नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत! कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांची गाणी होऊन रेडिओवर जेंव्हा निरनिराळ्या गायक गायिकांच्या आवाजातून रसिकांपर्यंत येत असत त्यावेळेस पाडगावकरांच्या गाण्यांनी हे संगीत विश्व किती समृद्ध केलं आहे याची जाणीव आता ती गाणी आठवली कि आपल्याला होत रहाते. “उन असो वा असो सावली, “जाहल्या काही चुका”, “गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे”, जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा” अशा काही गाण्यांप्रमाणेच कविवर्य मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली एक विराणी आज आपण पहाणार आहोत ज्याचे शब्द आहेत –
डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली
वचने मला दिलेली विसरून रात्र गेली
“मी लवकरच तुला भेटायला नक्की येतो…माझी वाट पहा… मी आल्यावर आपण नक्की लग्न करू … तोपर्यंत तू तुझ्या घरच्यांना काही काही सांगू नकोस ” अशी विविध आश्वासनं देऊन तिच्यापासून दूर निघून गेलेल्या तिच्या प्रियकराला भेटायला ती आता अतिशय उत्सुक आहे. मात्र प्रत्येक रात्र तिला फसवते आहे आणि दिवस मात्र “अगं, आजची रात्र उलटली कि उद्या तुझा प्रियकर तुला भेटायला नक्की येतो कि नाही ते बघ” अशी वेडी आशा दाखवतो आहे. ती म्हणते आहे कि आज मात्र माझं मन निराशेने ग्रस्त आहे. एकीकडे दिवसा तुझ्या आठवणी मनाला अस्वस्थ करतात. दुसरीकडे आशेची निरांजनं तेवती ठेवत मी तुझी रात्रभर वाट पहाते आणि रोज येणारी पहाट मला सांगते कि वेडे आजची रात्रही तुला दिलेलं वचन विसरली आणि आली तशीच निघून गेली. त्यामुळे औदासिन्याची छाया माझी पाठ सोडत नाहीये.
डोळ्यात जन्म सारा दाटून डोह झाला
अश्रूत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली
सुखी संसाराची किती स्वप्नं माझ्या डोळ्यात तरळत होती. तुझी आजन्म मिळणारी साथ तुझ्या आश्वासनांमधून त्या स्वप्नांना अधिकच फुलवत होती. मी ही त्या स्वप्नांचे पंख लावून आशेच्या हिंदोळ्यावर झोके घेत होते. त्यावेळेस असं वाटायचं कि माझ्याइतकं सुखी, माझ्याइतकं आनंदी या जगात कुणीच नसेल. ते सारे क्षण आठवणींचा डोह बनून डोळ्यात साठून राहिले आहेत. पण तुझ्या आश्वासनांचा त्याभोवती असलेला मुलामा आता हळूहळू निघून चालला आहे. आपल्या प्रत्येक भेटीला साक्ष असणारा चंद्रदेखील आज डोळ्यातून वाहणाऱ्या या अश्रूंमध्ये विखरून गेला आहे. तुझ्या आठवणींनी मला सतावणारी ही रात्र माझी असली तरी ती मला सुखाच्या वाटेवर न नेता निराशेच्या खोल गर्तेत ढकलते आहे जिथे फक्त औदासिन्य आणि नैराश्याचा अंधार आहे. ती देखील तुलाच का बरं धार्जिणी व्हावी?
मी मानिले मनाशी माझेच सर्व तारे
स्वप्नात हाय माझ्या बहरून रात्र गेली
तुझ्या सहवासात मी फुलत गेले, उमलत गेले, बहरत गेले. आपल्या भोवतालचा निसर्ग, बागेतील वृक्ष, लता, वेली, इतकंच काय आकाशातील तारे आणि आपल्या दोघांच्या भेटीचा महत्वाचा साक्षीदार म्हणजे चंद्र, तसंच पौर्णिमेच्या कित्येक रात्रींचा पूर्ण चंद्र….. थोडक्यात सांगायचं तर निसर्गाच्या सानिध्यात फुलणाऱ्या आपल्या प्रेमाचा प्रत्येक साक्षीदार मी आपला मानला होता. मला दु:ख मात्र याचं वाटतं की तुझ्या आठवणींमध्ये मला चिंब भिजवणारी ही रात्र प्रत्यक्षात मला फसवत राहिली आणि तुझी वाट पहाताना जरा कुठे चुकून माझा डोळा लागला तर तेवढ्या अवधीत माझ्या स्वप्नांच्या कळ्या ती फुलवत गेली. प्रत्यक्षात ही रात्र तर मला फसवतेच आहे पण आता तुझ्या न येण्याने इतके दिवस माझ्या मनात असलेल्या तुझ्याबद्दलच्या विश्वासाला मात्र सुरूंग लागला आहे.
संगीतकार अनिल अरूण यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अनुराधा पौडवाल यांनी आपल्या आर्त आवाजात गायलेलं हे गाणं नंतरही खूप वेळ आपल्या मनात रेंगाळत रहातं.

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान परीक्षण👌👌👌
रसग्रहण फारच मस्त.
नेहमी प्रमाणे उत्तम …
गाण ऐकलच पाहिजे आता …
फारच छान
धन्यवाद गौरव 🙏
मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली व अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही विराणी आजही लोकांच्या हृदयात स्थान करून आहे. या गीताचे आपण केलेले रसग्रहण उत्तम जमले आहे. रसग्रहणासाठी आपण करत असलेली गाण्याची निवड ही खरोखरच वाखाण्यासारखी आहे.