Wednesday, July 2, 2025
Homeलेखदिसते तसे नसते...

दिसते तसे नसते…

“पुस्तकाचे मुखपृष्ठ बघून पुस्तकाविषयी मत बनवू नका” अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. त्याच प्रमाणे पहिल्या भेटीतच दुसऱ्या व्यक्तीबद्दल मत बनविणे हे अजिबात योग्य नाही. कदाचित वस्तुस्थिती काही वेगळीच असू शकते.

किती सहजासहजी आपण एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवतो अथवा गैरसमज करून घेतो. ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जात असेल याची जरा देखील कल्पना नसताना ! असे का होते ? एवढी घाई कशासाठी.. ?

आपण असे काही प्रसंग पाहू यात जेणे करून कोणाबद्दल मत व्यक्त करताना थोडा विचार करू शकू. थोडी माहिती घेऊ. त्या व्यक्तीला जाणून घेऊ थोडा वेळ देऊ… असे केल्याने कदाचित आपले मत परिवर्तन होऊ शकते… काही गैरसमज दूर होतील…. !

अशीच एक गोष्ट दोन जिवलग मित्रांची. राकेश आणि मंगेश यांची अनेक वर्षांची मैत्री…. राकेश अतिशय शांत तर मंगेश खूप तापट….

त्या दिवशी मंगेश ने राकेशला फोन केला. जवळ जवळ पंधरा वेळा केला असेल. मात्र पलीकडून काहीच उत्तर येत नव्हते. मंगेशला काही महत्त्वाचे सांगायचे होते. मात्र एवढे मिस कॉल दिले असून देखील राकेशचा फोन आला नाही म्हणून तो खूप चिडला व पुन्हा त्याचे तोंड ही पहायचे नाही अशी त्याने शपथ घेतली. त्याला वाटले की आपण अनेक वेळा राकेशला मदत केली होती व आज त्याला पैसे मागितले, त्याला गरज होती तर तो उत्तर देत नाही.

काही तासांनी पुन्हा पलीकडून फोन आला….. त्याला समजले की राकेशचा अपघातात मृत्यू झाला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आज त्याने रागाच्या भरात बोललेले वाक्य खरे झाले होते. तो दवाखान्यात गेला. तेव्हा डॉक्टरने सांगितले की आम्ही खूप प्रयत्न केले पण तुमच्या मित्राला वाचवू शकलो नाही. तुमच्या मित्राच्या पिशवीत हे पैसे होते ते तुम्ही ताब्यात घ्या. त्याला काही दिवसांनी समजले की राकेशने आईची शेवटची भेट म्हणजे सोन्याची चेन सोनारकडे गहाण ठेवून पन्नास हजार रुपये घेतले होते. तो निशब्द झाला व ढसाढसा रडू लागला.

अशीच एक गोष्ट निशा व तिचे पती निखिल यांची. आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. निखिल नोकरी करत होता. एक मुलगी, सासू सासरे असा परिवार. निशा खूप हळवी होती. पतीचे कष्ट, त्याचे हाल तिला पहावत नसत. नेहमीच स्वतःची स्वप्ने मागे ठेवून तो सर्वांच्या गरजा पूर्ण करत होता.

निशा आता दोन्ही वेळेचा स्वयंपाक व घरातील सर्व कामे करून बाहेर जात होती. सासू सासरे देखील खूप समजुतदार होते. ते काही बोलले नाही कारण तिच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.

पण निखिलच्या मित्राने निशाबद्दल चुकीची माहिती दिली. तो दारू पिऊन रागाच्या भरात पुढचा मागचा विचार न करता निशावर खूप रागावला. तिच्यावर संशय घेतला. एवढ्या वर्षात जे नाही झाले ते आज घडले. त्याने तिच्यावर हात उगारला.

दुसऱ्या दिवशी निखीलचा राग शांत झाल्यावर निशाने त्याच्या हातात गाडीची चावी देऊन सांगितले, तुमचा रोजच्या प्रवासात खूप वेळ जात होता, तुमचे हाल, होणारा मनस्ताप मला पाहवत नव्हता म्हणून गेली चार महिने मी मैत्रिणीच्या घरी जाऊन शिवणकाम करत होते. तिला एका शाळेचे युनिफॉर्म शिवण्याची मोठी ऑर्डर मिळाली होती म्हणून मी तिला मदत करत होते व त्याच पैस्यातून ही गाडी घेतली. सासू सासऱ्यांना हे माहीत होते पण आज तुमचा वाढदिवस म्हणून ही भेट एक सरप्राइज म्हणून द्यायची होती.

दुसऱ्याच्या ऐकण्यावरून निखिलने किती मोठा गैरसमज केला होता ! कारण आजूबाजूच्या लोकांना केवळ हेच दिसत होतं की नवरा कामाला गेला की ही दिवसभर बाहेर असते. मात्र ती कोठे जाते….? काय करते….? हे माहीत नव्हते. निखिलने माफी मागितली व पुन्हा लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, कधीच दारूला स्पर्श करणार नाही असे सांगितले.

असाच तिसरा प्रसंग कमलाच्या बाबतीत घडला.आईला कॅन्सर झाल्यामुळे शिक्षण मधेच सोडून तिने नोकरी करण्याचे ठरवले कारण वडिलांचे छत्र नव्हते व घरात दोन लहान भाऊ होते. चुलत काकांनी तुला नोकरी देतो म्हणून बाहेर गावी नेले व तेथे तिला विकून टाकले. अनेक वर्षे तिने खूप यातना सहन केल्या. चुकीची कामे तिच्याकडून करून घेतली गेली. एके दिवशी खूप प्रयत्न करून निशा तेथून पळून गावी आली. तेव्हा गावकऱ्यांनी तिच्यावर बहिष्कार टाकला व तू किती बेजबाबदार आहे म्हणून तिला अपमानित केले. तिला कळाले की तिची आई गेली होती व लहान भाऊ अनाथ आश्रमात होते. इकडे काकाने ती पळून गेली असे सांगितले होते. जेव्हा सर्व गावकऱ्यांना सत्य कळाले तेव्हा सर्वांनी मिळून तिला मदत केली. तिला आधार दिला व काकांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

अशीच एक गोष्ट कविताची. ती दिसायला खूप सुंदर होती. त्यात परत छान रहायची. वडिलांच्या व्यवसायात मदत करायची. मात्र वडिलांच्या साध्या व भोळेपणाचा त्यांच्या मित्रांनी गैरफायदा घेतला. त्यांची फसवून सही घेतली व व्यवसाय स्वतःच्या नावावर केला.

कविताने हार न मानता स्वतःच्या हिंमतीवर नवीन व्यवसाय सुरू केला. ती अतिशय कडक, कठोर, चिडकी झाली होती हे बाहेरचे रूप सर्वांना दिसत होते. तिला खूप गर्व आहे, ती खूप शिष्ट आहे असे तिच्याबद्दल सर्वांचे मत झाले होते. परिस्थितीने तिला तसे केले होते जणू तिच्या भावनांचा दगड झाला होता.

असाच एक मुलगा प्रमोद. चांगली नोकरी होती जेमतेम ३० वयाचा. अत्यंत अबोल. शांत. आपण बरे व आपले काम बरे, काहीसा असाच. त्याचे सहकारी फिरायला जायचे. पार्टी करायचे. याला देखील बोलवायचे पण हा कधीच गेला नाही म्हणून हा खूप तुसडा व माणूसकी नसलेला असे त्यांचे ठाम मत झाले. त्यांच्या घरी खूप आग्रह केला म्हणून प्रमोद गेला होता. पण प्रमोदने कधीही कोणाला स्वतःच्या घरी बोलावले नाही. म्हणून त्यांना वाटे की याला कोणाचीही गरज नाही. तो स्वत:च्या विश्वात असतो.

एकदा एका मित्राने प्रमोदचा पाठलाग केला आणि काय आश्चर्य…? प्रमोद एका आश्रमात गेला व काही वेळाने सामान ठेवून बाहेर गेला.
या मित्राने तेथे चौकशी केल्यावर समजले की प्रमोद तेथेच रहातो व मुलांना संध्याकाळी शिकवण्याचे काम करतो. दर रविवारी देखील त्यानां बागेत घेऊन जातो व काही श्लोक व गोष्टी सांगून जीवनाचे धडे देतो. संस्करांचे बीज या बालमनावर करतो. तो येथेच लहानाचा मोठा झाला त्यामुळे हे आश्रमाचे कुटुंब आहे तसेच हे आश्रमातील पन्नास मुलांचा जेवणाचा खर्च तोच करतो.
हे ऐकून मित्र चकित झाला व क्षणात त्याचे मत बदलले. त्याच्या मनात प्रमोद विषयी आदराचे स्थान निर्माण झाले. पुढे त्याच्या मित्रांनी देखील आश्रमास खारीचा वाटा देण्याचे ठरवले.

अशीच सोनाली. अतिशय कष्ठाळू, स्वाभिमानी व प्रामाणिक .तिने कधीही कोणाकडून पैसे घेतले नाही. मित्र मैत्रिणी श्रीमंत असून त्यांचा कधी गैरफायदा घेतला नाही. लग्नाआधी स्वबळावर शिक्षण पूर्ण केले. नोकरी करून घराला आर्थिक मदत करत असे. नोकरी व घर हेच तिचे विश्व बंदीस्त.

लग्न झाल्यावर देखील तेच तिच्या नशिबी होते. तिचे पती अतिशय मागासलेल्या विचारांचे होते. त्यामुळे त्यांनी नोकरी करायला परवानगी दिली नाही. ते तिला कधीही पैसे देत नसत. तुला कशासाठी पैसे लागतात ?मी तर घरात सगळं सामान आणतो, सगळे खर्च मी भागवतो असे सारखे तिला ऐकवत असत. मग तिनेही त्यांना कधी पैसे मागितले नाही. घरात बसून चित्रकलेचे क्लासेस घेत व त्यातूनच स्वतःचे खर्च भागवत व मुलांची देखील थोडीफार हौसमौज करत असे. पतीने तिच्या कलेचे कधी कौतुकही केले नाही किंवा तिला प्रोत्साहन देखील दिले नाही. तिचे नेहमीच खच्चीकरण केले. पुरुषी अहंकार गाजवत राहिले. सतत टोमणे मारणे, वाईट साईट बोलणे, तिचे मन दुखावणे हेच ते करीत असत. तीही सर्व सहन करत असे. बाहेर मी किती साधा सज्जन माणूस असे स्वतःचे चित्र पतीने केले होते.

सोनालीने देखील कधी कोणापाशी तक्रार केली नाही अथवा घरातील गोष्टी सांगितल्या नाही कारण “झाकली मूठ सव्वा लाखाची” असे तिला वाटे. करणार काय बिचारी स्वावलंबी जगण्यासाठी चित्रकला शिकवत असे.थोडेफार पैसे मिळत त्यात ती समाधानी व आनंदी होती. घरचा व्यवहार कधीच तिच्या हातात नव्हता.
सर्वांना वाटे तिची तर किती मज्जा आहे ! मोठे घर, दागिने सर्व काही. वेळ जात नसेल म्हणून चित्रकलेचे क्लास घेते नाहीतर तिला काय गरज आहे ?

पण… या नजरेआड दिसणाऱ्या गोष्टी, पडद्यामागील सत्य केवळ एकाच मैत्रिणीला माहीत होते. हो, देविकाला. त्यामुळे ती मैत्रीण तिचा आत्मविश्वास वाढवत, जशी जमेल तशी सर्व मदत करत असे. सुख दुःखात सोबत करत असे. सुदामा व कृष्णा सारखी त्यांची ही मैत्री निर्मळ व पवित्र होती. मात्र जगाला सोनाली खूप नशीबवान आहे एवढेच दिसत होते. तिचा मानसिक व आर्थिक छळ कोणाला माहिती नव्हता. तिच्या गोड हास्यामागे हे सत्य लपवले गेले होते.
फक्त भक्कम आधार तो देविकाचा, जी तिच्यासाठी मनुष्यरूपी परमेश्वर होती. तिच्या आयुष्यातील खरी साथीदार होती. तिच्या जगण्याचा सार होती.

अशा काही घटना पाहून हेच लक्षात येते की दिसते तेच खरे नसते. पडद्यामागील चित्र खूप भयंकर असू शकते …..
कधी कधी सत्य खूप वेगळे असते.

रश्मी हेडे

— लेखन : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४