Saturday, December 21, 2024
Homeसंस्कृतीमंगळागौर

मंगळागौर

श्रावण महिन्यापासून सर्व हिंदू सण जोरात साजरे व्हायला लागतात. श्रावण महिना म्हटला की सर्वात पहिले आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते या महिन्यातील सण. नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, शुक्रवारी जिवतीची पूजा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी असे अनेक सण एकापाठोपाठ एक लागून येतात.

मंगळागौर म्हटलं की मंगळागौर माहिती, मंगळागौरीची आरती, मंगळागौरीचे खेळ ही सगळी मजा कशी डोळ्यासमोर येते.
विशेषत: मंगळागौरीचा उत्सव, हा नववधूंसाठी सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे. तिच्या लग्नानंतर श्रावण महिन्याच्या मंगळवारी नववधू आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी शिवलिंग पूजन करते. मंगळागौरी पूजा किंवा मंगळागौरी व्रत श्रावण महिन्यातील मंगळवारी केले जाते. मंगळागौरी व्रत देवी मंगलागौरीला समर्पित आहे, जी देवी पार्वती देवी म्हणून प्रसिद्ध आहे.

मंगळागौर हा सर्व कुटुंबातील महिला आणि नातेवाईक यांचा संगीतमय मेळावा आहे. त्यात नाचणे, खेळ खेळणे, उखाणे म्हणजे विवाहित स्त्रिया आपल्या पतीचे नाव काव्यमयपणे घेतात. स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला जातो.

नऊवारी साडी नेसून, नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून ही पूजा केली जाते. अगदी नटूनथटून एकत्र जमून मंगळागौरीची पूजा साजरी करण्यात येते. षोडशोपचार विधी करून देवी मंगलागौरीची पूजा केली जाते. देवीला विविध वस्तू अर्पण केल्या जातात. विधी पूर्ण केल्यानंतर, भक्त मंगळा गौरी व्रतामागील कथा वाचतात/ऐकतात. स्त्रीला वैवाहिक जीवनात समृद्धी मिळते आणि तिच्या जीवनातील प्रत्येक बाबतीत आनंद मिळतो, अशी एक प्रचलित धारणा आहे.

पारंपारिक मंगळागौरीच्या खेळामध्ये मंगळागौर रात्रभर जागवली जाते, अगदी दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत हे खेळ खेळले जातात. महिनाभर रोज जवळजवळ खेळ खेळले जायचे, त्यामुळे महिला सर्वार्थाने एकदम फिट असायच्या.

फुगड्यामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस प्रकार खेळले जातात. एका हाताची फुगडी, फुलपाखरू फुगडी, बस फुगडी या आणि अशा बऱ्याच प्रकारच्या फुगड्या खेळल्या जातात. त्याची सुरुवात सासू-सुनेची फुगडी आणि विहिणी-विहिणी फुगडी याने केली जाते. फुगडी करताना स्त्रिया विविध प्रकारची रचना करून गातात आणि नृत्य करतात. जास्तीत जास्त वेगाने, नर्तक “फू” सारख्या आवाजात तोंडातून हवा फुंकून ताल जुळवतात. त्यामुळेच याला फुगडी हे नाव पडले. अनेक गाण्यांमध्ये गुंफून आणि अनेक उखाणे घेऊन हे खेळ खेळले जातात.

पिंगा ग पोरी पिंगा सध्या बाजीराव मस्तानी मुळे फेमस झालेलं आहे. पण पारंपरिक पिंगा मध्ये एक वेगळीच मजा आहे. त्याच्यामध्ये मुलीकडचे वेगळे पिंगा घालतात आणि मुलाकडचे वेगळे पिंगा घालतात आणि त्याच्यामध्ये सांगतात, “लेक माझी ग सुन तुझी ग, लेक माझा ग जावई तुझा ग – पिंगा ग पोरी पिंगा” आणि त्यांच्यामध्ये जी जुगलबंदी चालते ती अप्रतिम असते, त्याच्यात खूप मजा येते.

लाट्या बाई लाट्या, अठूडं केलं गठूडं, सासु सुनेचा भांडण, आई-मुलीचं आई मी येऊ का , गंमत आहे ना त्या खेळांची ! सूप घेऊन नृत्य , कमळ , नंतर गोफ विणतात, हे खेळ खेळताना खरोखर खूप धम्माल येते! कशी मी नाचू? नाच गं घुमा – या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला, तोडे नाही मला, नाचू मी कशी ? असे म्हणत- आपल्याला हव्या असलेल्या दागिन्यांची मागणी करतात.

आळुंकी-साळुंकी, ताक घुसळणे, भोवर भेंडी, हातूश पान बाई, किस बाई किस, काच किरडा, तिखट मीठ मसाला- फोडणीचे पोहे कशाला, या आणि अशा विविध प्रकारचे 100 च्या वर खेळ खेळले जातात.

काही ठिकाणी तर उखाण्यांच्या स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात. स्त्रिया दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत झिम्मा (टाळी नृत्य), भेंड्या (अंताक्षरी गाणी) खेळतात. पहाट झाल्यावर कोंबडा खेळून कार्यक्रमाची सांगता केली जाते.

हल्ली मंगळागौरीचे विविध ग्रुप बोलवून मंगळागौर साजरी केली जाते, यामुळे आपली परंपरा, संस्कृती यांचा वारसा जतन केला जातो.

दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी देवी मंगलागौरीच्या मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते. कुटुंबाच्या सुखासाठी हे पूजन आणि मंगलागौरी व्रत सलग पहिले पाच वर्षे केले जाते.

प्रिया मोडक

– लेखन : प्रिया मोडक
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. मंगळागौर …खूप सुंदर आणि माहितीपूर्ण लेख👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७
Purnima anand shende on निसर्गोपचार : ३
Manisha Shekhar Tamhane on निसर्गोपचार : ३