Friday, December 27, 2024
Homeसंस्कृतीनागपंचमी

नागपंचमी

आज नागपंचमी आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊ या भारतीय संस्कृतीचे अभ्यासक वि. ग.सातपुते यांनी सांगितलेले नागपंचमी चे महत्व. नाग, साप वाचवू या आणि पर्यावरणाचे संरक्षण करू या. नागपंचमी च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते.

“श्रावणे शुक्लपंच्यम्यां यत्कृतं नागपूजनम् ।
तने तृप्यंन्तु मे नागा भवन्तु सुखदा: सदा ।।”

भारतीय संस्कृतीत धार्मिक व्रतवैकल्ये, सणवार उत्साहाने आणि श्रध्येने साजरी करण्याची परंपरा अनादिकालापासून आहे. त्या सणांना हिंदू धर्मात फार महत्वाचे स्थान आहे. या सर्वच सणाबाबत हे सण उत्सव कां केले जातात, त्याची पार्श्वभूमी काय ? त्याचे दृष्टांत कोणते याची सारी महती पुराणकाळापासून हिंदूधर्मातील ग्रंथातून, अगदी देवदेवता, ऋषीमुनी यांच्या काळापासून अनेक कथांमधून, आपल्या प्रत्ययास येते. तसेच पुरातन कालापासून देवदेवतांच्या प्रतिकांची श्रद्धेने पूजा करण्याची प्रथा देखील आजही प्रचलित आहे. पण या सर्वांमध्ये प्रत्येक सण, उत्सवांच्या मागे संस्कारांचं, संस्कृतीच, तसेच शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत असे मानले जाते. या साऱ्या सणांच्या बाबतीत अनेक पौराणिक आख्यायिका, दंतकथा आहेत आणि त्या सर्वश्रुत आहेत.

नागपंचमी हा असाच श्रावण महिन्यातील सण भारतात साजरा केला जातो. नाग हे भगवान शंकराच्या गळ्यातील हाराचे स्थान आहे. भगवान विष्णूलक्ष्मी यांची शय्या असून विष्णू नागावर विराजमान आहेत असे दिसते आणि पशु, पक्षी, प्राणी यांचा मानवी जीवनाशी खूपच जवळून संबंध आहे. हे आपल्या दृष्टोत्पत्तीस येते. तेंव्हा बैलपोळा, नागपंचमी, गोपूजा (वसुबारस) ऋषीपंचमी, असे इतर अनेक जे सण मानले जातात त्यांची त्या त्या श्रद्धेनुसार त्या श्रद्धेच्या महत्वानुसार त्या त्या दिवशी यथायोग्य पूजा करण्याची प्रथा पूर्वीपासून सुरू आहे. त्यामागे धार्मिक, सामाजिक, शास्त्रीय कारणे देखील आहेत. आणि उत्सवांची नाती श्रध्येय, देवधर्म या संकल्पनेशी आस्थेने जोडलेली आहेत. अप्रत्यक्षात नैसर्गिक पर्यावरणाशी जोडलेलं ही नाती आहेत.

भारतीय संस्कृती भावनिक, दैविक श्रद्धेशी निगडित आहे. त्यामुळे साऱ्या निसर्गाला, साऱ्या सृष्टीला भारतीय संस्कृतीत परमेश्वराच्या रुपात पाहिलं जातं..! आणि बैल (नंदी), मोर, वाघ, सिंह नाग, वराह, मत्स्य, गरुड, उंदीर, श्वान अशा अनेकांना दैवी प्राण्यांच्या श्रेणीत गणलं गेलेलं आहे. म्हणून नागला देखील दैवीप्राणी समजले असून नागपंचमीची पूजा म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी हा सण मानला आहे म्हणूनच नागपंचमीच्या पूजेचे महत्व आहे.

प्राचीन आख्यायिकेत भगवान कृष्णाशी कालियामर्दन ही कथा निगडित आहे. ती सर्वश्रुत आहे. आपण सर्वांनी ती ऐकली आहे. त्या कथेत कालिया या महाकाय सर्पाचा भगवान श्रीकृष्ण लोकरक्षणासाठी पराभव करतात आणि त्यावेळी तो सर्पराज कालिया श्रीकृष्णाला शरण येतो आणि तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी असल्यामुळे नागपंचमी हा दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि नागदेवतेची पूजा केली जाते.

भारतीय संस्कृतीत ज्योतिष शास्त्राचा देखील उल्लेख आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचे शास्त्रानुसार कुंडलीच्या अभ्यासानुसार अनेक पद्धतीने भविष्य वर्तविले जाते. त्यात कुंडलीतील बलस्थान किंवा दोष वर्तविले जातात. त्याला उपाय देखील सांगितले जातात पण हा विश्वासाचा, श्रद्धेचा विषय आहे. कुंडलीत अनेक योग दाखविले आहेत. त्यामध्ये कालसर्प हा दोष असलेला महत्वपूर्ण योग सांगितला आहे. त्या दोषयुक्त योगापासून मुक्ती मिळावी म्हणून ज्योतिषी पवित्र नदीकाठावर कालसर्प योगाची शांती करण्यास सुचवतात आणि त्यासाठी शास्त्रोक्त धार्मिक विधी करण्यास सांगतात त्यावेळी नागदेवतेची पूजा केली जाते. ही प्रथा आजही सुरू आहे. पण हा श्रद्धेचा भाग आहे. पौराणिक कथेतून पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर (डोक्यावर) तोललेली आहे असा उल्लेख आहे.

भारतीय संस्कृतीत अनेकप्रकारे नागांची पूजा केली जाते. भारतीयांनी नागाला देवता मानले आहे. शेतीप्रधान संस्कृतीत नागपूजेला विशेष महत्व दिले आहे. नाग, साप हे शेताचे रक्षण कर्ते आहेत असे मानले जाते. भारतात विविध प्रांतात म्हणजे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, केरळ, तामिळनाडू, आसाम अशा ठिकाणी नागपंचमी उत्सवाने साजरी केली जाते.
विशेष करून स्त्रिया या दिवशी नटून थटून नागाची पूजा करुन गारुडी लोकांनी पकडून आणलेल्या खऱ्या नागाची दूध, लाह्या, अर्पण करून हळदीकुंकू लावून पूजा करतात.

आधुनिक काळात तांत्रिक विकसित क्षेत्रात आपल्याला या नागपंचमीच्या पूजनाचे महत्व कमी झालेले दिसते. पूर्वी नाग, साप हे विषारी असल्याने नागांची हत्या केली जात होती पण आता सर्पमित्रांच्या साह्याने नागसापांचे संरक्षण केले जाते व त्यांना पकडून इतरत्र जंगलात सोडले जाते.

आज वैद्यकीय क्षेत्रात संशोधनामार्फ़त नागांपासून मिळणाऱ्या विषाचा देखील त्याच्या विषातील औषधी गुणधर्मामुळे अनेक रोगांवर उपयुक्त औषधे बनविली जात आहेत. काळानुसार वैचारिक बदल होवून अंधश्रद्धा वगळून सण आणि उत्सवांचे योग्य ते बदल घडत आहे. हे स्वागतार्ह आहे.
इती लेखन सीमा.

विजय सातपुते

— लेखन : वि.ग.सातपुते. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९