नमस्कार, मंडळी.
मध्यंतरी मला एका “परदेशस्थ मराठी ऑनलाईन कवी
संमेलना”चे अध्यक्षपद भुषविण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझ्या असे लक्षात आले की, साहित्याच्या प्रांतातील या मातब्बर मंडळींना मराठीतील पहिली कवयत्री कोण आहे ? हे देखील माहिती नाहीय.
साहित्याच्या प्रांतातील व्यक्तींनाच जर अशी मूलभूत माहिती नसेल तर सर्व सामान्य व्यक्तींना ती असण्याची शक्यता कमीच. हे पाहून तसेच मराठी भाषेला जन जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मूलभूत कार्य केलेल्या महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्ट्य जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आपण आपल्या पोर्टलवर दर शुक्रवारी
“महानुभावांचे मराठीतील योगदान” ही लेखमाला सुरू करीत आहोत.
ही लेखमाला प्रा डॉ विजया राऊत लिहितील. पुढे त्यांचा जीवन परिचय देत आहे.
डॉ. विजया जितेंद्र राऊत या असिस्टंट प्रोफेसर, मराठी विभाग प्रमुख म्हणून नागपूर येथील विमेंस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये कार्यरत आहेत. त्यांची
शैक्षणिक अहर्ता बी.ए.एम.ए (मराठी, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र) बी.एड., एम.एड, अशी असून, त्यांनी “डॉ.अरुणा ढेरे यांच्या ललित निबंधाचा संशोधनात्मक अभ्यास” या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची कला विभागातील मराठी साहित्याची सन 2012 मध्ये आचार्य पदवी (पीएच.डी) प्राप्त केली आहे.
प्रा डॉ विजया राऊत यांचे “डॉ. अरुणा ढेरे यांचे ललित निबंध प्रबंध हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
विमेंस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या “सुप्रभात” या वार्षिक अंकाचे त्या संपादन 2017 पासून संपादन करीत आहेत.
या शिवाय त्यांनी “इंद्रधनु समीक्षा ग्रंथ” डॉ. जनार्दन काटकर यांची कविता “आस्वाद आणि समीक्षा” आय.य. पवार लिखित “ऊन पाऊस कवितेचे वाड्.मयीन स्वरूप” या पुस्तकांचे लेखन व संपादन केले आहे.
त्यांना आतापर्यंत, वुमेन्स वेल्फेअर सोसायटी नागपुर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कला विभागातील मराठी विषयात नववी मेरिट,
अखिल भारतीय महानुभाव अभ्यास मंडळ नागपूर यांचेकडून गौरव व स्मृतिचिन्ह मिळाले असून
त्यांच्या “इंद्रधनु” या समीक्षा ग्रंथास कविवर्य मिठे वाचनालय पालखेड जि. नाशिक हा व कवयित्री शेवंताबाई सरकाटे स्मृती प्रतिष्ठान नांदुरा समीक्षा साठी राज्यस्तरीय साहित्य सन 2018 चा तसेच इतर संस्थांचे राज्यस्तरीय तीन पुरस्कार मिळाले आहेत.
प्रा डॉ विजया राऊत यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात स्वागत आहे.
– संपादक
आद्य कवयित्री : महदंबा
प्रस्तावना :-
मध्ययुगीन मराठी वाड्.मय प्रवाहातील महानुभाव साहित्य हा एक महत्त्वपूर्ण प्रवाह आहे. महानुभाव पंथात पाच अवतार यांना महत्त्व दिलेले आहे. त्या पाच अवतारांना पंचकृष्ण, पंचअवतार, असे सुद्धा संबोधले जाते. महानुभाव पंथ ज्या पाच अवतारांनी बनलेला आहे, त्यातील प्रथम अवतार म्हणजे श्री कृष्ण अवतार होय, दुसरा अवतार श्री दत्तात्रय प्रभू होय, तिसरा अवतार, चक्रपाणी प्रभू अवतार होय, चौथा अवतार, श्री गोविंद प्रभु अवतार होय, आणि पाचवा अवतार, श्री चक्रधर स्वामी अवतार असे पाच महापुरुषांनी बनलेला हा महानुभावपंथ आहे.
या महानुभावांनी आपले लेखन गद्यातून केले, तसेच ते पद्यातूनही केले आहे. सर्वच गद्य- पद्य लेखन निर्मितीमागील प्रेरणा विशुद्ध भावभक्तिची आहे.
पंचकृष्णभक्ती ही महानुभाव पंथाचे वैचारिक नियमन करणारी आहे. पंचकृष्णाशिवाय कोणत्याही अवताराला ते मानत नाहीत. त्यातही श्रीकृष्ण हीच बहुतांश महानुभावांची काव्यशक्ती आहे.
“महदंबेचे धवळे” ही मराठीतील पहिली कविता कृष्णभक्तीच्या प्रेरणेतून जन्माला आलेली आहे. अंत:करणात कृष्णभक्तीचा तेवत असलेला दीपज्योतीचा प्रकाश म्हणजे “महदाइसांचे धवळे ” होत, निमित्त फक्त श्रीगोविंद प्रभुंचे होते.
मराठीत अवतरलेली महानुभावी पहिली कविता जन्मतः स्वरूपात पाहावयास मिळते. ही काव्यनिर्मिती अनेक वाड्.मयीन पैलूंनी श्रेष्ठ आहे. महानुभावांच्या काव्य वाड्.मयाचा आपल्याला सविस्तर अभ्यास करावयाचा आहे.
मराठी शारदेच्या दरबारात सर्वप्रथम स्थानापन्न होण्याचा मान महदंबेनी मिळविला, तो एक आद्य कवयित्री म्हणूनच ! महानुभाव पंथातील श्री नागदेवचार्यांची या भगिनी, विलक्षण बुद्धिमान होत्या. श्री चक्रधरांचे पूर्वाश्रमीचे जीवन लीळाचरित्रात प्रतिबिंबित होण्यामागे महदंबा उर्फ महदाइसाच कारणीभूत आहेत. त्या अत्यंत जिज्ञासक व चर्चिक होत्या. खरेतर त्यांचे मूळ नाव रुपाइसा परंतु त्यांच्या असाधारण गुणांमुळे स्वामींनी त्यांचे नामकरण ‘महदाइसा ‘केले. पुढे याच नावाचे संस्कृतीकरण “महदंबा “असे केशिराजांनी केले.
म्हातारी जिज्ञासक: म्हातारी चर्चक: म्हातारी एथ काही पुसतचि असे :
असे स्वामींनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गगार काढलेले आहेत. त्यांच्या देहावसनानंतर नागदेवांनी
“म्हातारी धर्मरक्षक : प्रीतिरक्षक” या शब्दांनी त्यांची वाखाणणी केली होती. पुढे स्वामींच्या प्रयाणानंतर नागदेवाचार्य सर्व परिवारासह श्री गोविंदप्रभूच्या सानिध्यात असतांना एका प्रसंगाच्या निमित्ताने त्यांना काव्य स्फुरले. एक तेलीण वधु-वरांसाठी बाशिंग घेऊन चालली होती,. महदाइसेनी श्रीगोविंदप्रभूसाठी एक बाशिंग देण्याबद्दल विनंती केली. बाशिंग घेऊन तिने श्रीप्रभूंच्या श्रीमुकुटी बांधले . श्रीप्रभुंना हळद लावली, वाजंत्र्याने वाद्य वाजविली. वडे, मांडे तळले गेले. जेवणावळी झाल्या, श्रीप्रभू हसू लागले. त्याच अवस्थेत महदाइसांना सांगितले,
“आवो मेली जाए गाए गाए म्हणे” महदाइसा म्हणाल्या “काइ गाओ जी ? यावर श्रीप्रभू म्हणाले, आवो कृष्ण रुक्मिणी गाए गाए म्हणे: तुरया भाट गाए म्हणे’
अशाप्रकारे महदाइसाने श्री प्रभूंच्या आज्ञेवरून जे गीत गायले, तेच धवळे म्हणून प्रसिद्ध पावले.
धवळे इ.स.१२८८ पूर्वी म्हणजे श्रीप्रभूंच्या देहावसाना पूर्वी रचले गेले. धवळे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भागात आहे. श्रीप्रभूंच्या वेळी गायले तो पूर्वार्ध, व पुढे त्यांच्या देहावसानानंतर म्हाइंभट्ट व लक्ष्मीभट्ट यांच्या आग्रहाखातर गायिले तो उत्तरार्ध होय. पूर्वार्धात ८४ कडवी आहेत, तर उत्तरार्धात ६४ कडवी आहे. दोन्ही ची संख्या १४८ एवढी आहे. महदंबेच्या धवळ्यातून यादवकालीन विवाह पद्धतीवरही प्रकाश पडतो. महदाइसांच्या नावावर “मातृकी रुक्मिणीस्वयंवर” नावाची दुसरीही एक काव्यरचना आहे. त्यांची कडवी ११० एवढी आहे. धवळ्यात शब्दबद्ध केलेली रुक्मिणीस्वयंवरांची कथा त्यात थोडक्यात वर्णन केलेली आहे. त्याचीही रचना अतिशय सोपी आहे.
धवळे म्हणजे लग्नप्रसंगी नवऱ्या मुलासंबंधी गावयाची गाणी होय. प्रामुख्याने ही विरह विषयक गीते स्त्रियाच गातात. दासोपंतांच्या काव्यातही “धवळे” गीतांचा उल्लेख आहे.
वर विषयक गीत लिहिण्याचा सर्वप्रथम मान महदंबेला मिळतो. मराठीमध्ये धवळे कुणाचेही उपलब्ध नाहीत. गुजरातमध्ये “धडलघोळ” या नावाने विवाह गीते रूढ होती. अजूनही ही प्रथा रूढ आहे. महदंबेनी लिहिलेले संपूर्ण “धवळे” सहज सौंदर्याने ओतप्रोत भरलेले आहेत. ते साध्या शब्दांनी लिहिलेले एक कथाकाव्य आहे. प्रसंगचित्रण व व्यक्तीचित्रण ही कथाकाव्याची दोन प्रमुख अंगे या काव्यात पहावयास मिळतात. प्रारंभापासून तो अंतापर्यंत या कथा काव्यात एक गतिमानता आहे असे दिसून येते .
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
पहिली कविता आणि कवियत्री महादंबा जी यांची ही माहिती मला नव्हती. आभार