Wednesday, February 5, 2025
Homeलेखमाझी "एडिटोरियल अरेस्ट !"

माझी “एडिटोरियल अरेस्ट !”

काही काळापूर्वी आपल्या कानावर “अरेस्ट” हा शब्द पडला की आपल्याला समजायचे कुणाला तरी, कशासाठी तरी पोलिसांनी अटक केली आहे.

आजकाल मात्र अरेस्ट चा दुसरा प्रकार आपल्या कानावर सतत पडत आहे, वाचनात येत आहे तो म्हणजे “डिजिटल अरेस्ट !” या प्रकारात सायबर भामटे आपल्याच मोबाईलद्वारे आपल्याच घरात आपल्याला अटकेत ठेवतात आणि लाखो करोडो रुपये लुबाडतात. पुढे सत्य कळून आल्यावर फसवल्या गेलेल्या व्यक्ती नाईलाजानेच पोलीस तक्रार दाखल करतात आणि पोलीस पुढील कारवाई करायला लागतात.

माझ्या बाबतीत मात्र नुकताच अरेस्टचा वेगळाच प्रकार घडला. त्यासाठी मला शब्द सुचला तो म्हणजे “एडिटोरियल अरेस्ट !” त्याचे असे झाले की, स्टोरी टुडे पोर्टल वर प्रसिद्ध झालेल्या सौ मेघना साने यांची परदेशस्थ मराठी, डॉ भास्कर धाटावकर यांची “माझी कॅनडा अमेरिका सफर” अशा दोन लेखमाला पुस्तक रुपात प्रसिद्ध झाल्या. पुढे सौ वर्षा भाबळ यांची “जीवन प्रवास”, सौ रश्मी हेडे यांची “समाजभूषण” आणि निवृत्त पोलिस उपअधीक्षक सौ सुनीता नाशिककर यांची “मी, पोलीस अधिकारी” या लेखमाला पोर्टल वर प्रसिद्ध झाल्या आणि त्या ही लोकप्रिय ठरल्या. या तिघी लेखिकानी पोर्टल ची निर्माती तथा त्यांची सखी सौ अलका भुजबळ ला गळ घातली की आमचे पुस्तक तूच प्रकाशित कर. सदा, सतत काही तरी नवीन करावेसे वाटणाऱ्या अलका ने पण ही कल्पना उचलून धरली आणि प्रकाशन व्यवसायाचा काही ही अनुभव नसताना, ती धडाडीने कामाला लागली. तिला मदत म्हणून मी ही अनिच्छेनेच या कामात ओढला गेलो.

अनिच्छेने यासाठी की हे काम किती झंझटीचे असते याचा अनुभव मी माझ्या शासकीय सेवेत घेतलेला होता. तरी बरं ,तिथे सर्व यंत्रणा, छापखाना, शासकीय असतो. थेट आर्थिक बाबींशी आपला काही संबंध येत नाही. तर असो. अशा प्रकारे एकेक करून या तिघींची पुस्तके प्रकाशित झाली. या पैकी “जीवनप्रवास” चे प्रकाशन जेष्ठ समीक्षक प्रा अविनाश कोल्हे यांच्याहस्ते, समाजभूषण चे प्रकाशन पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते पुणे येथे जागतिक पुस्तक दिनी, म्हणजे २३ एप्रिल २०२४ रोजी, तर “मी, पोलीस अधिकारी” या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईतील राजभवनात १७ मे २०२४ रोजी संपन्न झाले.

या ३ पुस्तकांनंतर माझे मित्र, निवृत्त सह सचिव श्री राजाराम जाधव यांनी त्यांची “अजिंक्यवीर” आणि “अंधार यात्रीचे स्वप्न” ही पुस्तके पुनर्प्रकाशित करण्याची त्यांनी आमच्यावर प्रेमळ सक्ती केली. त्यामुळे ती २ पुस्तके प्रकाशित झाली. लगोलग त्यांनी त्यांची “चंद्रकला” ही कादंबरी आणि “हुंदके सामाजिक वेदनेचे “हा वैचारिक लेखसंग्रह प्रकाशित करून घेतला. त्यानंतर अलकाची मैत्रीण सौ पौर्णिमा शेंडे हिच्या “पौर्णिमानंद” काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले

इतकी इतरांच्या पुस्तकांची प्रकाशने झाल्यावर मग मी ही विचार केला की, आता आपण इतरांची पुस्तके प्रकाशित केलीच आहेत तर स्वतःचे ही पुस्तक आपणच का प्रकाशित करू नये ? तसेही माझ्या “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाचे भिजत घोंगडे प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांच्या मिशन आयएएस कडे दीड वर्षे पडून होते. शेवटी वाट पाहून, वैतागून ते मीच प्रकाशित करायचे ठरविले आणि अशा प्रकारे न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स चे आठव्या पुस्तकाचे लोकार्पण तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते १ जून २०२४ तर प्रकाशन ८ जून २०२४ रोजी जपानच्या जगप्रसिद्ध बुलेट ट्रेन मध्ये झाले. या अभिनव प्रकाशनाला भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि बघता बघता एका ५०० प्रतींची पहिली आवृत्ती एका महिन्यात संपली. त्यामुळे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन २९ जून २०२४ रोजी पुस्तकातील एक यशकथा नायिका, लातूर च्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते त्यांच्या लातूर येथील शासकीय निवासस्थानी झाले.

दरम्यान, माझ्या आधी प्रकाशित झालेल्या आणि चांगली मागणी असलेल्या “करिअरच्या नव्या दिशा” या पुस्तकाची पहिली आवृत्ती संभाजीनगर येथील शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या विद्या बुक्स पब्लिशर्स ने प्रकाशित केली होती.पण त्यांचा व्यवहार न पटल्याने त्यांनाच दुसरी आवृत्ती काढण्याचे सांगण्याऐवजी अलकाचे कॅन्सरवर मात केल्याबाबतचे “कॉमा” हे पुस्तक प्रकाशित केलेल्या डिंपल पब्लिकेशन ने दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्याची कल्पना मी मांडली. ती त्यांनीही स्वीकारली. पुस्तकाचे सर्व डीटीपी, सर्व मुद्रित शोधन झाले, पुस्तक कधी प्रकाशित करणार असे अधून मधून विचारले की लवकरच पुस्तक प्रकाशित करीत आहोत, हेच अपेक्षा भंग करणारे उत्तर सतत ऐकायला मिळायचे. शेवटी डिंपल चा नाद सोडून ते ही पुस्तक न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स तर्फे प्रकाशित करायचे ठरविले आणि पुस्तकाचा विषय पाहून कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मुंबई महानगर पालिकेच्या सूसुज्ज् अशा पत्रकार कक्षात अनेक वाहिन्यांचे आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष ७ ऑगस्ट २०२४ रोजी झाले. प्रकाशनानंतर चहापान करत करत, पुस्तक चाळताना मंत्री महोदयांनी त्यांच्या विभागासाठी या पुस्तकाच्या १ हजार प्रती घेण्याच्या सूचना त्यांच्या सचिवास दिल्या.

दरम्यान पोर्टल च्या केमॅन आयलंड्स देशातील लेखिका शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहिण्याची आणि ते न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स तर्फे प्रकाशित करण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि फेब्रुवारी महिन्यापासून त्यांच्या आत्मचरित्राचा प्रवास सुरू झाला. त्यांनी काही पाने लिहायची (म्हणजे टाईप करून पाठवायची) ते मी तपासायचे आणि दुरुस्त करून अक्षर जुळणीकाराकडे द्यायचे, असा सिलसिला सात महिने सुरू राहिला आणि “मी शिल्पा.. चंद्रपूर ते केमॅन आयलंड्स” हे आत्म चरित्र प्रकाशित झाले. या आत्म चरित्राचे लोकार्पण नागपूर येथे १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याहस्ते झाले. तर रितसर प्रकाशन, संध्याकाळी ९७ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा डॉ रवींद्र शोभणे, जेष्ठ पटकथा लेखक – दिग्दर्शक श्री प्रदीप दिक्षित यांच्या हस्ते आर्यवैश्य समाज गृहात मोठ्या थाटामाटात पार पडले.

या सर्व पुस्तक प्रकाशनाच्या बातम्या, परिक्षणे वाचून आकाशवाणी – दूरदर्शनचे निवृत्त संचालक तथा लेखक चंद्रकांत बर्वे हे आमच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांचे “सत्तरीतील सेल्फी” हे आकाशवाणी – दूरदर्शन मध्ये ते चाकरी करताना भेटलेल्या लेखक, नाटककार, कलाकार, मुख्यमंत्री, राज्यपाल अशा विविध थोर व्यक्तींचे गुण आणि त्या बरोबरच अत्यंत धाडसाने दोषही दाखविणारे पुस्तक प्रकाशन आमच्यावर वर सोपविले.

या पुस्तकाचे अडीच तीन महिने “ऑनलाईन ऑनलाईन” लेखन, पुनर्लेखन सुरू राहिले. शेवटी “ऑनलाईन ऑनलाईन” च्या मर्यादा लक्षात येऊन बर्वे साहेबांनी, मी त्यांच्या घरी येऊन, एकत्र ‘बसू’न काम करू या, असे सुचविले.

त्या प्रमाणे एका शुक्रवारी संध्याकाळी बर्वे साहेबांच्या घरी मी गेलो. त्यात मिसेस बर्वे, त्यांच्या कॉलेजातील मित्रमैत्रिणीसोबत अरुणाचल प्रदेशात फिरायला गेल्या असल्याने आम्हालाही काम करताना आवश्यक ते स्वातंत्र्य मिळाले. घरून निघताना, कदाचित कुठें खुप उशीर झाल्यास आणि जाऊ तिथे जेवायची, झोपायची व्यवस्था असल्यास तिथेच रात्र काढायची या माझ्या सवयीमुळे मी माझी नेहमी तयार असणारी प्रवासी बॅग घेऊनच बर्वे साहेबांच्या घरी पोहोचलो. दोन चार तासात काम पूर्ण होईल असे सुरुवातीला वाटत होते. पण काम संपता संपेना. म्हणून नाईलाजाने आम्ही रात्री अकरा वाजता खाण्यापिण्यासाठी ब्रेक घेतला. परत दोन तास काम करून रात्री १ वाजता (खरं म्हणजे, पहाटे १ वाजता) झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी कामाच्या व्यापाने आंघोळ न करताच काम सुरू करावे किंवा कसे या वर सखोल खल होऊन अंती अनायासे स्वयंपाक करणाऱ्या मावशी आल्याच आहेत तर स्नान करून, शुचिर्भूत होऊन, नाश्ता करून पुन्हा कामाला लागायचे आम्ही एकमताने ठरविले. तसे करून सकाळी नऊ वाजता जे कामाला लागलो ते थेट दुपारी एक वाजेपर्यंत काम करीत राहिलो. शेवटी किती ही काम केले तरी पोट भरत नाही, या सत्याची जाणीव झाल्याने जेवणाची सुट्टी घेऊन जेवण घेतले. आता आम्ही दोघेही जेष्ठ नागरिक. मी कनिष्ठ जेष्ठ नागरिक तर बर्वे साहेब “जेष्ठ” जेष्ठ नागरिक ! त्यामुळे थोडे पडावे म्हणून जे पडलो तर थेट दुपारी चार वाजताच जागे झालो ! बर्वे साहेबांनी त्यांच्या हाताने मस्त कडक कॉफी केली. ती आम्ही चवीचवीने घेतली आणि पुन्हा कामाला लागलो ते थेट रात्री उशिरापर्यंत! परत आदल्या रात्री प्रमाणे खाण्यापिण्यासाठी ब्रेक घेऊन परत दोन तास काम करत राहिलो. अशा प्रकारे रात्री झोपी जाऊन तिसऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशीची परंपरा पुढे चालवत रविवारी संध्याकाळ पर्यंत काम करत राहिलो.

दरम्यान, हे प्रकरण “वाटते तितके सोपे नाही” ही बाब माझ्या चांगलीच लक्षात आली होती. कधी एकदा या “एडिटोरियल अरेस्ट” मधून माझी सुटका होते, असे मला झाले होते.

या अटकेतून सुटकेला निमित्त मिळाले, ते म्हणजे आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या मुलाचे लग्न आणि त्यासाठी आहे तिथून ताबडतोब घरी या, नाही तर लग्नघरी थेट (आणि तिथेही नाही आलो तर थेट देवाघरीच😭) पोचण्याचे बायकोचे आदेश ! आता आयुष्यभर साहेबांचे आणि बायको चे आदेश न मोडणारा मी, हा इतका महत्वाचा आदेश मोडण्याची काय बिशाद करेल ? शेवटी शुक्रवारी संध्याकाळ पासून रविवार, संध्याकाळी ७ वाजेपर्यंत “एडीटोरियल अरेस्ट” मध्ये अडकलेल्या माझी बरोब्बर ४८ तासांनी “एडीटोरियल अरेस्ट” मधून सुटका झाली. किती तरी उंच टॉवर मधील, किती तरी उंचीवर असलेल्या “फ्लॅट” मधून जमिनीवर येऊन मी आधी “फ्लॅट” झालो. भानावर आल्यावर टॅक्सीत बसण्यापूर्वी मी दोन्ही हात मोकळे करून, मोकळ्या आकाशाकडे पाहून मोकळा श्वास घेतला आणि नकोशा झालेल्या एडीटोरियल अरेस्ट मधून सुखरूप सुटका झाल्याबद्दल स्वर्गातील देवाभाऊचे आभार मानले.

पुढे १६ डिसेंबर २०२४ रोजी उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात सुप्रसिद्ध निवेदक, लेखक सुधीर गाडगीळ, आश्रमाचे प्रमुख डॉ अभिषेक देविकर, प्रकाशिका अलका भुजबळ आणि इतर मान्यवरांच्या हस्ते “सत्तरीची सेल्फी” या पुस्तकाचे थाटात प्रकाशन झाले.

पण दुसरा, नवाच अध्याय सुरू झाला, तो लवकरच कधी तरी सांगेन.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. वा खूपच छान.
    आपल्या कामाला धडपडीला सलाम.

  2. ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड, या वाक्प्रचाराप्रमाणे असह्य अरेस्ट उसह्य झाली असावी.
    वर्णन अत्यंत प्रवाही आणि अहंकाराचा लवलेश नसलेले असे झाले आहे.

  3. तुमच्या दोघांच्या लाख मोलाच्या कार्याला मानाचा मुजरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी