहिती नसेल.
अभिनंदन!!
धन्यवाद अरूण 🙏
झकास विकास !! Re-living college day picnic time. Remember डाव्या डोळ्यावर बट्ट ढळली and recollect non marathi guy asking the meaning of butt
धन्यवाद संजय🙏
विकास किती सुंदर रसग्रहण केले आहेस..फार फेमस गाणे आहे…कविच्या कल्पना तू छान रंगवून समजावून ..सोप्या शब्दांत
सांगितल्या आहेस…Keep it up
धन्यवाद रेखा 🙏
गाण्याचे रसग्रहण फारच छान केलंय की डोळ्यापुढे चित्रच
साकारले गेले.
मला पुर्वी रेडियो वरच्या ‘भावसरगम’ कार्यक्रमाची
आठवण झाली.
तुमच्या या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा.
धन्यवाद आशा 🙏
विकासजी…
“ही चाल तुरुतुरु “हे ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचे गाणे
तारुण्य बेधुंद करून टाकते.
या गाण्याशिवाय पिकनिक अपुरी राहते.
सहज सोपी गुणगुणत रहावी अशी सुंदर चाल
संगीतकार देवदत्त साबळे यांनी दिली आहे.त्यावर कहर म्हणजे जयवंत कुलकर्णी यांचा साजेसा आवाज.
आपण सुंदर रसग्रहण वाचून पुन्हा जवानीत
गेल्यासारखे झाले.
खूप सुंदर आणि शुभेच्छा👌👌👍🌹
धन्यवाद विजयजी 🙏
विकासजी…
“ही चाल तुरुतुरु “हे ज्येष्ठ कवयित्री यांचे गाणे
तारुण्य बेधुंद करून टाकते.
या गाण्याशिवाय पिकनिक अपुरी राहते.
सहज सोपी गुणगुणत रहावी अशी सुंदर चाल
संगीतकार देवदत्त साबळे यांनी दिली आहे.त्यावर कहर म्हणजे जयवंत कुलकर्णी यांचा साजेसा आवाज.
आपण सुंदर रसग्रहण वाचून पुन्हा जवानीत
गेल्यासारखे झाले.
खूप सुंदर आणि शुभेच्छा👌👌👍🌹
विकास भावे यांनी या गाण्याचं रसग्रहण छान केले आहे. माझी या गाण्याबद्दल थोडी वेगळी आठवण आहे. हे गाणे त्याच्या चालीमुळे विशेष लोकप्रिय झाले. सहज म्हणता येण्यासारखे, ठेका धरता येण्यासारखे . जयवंत कुलकर्णी आमच्या पार्ल्यातले. आणि हे गाणं प्रसिद्ध झालं तेव्हां आम्ही शाळकरी मुलं होतो आणि आताच्या काळातील मुलांसारखी समज(?) मुळीच नव्हती.बावळटच. पण सारेच. तर, त्यातील ही चाल तुरु तुरु ..एव्हढंच आम्हांला म्हणायला आवडायचे. पुढचा अर्थ डोक्यावरून. आमच्यापैकी कोणी मधेच फास्ट चालू लागले की ही ओळ म्हणायचो नि फिदीफिदी हसायचो. जयवंतकाका टिळकमंदिरात कार्यक्रम करायचे तेव्हां त्यांच्या घरून तबला,पेटी ,डग्गा नेणे हे आम्हां वानरसेनेचे काम.(तेवढाच संगीताशी संबंध) त्याकाळी रिक्षा, टॅक्सी वगैरे चैन नव्हती.मग दिसतील त्या पोरापोरींना पिटाळले जायचे.आम्हांला आवडायचे कारण छान छोटासा बंगला, त्यांत गुलाब,चाफा इ . फुलझाडे .काका बहुदा घरात नसायचे. त्याकाळी दारे उघडीच असायची.आम्ही बाहेरून काकूला आवाज द्यायचो.त्या लगबगीने यायच्या, खूप गोड हसून साहित्य देण्यापूर्वी आम्हांला खाऊ द्यायच्या , फुले द्यायच्या.आम्हांला वाटले होते की गाणेही काकांनीच लिहिले आहे म्हणून मी एकदा त्यांना विचारले, तुम्ही तुरुतुरु चालता म्हणून काकांनी लिहिले ना ..त्यावर सारे मोठ्याने हसले ..पटून.. आणि त्यावेळी काकू ज्या लाजल्या ते अजून लक्षांत आहे. मग त्या दिवसानंतर , काकूंना आवाज द्यायचा म्हणजे आम्ही ..”ही चाल तुरु तुरु …” मोठ्याने गायचो .गायचो कसले …नरड्यापासून …😄 काकू खाऊ घेऊनच बाहेर…
सूर आणि ठेकाच लक्षांत आणि सहलीला अन्ताक्षरीसाठी म्हटले जाणारे गाणे तुमच्या सुरेख रसग्रहणामुळे आज परत एकदा नीट वाचले.मात्र खूप वर्षांनी त्या बंगल्यापर्यंत धडकून आले.🤗
नीला मॅडम, खूपच छान आठवण सांगितली तुम्ही. मलाही हे गाणं खूपच जवळचं आहे.गाण्याच्या भेंड्या, गणपती उत्सवातील सार्वजनिक कार्यक्रम अशा ठिकाणी माझी याच गाण्याला पसंती असायची….. अजूनही आहे…. सविस्तर अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
नीलाजी, आपण खूपच छान, दिलखुलास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपले मनःपूर्वक आभार. आपण आपली ही प्रतिक्रिया व आपले छायाचित्र कृपया मला माझ्या +919869484800 या मोबाईल क्रमांकावर पाठवाल का ? – देवेंद्र भुजबळ, संपादक,न्यूज स्टोरी टुडे.
गाण्याचे रसग्रहण फारच छान केलंय की चित्र डोळ्यासमोर येते.
मला पुर्वीच्या रेडीयो वरिल ‘भावसरगम’ कार्यक्रमाची आठवण होते.
धन्यवाद आशा🙏
रसग्रहण फारच छान केले आहे.
मला पुर्विच्या ‘भावसरगम’ या रेडीयो वरिल कार्यक्रमाची
आठवण झाली.
गाण्या इतकेच छान रसग्रहण !👍
धन्यवाद अनिल🙏
सुंदर रसग्रहण केले आहे आपण🙏🏻
धन्यवाद मॅडम 🙏
तुझी चाल तुरुतुरु हे शांताबाई यांनी लिहिलेल्या गाण्याला देवदत्त साबळे यांनी अतिशय सुंदर चाल लावली आहे व जयवंत कुलकर्णी यांनी सुध्दा ते सुरेल गायले आहे. भावे यांनी रसग्रहणासाठी या गाण्याची निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
धन्यवाद विवेक 🙏
‘ही चाल तुरतुरु’ या शांताबाईंच्या गाण्याचे योग्य ते रसग्रहण विकास भावे यांनी केले आहे.मला आठवतंय हे गाणं आमच्या नाते सुरांचे..मायबोलीचे या कार्यक्रमात नेहमी असायचे पण ‘स्त्री चे असे मनमोहक वर्णन करणारा कवी कोण असेल बरे ”हे विचारल्यावर प्रेक्षकांत क्वचितच कुणी सांगू शकत होते.
या गाण्यात कादंबरीत असते त्याप्रमाणे गोरा रंग ,गुलाबी गाल ,चाफेकळी नाक असे वर्णन नसून तिच्या विभ्माचे वर्णन आहे त्यामुळे ते त्या स्त्री चे चलतचीत्र च रेखाटते. विकास जी हे गाणे निवडून आमच्या मनातले गाणे ओठावर आणलेत.धन्यवाद.
धन्यवाद मेघनाताई
गाण्याची आठवण खूप छान आहे. भावे सरांचे अभिनंदन
धन्यवाद रामदासजी 🙏
धन्यवाद मेघनाताई