मी आणि मिस्टर कारखानीस यांना जगभर फिरण्याची अतिशय हौस आणि ती हौस पूर्ण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. आजपर्यंत मी २४ देशांना भेट दिली आहे. पण ११ जुलै, २०२४ रोजी टोरोंटो, कॅनडा इथे जाण्याचा योग इतका अचानक येईल हे काही ध्यानीमनी नव्हते. विशेष म्हणजे कॅनडाने आमच्या परदेशवारीची सिल्वर ज्युबिली पूर्ण करण्याचा मान पटकवला.
आमची मुलगी कॅनडात राहायला आल्यामुळे तिला भेटायला जुलै मध्ये आम्ही टोरोंटोला राहायला आलो. ही प्रथम भेट अविस्मरणीय ठरली. बाहेरील वातावरण अतिशय सुखद होतेच पण मनातही गुदगुल्या होत होत्या जणू. याचे मुख्य कारण म्हणजे ‘लेकीकडे जाईन, मज्जा करेन’ अशी भावना मनात होती. यावेळी प्रवासाचा संपूर्ण प्लॅन करणारी आमची कन्या होती. नवीन देश, नवीन शहर आणि इथला इतिहास जाणून घेण्याची उत्कट इच्छा. अशा पार्श्वभूमीवर आम्ही प्रवासाला निघालो.
कॅनडा हा जगातील नॉर्थ अमेरिकेत वसलेला देश. क्षेत्रफळानुसार जगात याचा दुसरा क्रमांक लागतो. या देशाचे १० प्रोव्हिन्सेस म्हणजे आपण राज्य म्हणूया आणि तीन टेरिटरीज म्हणजे विशेष राज्य असे भाग केले आहेत. हा देश अटलांटिक, पॅसिफिक आणि आर्क्टिक या तीन महासागरानी वेढलेला आहे. या देशाची सीमा अमेरिकेलगत आहे.
कॅनडा आणि अमेरिकेत रस्ते, दुकानं, इमारती, शॉपिंग मॉल्स, शहरांची रचना, दळणवळणाची साधने यात साधर्म्य अनेकदा जाणवते तेव्हा त्यांची फक्त सीमा जोडल्या गेली नसून इतर अनेक विचार आणि आचार यांनाही दत्तक घेतले आहे हा विचार मनात डोकावून जातो. स्थानिक कॅनेडियन गोरा माणूस, पूर्वेकडील युरोपिअन माणसा सारखा जास्त पांढुरका दिसतो तर अमेरिकन माणूस जास्त लालेलाल दिसतो (हे माझे आपले निरीक्षण ह !). अर्थात इथेही अनेक देशातील लोकांची सरमिसळ झाली आहे. त्यात फ्रेंच लोकांचे वर्चस्व जाणवते. म्हणूनच इंग्रजीबरोबर फ्रेंच ही इथली राजकीय भाषा आहे. ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे तर टोरोंटो, मॉन्ट्रिअल आणि वॅक्युवर ही महत्वाची शहरे आहेत.
कॅनडात ब्रिटिशांची राजवट होती. स्वतंत्र झाल्यानंतर राजकीय राजवट चालू राहिली आहे पण राजकीय कारभार लोकशाही राजवटीत (सेनेट आणि हाऊस ऑफ कमेन्स) सांभाळला जातो. भरपूर मोठा असलेल्या या देशाला भरपूर गोडे पाणी लाभले आहे. म्हणजे पहा एकूण क्षेत्रफळापैकी १२% क्षेत्रफळ गोड्या पाण्याने व्यापले आहे. एव्हढ्या मोठ्या देशाची लोकसंख्या फक्त ४० मिलियन आहे. त्यामुळे या देशाच्या लोकसंख्येची घनता दर किलोमीटरला ४.२/KM इतकी आहे. तर भारताची लोकसंख्या घनता ४३१.११/KM आहे. हा फरक इतका प्रकर्षाने जाणवतो आणि एखादा देश प्रगती करत असेल किंवा समृद्धीच्या पथावर मार्गक्रमण करत असेल तर त्या देशाची लोकसंख्या मर्यादित असणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येते. अर्थात भारत हा तरुणांचा देश आहे हा भाग वेगळा.
कॅनडातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणजे निसर्गाचा चमत्कार असलेला ‘नायगारा धबधबा’. यापूर्वी अमेरिकेतून त्याचे भव्य रूप पाहिले होते. आता कॅनडाच्या बाजूने नायगारा पाहणे ही सुवर्णसंधी होती. अतिशय सौंदर्यपूर्ण असे हे फेसाळत्या प्रपाताचे उगम असलेले शहर. त्याविषयी किती सांगावे तेव्हढे कमीच. यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे आणि यावर अनेकांनी लिहिले आहे.
आज मी लिहिणार आहे ते Bellevue House National Historic Site, Canada याबद्दल. हे स्थळ ओंटारिओतील किंग्स्टन या ठिकाणी आहे. याचे खास वेगळे वास्तुशास्त्र आणि ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे ही वास्तू आपले वेगळेपण टिकवून आहे. या वस्तूला भेट द्यायला आम्ही आमच्या गाडीने गेलो.
बेलेवु हाऊस ला येण्याआधी थोडी माहिती काढली होती. म्हणून इथे यायला मी अतिशय उत्सुक होते. इथे पोचल्यावर माझी उत्सुकता आणखी ताणली गेली.
‘बेलेवु हाऊस’ ही वास्तू १८४० च्या दरम्यान बांधली गेली होती . या इमारतीचे बांधकाम इटालियन पद्धतीचे होते. त्यावेळी अशा तर्हेचे बांधकाम नाविन्यपूर्ण होते. लोकांना हे बांधकाम इतके आवडले की त्यावेळी कॅनडात अशा पद्धतीची बांधलेली घरे विशेष प्रसिद्धीला येऊ लागली. या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व असे की कॅनडाचे पहिले पंतप्रधान सर जॉन मॅक्डोनाल्ड इथे ऑगस्ट १८४८ ते सप्टेंबर १८४९ या दरम्यान काही काळासाठी राहिले होते. त्यावेळी ते वयाने बरेच तरुण होते. व्यवसायाने वकील होते आणि किंग्स्टन मधील लेजिस्लेटिव्ह असेंबलीचे सभासद होते.
जुन्या पद्धतीच्या या हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या वास्तूने माझे लक्ष वेधून घेतले. बाहेर सफरचंदाची बाग आहे. त्यावर अनेक सफरचंद लटकलेली होती. अंगणात सफरचंद आणि बाजूबाजूला हिरवेगार वृक्ष, वनराई. वाह ! त्या सुंदर दृश्याचा आस्वाद घेत आम्ही त्या वास्तूजवळ पोचलो. या घराचे बांधकाम लाकडाचे आहे. तीन मजली असलेले हे घर मधोमध असलेला मनोरा, समोरचा मोठा व्हरांडा, मोठाल्या खिडक्या आणि सभोवताली असलेले भव्य वृक्षांचे हिरवेगार उद्यान यांनी वेगळे दिसत होते. आतमध्ये जुन्या ब्रिटिश पद्धतीचा पेहराव केलेला एक उंच तरुण उभा होता. त्याने आम्हाला कमरेत वाकून नमस्कार केला तेव्हा १८०३० च्या काळात पोचल्या सारखे वाटले. त्याने आम्हाला या घराविषयी बरीच माहिती सांगितली. १८३० च्या दरम्यान किंग्स्टन मधील श्रीमंत कुटुंबात, आपली गावातील घरे विकून उपनगरात भव्य, फॅशनेबल घरे बांधण्याची पद्धत रूढ होत होती. स्थानिक व्यापारी चार्ल्स हेल याच्यासाठी बांधलेले हे घर जॉन मॅक्डोनाल्ड यांना भाड्याने वर्षभराच्या मुदतीसाठी देण्यात आले. त्यावेळी जॉन मॅक्डोनाल्ड हे उमदे वकील, भविष्याचे सोनेरी स्वप्न पाहत होते.
त्याकाळी आलेल्या पाहुण्याने आपले व्हिजिटिंग कार्ड द्यायची पद्धत होती. ते दिल्यानंतर मुख्य दरवाजातून एका दालनात आपण पोहोचतो. तिथे जुन्या पद्धतीच्या खुर्च्या, गोलाकार डायनिंग टेबल, मेज असे मांडलेले दृष्टीस पडते. त्या काळातील लेखण्या, छत्र्या, खाण्याचे पदार्थ, कपबश्या, वेगवेगळी काचेची भांडी आकर्षक पद्धतीने मांडलेली आहेत. ते पाहताना खरोखरच त्या काळात सैर करून आल्यासारखे वाटते. खोल्यांची उंची कमी असून त्या मध्यम आकाराच्या आहेत. गोलाकार व्हरांड्याच्या आत एल आकारात वेगेवेगळ्या खोल्या आहेत. काही वरती एकेक मजली जिने चढून लागतात तर जुन्या पद्धतीचे किचन खाली तळघरात लागते. त्याकाळची लोखंडाची भांडी, दारूचे मोठमोठे नरसाळे, जुनी पद्धतीचा ओव्हन इत्यादी पाहताना तो काळ डोळ्यासमोर येतो. या सगळ्या वस्तू पाहताना, फार मोठी श्रीमंती काही नजरेस पडत नाही. मला उगीचच आपल्या राजे महाराजांचे मोठे वैभवशाली राजवाडे डोळ्यासमोर आले. म्हटले तर भारतातील धन, ऐश्वर्य अफाट होते पण ते आपल्याला टिकवता आले नाही असे राहून राहून वाटते. असो.
ही संपूर्ण वास्तू इटालियन पद्धतीने बांधली असली तरी थोड्या प्रमाणात फ्रेंच, युरोपिअन पद्धतीचा ठसा यावर असलेला आढळतो. सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही वस्तू लोकांसाठी खुली असते. आपण तिकीट काढायचे आणि आत जायचे. या वास्तूत शिरायला मधोमध दार आहे. उजवीकडे आणि डावीकडे दालने आहेत. पण ती एल आकारात आहेत. प्रत्येक खोलीला खिडक्या आहेत. पण त्या एकाच आकाराच्या नाहीत तर वेगवेगळ्या उंचीवर आहेत. या बंगलीवजा वास्तूला लहान व्हरांडा आहे, बाल्कनी आणि पोर्च आहे. सगळीकडून बागेचा नजारा दिसेल अशी रचना आहे. छप्पर कौलारू असून, खिडक्यांची दारे इटालियन पद्धतीची आहेत. प्रत्येक खोलीचे जुने पडदे आणि काही वापरातील वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. जुन्या ब्रिटिश पद्धतीचे किचन, त्यातील स्वयंपाकाच्या वस्तू, बाकडी, खुर्च्या, ओव्हन, इस्त्री करायचा रोलर इत्यादी आपल्याला जुन्या काळात घेऊन जातो. त्या वेळी मुख्य शेफ म्हणजे बावर्चीला घरात उच्च स्थान असायचे. आणि तिच्या हाताखाली असणाऱ्या नोकरांच्या ग्रेड्स असायच्या. सर जॉन मॅक्डोनाल्ड यांची खास वेगळी बेडरूम पाहताना इतिहास जिवंत होतो. हॉलमधील बेंच, ब्रासची शाईची दौत, रिवोलविंग डेस्क चेअर, अनेक जुनी, पिवळी पडलेली पुस्तकं, हस्तलिखीते, तलवार आणि लहान मुलाचा पाळणा पाहताना मला भूत, भविष्य आणि वर्तमान यांचे नाते कसे बदलत असते याची जाणीव झाली. वर्तमान हा उद्याचा भूत असतो आणि वर्तमानात राहून माणूस नेहमी माहित नसलेल्या भविष्याची स्वप्न पाहत असतो. आज आहे ते उद्या नसणार हे आपण नेहमी विसरतो. असो.
त्या काळातही प्रत्येक खोलीत उजेड येईल आणि वारा खेळता राहील याची सोय केलेली होती. त्याकाळी आजच्या सारखे हिटर किंवा वातानुकूलित यंत्रे नव्हती. तरीही सगळ्या सोयी होत्या. आजच्या मानाने टेबल- खुर्चीची, पलंगाची तोकडी लांबी रुंदी पाहून मात्र मी कोड्यात पडले. हे सर्व सामान इतके लहान दिसते की त्यावेळी सर मॅक्डोनाल्ड, त्यांची बायको हे अगदी स्लिम ट्रिम असावेत असा मी अंदाज केला. ही वस्तू तीन मजली आहे. जिन्याची लांबी, रुंदी पण अगदीच लहान वाटते. सर्व फर्निचर हे रेड ओकचे लाकूड वापरून बनवलेले आहे. तसेच सर मॅक्डोनाल्ड याना लागणारी उंची दारू, ती साठवत असलेले बॅरल्स, बाटल्या खाली सेलरमध्ये ठेवल्या आहेत. इथे त्यांचे वास्तव्य एक- दीड वर्ष होते. त्याकाळात त्यांची पत्नी इझाबेला क्लार्क आजारी होती. ती कधीच बरी झाली नाही. तिचे वास्तव्य जिथे होते ती जागा मला नकळत आजारीच वाटली. हा माझा भ्रम असेल कदाचित पण त्या खोलीच्या भिंती, फर्निचर, नैराश्य आणणारे वाटले. त्यानंतरच्या मजल्यावर त्यांच्या लहान मुलाची खोली आहे. तो मुलगाही आजारी होता. त्याचा लवकरच अवघ्या तेरा महिन्याचा असताना मृत्यू झाला. कदाचित त्या काळात उत्तम औषध उपलब्ध नसल्यामुळे स्त्रियांचा आणि लहान मुलांचा लवकर मृत्य होत असे.
सर जॉन हे स्वतः स्कॉटिश होते. इथल्या वास्तव्यात त्यांची वकिली चांगली चालली होती. नंतर ते कॅनडाचे लेजिस्लेचर झाले. याच काळात सर जॉन यांची राजकीय वर्तुळात प्रगती होत होती आणि त्यांना दुसरा मुलगा झाला. दुसऱ्या मुलाचे नाव हग जॉन असून तो अनेक वर्ष जगला एव्हढीच माहिती मिळाली. इझाबेलाच्या मृत्यूनंतर सर जॉन यांनी दुसरा विवाह केला. या सर्वांची पोर्ट्रेट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या काळातल्या स्त्रियांच्या आयुष्याची, नोकरांची आणि राजकीय नेत्यांची साधारण दैनंदिनी आपल्याला या वास्तूत फिरताना पाहावयास मिळते. यावेळी माझ्या मनात नकळत भारतातील स्त्रियांची आणि क्रांतिकारकांची आयुष्य नजरेसमोर आली. १९ व्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून अनेक समाजसेवक नेते लढले. त्यांचे आयुष्य अतिशय खडतर होते. याउलट पाश्चात्य देशात काही प्रमाणात शिक्षण आणि स्वातंत्र्य मिळूनही स्त्रियांचे आयुष्य बंदिस्तच होते असे मला वाटून गेले. काही का असेना, ही वास्तू मात्र माझ्या मनात कायमची भरली, हे मात्र खरे.
— लेखन : मोहना कारखानीस. सिंगापूर
— संपदान : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मोहनजी … आत्ताच कॅनडात जाऊन आल्यासारखे वाटले, आपल्याला शब्दांची सांगड किंवा गुंफणे उत्कृष्ट जमते. आपले लेखन चातुर्य आणि शब्दरचना अतिशय अभूतपूर्व आहे. 🙏🌹😘
मोहना जी , अतिशय छान लेखन आणि वर्णन केले आहे तुम्ही . वाचत रहावे असे वाटणारे . कॅनडातल्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट दिल्याचा आनंद अनुभवला !
मोहनाजी, तुमची ही सिल्व्हर ज्युबिली साधणारी कॅनडाची सफर मस्तच आहे. अगदी मोजक्या पण नेमक्या शब्दांत तुम्ही कॅनडाचे वैशिष्ट्ये टिपली आहेत. बेलवे हाऊस ही इटालियन वास्तू तुमच्या मनात भरल्यामुळे तुम्ही तिचे सविस्तर वर्णन केले. त्यामुळे आमच्यासमोर ती वास्तू उभी राहिली. सोबत काढलेले फोटोही वर्णनातील जिवंतपणा कायम ठेवत होते. भारताविषयीचे भाष्यही योग्यच आहे.
खूप सुंदर शब्दांकन. संपूर्ण माहिती अतिशय परिपूर्ण शब्दांत लिहीली आहे.
Khupach Sunder! Actual visit kelya sarakhe watale agadi.❤️🙏
वर्णन छान आहे, अगदी सहज भेट दिल्या सारखे वाटते.
पुढे मागे कॅनडा ला जायचा योग आला तर हि वास्तू आवर्जून बघु.
छान लिहीले आहे मोहना….वाचताना प्रत्यक्ष पाहिल्यासारखे वाटले
Very lively described.