पावसा रे पावसा
कसे मानू तुझे आभार
आधीच निरोप धाडून
बंद केलंस तू शाळेचं दार
तुझ्यामुळे आज
कटकट गेली शाळेची
खूप मज्जा येणार आज
पावसात चिंब भिजण्याची
दादा ताई नि माझे सवंगडी
सर्वांनाच वाटते तुझी गोडी
पावसात भिजू नको सांगणारी
मोठी माणसं आहेत थोडी वेडी
ही वेडी मंडळी
कधीच नसेल का रे भिजली
तसं असेल तर यांना
पावसाची गंमतच नाही कळली
आमच्याकडचे बाप्पा
चक्क माझ्याशी बोलले
तुझी वाट बघत
तुझ्यावर रुसून गेले
मी त्यांना सांगितलं बाप्पा
लवकर पाठवा पावसाला
अस्सा पाठवा की
सुट्टी मिळू द्या शाळेला
माझ्या लाडक्या
गणपती बाप्पाने माझं ऐकलं
मुसळधार पावसाला पाठवलं
आणि….. शाळेचं दारही बंद केलं
आई बाबा गेले ऑफिसला
म्हणून मिळतय भिजायला
साडे आठची वेळ दिली होती
उशीर का रे केलास यायला
आता आम्हा सगळ्या बच्चे कंपनीचं
ऐकावं लागेल तुला
असाच दिवसभर बरसत
बंद ठेव उद्यापण शाळेला
लोकल मात्र चालू राहू दे म्हणजे
आई बाबा जातील कामाला
पुन्हा उद्या मिळू दे
आजच्या सारखं भिजायला
— रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800