Tuesday, January 14, 2025
Homeलेखडॉ. शंतनू : जीवन त्यांना कळले हो !

डॉ. शंतनू : जीवन त्यांना कळले हो !

स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र या क्षेत्रातील तज्ञ म्हणून जवळपास ३० वर्षांचे उल्लेखनीय योगदान देणारे, महिलांच्या आरोग्य प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय परिषदा गाजवणारे डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी वयाच्या साठाव्या वर्षी १५ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. कर्करोगाशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली.

डॉ. शंतनू पेशाने वैद्यकीय व्यवसायात होते तरी एक प्रभावी वक्ता, विज्ञाननिष्ठ विचारांचे प्रवर्तक, अतिशय यशस्वी स्तंभलेखक, खुमासदार शैलीने प्रसार माध्यमातून भुरळ पाडणारे डॉक्टर लेखक, तसेच अभिनय कौशल्याने चकीत करणारे नाट्यकर्मीही होते. वैद्यकीय चर्चा सत्रे, कार्यशाळा आणि परिषदांमधून अनेक वर्षे आग्रहपूर्वक मराठीतूनच संवाद साधणारे डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते.

माझा त्यांच्याशी परिचय फार जुना नाही अगदी काही महिन्यांचा ! परंतु नुसत्या एका संवादातून त्यांनी दीर्घ काळ टिकणारी छाप पाडली. आमच्या संस्थेतर्फे डॉ. शंतनू यांना शकुंतला परळकर सेवाव्रती डॉक्टर पुरस्कार देण्याचा कार्यकारिणीचा निर्णय पक्का झाला आणि मी त्यांचे सन्मानपत्र लिहायचे म्हणून त्यांच्या संपर्कात आले. त्यांच्याशी वारंवार फोनवर बोलणे झाले. मिळवलेली माहिती वाचून मी तर अवाक झाले. या अष्टपैलू डॉक्टरचे सन्मानपत्र लिहायचे म्हणजे माझी कसोटीच होती. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम २६ मे २०२४ रोजी ठरला. डॉ. शंतनू सपत्नीक वाईहून मुंबईला येऊन पुरस्कार स्वीकारणार होतें, परंतु दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबात त्यांच दिवशी पहाटे अगदी जवळच्या नातेवाईकाचे दु:खद निधन झाले आणि त्यांचे येणे नाईलाजाने रद्द करावे लागले. त्यांच्या अनुपस्थितीतच विधायक कार्यकर्ती आणि आदर्श शिक्षक पुरस्कार हे दोन पुरस्कार देण्यात आले आणि त्यांच्या सन्मानपत्राचे फक्त वाचन करण्यात आले. त्या दिवशी त्यांना ऐकायला वैद्यकीय आणि साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून आले होते त्यांची निराशा झाली.

पुढे डॉ शंतनू यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सभासद पुरस्कार घेऊन ८ जून २०२४
मुंबईहून वाईला गेलो. लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या भव्य सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. डॉ. शंतनू यांचे भाषण ऐकायला वाईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचनालयाच्या अभ्यासिकेतील विद्यार्थी सुद्धा आवर्जून आले होते. त्यावरून डॉ. शंतनू यांचा लोकसंग्रहाचा गुणही अधोरेखित झाला.

विश्वकोशाचे आगर असलेल्या वाईत डॉ. शंतनू यांनी आयुष्यातील अनेक अडचणींवर धैर्याने मात करून यश संपादन केले होते. आपल्या सहचारिणी डॉ. रुपाली समवेत त्यांनी वाईतील त्यांच्या वडिलांनी सुरु केलेले “मॉडर्न क्लिनिक” अतिशय परिश्रमपूर्वक स्त्रीरोग तपासणी तसेच प्रसूति विभागात अद्ययावत केले.

डॉ. शंतनू यांचे वैद्यकीय संशोधन कार्यात अनेक उल्लेखनीय शोध आहेत. उदाहरणार्थ Bangle Breaking, Laryngoscope use in tubectomy, Innovation in stress – incontinence इत्यादी. महाअनुभव मासिकातील त्यांची सदरे “गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, फक्त पुरुषांबद्दल, स्त्रियांतील कामाविष्कार, डार्विन मेल्याचं दु:ख नाही, या वरील चर्चा तर आधुनिक वैद्यकीची शोधगाथा” अशी पुस्तके, स्तंभलेखन, यु-ट्यूब वरील लोकप्रिय संवाद सर्वांस अनुभवण्यास मिळाले आहेत.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोनातून तर्कशुद्ध वैचारिक पुस्तके आणि लेख लिहून, अंधश्रध्दा निर्मूलन महिलावर्गाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे हे जाणून डॉ. शंतनू शेवटपर्यंत कार्य करत राहिले.

डॉ. शंतनू यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रभावी वक्ते म्हणून डॉ. मंजिरी चितळे वक्तृत्व पुरस्कार, तसेच डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, त्यांच्या यु-ट्युब प्रसार माध्यमातून केलेल्या स्त्री आरोग्याच्या जाणीवेसाठी प्रदान करण्यात आला. “पाळी मिळी गुपचिळी“ बद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विलास रानडे पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या “फादर टेरेसा“ या साहित्यकृतीस अक्षरगौरव पुरस्कार तसेच १२ वा लाडली पुरस्कार “लिंगभेदातील आरोग्यक्षम संवेदना“ यासाठी मिळाला. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल वाईचा “आनंद पुरस्कार” तसेच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कै. ना. ह. आपटे साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले.

डॉ. शंतनू यांची वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्यिक वाटचाल पहातांना वाटतं “ज्याला कां जगायचं कळतं, त्याला कसं जगायचं हा प्रश्नच पडत नाही. तो फुलपाखराच्या स्वच्छंदी वृत्तीने वेदनेलांही आनंदाची झालर लावून जगतो” हे पटते आणि म्हणावेसे वाटते, जीवन त्यांना कळले हो !

डॉ. शंतनू यांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अमूल्य योगदान नव्या पिढीस प्रेरणा देणारे तसेच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरो, हीच त्याना आदरांजली !

आशा कुलकर्णी

— लेखन : आशा कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. ‘डॉ. शंतनु : जीवन त्यांना कळलं हो’ हा आशाताईंनीं लिहिलेला लेख वाचला. अतिशय हृदयस्पर्शी आहे. असोशीने जगणं, मरणाचा सकारात्मक दृष्टीने विचार करुन आपलं कार्य करत राहणं, त्यातून आनंद मिळवून इतरांना देणं व आपल्या देहाचं दान करणे हे प्रेरणादायी आहे. २६ में २४ हुंडाविरोधी चळवळीचा पुरस्कार वितरण समारंभाला मी उपस्थित होतो. त्यांना पहाण्याची,ऐकण्याची संधी ते येऊ न शकल्याने आज हळहळ वाटत आहे. आशाताईंनी लिहिलेल्या लेखामुळे एक विख्यात डॉक्टर, संशोधक, साहित्यिक, उत्तम वक्ता, अंधश्रध्दा निर्मूलन करणारा समाजसेवक, आनंदाची उधळण करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली. आशाताईंनी वाईला जाऊन डॉ. शंतनु यांना पुरस्कार प्रदान केला व त्यांची भेट झाली हे चांगले झाले. डॉ.शंतनु अभ्यंकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! मानाचा मुजरा!
    हा लेख प्रसिद्ध केल्या बद्दल लेखिका,संपादक,निर्माती यांचे आभार!

  2. छान खूपच छान लिहीलंय डाॕ शंतनू ह्यांच्या बद्दल.
    लेखन संपादन आणि निर्मिती करणाऱ्या त्रयींचं मनापासून अभिनंदन
    !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अहेर on भोगी
Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Priyanka Ashok Sangepag on सदाफुली !
Shriniwas Ragupati Chimman on सदाफुली !