“द इंडियन्स”
जनुकशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, हवामानशास्त्र तसेच भाषाशास्त्र अशा विज्ञानाच्या कसोटीवर सत्यान्वेषी साधनांच्या सहाय्याने भारताच्या जवळ जवळ बारा हजार वर्षांच्या गतकाळाचे अतिशय चिकित्सकपणे तेही समग्रतेने मोठ्या काळजीपूर्वक अवलोकन करणारा “द इंडियन्स” हा काळाच्या पटावरचा अतिशय मूलगामीत्वाचा वेध घेणारा सर्वव्यापी असा ७४४ पृष्ठांचा बृहद ग्रंथ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगभरातील सुमारे शंभराहून अधिक अभ्यासकांनी यात आपले योगदान दिलेले आहे.
एकूणच इतिहास, तत्त्वज्ञान, भाषा तसेच संस्कृती या ज्ञानशाखा आणि समाजकारण आणि राजकारण याप्रति सजग आणि संवेदनशील असणार्या सर्वांना आवाहन करणारा हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. अनेक सहस्त्रकांच्या या समग्र इतिहासाचे संपादन गणेश देवी, टोनी जोसेफ आणि रवी कोरीसेट्टर या विद्वानांनी केले असून, त्याचा अनुवाद शेखर साठे, प्रमोद मुजुमदार, नितिन जरंडीकर तसेच ज्ञानदा असोलकर मंडळींनी अतिशय कष्टपूर्वक व नेटाने केला आहे. याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिवादन करायला हवे !
एकूणच सात विभागात हा ग्रंथ विभागलेला असून, हे सातही विभाग एकत्रितपणे भारतीय जनजीवन, इतिहास आणि समाजाबद्दल प्रगल्भ आणि परिपक्व अंतदृष्टी देतात.
विभाग एक :
मानवाची उत्क्रांती आणि इतिहासपूर्वकालीन जीवन ग्रंथाच्या पहिल्या भागात दक्षिण आशियातील मानवाची उत्क्रांती, त्याचे स्थलांतर तसेच हवामानाचा भारतीय लोकवस्तीच्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास काळजीपूर्वक मांडलेला दिसतो.
विभाग दोन : संस्कृतीची पायाभरणी, उदय आणि र्हास
ग्रंथाच्या दुसर्या भागात वनस्पती, प्राणी आणि इतर घटकांच्या पालन-पोषणाद्वारे प्रदेशातील विविध सभ्यतेच्या आणिबाणीवर होणारा परिणाम आणि या सभ्यतेचा र्हास कसा कसा होत गेला, यावर लक्ष केंद्रित करीत काही नेमकी निरीक्षणे व निष्कर्ष अभ्यासकांनी नोंदवली आहेत.
विभाग तीन : प्राचीन भारतातील भाषांचे संमिश्रण आणि तत्त्वज्ञान
ग्रंथाच्या तिसर्या भागात प्राचीन भारत, बौद्ध-जैन धर्माचे तत्त्वज्ञान, संस्कृत, इंडो-इराणी पाली भाषा आणि साहित्याचा ऊहापोह घेतला गेला आहे.
विभाग चार : विविध प्रदेश आणि त्यांचा संक्षिप्त इतिहास
ग्रंथाच्या चौथ्या भागात उत्तर दक्षिण, उत्तर पूर्व, दख्खन पूर्व आणि पश्चिम यातील भौगोलिकता तसेच समाज संस्कृतीचा खोलवर अभ्यास केला गेला आहे.
विभाग पाच : वसाहतकाल
ग्रंथाच्या पाचव्या भागात वसाहतवादाचे आगमन आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर तसेच सामाजिक संरचना आणि तथाकथित ज्ञानप्रणालीवर झालेल्या प्रभाव परिणामांचा विचार केला गेला आहे.
विभाग सहावा : स्वातंत्र्याच्या दिशेने आंदोलने
ग्रंथाच्या सहाव्या भागात आदिवासी चळवळी, आंबेडकरी राजकारण, गांधीवादी प्रतिकार आणि स्वतंत्र प्रजासत्ताकाची पायाभरणी करणार्या घटकांची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
विभाग सातवा : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर
ग्रंथाच्या सातव्या भागात समकालीन भारताकडे समग्रतेने आणि साकल्याने पाहण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यातही संविधनाचे कार्य आणि शहरीकरण, उदात्तीकरण आणि आधुनिक भारतीय अनुभवाचे नानाविध पैलूंचा विचार केला गेला आहे.
वर निर्देश केलेल्या आशय-विषयाची व्याप्ती आणि संमिश्रता आपण नुसती पाहिली तरी या शोध-संशोधनाचा आवाका लक्षात यावा! एक मात्र आहे की, भारताचा इतिहास आणि वारसा भावी पिढ्यांपर्यंत सत्यान्वेषी मार्गाने पोहोचवण्याचे कार्य या सर्व विद्वान प्रभृतींनी केले आहे, यात तीळमात्र शंका नाही.
इथवर मी प्रस्तुत बृहद ग्रंथाचा जो धावता आढावा घेतला, यातून इतिहास, तत्त्वज्ञान, भाषा, संस्कृती या ज्ञानशाखा आणि समाजकारण व राजकारण या प्रति सजग व उत्सुक असणार्या सर्वांना आवाहन करणारा अलिकडच्या काळातील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज असल्याचे सहज लक्षात यावे !
— परीक्षण : डॉ कमलेश सोमण.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
द इन्डियन्स पुस्तक परिचय वाचनीय आणि अभ्यासपूर्ण.