Thursday, January 2, 2025
Homeलेख"भारताचे स्वातंत्र्य चिरायू होवो !"

“भारताचे स्वातंत्र्य चिरायू होवो !”

भारताच्या ७५ व्या अम्रुतमहोत्सवी वर्षानंतर ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप हार्दिक शुभेच्छा !

हिंदूस्थानाला, म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळून पंधरा ऑगष्ट २०२४ ला ७७ वर्षे पुर्ण झाली आहेत. १५ ऑगष्ट २०२२ हे स्वातंत्र्याचे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष वर्षभर साजरे केले गेले. यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षे पुर्ण झाली आहेत. या ७७ वर्षात आपण किती स्वातंत्र्य उपभोगले आणि उपभोगत आहोत याचा सर्वांनी साकल्याने अंतर्यामी विचार करणे खूप आवश्यक आहे.
या ७७ वर्षात भारत देशाच्या सिमेलगतच्या देशांकडून अनेक आक्रमणे झाली, चीन व पाकिस्तानशी युद्धही झाले. भारताच्या शूर जवानांनी प्राणपणाने लढून ती आक्रमणे परतवून लावली. त्यात, बरेच जवान शहीदही झाले. तेव्हापासून, आजतागायत शेजारच्या राष्ट्रांकडून अतिरेकी कारवायाही चालूच आहेत. या ७७ वर्षांच्या कालावधीत भारताला अनेक थोर निष्णात व बुध्दीमान असे राष्ट्रपती व पंतप्रधान लाभलेले आहेत. तसेच, सध्याचे भारताचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी हे अत्यंत हुशार, चाणाक्ष व बुध्दीमान असे नेतृत्व भारताला लाभलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, लष्करी, परराष्ट्रीय धोरणाबाबतीत, शांतता, सलोखा, समता व सुरक्षिततेबाबतीत अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. ही भारताच्या व भारताच्या सर्व जनतेच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.

इसवीसन १५ व्या शतकापासूच भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण, उत्तर भारतात चितोडचा राजा राणा प्रतापसिंह, तसेच, झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच, इतर राजपूत राजानी त्यांच्या आयुष्याची पर्वा न करता शेवटपर्यंत निकराचा लढा दिला. झाशीची राणी तर पाठीवर झोळी मध्ये पोराला बांधून धैर्याने, शौर्याने शेवटच्या क्षणापर्यंत “मेरी झांसी नही दूंगी” म्हणत लढत राहिली. ही आपल्या हिंदूस्थान देशाची परंपरा आहे. हा स्वातंत्र्याचा लढा पूढेही चालूच राहिला. पूढे सोळाव्या शतकात भारतात एका क्रांतीपर्वाची सुरुवात झाली. भारतभूषण, महाराष्ट्रभूषण छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्रभूषण राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या उत्कृष्ट संस्कारांनी भारतभूषण छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. अनेकानेक किल्ले बांधून, तसेच, मोगलांचे अनेक किल्ले जिंकून महाराष्ट्राचे स्वतःचे स्वराज्य स्थापन करुन ते समृद्ध केले. जात, पात, धर्म यांचा विचार न करता अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करुन श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्य समृद्ध केले. स्वत:चा अहंपणा न ठेवता शिवाजीराजे ! हे रयतेचे राज्य आहे असे म्हणत आणि आयुष्यभर समस्त रयतेच्या कल्याणासाठी, सुखासाठीच ते आदिलशाही, मोगलशाही आणि इंग्रजांशी लढत राहिले. त्यांना त्यांच्या जवळच्या मराठा स्वकीयांनीच खूप त्रास दिला नाहीतर, त्यांनी तेव्हाच, संपूर्ण हिंदुस्थानात भगवा ध्वज फडकविला असता. छत्रपती संभाजीराजेही खूप शूरवीर होते. त्यांची समशेर प्रचंड वजनाची होती. तरी ते तिला सहजगत्या फिरवून शत्रूच्या चिंधड्या चिंधड्या करीत असत. परंतु, त्यांनाही स्वकियांच्याच घातकी कारवायांमुळे स्वराज्य भारतात सर्वत्र वाढविता आले नाही.

तदनंतर, श्री राजारामराजे व त्यांची पत्नी ताराराणी यांनी स्वराज्याचा कारभार सांभाळला. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे श्री राजाराम राजे जास्त काळ राज्याचा कारभार पाहू शकले नाहीत. त्यांच्या निधनानंतर मात्र स्वराज्य रक्षक शूर, मर्दानी महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडले आणि स्वराज्याचे रक्षण केले. त्यांच्याच कर्तृत्वाच्या कार्यकाळात औरंगजेबाचा मृत्यू झाला. एका दूष्ट राजवटीचा अंत झाला. नंतर छत्रपती श्री शाहू महाराजांनीही स्वराज्याचा कारभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला व स्वराज्याला समृध्द केले. नंतर पेशवे घराण्याने व श्रीमंत माधवराव पेशव्यांनी, स्वराज्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळला. सतराव्या शतकाच्या शेवटी, १८ व्या शतकापासूनच मात्र, भारतीय.स्वातंत्र्याच्या लढ्याची सुरुवात झाली. कारण, भारतावर इंग्रजांनी वर्चस्व मिळवून या देशावर आधिपत्य गाजवायला सुरुवात केली होती. त्या शतकातील सर्व जाती, धर्मांच्या क्रांतिकारकांनी तन, मन व धनाने स्वातंत्र्याचा लढा निकराने लढला. त्यांनी स्वतःच्या जीवाची व स्वतःच्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा कधीही केली नाही. त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनीही अत्यंत मोलाची साथ दिली. यात, श्री.वि.दा.सावरकर यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा, लोकमान्य टिळकांचा व कुटुंबियांचा तसेच, भगतसिंग, सुखदेव,व राजगुरू, श्री.वासुदेव बळवंत फडके, श्री. चंद्रशेखर आझाद, चापेकर बंधू तसेच, संपूर्ण भारत देशातील इतर ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्यवीरांचा अत्यंत मोलाचा सहभाग होता. हा स्वातंत्र्य लढा त्या शतकातील सर्वच्या सर्व स्वातंत्र्यवीरांनी अगदी स्वातंत्र्याच्या कळसापर्यंत नेऊन ठेवला. फक्त, स्वातंत्र्याच्या कळसाचा सूर्योदय होणे बाकी होते. ते स्वातंत्र्याच्या कळसाच्या सूर्योदयाचे काम १८ व्या व १९ व्या शतकातील शहीद झालेल्या व स्वातंत्र्य मिळाल्यावरही हयात असलेल्या स्वातंत्र्यवीरांनी तसेच, त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनीही अत्यंत धाडसीपणाने स्वतःचे बलिदान करुन स्वातंत्र्यसूर्याचा कळस पुर्ण करुन भारताला पंधरा ऑगष्ट, १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले. तो स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहण्याचे सद्भाग्य स्वातंत्र्यवीर श्री. वि.दा. सावरकर यांना त्यांच्या हयातीत लाभले. हा त्यांच्या आयुष्यातील तो अनमोल असा, अमृतयोग दिवस होता. तो दिवस अखंड भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखा होता. म्हणूनच, १५ ऑगष्टला संपुर्ण भारतात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.

भारतात इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले. इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा, त्यांची संख्या फक्त १७९ एवढीच होती. नंतर ते १००० झाले. त्यानंतर १०००० झाले. त्यानंतर ते १,००,००० झाले. त्या एक लाख इंग्रजांनी भारताच्या ३० कोटी लोकांवर दीडशे वर्षे राज्य केले. हे त्यांना कसे शक्य झाले. तर त्याचं कारण म्हणजे त्यांनी भारताच्या लोकांच्या स्वभावाचा अभ्यास केला. त्यातून, त्यांनी जो निष्कर्ष काढले ते आज २०२४ सालीही लागू होतात. ते निष्कर्ष म्हणजे भारतीय लोकांना जातीभेद, धर्मभेद, प्रांतभेद, गरीब-श्रीमंत अशा गोष्टींमध्ये भडकवायचे ! मग काय ! तीस कोटीचे तिनशे करोड जरी हिंदू झाले तरी ते आपल्याविरुद्ध उठाव करु शकणार नाहीत हे जाणून इंग्रजांनी राज्या- राज्याच्या माणसांमध्ये उपरोक्त विषयांमध्ये भांडणे लावली, द्वेष निर्माण केला म्हणजे, ते एकमेकांनाच मारत राहतील, ठार करतील ही कूटनिती इंग्रजांनी वापरली. त्यामुळे, भारतीय लोक आपापसातच लढत राहिले, तसेच, त्यांच्या सत्तेच्या जाचात राहिले. त्यामुळे, भारतीयांना दिडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामीत राहावे लागले. म्हणून, भारताच्या, महाराष्ट्राच्या नागरिकांनो अंतर्यामी लक्ष देवून नीट लक्षात घ्या. तुम्ही एवढे मोठे झाला आहात का ! की तुम्ही महापुरुषांच्याही वाटण्या केल्या आहेत. पैगंबर मुसलमानांचे झाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धांचे झाले, सावरकर ब्राह्मणांचे झाले, मल्हारराव होळकर धनगरांचे झाले, महात्मा ज्योतिबा फुले माळ्यांचे झाले. इंग्रजांनी भारतीयांची वाताहत केली.
भारतीयांना फसवले हातोहात !

भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव साजरा होवून ७७ व्या स्वातंत्र्य दिनालाही अजूनही इंग्रजांनी केलेली भेदनीती अजूनही भारतीय जनतेच्या मनातून गेलेली नाही हेच दिसून येते. हीच भेदनीती राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी वापरली. अजूनही त्याच वृत्तीचा वापर राजकारण्यांकडून केला जातो आहे. या बाबीकडे सर्व भारतीयांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. अशा त्यांच्या वृत्तीचा सर्व जनतेनी बिमोड केला पाहिजे.
अशीच वृत्ती जर आपली राहिली तर आपले स्वातंत्र्य अबाधित राहील का ! याचा अंतर्यामी विचार करा ! आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवा. जातपात, धर्माच्या नावाखाली वादविवाद करु नकात. एकमेकांशी भांडू नकात. सध्या माणुसकी हाच धर्म आहे हे लक्षात ठेवा. तरच, भारतीय स्वातंत्र्य अबाधित राहील. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी १८ व्या व १९ व्या शतकातील आपल्या देशातील हजारो स्वातंत्र्य सैनिकांना आपल्या प्राणांचे बलिदान करावे लागले आहे.

शेकडों स्वातंत्र्यसैनिकांना अंदमानच्या जेलमध्ये स्वातंत्र्यासाठी अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. इंग्रज सैनिकांचा अत्यंत क्रूर छळ सहन करावा लागला आहे. थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांच्या काव्यात स्वातंत्र्याविषयीची तळमळ व्यक्त केली आहे.ते म्हणतात, “ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ! तळमळला सागरा ! ने मजसी ने !” हीच भावना सर्व स्वातंत्र्यसैनिकांची होती. निर्दयी, क्रूर इंग्रज सैनिकांच्या हंटरच्या माराने झालेल्या रक्ताच्या जखमांतून देशप्रेमातून वि.दा.सावरकरांनी त्यांच्या काव्यातून ही भावना व्यक्त केली आहे. तीच भावना, तळमळ सर्व स्वातंत्र्यवीरांचीही होती. त्यांच्या रक्तातून, बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य आपण पुर्णत: अबाधित ठेवले पाहिजे.‌‌ यात निष्काळजीपणा होता कामा नये हे लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा, तोडा फोडा आणि राज्य करा ! ही नीती कोणिही अवलंबिल. हे अत्यंत गांभीर्याने लक्षात घ्या. तितक्याच तातडीने त्याची अंमलबजावणी करा बाहेरच्या देशातील कोणी घूसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा प्रयत्न हाणून पाडा. तसेच, त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त ताकदीने उत्तर द्याभारताच्या जवानांनी वेळोवेळी हे सिध्द केले आहे आणि सिध्द करीत आहेत. फक्त समस्त भारतीयांनी लष्कराच्या जवानांना अत्यंत मोलाची साथ दिली पाहिजे, तसेच, सहकार्य केले पाहिजे. एका कवीने समर्पक शब्दांत भारताच्या सार्वभौमतेचे वर्णन केले आहे. “बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो ! हे स्वातंत्र्य अखंडीतपणे राहण्यासाठी सामाजिक प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता आहे. हे प्रत्येक भारतीयाच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे. तरच, ख-या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य अबाधित टिकून राहील, यात संशय नाही.
जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय स्वातंत्र्यसैनिक !
स्वातंत्र्यदिनानिमित्ताने व सर्व स्वातंत्र्यसैनिक, सैनिक व हुतात्मा झालेल्यांचे मनोगत यावर आधारित माझी स्वरचित कविता या निमित्ताने खूप उपयुक्त होईल. ती खालीलप्रमाणे आहे.

“मनोगत स्वातंत्र्य सैनिकांचे, सैनिकांचे, देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे”

शतदा वंदन ! तुम्हा स्वातंत्र्य सैनिकांनो !
सैनिकांनो ! हुतात्म्यांनो !

मिळाले जे स्वातंत्र्य तुम्हा सकलांना
अबाधित ते भारतदेशी टिकवून ठेवा
जाणा!हजारो हुतात्म्यांच्या बलिदानाने
स्वातंत्र्य मिळाले आहे भारत देशाला,

म्हणूनि, घेतात उपभोग तुम्ही स्वातंत्र्याचा
अर्थ ध्यानी घ्या नीट, सैनिकांच्या कष्टाचा
आयुष्याचा क्षण क्षण वेचतात ते देशासाठी
रात्रंदिन झटतात भारतीयांच्या रक्षणासाठी

स्वकुटूंबाला सोडून लढतात दूर सीमेवर
मुलाबाळांवर प्रेम असते त्यांचेही अपार
परि, कर्तव्यापूढती नाते राहते खूप दूरदूर
ठसवून घ्या त्यांची शक्ती, भक्ती स्वह्रदयावर

— लेख व काव्यरचना : मधुकर निलेगावकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. लेखक निलेगावकर सर आपण स्वातंत्र, मराठ्यांच्या कर्तबगार विषयी सखोलपणे विवेचन केले आहे.
    अभिनंदन व शुभेच्छा!

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pratibha Saraph on नव वर्ष ..
आशी नाईक on कवी
विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !