Monday, May 19, 2025
Homeसाहित्यकृष्ण : १० कविता

कृष्ण : १० कविता

१. गोपिका आल्या

आल्या गं बाई, आल्या गं
आल्या-आल्या-आल्या-आल्या
दहीहंडी फोडाया गोपिका आल्या !!धृ!!

थरावर थर रचलेत सात
सातच्या आत जायचयं घरात
भरभर लावा खांद्याला हात
चिंब पाण्याने साऱ्या भिजल्या
दहीहंडी फोडाया गोपिका आल्या !!१!!

गिरगावच्या आल्या नाचत-नाचत
दादरच्या आल्या मिरवत-मिरवत
ठाण्याच्या आल्या गर्जत-गर्जत
कल्याणच्याही सावध झाल्या
दहीहंडी फोडाया गोपिका आल्या !!2!!

आकाशाला तिची नजर भिडली
गोपिका ती सरसर चढली
मोठ्या हिंमतीने तिने हंडी फोडली
गौळणी या खेळात रंगल्या
दहीहंडी फोडाया गोपिका आल्या !!3!!

आल्या बाई..दहीहंडी फोडाया गोपिका आल्या.

सुरेखा गावंडे

– रचना : सुरेखा गावंडे. कल्याण-पूर्व

२. कृष्ण

कृष्ण एक दैवत
कृष्ण एक शक्ती
कृष्ण वात्सल्य मूर्ती
कृष्ण केवळ भक्ती. १

कृष्ण प्रेम राधेचं
कृष्ण मैत्री सुदामाची
कृष्ण समर्पण मिरेचं
कृष्ण सारथ्य पार्थाची. २

कृष्ण दुत पांडवांचा
कृष्ण काळ जरासंधाचा
कृष्ण पुत्र वासुदेवचा
कृष्ण मृत्यू कंसाचा. ३

कृष्ण एक पथदर्शक
कृष्ण रचयिता गितेचा
कृष्ण एक योगेश्वर
कृष्ण सागर ज्ञानाचा. ४

कृष्ण सूर बासरीचा
कृष्ण गोपाल गाईंचा
कृष्ण लाडला यशोदेचा
कृष्ण कन्हैया नंदाचा. ५

कृष्ण वेड गोपींचे
कृष्ण नृत्य नर्तकींचे
कृष्ण रास गोकुळ वासींचे
कृष्ण वंश यादव कुळींचे. ६

कृष्ण शिष्य सांदिपनींचा
कृष्ण गुरू साऱ्या विश्वाचा
कृष्ण एक स्तंभ धर्माचा
कृष्ण एक मानक कर्माचा. ७

कृष्ण पती रूक्ष्मणीचा
कृष्ण राजा द्वारकेचा
कृष्ण पिता प्रद्युम्नचा
कृष्ण मित्र सुदामाचा. ८

कृष्ण एक माखनचोर
कृष्ण एक गिरीधारी
कृष्ण एक रणछोड
कृष्ण एक बांकेबिहारी. ९

कृष्ण मृदुल बिहारी
कृष्ण सुदर्शन धारी
कृष्ण कुंज बिहारी
कृष्ण पितांबर धारी. १०

कृष्ण एक स्वाध्याय
कृष्ण एक रुप
कृष्ण एक ध्यास
कृष्ण एक स्वरुप. ११

कृष्ण कृष्ण राधे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण राधे गोविंद
कृष्ण कृष्ण हरे कृष्ण. १२

प्रकाश शर्मा

– रचना : ओम प्रकाश शर्मा.

३. श्रीकृष्ण

कंसाच्या त्रासाने, व्याकुळले चराचर ।
भगवंताने वचनासाठी, घेतला अवतार ।।

एक आंनद घनश्याम, निर्गुण निराकार ।
रक्षण करण्यासाठी, मग झाले साकार ।।

निर्माता पालनकर्ता, तुला काय कुणाची भीती ।
रोहिणी नक्षत्र अष्टमी, आला काळ्या राती ।।

बंदिगृहामध्ये जन्माला, देवकीच्या उदरी ।
गोकुळात येऊन, सुख यशोदेच्या पदरी ।।

वेड लावले गोपिकांना, वाजवून तू मुरली ।
राधा झाली प्रियसी, कृष्णा मध्ये विरली ।।

बातमी कळली मामाला, तिकडे हाहाकार ।
इकडे तारणहार आला, म्हणून जयजयकार ।।

धर्म रक्षण्यासाठी, सारथी सुद्धा झाले ।
रणांगणी पार्थाला, गीता ज्ञान दिले ।।

घाला देवा पदरी, होईल जो जो गुन्हा ।
श्रीकृष्ण गोविंदाला, वंदन पुन्हा पुन्हा ।।

रामदास आण्णा

– रचना : रामदास आण्णा. बुलढाणा

४. बासरी

कृष्ण सांगे बंसी ला आकृष्ट कर मन
चोरायाचे चित्त गोपिकांना भुलवून ।।ध्रु।।

कुंजवनी पंचा हतरला भूवरी कृष्णानं
त्यावर ठेवली बासरी पाही कौतुकानं
बन्सीला सांगे केली तुझी सेवा प्रेमानं ।।1।।

हाताचा दिधला बिछाना घेऊन करांत
आधाराची केली कुशी तुला अलगद
बोटांनी देत होतो तुझे अंग चेपून ।।2।।

पावा वाजवितां हलवायचो केशसंभार
केसांनी घालायचो वारा अलवार
फुंकिता तुज मधुर स्वर येती बंसीतुन ।।3।।

कुंजवनी मधुर वेणू वाजवी श्रीरंग
गवळणी आल्या ऐकून स्वर झाल्या दंग
विसरल्या संसार घरदार देहभान ।।4।।

यमुने काठी रासक्रीडा चालू झाली वनांत
महादेव स्त्रीरूप घेऊन रमले खेळांत
ओळखले महेशां घेतले मिठीत कृष्णानं ।।5।।

कृष्णांचे करांत मुरली चक्र सुदर्शन
द्वारकेचा राजा पण सुदामा मैत्री जपून
अर्जुनाचा सारथी राहे बहुरूपी बनून ।।6।।

अरुण गांगल

– रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड

५. काव्य प्रकार : गौळण  (वर्ण 12)

कान्हा
कान्हा…मज फसवू नको श्रीहरी
मला रे…रुपदर्शन दे मुरारी ॥धृ॥

यशोदेचा कान्हा, हाय लई थोर
गोपियांचा हाय, बाई चित्तचोर
कसा आला… जन्म देवकी घरी
मला रे.. रुपदर्शन दे मुरारी ॥१॥

गोप गोपी सा-या वाट आडविती
तुज प्रेमे दिनरात आळविती
वसलासी आमुच्या… हृदयांतरी
मला रे… रुपदर्शन दे मुरारी ॥२॥

गळ्यामंधी घाली.. तुळशीची माळ
पायामंधी वाजे.. छुम छुम चाळ
यशोदेचा कान्हा.. नटखट भारी
मला रे…रुपदर्शन दे मुरारी ॥३॥

शोभा कोठावदे

– रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई

६. दृष्ट

कान्होबाला दृष्ट झाली
किरकिर करितो संध्याकाळी
उगा राहिना गा उगा रहिना ll ध्रु ll

मीठ मोहऱ्या घेऊन हाता
दृष्ट कधी यशोदा माता
दृष्ट उतरेना ग उगा राहीना ll१ll

लिंब लोण घेऊन हाता
दृष्ट काढी देवकी माता
दृष्ट उतरेना ग उगा राहीना ll२ll

धावत आली राधा राणी
खुदकन हसले चक्रपाणी
उगा राहिला ग उगा राहिला ll३ll

रानफुले ती हाती घेऊन
राधा उतरी कृष्णा वरूनी
दृष्ट उतरली ग उगा राहिला ll४ll

नलिनी कासार

– रचना : नलिनी कासार. पुणे

७. पान्हा

पान्हा अमृताचा निरंतर वाहे
मुख तयाचे स्तनाशी लागता

कृष्ण बघता समाधान पावे
झाली धन्य धन्य गोमाता

नयनांतूनी वात्सल्य झरझरे
पोटी तव माया नी ममता

बाल होऊनी तान्ह्या संगे
वंदन करीतो तुज हे भगवंता

– रचना : नेहा हजारे. ठाणे

८. भगवान श्रीकृष्ण

अधर्माचा नाश कराया जन्मला
यशोदेपोटी कान्हा
अवघ्या जगाला दिला
गीता माऊलीचा पान्हा

भगवान श्रीकृष्णाने कृपा केली
भगवद्गीतेतून संपूर्ण विश्वावर
कर्मयोगाचा सिद्धांत
जादू करतो प्रत्येक निराश मनावर

सकारात्मक ऊर्जेतून दिला
पांडवांसह द्रौपदीला आत्मविश्वास
दुष्टांचा नाश करून घेतला
प्रजेच्या कल्याणाचा ध्यास

जगातल्या सर्व समस्यांचं निराकरण
पाच हजार वर्षांपूर्वी केलं श्रीकृष्णाने
कानात प्राण गोळा करून
ऐकलं ते लाडका सखा अर्जुनाने

जन्माला येताच श्रीकृष्णाने
दुष्ट पुतनेला संपवले
पापी कंसाचे सर्व डाव
या केशवाने धुळीत मिळवले

सत्वगुणी पांडवांची बाजू घेऊन
दुष्ट कौरवांचा नाश केला
प्रेम दया करुणेचे अमृत देऊन
जगाला मानवतेचा धर्म दिला

सत्ता आणि वासनेने होते धुंद
व्यभिचारी दुर्योधन जरासंध
त्यांचा नाश करून दिला श्रीकृष्णाने
सद्धर्माचा मांगल्याचा जगी सुगंध

बालकृष्णामुळे मिळालं
दही दूध लोणी बाल गोपाळांना
आनंदून जातं मन
खोडकर कान्हाच्या कृष्ण लिला बघतांना

राधा कृष्ण प्रेम, कृष्ण सुदामा प्रेम
अजरामर झालं जगात
जीवनाचं तत्त्वज्ञान भरलंय
भगवान श्रीकृष्णाच्या गीतामृतात

कृष्णमय होता जीवन
नसे भय जगण्या मरणाचे
राधा व्हावे मन
होईल सार्थक मनुष्य जन्माचे

सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

राजेंद्र वाणी

– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई

९. मीरा युगाची…

पहाटे कधी…अवेळी.. सांजवेळी
तुझ्या बासरीचा मला नाद येतो
अशी धावते भान हरपून मीही
होऊन कृष्ण, सखा मज साद देतो

बोलतो कधी…बोल तो लावतोही
तरी भावतो…मुरारी श्याम भोळा
कधी थिरकते..कधी नाचते-गाते.
होत तल्लीन ..जशी बावरी राधा

कसा ताण सहजी जिरवितो मनाचा
जसा कृष्ण भार करंगुळी तोले
धरी सावली …कधी सारथी माझा
जिंकवी मला तो स्वतः हार झेले

भास फुलांचा असा गंधीत वारा..
शामल घन तो आभाळी जाताना
कधी तल्लीन कधी व्याकूळ होता
अवघा परिसर गोकुळ होतो, कान्हा

किती गोपिका भोवती फेर धरती
तुझी ‘राधिका’ व्हायचे ना मलाही
तुझ्यावर करावे असे प्रेम साधे
म्हणावे कुणी हीच ‘मीरा युगाची !’

प्रतिभा सराफ

– रचना : प्रा. प्रतिभा सराफ. मुंबई

१०. कृृष्ण

विनाश करण्या अधर्माचा
कृष्ण जन्म जाहला
वसुदेव देवकीचा सुत
गोकुळी नंदाघरी वाढला

दही दूध माखन चोरी करी
गोपालांसह गोधन चारी
यशोदे तुझा कान्हा
खोडकर भारी

कृष्णा नको रे वाट अडवू
जाऊ दे ना यमुनेला
कंकर मारुनी घडे फोडीसी
कसे रोखू तव चेष्टेला

धुन मुरलीची ऐकून
अवघ्या गोपी मुग्ध जाहल्या
देहभान विसरून
सुरावटीत डुलू लागल्या

कशा वर्णू तव लीला
केलेस मर्दन कालियाचे
गोवर्धनास छत्र करुनी
रक्षण केले नगरजनांचे

पारिजात बहरला
सत्यभामेच्या दारी
सडा पहा सांडला
रुख्मिणीच्या महाली

किती चतूर तू रे
कृष्णा विस्मयकारी
नामात तुझ्या दंग
गोवर्धन गिरीधारी

मीरा झाली बावरी
कामधाम संसार विसरली
प्राशुनी विषाचा प्याला
माधव मुकुंद नामात रंगली

राधा प्रिय सखी कृष्णाची
नसे चिंता संसाराची
मुखी असे एकच नाम
राधे श्याम राधे श्याम

अरुणा मुल्हेरकर

– रचना : अरूणा मुल्हेरकर. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजया वाळुंज on आमचा वाडा…
शितल अहेर on पहलगाम
शितल अहेर on पहलगाम
गोविंद पाटील on आमचा वाडा…
कविता बिरारी on पहलगाम
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८