आपण दरवर्षी, वर्ष अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या पहिल्या काही दिवसात, काही संकल्प सोडतो. वाचू या, चित्रकार, लेखक, व्याख्याते श्री विजयराज बोधनकर यांनी सोडलेले काही संकल्प.
श्री विजयराज बोधनकर यांनी सोडलेले संकल्प सिध्दीस जावोत, यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
२०२५ या पहिल्या वर्षाचा माझा पहिला दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरू संत श्रेष्ठ आडकुजी महाराज यांच्य वरखेड या गावी एका पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने आनंदात गेला. वैचारिक मेळाव्यात नव्या वर्षाची अशी छान सुरुवात झाली.
मी व्यवसायाने जरी चित्रकार असलो तरी मला साहित्यात बालपणापासून आवड आहे आणि ती मी आता पर्यंत जपली आहे. माझी अनेक पुस्तके प्रकाशित झाली. चित्र, कविता आणि लेखन हातात हात घालून माझा प्रदीर्घ प्रवास झाला.
या नव्या वर्षात अनेक चित्र प्रदर्शने आणि अनेक विषयावरच्या लेखनाचा मी संकल्प केला आहे आणि सांगायला आनंद वाटतो की मी या दृष्टीने प्रारंभ देखील केला आहे.दिवसाला दोन पाने लिहायचे आणि पाच पेक्षा जास्त पाने वाचायची. या माझ्या संकल्पामुळे किमान पाचशे पाने वर्षा काठी लिहून होतील आणि अनेक पुस्तके वाचून होतील, अशी मला आशा आहे.
मी स्वतःलाच प्रश्न विचारतो की,निसर्ग त्याच्या कार्यात, नियमात सातत्य राखू शकतो तर मी का राखू शकणार नाही ? निसर्गाला मी गुरू मानतो. त्याची कायम एकच मागणी असते, ती म्हणजे शुद्ध रहा. देहाला, मनाला अशुद्ध करणाऱ्या गोष्टीपासून सावध रहा. आयुष्य आणि शरीर एकदाच मिळते. मन आणि बुध्दीला प्रेरणा मिळावी म्हणून सतत वाचन, मनन आणि चिंतन करीत रहा. असेच जीवन जगण्याचा मी कायम प्रयत्न करीत आलो आहे.
माझ्या संग्रही आज साडे तीन हजार पुस्तके आहेत. तीस वर्षे घरी टीव्ही नाही. प्रत्येक दिवस मला बोनस वाटतो. निर्मिती हे माझे व्रत आहे. स्वतःवर विश्वास ठेव असा निसर्गाचा संदेश मला महत्वाचा वाटतो. शरीर हे निसर्गाने आई मार्फत दिलेले मोठे धन आहे. त्या शरीर धनाची काळजी घेणे, हे नव्या वर्षाचे महत्वाचे व्रत असेल. मी सध्या साठी पलीकडे गेलो असून सुदैवाने एकही आजार नाही. मी निसर्ग रुपी ईश्वराचे आभार मानतो. पंच महाभूते हीच ईश्वराची खरी रूपे आहेत यावर माझा विश्वास आहे. “सर सलामत तो पगडी पचास” ही म्हण खूप काही सांगून जाते. कुठल्याही स्पर्धेत मला रस नसतो. मला रस असतो तो रोजच्या रियाजात ! सकारात्मक विचारांचा, अनेक कलांचा.
मला रियाज हा स्पर्धेपेक्षा जास्त शाश्वत वाटतो. त्यामुळे आपण गुणात्मक अधिक सक्षम होत जातो. त्यातून सकस कला निर्मिती होत जाते. २०२५ हे वर्ष मला नक्की उत्तोत्तम देणार याची मला खात्री आहे कारण मी माझ्या चंचल मनाला लगाम घालू शकतो. राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची एक प्रार्थना आम्ही लहान असताना म्हणायचो…
“चंचल मन को बुध्दी विचारक शुध्दी सतत ही करना है !… हीच प्रार्थना मला खूप काही देवून जाईल.चंचल मनाला शांत करता आले तरी शांत मन खूप काही करू शकेल.
सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा.
— लेखन : विजयराज बोधनकर. ठाणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800