प्रत्येक माणसाचा जन्म हा एक गोफ असतो—”जीवनाचा गोफ !”. त्या गोफाला एक सुंदर विणकाम मिळावं, असं नियतीचं स्वप्न असतं. पण आजच्या काळात जीवनाचं साधेपण हरवत चाललं आहे.
जन्माला येतो, शिक्षण घेतो, नोकरीच्या मागे धावतो. नोकरी मिळाली की लग्न होतं आणि लग्नानंतर सुरू होतो कुटुंबाचा गाडा ओढायचा प्रवास. या सगळ्यात बालपण हरवतं, तरुणपण संपतं आणि म्हातारपणी उरतं ते फक्त थकवा आणि अनुत्तरित प्रश्न.
आज शिक्षण ही एक स्पर्धा बनली आहे. प्रत्येकाला इतरांपेक्षा वरचढ ठरायचं आहे. ‘मागे राहणं’ म्हणजे आयुष्य हरवणं, असं लोकांना वाटतं. कारण समाज नुसता दबाव टाकत नाही, तर सतत धावण्याची सक्ती करतो. माणूस स्वyप्नाळू आहे, आणि त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करताना तो स्वतःलाच विसरून जातो. समाजाचा आवाज इतका मोठा असतो की, त्यात आपलं मन शांत राहून काही विचारही करू शकत नाही.
पण कधीतरी आपण थांबून स्वतःला विचारलंच पाहिजे—हे सगळं कशासाठी ? यश मिळवण्यासाठी आपण किती मोठा त्याग करतोय ? आणि त्या त्यागात आपण खरं सुख, मनःशांती, आणि आपल्या माणसांचा सहवास गमावून बसतोय. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसारखं आपलं जीवन होतंय— पण विठोबाला भेटण्याआधीच आपण दमून जातो.
जीवनाचा आनंद हा केवळ यशात नाही; तो माणसांच्या नात्यात, साधेपणा आणि स्वतःसाठी जगण्यात आहे. नुसतं धावत राहण्यापेक्षा थोडं थांबून, निवांत बसून, आयुष्याशी संवाद साधायला शिकलं पाहिजे. हेच खरं समाधान आहे.
नुकतंच माझ्या हातात “फाईव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग पीपल” नावाचं एक पुस्तक आलं. या पुस्तकाची लेखिका ऑस्ट्रेलियात केअरगिव्हर चे काम करते. मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांची सेवा करताना तिने अनुभवलेली सत्यकथा या पुस्तकात आहे. हे सर्व श्रीमंत आणि यशस्वी लोक आयुष्यभर भौतिक सुख-सोयींचा पाठलाग करत राहिले. पण मृत्यूपूर्वी त्यांना जाणवलं, त्यांनी आयुष्यात काहीतरी खूप महत्त्वाचं गमावलं आहे.
त्यांच्या अनुभवांनुसार, आपण पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखांच्या मागे धावत असतो, पण त्या धावपळीत आयुष्य जगायचं विसरतो. शेवटच्या क्षणी उरतो तो फक्त पश्चात्ताप. कुणाला वाटतं, आपण मित्र गमावले; कुणाला वाटतं, कुटुंबासाठी पुरेसा वेळ दिला नाही. काहींना वाटतं, जग फिरायचं राहून गेलं. तर काहींना जाणवतं, आपण नको इतका वेळ कामात घालवला. शेवटी उरतो तो फक्त दु:ख आणि पश्चात्ताप—पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यावर असताना माणूस खोटं बोलत नाही. म्हणूनच अशा अनुभवांमधून शिकणं गरजेचं आहे.
मुनाभाई एम.बी.बी.एस. या चित्रपटातील एक प्रसंग आठवतो, जिथे जाहीर भाई संजय दत्तला सांगतो, “मला मारायचे नाही, फक्त उद्यापर्यंत जगू दे; कारण उद्या माझी अम्मी येणार आहे आणि मला तिला शेवटचं भेटायचं आहे. “दुर्दैवाने त्याचा कॅन्सर त्याला उद्यापर्यंत जगू देत नाही, पण त्यातला संदेश खूप मोठा आहे.
आपल्या आयुष्यातही आपण वेळेत जागं झालं पाहिजे. आपल्या प्राधान्यांवर विचार करून, खरं आयुष्य कसं जगायचं हे ठरवलं पाहिजे.
या न संपणाऱ्या धावपळीत अडकण्यापेक्षा, आयुष्याचा खरा आनंद शोधणं महत्त्वाचं आहे. निसर्गाने दिलेल्या या अनमोल आयुष्याचा प्रत्येक क्षण उपभोगायला शिकलं पाहिजे. ह्या रॅट रेस मधून आपल्याला बाहेर पडले पाहिजे, आपण जी बकेट लिस्ट बनवली ती पूर्ण करण्याचे प्लॅन केले पाहिजे नको ते घरगुती भांडणे, प्रॉपर्टीसाठीचे दुरावे, आणि आपसातील द्वेष. नाहीतर, माणूस म्हणून जन्माला आलो, पण माणूस म्हणून जगलो नाही, अशी खंत उरेल.
— लेखन : संदिप तगलपल्लेवार. केमन आयलंड्स
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Wow very good article
And touching as.wrll