Tuesday, July 1, 2025
Homeसेवा'पुरी बाबा’ : आपलेपणाचा किमयागार !

‘पुरी बाबा’ : आपलेपणाचा किमयागार !

प्रा सुरेश पुरी सरांचे विद्यार्थी राहिलेले संदीप काळे हे सध्या ड्रीमवर्थ सोल्युशन्सचे (जागतिक नेटवर्क संस्था) नयन अक्षर मासिक, नयन अक्षर प्रकाशन हाऊस, व्हॉईस ऑफ मीडिया मासिक, दै. शासन सम्राट, मुंबई, आदींचे मुख्य संपादक संचालक आहेत.

५२ देशांतील सुमारे ४.७ लाख पत्रकार कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संस्थेचे ते संस्थापक.त्यांनी आतापर्यंत ७२ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ‘ट्वेल्थ फेल’ या पुस्तकावर आधारित हिंदी चित्रपट खूपच गाजला आहे.

श्री संदीप काळे यांनी २५ वर्षांच्या कारकिर्दीत जय महाराष्ट्र, IBN लोकमत, दै. प्रहार, दै. लोकपत्र, दै. लोकमत, साम टीव्ही, दै. सकाळ आदी माध्यमांमध्ये काम केले आहे. दै. सकाळमध्ये ते १२ वर्षे संपादक होते. आतापर्यंत २४८ पुरस्कार मिळविलेल्या संदीप काळे यांचे ‘न्यूज स्टोरी टुडे’ परिवारात हार्दिक स्वागत आहे.
— संपादक

छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्या दिवशी मी उतरलो. गाडीत बसून किशोर गुंजाळच्या घराकडे निघालो. गाडीच्या बाहेर चारही बाजूंनी माझी नजर भिरभिरत होती. मी पाहत होतो, तेव्हाच्या औरंगाबादमध्ये असतानाचे वातावरण आणि आता औरंगाबादचे नाव बदललेले संभाजीनगर, यात खूप मोठा बदल झाला होता. शहर सोडून आज २० वर्ष झाली, तरी आजही संभाजीनगरमध्ये, इकडे रामनगर पासून ते तिकडे विद्यापीठापर्यंत प्रत्येक भागात कुणी ना कुणी माणूस ओळखीचा होताच होता. त्या प्रत्येक भागात आपल्या हक्काचे, ओळखीतले एक घर होतेच. संभाजीनगरमधले ते दिवस प्रचंड संघर्षाचे होते, तरीही आनंद खूप होता. आज संभाजीनगरच्या त्या प्रत्येक क्षणाची मला आठवण येत होती.

किशोरच्या घरी तयार होऊन, मी किशोरला घेऊन विद्यापीठात निघालो. विद्यापीठाच्या गेटसमोर गाडी उभी करून आम्ही बाबासाहेबांच्या चरणांवर मस्तक टेकवले. गाडीत बसून आता आम्ही कमानीमधून विद्यापीठात प्रवेश करणार, इतक्यात किशोर मला एकदम म्हणाला, ‘अरे संदीप, त्या माणसांमध्ये बसलेले ती व्यक्ती, मला पुरी सर वाटतात. किशोरच्या तोंडातून पुरी सरांचे नाव ऐकल्या-ऐकल्या माझा चेहरा एकदम प्रफुल्लित झाला. मी गाडीची काच खाली केली. बाहेर पाहतो तर काय ! त्या सगळ्या माणसांमध्ये मोठमोठ्याने हसणारी ती व्यक्ती तिच होती. पुरी सर म्हणजे आमचे सुरेश पुरी सर.

किशोरने गाडी बाजूला घेतली. मी गाडीतून खाली उतरलो. जिथे पुरी सर होते, तिथे आम्ही पोहचलो. पुरी सरांच्या पायांवर मस्तक ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले. मी खाली वाकल्यावर पुरी सरांनी मला वर उचलले. मी कोण आहे, हे पाहत त्यांनी माझा चेहरा न्याहाळला. मी कोण, हे लक्षात आल्यावर सर माझ्याकडे पाहत एकदम ओरडले, ‘अरे संदीप, इकडे कुणीकडे ?’ असे म्हणून त्यांनी मला आलिंगन दिले. सर माझी मिठी कधी सोडणार असे पाहणाऱ्यांना नक्की वाटत असणार. त्यातल्या काहींना आमचे प्रेम माहिती होते. ज्यांना माहिती नव्हते, त्यांना ते प्रेम समजून सांगणे शक्य नव्हते. २००२ ते २००८ हा अवघा सहा वर्षांचा काळ म्हणजे पुरी सरांच्या सहवासातला सुवर्णकाळ होता. त्या सहवासातूनच आयुष्याची खरी पायाभरणी झाली. पुरी सरांनी माझी मिठी सोडली. तिथे असलेल्या प्रत्येकाला माझी ओळख करून देताना पुरी सर म्हणाले, ‘हा माझा विद्यार्थी संदीप काळे. मुंबईला असतो. मोठा पत्रकार आहे आणि अनेक पुस्तके त्याच्या नावावर आहेत. पत्रकारांसाठी याने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून जागतिक स्तरावर काम सुरू केले आहे’. माझा कौतुक सोहळा काही केल्या सर थांबवत नव्हते.

मी सरांना म्हणालो, ‘सर, आता बस्स झाले’. माझ्याकडे शांतपणे बघत पुरी सरांनी त्यांचे बोलणे थांबवले. मग झालेल्या शांततेची कोंडी फोडताना सर पुन्हा तिथे असलेल्या सर्वांची मला ओळख करून देत होते. सर्व सरांचे विद्यार्थी होते. प्रत्येक जण मला मला परिचय करून देताना सांगत होते, ‘सरांनी माझे शिक्षण पूर्ण केले. सरांनी माझे लग्न लावून दिले. कुणी नॊकरीचे सांगत होते, कुणी प्रेस टाकून दिली, असे सांगत होते. प्रत्येक जण सरांविषयी भरभरून बोलत होते. तिथे असणारे समीर वाघमारे म्हणाले, ‘मी सांगतो तो विषय साधारण तीस वर्षांपूर्वीचा आहे. वडील रोज मजुरी करायचे. त्या मजुरीतून माझ्या दोन बहिणी आणि माझ्या जगण्याचा प्रश्न कसाबसा सोडवला जायचा. मी मित्रासोबाबत विद्यापीठात शिकायला आलो. रोजचा खर्च बघून बापाने लगेच परत ये असा निरोप पाठवला. मी ठरवले होते, परत जायचे नाही. पुरी सर सर्व विद्यार्थ्यांना मदत करायचे, योग्य तो मार्ग दाखवायचे, हे मी कित्येक वेळा पहिले होते. मी माझी अडचण पुरी सरांना सांगितली. मला जवळ घेत पुरी सर म्हणाले, ‘नको काळजी करू, चांगला अभ्यास कर. मी आहे ना तुझ्या सोबत’. तेव्हा जो सरांनी पाठीवर हात ठेवला, तो आजपर्यंत कायम आहे’.

समीर अजून उत्साहाने बोलत म्हणाले, ‘मला तो प्रसंग अजून आठवतो. गावाकडून वडील गेल्याचा निरोप आला. आई अगोदरच मरण पावली होती. मी पुरी सरांना बाबा गेल्याचे सांगायला घरी गेलो. सरांना निरोप देण्याऐवजी सरांच्या गळ्यात पडून खूप रडलो. मी घरी जाण्यासाठी निघालो खरा, पण पैसे नसल्यामुळे बापाचे अंत्यसंस्कार करायचे कसे ? हा प्रश्न माझ्या समोर होता. दुसर्‍या क्षणी मनात विचार आला, पुरी सरांना पॆसे मागावे का ? पण दुसरे मन म्हणाले, किती मागायचे पैसे सरांना ? मी थोडा शांतपणे विचार करून निघालो. थोडे पुढे गेल्यावर मी मागे पाहिले, तर दुसरे कपडे घालून पुरी सर माझ्यासोबत माझ्या गावी निघाले होते. माझ्या वडीलांच्या अंत्यसंस्कारांचा सर्व खर्च त्यावेळी पुरी सरांनी केलाच. शिवाय आयुष्यभर वडीलांसारखे माझ्यामागे उभे राहिले. आता काय बायको मोठ्या हुद्यावर आहे. दोन्ही मुले डॉक्टर. नागपूरला घर, गावाकडं घर, कशाचीही कमी नाही’. समीर पुरी सरांचा हात हातात घेत म्हणाला, ‘आता एकच कमी आहे, ती म्हणजे पुरी सरांचा सहवास मिळत नाही. समीरच्या बोलण्याने तिथे असणारे सारेच भावुक झाले होते. तिथे असणाऱ्या प्रत्येकाची पुरी सर यांना घेऊन एक वेगळी स्टोरी होती. त्या स्टोरीचे नायक पुरी सर होते.

मला वाटायचे पुरी सरांनी जे माझ्यासाठी केले, ते कुणासाठी केले नाही. पुरी सर माझ्या जवळचे आहेत, माझ्याएवढे ते कुणाच्याही जवळचे नाहीत. पण तसे नव्हते. तिथे असणाऱ्या प्रत्येकासाठी पुरी सरांनी पाठीराख्या बापाची भूमिका बजावली होती. माझ्याएवढेच त्या सर्वांचे पुरी सर तेवढेच जवळचे होते.

आम्ही पुरी सरांना भेटलो, त्या दिवशी पुरी सरांच्या संतोष कांबळे नावाच्या विद्यार्थ्याच्या मुलीचे लग्न होते. लग्नानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरली ती पुरी सरांची भेट. लग्न लागले आणि त्यानंतर पुरी सर त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मस्त झाडाखाली गप्पा मारत बसले होते. अनेक ठिकाणी प्राध्यापक म्हणून सेवा करणारे प्रा. सुरेश पुरी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्र विभागातून प्रोफेसर तथा विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. पत्रकारिता आणि जनसंपर्क या दोन्ही क्षेत्रांत पुरी सरांचे विद्यार्थी पावलोपावली आढळतील. ते विद्यार्थी त्यांनी घडवलेले, उभे केलेले, मोठी मदत केलेले, मोठा आधार दिलेले. ‘काय त्या माणसाची किमया’ होती, कसे शब्दात सांगायचे.
“गरज सरो आणि वैद्य मरो”, असे पुरी सरांच्या विद्यार्थ्यांनीही कधी केले नाही. मी तुम्हाला मदत केली, तुम्ही इतरांना मदत करा, आपला जन्म इतरांना देण्यासाठी झाला आहे, हा कानमंत्र पुरीसरांच्या मुशीतून तयार झालेल्या प्रत्येकाने अंगीकारला. आम्ही पुरी सरांचे विद्यार्थी आहोत, असे अभिमानाने सांगणाऱ्या पुरी सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांना आयुष्यभर जपले.

‘पुरी बाबा’ म्हणून सर्व विद्यार्थ्यांच्या काळजाचा तुकडा असलेले पुरी सर. असे शंभरामध्ये एखादेच शिक्षक असतील, ज्यांनी विद्यार्थ्यांवर प्रचंड प्रेम केले. त्यांचे प्रचंड प्रेम मिळवले. पुरी सरांच्या नावाने त्यांच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, पुरस्कार, पुस्तकप्रेम यासारखे अनेक उपक्रम राबवले. या मातृह्रदयी माणसात काय जादू होती काय माहीत ! जो विद्यार्थी त्यांच्या सहवासात यायचा, तो त्यांचाच व्हायचा.
आज जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही, जिथे पुरी सरांनी घडवलेले विद्यार्थी नाहीत. असे प्रामाणिक गुरुजी आपल्या अवतीभोवती शंभर किमीवर असले, तरी आमच्याकडे दूर होत चाललेले गुरुशिष्याचे नाते अजून संस्कारित होईल. माझ्या मनात असा उगाच विचार सुरू होता.

पुरी सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या गप्पांमध्ये विद्यापीठात असलेल्या कामाचा वेळ आता संपला होता. पुरी सर यांना घेऊन जावे, काकूंना भेटावे, या उद्देशाने मी पुरी सरांना माझ्या गाडीत बसवले. गुलमंडीच्या भाजी मार्केटजवळ पुरी सरांनी गाडी उभी करायला सांगितली. त्यांच्याजवळ असलेल्या काळ्या छोट्या बॅगेतून त्यांनी दोन पिशव्या काढल्या. सरांनी अवघा बाजार पायाखाली घातला. हातातल्या दोन पिशव्या मालाने भरून घेतल्या. सर आले आणि गाडीत बसले. दोन्ही भरलेल्या पिशव्यांकडे पाहत मी पुरी सरांना म्हणालो, ‘सर, आताही घरी सामान घेऊन जाताय, घरचे काम करताय, कमाल आहे !’
माझ्या बोलण्यावर पुरी सर एकदम हासले. दूध डेअरीपासून पुरी सरांनी गाडी त्रिमूर्ती चौकात घ्यायला लावली. बंजारा कॉलनीत एका घरासमोर आमची गाडी थांबली. सरांनी मला आतमध्ये यायला सांगितले. दोन पिशव्यांमधील उरलेली पिशवी सरांनी हातात घेतली. आम्ही त्या घरात प्रवेश केला. त्या घरात एक जोडपे लिखाणाचे काम करीत होते. पुरी सरांना पाहून ते दोघेही त्यांच्याकडे धावत आले. त्यांनी पुरी सरांना नमस्कार केला. पुरी सरांनी त्यांच्या हातात असलेली बॅग त्या घरात असलेल्या महिलेच्या हाती दिली. पुरी सरांनी त्या दोघांसोबत गप्पा मारताना त्यांचा परिचय करून दिला. थोड्या वेळात आम्ही उठलो आणि बाहेर येऊन गाडीत बसलो.

गाडीत बसल्यावर पुरी सर त्या जोडप्यांबाबत म्हणाले, ‘ते जोडपे विद्यापीठात शिकायचे. दोघांची जात वेगळी. त्यामुळे दोघांनाही घरच्यांनी नाकारले. चांगल्या ठिकाणी नोकरीला लागले, पण झाले असे की कोरोनाच्या काळात दोघांचीही नोकरी गेली. तेव्हापासून आजपर्यंत नोकरी शोधण्याचे काम सुरू आहे. मी दर आठवड्याला संजू आणि नीलिमाकडे येऊन त्यांना बाजार देण्याचे काम करतो’. असे बोलून पुरी सर एकदम शांत बसले.

मी विद्यापीठात असतानाचा तो काळ मला एकदम आठवला. त्या वेळी रोज दोन चार मुलांना पुरी सरांकडून मदत व्हायची. आर्थिक आणि सामाजिक अडचणींमधून मार्ग काढायचा कसा, यावरचे सोल्युशन एकमेव पुरी सर असायचे. अगोदर त्यांचा स्वतःचा पगार, मग मुलांचा पगार सर्व वाटून पुरी सर मोकळे व्हायचे. आलेल्या पीएफच्या पैशातून चार पैसे म्हातारपणाची काठी मजबूत करण्याऐवजी पुरी सरांनी विद्यार्थ्यांना उद्योग टाकून देणे पसंत केले. आम्ही बोलत बोलत घरी पोहचलो. घराखाली काकू झाडांना पाणी टाकत होत्या. मला पाहून काकू एकदम चकित होत म्हणाल्या, ‘कसे काय बाबा आज तुम्हाला दिवस उजाडला ?’ असे म्हणाल्या, आम्ही घरी वरती गेलो, तर काय वरती नेहमीप्रमाणे मुलांची पंगत सुरू होती. माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुरी सर आणि पुरी काकू आणि विद्यापीठामधले ते घर आले, ज्या घरात बाराही महिने पंगत बसलेली असायची. दरवर्षी त्या पंगतीची लांबी वाढतच जायची. ती प्रथा आज पुरी सर सेवानिवृत्त होऊन कित्येक वर्ष लोटली, तरी अजून सुरूच होती. मग काय पुरी काकूने मला आणि सरांना दोघांनाही ताट वाढले. जेवण झाल्यावर पुन्हा एकमेकांचा परिचय आणि त्यातून पुन्हा नवनवीन किस्से, नवे विषय. त्या मुलांच्या आयुष्यासाठी त्यांनी केलेले काम. पुरी सर आणि पुरी काकू दोन्ही माणसे काय अफलातून आहेत !

मी पुरी सरांना म्हणालो, ‘सर, तुम्ही ही सारी धावपळ करून थोडा वेळ स्वतःसाठी काढा’. त्यावर सर हसत हसत म्हणाले, ‘आरे, स्वतःसाठी वेळ काढायला आणि ऐटीत जगायला मी काय पाटणूरचा पाटील आहे का ?’ आम्ही कोणीही सरांना जर खूप गंभीरपणे काही सांगायला गेलो तर, ते सारे सांगितलेले ते गमतीत घेतात. कसे सांगायचे त्यांना ?

आयुष्यभर पुरी सरांनी इतरांचा विचार केला. त्यांनी स्वतःविषयी जरा जरी मोह ठेवला असता, तरी त्यांचे आयुष्य सोनेरी क्षणांनी दिपून गेले असते, पण पुरी सरांनी अखंड मानवतेचा विचार समाजमनात खोलवर रुजवला, तो टिकवला, वाढवला. हजारो विद्यार्थी पुरीसरांनी उभे केले. त्यांना मोठे केले. असे अनेक पुरी सर आपल्या आजूबाजूला असणे आवश्यक आहे, बरोबर ना..?

संदीप काळे.

— लेखन : संदीप काळे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४