25 जानेवारी हा मतदार दिन आहे. या निमित्ताने हा विशेष लेख…
– संपादन
“मतदान करायला जायचे आहे
आपले कर्तव्य
बजवायचे आहे”
मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिन” (नॅशनल व्होटर डे) साजरा केला जातो. देशातील 18 वर्षाच्या तरुणांना पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी मिळते. यासाठी निवडणूक आयोग मतदान दिनी अशा तरुणांना ओळखपत्र देऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत असते.
25 जानेवारीलाच मतदार दिन साजरा करण्याचे कारण म्हणजे याच दिवशी 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या 61 व्या स्थापना दिनी म्हणजेच 25 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादेवी पाटील यांच्याहस्ते राष्ट्रीय मतदार दिनाची सुरुवात करण्यात आली.
देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, याची जाणीव या दिवशी मतदारांना करून दिली जाते. मतदार दिन विविध सार्वजनिक ठिकाणी साजरा केला जातो. मतदारांची ओळख करून त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
लोकशाही देशाच्या नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची आणि आठवण करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
प्रत्येक वर्षी मतदार दिनाच्या दिवशी मतदारांना मतदानाची शपथही दिली जाते, जेणेकरून ते नागरिक म्हणून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी जागरूक रहातील.
गावकर्यांमध्ये, विशेषतः नवमतदारामध्ये मताधिकार, निवडणूक, लोकशाही याविषयी जाणीव- जागृती निर्माण करण्यासाठी सदर दिनाचे महत्व सांगावे जेणेकरून त्यातून लोककशाही विषयक वातावरण निर्मिती व्हावी. जेवण ही शरीराची गरज आहे, विचार ही मेंदूची गरज आहे, भावना ही मनाची गरज आहे, मतदान ही देशाची आणि काळाची गरज आहे. त्यामुळे तरुण पिढीला स्वत:च्या जबाबदारीची जाणिव असणे आणि त्या जाणिवेतुन कार्यक्षम होणे म्हणजे समाजाचे विकासात्मक दृष्टीने पुढे पडणारे पाऊल होय.
प्रसार माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे जी कृत्रिमता वर्तनात आणि संभाषणात येत आहे तीच कृत्रिमता तरुण वर्गाच्या कार्यातून दिसत आहे. तरुण वर्ग हा केवळ संख्येच्या अंगातून नाही तर कार्यातून समाजात सहभागी झाला पाहिजे. व्यक्ती समाजाशिवाय राहू शकत नाही आणि समाज व्यक्तींशिवाय बनु शकत नाही. त्यामुळे समाजाप्रती असलेली कर्तव्य, जबाबदारी, सहकार्य, सहानुभूती, सहिष्णुता, आदर, धर्मनिरपेक्षता, समानता, एकनिष्ठता, एकात्मता, विश्वबंधुत्व, विश्वकल्याण यासंबंधी तरुण पिढीला उद्बोधन केले पाहिजे. तुमचे मत आणि तुमचे सामाजिक कार्य किती महत्वपूर्ण आहे हे तरुणांच्या मन,मस्तिष्क आणि मनगटात भिनवणे गरजेचे आहे.
देशाला जर प्रगतीच्या शिखरावर घेऊन जायचे असेल तर प्रत्येक तरुणाने सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभागी होणे ही काळाची आणि येणाऱ्या सुशिक्षित पिढीची गरज आहे.
“आपली जबाबदारी व अधिकार
मजबूत लोकशाहीचा खरा आधार”

– लेखन : प्रा डॉ.ज्योती रामोड. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800