भाग 9 : कौमार्य अवस्था आणि बालक पालक संबंध
“आई आज माझा एक्स्ट्रा क्लास आहे मला यायला उशीर होईल” असं सांगून पंधरा वर्षाची जुई आपली गुलाबी रंगाची लुसलुशीत फरची बॅग पाठीवर अडकवून दारा बाहेर पडणार त्याच वेळी आई किचन मधुन जवळपास ओरडलीच,” जुई, जास्त उशीर करू नको. Hबाबा यायच्या आत घरी ये.” असं म्हणता म्हणता आई हातात पळी घेऊन किचन मधून बाहेर आली आणि जुई कडे बघून म्हणाली, “ती ओढणी नीट कर आधी”. जुईने एका खांद्यावर छान पिनप केलेली ओढणी पटकन दोन्ही खांद्यावर पसरवून घेतली. तेवढ्यात पूजा करता करता आजी मागे वळून जुईला म्हणाली, “परवा मानवी ची आजी भेटली होती,तू म्हणे त्या एका पोराशी बोलत होतीस”. त्यावर आई काहीतरी बोलणार एवढ्यात जुई म्हणाली, “अग आजी फक्त सुट्टे पैसे घेतले त्याच्या कडून.बोलले नाही काही”. असं बोलून जुई घरा बाहेर पडली. थोड्या अंतरावर जाऊन तिने बो बांधलेले रेशमी केस मोकळे सोडले आणि ओढणी व्यवस्थित केली. तिला, आवडत होती तशी.
जुई क्लासच्या दिशेने वळली. जुईला फार मैत्रिणी नव्हत्या.तिचं बोलणं देखील मोजकं होतं. क्लास मध्ये शिरताना दाराच्या उजव्या बाजूला थांबलेल्या एका मुलाने तिच्याकडे एक कागदाचा बोळा टाकला. एकाएकी असं घडल्या मुळे जुई घाबरली. त्याच्याकडे लक्ष न देता ती क्लास मध्ये निघून गेली. क्लास मध्ये बसल्या बसल्या जुई सारखी खिडकीतून बाहेर बघत होती.खूप अस्वस्थ झाली होती ती. क्लास संपल्यावर ती आपल्या एका मैत्रिणीचा हात धरून बाहेर पडली. तो कागदाचा बोळा तिथे तसाच पडला होता. जुई वारंवार वळून त्या कागदी बोळ्याकडे बघायची पण तो उचलून घेण्याची हिंमत तिला होत नव्हती.
पुढे काही दिवस नियमाने तो मुलगा असे कागदी बोळे जुई समोर टाकायचा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती वर्गात निघून जायची. ते सगळं तिला आवडत होतं की नाही ? त्या मुलाच्या अश्या वागण्याची कोणाकडे तक्रार करायची की नाही ? त्या कागदावर काय लिहिलंय हे तिला बघावसं वाटायचं की नाही ? की मग तिचा गोंधळ उडाला असणार की, कोणीतरी आपली दखल घेतली आहे. आपल्यासाठी कोणीतरी नियमाने काहीतरी लिहितोय.असे अनेक मिश्रित प्रश्न आणि विचार जुईच्या मनात निश्चितच असणार. पण हा गुंता सोडवायचा कसा ? घरी आई बाबांना सांगितलं तर ते रागवणार. मैत्रिणीला सांगितलं तर कोणाला सांगणार तर नाही ना ही भीती होती. शरीरात दर रोज होणारे बदल, हार्मोन्स ची उलथा पालथ, मनावरचा निसटत जाणारा ताबा जुईला त्या मुलाकडे आकर्षित करू लागला. तिचे बाबा खूप रागीट स्वभावाचे होते. छोट्या छोट्या गोष्टीवरून ते घर डोक्यावर घेत असत. त्यामुळे आई ची खूप चिडचिड व्ह्यायची. एक लहान भाऊ होता आणि आजी होती त्यांच्याशी काय बोलणार ?
जुई अभ्यासात खूप हुशार होती.घरच्या तंग वातावरणामुळे ती खूप अस्वस्थ असायची. मोजक्या मैत्रिणी होत्या. ती त्यांच्याशी पण फार बोलत नसे. तिच्या मनात प्रश्नांचा काहूर माजला होता पण उत्तर कुठं शोधायचं ते कळत नव्हत. शाळेत दिल्या जाणारं लैंगिक शिक्षण, घरी आदर्श संस्काराचे धडे, सतत तिच्या हालचाली वर नजर ठेवणारी आजी.या सगळ्यात जुईला तिच्या भावनिक, मानसीक, शारीरिक गरजांना समजून घेण्यास नीट विचार करण्यासाठी आणि तिच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी योग्य कोणी मिळालंच नाही आणि मग….
आणि मग काहीही होऊ शकेल. जुई वाहवत जाऊ शकेल, तो मुलगा तिची फसवणूक करू शकेल, जुई कुठल्या अडचणीत येऊ शकेल, ती कुठले चुकीचे निर्णय घेऊ शकेल, ती भावनांच्या आहारी जाऊन आपलं पुढील आयुष्य धोक्यात टाकू शकेल. यातलं काहीही घडू शकेल किंवा या ही पेक्षा भयंकर काहीतरी घडू शकेल. कदाचित त्याचं नातं मैत्री,प्रेम या दिशेने पण पुढे जाऊ शकेल. पण या वयातील शारिरीक आकर्षण ही गरज उच्च कोटीला पोहोचली असते त्यात भावना देखील गुरफटून जातात आणि मग हे आकर्षण, मैत्री आणि प्रेम या गुंत्यात मुलं अडकतात आणि मग गुंता नीट सोडवला नाही गेला की, त्यांच्या कडून चुका घडतात आणि या चुका कधी कधी इतक्या मोठ्या होतात की बाल अपराधाचे स्वरूप घेतात आणि या बालकांचे आयुष्य अतिशय नाजूक वळणावर येऊन नकारात्मक गोष्टीकडे वळत जातं.या सगळ्यांचा अतिशय गंभीर आघात बालकांच्या भावनिक, मानसीक गरजा वर होतो.
कौमार्य अवस्थेत बालकांच्या दृष्टीने बालकांचे सगळ्यात मोठे वैरी म्हणजे त्यांचे पालक असतात. सतत सूचना करणं, टोमणे देणं, बालकावर नजर ठेवणं, बालकांवर पालकांनी अविश्वास दाखवणं, सतत कुठल्या तरी आदर्श गोष्टी सांगत राहणं, बालकांची प्रत्येक गोष्ट चुकीची आहे हे खुणावत राहणं, बालकांच्या संपूर्ण पिढीला नाव ठेवत राहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक गरजा समजून न घेता त्याचा कायम अस्विकार करण.
ही गोष्ट पालक बालक संबंधात दरी निर्माण करत जाते आणि त्यांच्यात दुरावा वाढत जातो.हे दुरावे इतक्या उच्च कोटीला पोहोचतात की मुलं पालकांशी काहीही शेयर करत नाही, सतत खोटं बोलू लागतात आणि नंतर नंतर बोलेनासे होतात. ते आपल्या वेगळ्याच विश्वात रममाण होतात.त्यांच्या या विश्वात शिरायचं असल्यास त्यासाठी एकच मार्ग आहे, त्यांच्याशी मैत्री आणि स्वीकार.
प्रत्येक पिढी मागच्या पिढीपेक्षा वेगळी असणारच आहे.त्यांच्या गरजा, मान्यता,चूक बरोबर या संकल्पना बदलत जाणारच आहेत. आणि म्हणून पालकांनी जर आपल्या नैतिक मूल्यांचे मोजमाप त्यांच्या कृती सोबत जोडत गेले तर ती पोकळी वाढतच जाणार आहे. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. बालकांशी बोलताना कायम आपल्याला फक्त बोलायचं असतं त्यांनी फक्त एकावं असं पालकांना आवर्जून वाटतं आणि ते तेच करत राहतात. आम्ही आमच्या मुलांशी खूप बोलतो म्हणजे काय? पालकच बोलत असणार तर पालक बालक संबंध एका टोकाला जाऊन थांबणारच की.या उलट पालकांनी बालक जास्तीत जास्त बोलतील यासाठी तशी वातावरण निर्मिती करावी.आणि त्यांना त्यांचे विचार, मनातील घालमेल बोलण्याची संधी द्यावी. पाल्य जे काही बोलतील ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. या बोलण्यातून बालक व्यक्त होत असतात आणि ही उत्तम संधी असते त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याची. सगळे विषय त्यांच्याशी बोलावे.काही विषय आपण एका संस्कार नावाच्या कुपीत बंद करून ठेवतो आणि त्यामुळे ते विषय तिथेच कुजत जातात आणि पाल्यांना जेव्हा त्याबाबत कोणाशी तरी बोलावंसं वाटतं ते आपल्या पालकांची निवड कधीच करत नाही. ते आपल्या मित्रांशी किंवा बाहेर कोणाशी तरी बोलतात.
पालकांनी इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपण जर सुसंवाद साधण्याचे दार बंद केले असणार तर ही पाल्य काय करणार ते बाहेर जाऊन वेगवेगळी दार ठोठावतात. मग आपल्याला काय माहिती ती कडी उघडणारी माणसं कशी असणार? ती त्यांना काय देणार ? त्यांचा गैरफायदा घेणारी असली तर ? म्हणून पालकांनी बालकांसाठी एप्रोचेबल राहणं किती आवश्यक आहे याचा विचार करावा.कोणतीही गोष्ट ती चूक की बरोबर असे वर्गीकरण न करता पाल्यांनी पालकांशी शेयर करायला हवी. पाल्यांना सुरक्षित वाटेल आणि सुसंवाद साधता येईल, आपल्या भावना समजून घेतल्या जातील असा विश्वास वाटेल असे वातावरण कुटुंबात निर्माण करणं ही आजच्या काळाची गरज आहे.
कौमार्य अस्वस्थेतील बालकांच्या मनात अनेक मखमली प्रश्न असतात. त्याची अतिशय कौशल्याने रेशमी उत्तरं देण्याची जबाबदारी पालकांनीच पूर्ण केली तर या नाजूक वयात बालक कधीच विखुरणार नाहीत आणि त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या वयाच्या टप्प्यात बालक आपल्या यशस्वी भविष्याची बांधणी करू शकतील.
क्रमशः
— लेखन : डॉ राणी खेडीकर.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800