महाराष्ट्राच्या प्रगतीवर चर्चा करण्यासाठी अर्थसंकेतने मुंबईत नुकतीच उद्योजकीय परिषद आयोजित केली होती.
बांधकाम, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, उत्पादन ते कृषी आणि पर्यटन यासारख्या उद्योगांमध्ये महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. या यशात योगदान देणारे सरकारी उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणुकीच्या संधी, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी शेअर बाजारातून भांडवल उभारणी या वर मंथन करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होते. पुढील सहयोग आणि भविष्यातील वाढीच्या पुढाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक उर्जा केंद्र बनण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास या परिषदेत साजरा करण्यात आला.
अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांनी प्रास्ताविक करताना महाराष्ट्राच्या एक हजार हुन अधिक वर्षाचा मुद्देसूद आढावा घेऊन मराठी माणूस उद्योजकतेमध्ये पुढे जावा यासाठी अर्थसंकेत नेहमीच प्रयत्नशील राहील असे सांगितले.
डिजिटल कोच श्री. जोतिराम सपकाळ यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून व्यवसाय अनेक पटीने कसा वाढवावा यावर सुरेख मार्गदर्शन केले.
सॅटर्डे क्लबच्या सल्लागार सौ. मानसी मांजरेकर यांनी व्यापार वाढीवर उपस्थितांना धडे दिले. तर चंद्रहास रहाटे यांनी गुंतवणुकीचे महत्व सोदाहरण पटवून दिले. वैभव बागवे यांनी स्वस्त आरोग्य सेवांबद्दल माहिती दिली. तर वैभव शेटे यांनी शेअर बाजारातून पैसे कसे मिळवावे याबद्दल मार्गदर्शन केले.
पुरस्कार
यावेळी श्री. संकेत खाडे यांना, अर्थसंकेत ‘युवा उद्योजक’ पुरस्काराने तर श्री. मकरंद शेरकर, श्री. जॉय मसिह, दीपिका जैन यांना ‘बिझनेझ अचिव्हर्स’ पुरस्काराने तर श्री. संजय काठोळे व सौ. अलका काठोळे यांना ‘इन्व्हेस्टर अचिव्हर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून येस बँकेचे मुंबई उपाध्यक्ष श्री दीपक शर्मा, बिझनेस कोच श्री. रोहित सोलकर उपस्थित होते.
परिषदेच्या आयोजक, रचना आर्टस् अँड क्रिएशन्सच्या सौ. रचना लचके बागवे यांनी आभार मानले. श्री. मंदार नार्वेकर यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अशी परिषद आयोजित करण्याचा आयोजकांचा मानस आहे
परिषदेचा धावता आढावा आपण पुढील 👇 लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
https://www.youtube.com/watch?v=La5RqZu3tu4
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800