Friday, January 3, 2025
Homeसाहित्यपुस्तक परिचय : "वडिलांना आठवून"

पुस्तक परिचय : “वडिलांना आठवून”

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले प्र के अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांची आज पुण्यतिथी आहे.या निमित्ताने त्यांची कन्या शिरीष पै यांनी वडिलांविषयी लिहिलेल्या “वडिलांना आठवून” या पुस्तकाचा श्री दिलीप गडकरी यांनी करून दिलेला परिचय वाचणे नक्कीच औचित्याचे ठरेल.

आचार्य अत्रे यांना विनम्र अभिवादन.
– संपादक

“वडिलांना आठवून” या पुस्तकाच्या लेखिका शिरीष पै हया सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, वक्ते आचार्य अत्रे यांच्या कन्या असल्या तरी त्यांनी स्वतः सुध्दा साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रांत स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे.

मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडे वाढत नाहीत असे म्हणतात, परंतु शिरीष पै यांनी ते खोटे ठरवले आहे. अर्थात त्यासाठी आपले वडिल आचार्य अत्रे यांचे कसे योगदान आहे हे सांगण्यासाठी शिरीष पै यांनी शब्दप्रपंच मांडला आहे. अवघ्या साठ पानी पुस्तिकेत लेखिकेने अकरा प्रकरणात अत्रे यांचा काव्यप्रवास, करुणरसाचे उद्गगाते आचार्य अत्रे, शेतकरी – अत्रे, वाद मिटवणारे अत्रे, मुलीला पुरुषासारखी पराक्रमी हो म्हणणारे अत्रे, पत्रकार अत्रे, संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणणारे अत्रे इत्यादी बाबतीत एका लेकीने आपल्या वडिलांच्या आठवणींची साठवण करणारे हे पुस्तक आहे.

लेखिका म्हणतात की, वडिलांमुळे लहान वयात माझे साहित्यावर प्रेम जडले. वयाच्या नवव्या वर्षी मी माझी पहिली कथा आणि कविता लिहिली. वयाच्या चवदाव्या वर्षी मला ‘खेळगडी’ मासिकाच्या कथास्पर्ध्येत पहिले बक्षिस मिळाले. त्यावेळेस वडिलांनी “दिसामाजी काहीतरी ते लिहावे…. अशीच लिहित रहा” असा संदेश दिला. वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी साहित्य सेवेकडे वळले. वयाच्या तेविसाव्या वर्षी वडिलांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकात संपादकखात्यात नोकरी करून पत्रकारीतेकडे वळले.

अत्रे यांचा काव्यप्रवास – :
अत्रे यांच्या आईमुळे त्यांना गाण्याची आवड निर्माण झाली. तसेच आजोबांनी (वडिलांचे वडिल) वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत आर्या , दिंड्या आणि भक्तिपर पदे पाठ करून घेतली आणि काव्याची आणि गाण्याची गोडी त्यांच्या मनात उत्पन्न केली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षा पासून अत्रे काव्य लिहू लागले. शालेय जीवनात त्यांना बालकवी आणि गोविंदाग्रज यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांनी अत्रे यांना सांगितले कविता लिहिताना भाषा साधी वापरा, लावण्या – पोवाडे – अभंग वाचा, भाषांतरे करू नका.
१९१६ ते १९२१ या काळात अत्रे यांनी विपुल काव्यरचना केली. सुरवातीला ते मकरंद आणि केशवकुमार या टोपण नावाने कविता लिहित असत. त्यांची समग्र भावकविता ‘गीतगंगा’ काव्य संग्रह १९३५ साली प्रकाशित झाला. त्याआधी ‘झेंडूची फुले’ हा विडंबन काव्य संग्रह प्रकाशित झाला. काव्यविषयक क्रांतिकारक विचार करणारे अत्रे, मर्ढेकर यांच्या नवकाव्यावर मात्र टीका करत.त्यांना मर्ढेकर यांची भाषा व कवितेतील दुर्बोधता पसंत नव्हती.अत्रे यांच्या चित्रपटातील गीते ही नुसते गाणे नव्हते तर गायला सोपे, चालीला गोड, कानाला मधुर असे उत्तम दर्जाचे काव्य होते.अत्रे यांनी जशी सुरेल चित्रपटगीते लिहिली तशीच अर्थपूर्ण नाट्यगीतेही लिहिली.

अत्रे यांनी लहान मुलांसाठी अनेक बालगीते लिहिली. कवितेतून मुलांचे मनोरंजन करणे, त्यांच्या विचारांना वळण लावणे, त्यांच्या अपरिपक्व मनाचे उन्नयन करणे हेही बालगीताचे उद्दिष्ट असावे असे अत्रे यांना वाटे.

करुणरसाचे उद्गगाते, सुविख्यात चरित्रकार धनंजय कीर नेहमी म्हणत असत, अत्रे यांचे डोळे म्हणजे मायेने तुडुंब भरलेले दोन डोह होते. म्हणूनच त्यांच्या लेखणीने जनतेला जसे हसवले त्याच लेखणीने वाचकांच्या डोळ्यात पाणी उभे केले. विनोदाचा उगम दुःखातून होतो अशी विनोदाची व्याख्या अत्रे यांनी केली आहे. हे जग म्हणजे अनंत दुःखाची खाण आहे तसेच हसल्याने दुःखाचा विसर पडतो असे ते म्हणत असत.

शिरीष पै आपल्या लेखात म्हणतात की, अत्रे यांनी आयुष्यभर अनेकांशी वाद केले. त्यापैकी काही तात्विक होते तर काही वाड्मयीन तर काही राजकीय होते. निधनापूर्वी त्यांचे दयार्द्र, ममताळू अन्तःकरण झाले होते. मरण्यापूर्वी त्यांनी सारी भांडणे मिटवली आणि महाराष्ट्राची सेवा करीत कृतार्थ मनानेच त्यांनी प्राण सोडला.

शिरीष पै यांना त्यांचे वडिल आचार्य अत्रे नेहमी म्हणत असत ‘पुरुषासारखी पराक्रमी हो !’ ते फक्त म्हणत नसत तर तसे पराक्रम करून दाखवण्याची संधी पराक्रमी पित्याने लेकीला दिली आणि शिरीष पै यांनी सुद्धा संकटकाळी वडिलांना सहकार्य केले.

पत्रकार अत्रे :-
अच्युतराव कोल्हटकर यांच्या ‘संदेश’ मध्ये सुरुवातीला लेखन करणाऱ्या अत्रे यांनी १९ जानेवारी १९४० रोजी साप्ताहिक ‘नवयुग’ सुरू केले. १५ नोव्हेंबर १९५६ रोजी दैनिक ‘मराठा’ सुरू केले.

अत्रे नेहमी म्हणत असत “पत्रव्यवसाय हा जरी धंदा असला तरी पत्रकारांची वृत्ती हा मात्र एक महान धर्म आहे. धंद्याला धर्माचे स्वरूप द्यावे ; पण धर्माचा धंदा करू नये. जनता क्रांतीचा जयजयकार करणे हाच खरा पत्रकारांचा धर्म आहे.”

संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश – :
महाराष्ट्राच्या इतिहासात ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलन’ हे एक अभूतपूर्व आंदोलन झाले. आचार्य अत्रे यांच्यासह एस.एम. जोशी, भाई डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, माधवराव बागल इत्यादी नेत्यांसह संपूर्ण महाराष्ट्र जनतेच्या सहकार्याने व १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

काही जण म्हणत होते की संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला तर काही जण हा कलश आचार्य अत्रे यांनी आणला. पण स्वतः आचार्य अत्रे मात्र म्हणाले की, हा मंगल कलश खऱ्या अर्थाने मराठी जनतेने आणला. मराठी जनता जर इतक्या शर्थीने लढली नसती तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालीच नसती.

वडिलांप्रमाणे साहित्य आणि पत्रकारितेमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या शिरीष पै यांच्या मनात आपल्या वडिलांच्या बद्दल नितांत आदर आहे हे साठ पानी पुस्तक वाचल्या नंतर लक्षात येते. विविध क्षेत्रांतील अशा अनेक महान पराक्रमी स्त्री पुरुषांच्या जडण घडणीत त्यांच्या वडीलांचा सिंहाचा वाटा असतो परंतु शिरीष पै, साहित्यिक व.पु.काळे यांच्यासारखे फारच थोडे जण आपल्या पित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुस्तकं प्रकाशित करतात.

सर्वत्र जून महिन्याचा तिसरा रविवार “जागतिक पितृदिन” म्हणून साजरा करतात. सानेगुरुजींनी “शामची आई” पुस्तक प्रकाशित करून आपल्या आईला अजरामर केले तसे अनेकांनी आपल्या पित्याबद्दल लेखन करून आपल्या वडिलांना प्रकाशझोतात आणावे ही अपेक्षा.

दिलीप गडकरी

परीक्षण : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
संपादन : देवेंद्र भुजबळ
निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pratibha Saraph on नव वर्ष ..
आशी नाईक on कवी
विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !