२०२० चे साल. राष्ट्रपती भवनाच्या मोठ्या हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविद हे मंचावर पद्मश्री, पद्मविभूषण इत्यादी पुरस्कार प्रदान करत होते. एकेक व्यक्ती भरल्या मनाने, सन्मानाने ते पुरस्कार ग्रहण करत होती. एकानंतर एक नावांची घोषणा होत होती आणि पुरस्कार प्रदान केले जात होते. प्रकाश झोतात, फोटोग्राफी चालू होती. त्यातच एका नावाची घोषणा झाली..ऊषा चौमार.
घोषणा होताच ती जागेवरून उठून मंचाकडे चालू लागली आणि आठवणींच्या वाटेवर थबकली.
राजस्थानच्या अलवर इथे जन्मास आलेली सात वर्षांची चिमुकली ऊषा एक दिवस आई बरोबर संडासाची घाण (मल/ मैला) कशी स्वच्छ करावी हे बघायला गेली आणि ट्रेनिंग घेऊन एक परात आणि गोलाकार मोठ्या पळीसारखं भांडं हातात घेऊन घरोघरी संडासाची घाण स्वच्छ करण्याचं काम करू लागली. तिची आई तिला काम नीट करता यावं म्हणून हे शिकवत होती. ज्या वयात पोरं खेळण्यात रमतात त्या काळात ऊषा घाण स्वच्छ करण्याचं काम करत असायची. त्यातून दहा पंधरा रुपयांची प्राप्ती होत असे. कुणाकडे पाहुणे आले की अर्थातच संडासाची घाण जास्त व्हायची आणि त्याचे थोडे ज्यादा पैसे मिळायचे. कामावरून एक दिवस ही सुट्टी मिळत नसे. आजारपण आलंच तर दुसऱ्याला पाठवावं लागायचं आपल्यातले पैसे ही तिला द्यावे लागायचे.
वयाच्या दहाव्या वर्षी ऊषाचे लग्न झाले पण तिच्या सासरी ही हेच काम पूर्वापार चालत आल्याने तिथे ही हेच काम ती करत असायची. अनेकदा घरी आल्यावर किती ही स्वतः ला स्वच्छ केले तरी जेवण जायचे नाही. लोक दूरूनच नाक मुरडायचे. हे काम करण्यासाठी त्यांचा रस्ता/वाट दुसरी असायची ज्यावरून इतर कोणी कधीच जात नसायचं.
रात्रीचं शिळं अन्न प्लास्टिकच्या पिशवीत बांधून दूर फेकायचे आणि ते ती उचलून घरी आणायची. देवळाच्या पायरीवर ही तिला कोणी बसू देत नव्हतं.
एकदा असंच डोक्यावर ती घाण घेऊन चार पाच बायका चालल्या होत्या ठराविक ठिकाणी त्यांनी ती घाण टाकली आणि परत येताना त्यांच्या बाजूला एक गाडी येऊन थांबली. त्यातून एक व्यक्ती बाहेर येऊन त्यांच्याशी बोलू लागली, “मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. काही सांगायचं आहे, काही विचारायचं आहे. ते घूंघट आधी वर करा.”
सगळ्यांच्या मनात विचार आला, “हा माणूस मार खाणार. आम्ही आपल्या दिरा समोर ही घूंघट उघडत नाही तिथे हा कोण लागून गेला.”
पण त्याने त्यांची वाट अडवत विचारलं,
“तुम्ही हे काम सोडून दुसरं काम करायला तयार आहात का ? पूर्वापार चालत आलंय म्हणून हे काम करताय हे खरं असलं तरी तुम्हाला दुसरं चांगलं काम करण्याची संधी मिळू शकते.” ती व्यक्ती होती बिंदेश्वरी पाठक, सुलभ इंटरनेशनलचे कर्तेधर्ते.
त्यांनी सगळ्यांना दिल्लीला घेऊन जायचे ठरवले. दिल्ली म्हणजे त्या बायकांसाठी अमेरिकाच होती. सासूबाई म्हणाल्या, “अंशी नव्वद वर्षं झाली ह्या कामातून सुटका नाही आता मिळणार आहे होय ?”
पण उषाच्या नवऱ्याने साथ दिली आणि ती दिल्लीला आली. पहिल्यांदा कारमध्ये बसली. दिल्लीला सुलभ कार्यालयात तिथल्या शिक्षिकांनी आणि मुलींनी फुलांचा हार घालून स्वागत केले आणि तिने जन्मात पहिल्यांदा फुलांचा हार घातला. लग्नात ही तिच्या नवऱ्याने तिला फुलांचा हार घातला नव्हता. त्यावेळेस उषाचं मन आणि डोळे दोन्ही भरून आले होते.
मोठ्या हॉटेलमध्ये आवडीचं जेवायचा पहिला प्रसंग फक्त पाठकजीं मुळे तिला अनुभवायला मिळाला. मिठाई आणि दोनशे रुपये बिदागी घेऊन ती तीन दिवसाने अलवरला परतली आणि ज्यांच्याकडे काम करायला जायची त्यांनी बोलायला सुरुवात केली, “आता काय म्हणे हे काम करणार नाही मग काय महाराणी बनून रहाणार ? बघू घर कसं चालतंय ते.”
नंतर अलवरला “नई दिशा” म्हणून वर्ग सुरु झाला. तिथे टी.व्ही लावला गेला. साफसफाई शिकवताना जन्मात पहिल्यांदा सकाळी आंघोळ केल्यावर तिला वेगळाच अनुभव मिळाला कारण घाण स्वच्छ करताना सकाळी आंघोळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. रोज आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून घरातून बाहेर पडताना वेगळाच अवर्णनीय आनंद मिळायला लागला. त्या घाण वासा ऐवजी उद्बबत्तीचा सुगंध दरवळायला लागला. वर्गात, लोणची, पापड करणे, कापडी पिशव्या बनवणं वगैरे बरंच काही शिकवलं जाऊ लागलं.
“आमच्या हाताचा हा माल कोण विकत घेणार ?” हे विचारल्यावर उत्तर मिळालं, “सुलभ इंटरनेशनल”
बिंदेश्वरी पाठक ह्यांनी सुलभ इंटरनेशनलची सुरुवात “आरा” पासून केली. संडासाची घाण उचलणाऱ्यांना काय वाटत असेल हे जाणून घेण्यासाठी त्यांनी दोन दिवस हे काम केलं आणि त्यांची मनोव्यथा जाणली. किती वेदना, किती पीडा आणि किती लाचारी ह्या कामात आहे हे त्यांनी प्रत्यक्ष जाणले.
आणि ह्या “नई दिशाने” ऊषाचे जीवन आमूलाग्र बदलून टाकलं. आता तिच्या पंखात बळ आलं होतं. एक सुंदर आकाश हात पसरून तिला कवेत घेण्यासाठी आतुर झालं होतं. आता उषाने जनजागृतीचे काम सुलभ इंटरनेशनलच्या सोबत सुरू केलं होतं. इतर शिक्षणा बरोबर तिने इंग्लिश भाषा शिकून आत्मसात केली. हा तिचा प्रवास २००३ पासून सुरू झाला आणि २००७ मध्ये ऊषा सुलभ इंटरनेशनलची प्रेसिडेंट झाली.
उषाने अमेरिका, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, फ्रांस ह्या देशाचे दौरे केले. तिथे अनेक भाषणं दिली. गंमत म्हणजे तिने अमेरिकेत एका फैशन शोमध्ये साडी घालून कॅटवॉक ही केला.
जिच्या डोक्यावर घाणीची टोपली/परात असायची तिच्या डोक्यावर मानाची पगडी विराजमान होऊ लागली होती. तिच्या पासून लांब पळणारी लोक तिला सन्मानाने घरी बोलवून लागले. तिच्या कामाची दखल श्री. राजनाथ सिंह ह्यांनी घेतली. नंतर पंतप्रधान मोदींची ही भेट झाली. हे सगळं घडत होतं पण ऊषाकडे कधीच साधं वरण म्हणजे पिवळं वरण बनलं नाही. कारण म्हणजे, “ते वरण मला वेगळीच आठवण करून देतं त्यामुळे मी हे वरण शिजवत ही नाही आणि खात ही नाही.”
तिच्या मनावर खोलवर झालेल्या यातनांची ही परिसीमा आहे.
टाळ्यांचा गडगडाट झाला आणि ऊषा चौमार वर्तमानात परतली. आज हा सन्मान तिचा नव्हे तर सबंध त्या स्त्री जातीचा सन्मान होता ज्या परिस्थितीला हार न जाता आलेल्या प्रत्येक संधीचा सोनं करतात. सुलभ शौचालय आणि सुलभ इंटरनेशनलमुळे घाण उचलण्याचा प्रकार जवळपास संपुष्टात आला होता म्हणून अनेक लोकांचे आशीर्वादाचे हात ही डोक्यावर होते.
— लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800