त्या वेळेस मी पुण्याला होतो, एकदा उत्सुकता म्हणून पुण्याच्या एका पुढच्या स्टेशनला जायचं असं मनाशी ठरवून मी गाडीत बसून पुढच्या स्टेशनला उतरलो.
ती एक विरळ वस्ती असलेलं खेडेवजा गांव होतं, वस्ती अगदी विरळच. पण पुढे जाऊन काय आहे हे पहावं म्हणून मी थोडासा पुढे गेलो. तिकडे एक चाळ दिसली, आता ह्या चाळीतील लोकं कशी राहत असतील ? त्यांची राहण्याची पद्धत कशी असेल ? हा विचार मनांत आला अन चाळीत एक फेरफटका मारून यावा व अगदीच कोणी हटकलं तर इथे फणसे कुठे राहतात म्हणून विचारायच. अर्थात फणसे इकडे रहातच नाहीत हे मला माहीत होतं आणि आपल्याला चाळीतून बाहेर पडता येईल हा विचार मनात होता.
तसा फेरफटका मारत असताना एक गृहस्थ पाठीमागून आले व कोण पाहिजे म्हणून त्यांनी विचारले. मी सहजच इथे फणसे कुठे राहतात म्हणून विचारलं, तसा त्यांनी थोडं आठवण्याचा प्रयत्न केला व फणसे इकडे रहात नाहीत असे मला सांगितले व मी चाळीच्या बाहेर पडण्यासाठी म्हणून प्रवेश दरवाजापाशी आलो.
या प्रवेश दाराचं एक वैशिष्ट होत. त्याला एक भली मोठी जाड काच होती व ती उघडझाप करता येईल अशी होती. त्या भल्या मोठ्या काचेवर बसून हळूच पाय सोडून जमिनीवर उतरायचं.
मी तसच केलं व चाळीतून बाहेर पडलो. माझं कुतूहल जागृत झालं आणि थोड पुढे जाऊन काय आहे हे पहावं, मी पुढे गेलो. तेथे बऱ्याच झोपड्या होत्या पण एकाही झोपडीला दार नव्हतं हे एक नवलच होतं. मी पुढे गेलो व कप्पाळावर हात मारला, अरे मी इकडे कुठे आलो. ही तर सर्व छक्यांची वस्ती होती.भराभर मी तिकडून बाहेर आलो व पुन्हा त्या झोपड्यांपाशी आलो. एका झोपडीत एक बाई काळपटसं पीठ मळत होती व तिची ५-६ वर्षाची मुलगी तिच्या गळ्यात हात घालून भूक लागली म्हणून रडत सांगत होती.
पुढच्या एका झोपडीत बांबू व पत्र्याच्या मध्ये मला काही चांदीचे शिक्के पडलेले दिसले, तसं मी त्या मुलीला बोलावल. खोटं कशाला सांगू, असे शिक्के बघून मलाही ते शिक्के उचलून घ्यायचा थोडा मोह झाला, पण असा विचार माझ्या मनात आलाच कसा, असा प्रश्नही माझाच मला पडला.
ती मुलगी यायला तयार नव्हती पण थोडेसे आढेवेढे घेत ती पुढे आली, तिला मी ते शिक्के दाखवले व तिथे कोणीच रहात नसल्यामुळे मी तिला ते घ्यायला सांगितले.
क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली की, आम्ही असे पैसे घेत नसतो. मला खाडकन् कोणी तरी कानशिलात लगवल्या सारखं झालं. का बरं ती असं म्हणाली असेल ? हे न उलगडलेले कोडेच होते.
मी ताडकन स्टेशन गाठलं व पुण्यात परत आलो.
— लेखन : सुभाष श्रृंगारपुरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800