“ताई आणि संध्या”
ताई आणि संध्याचं लहानपणापासूनच अगदी मेतकूट होतं. त्या समान वयाच्या म्हणूनही असेल कदाचित. बहिणी पण आणि जिवाभावाच्या मैत्रिणी पण असं संमिश्र नातं होतं त्यांचं. म्हणजे ते तसंच अजूनही आहे वयाची ऐंशी उलटून गेली तरीही.
ताई म्हणजे माझी सख्खी मोठी बहीण आणि संध्या आमची मावस बहीण पण ती जणू काही आमची सहावी बहीणच आहे इतकी आमची नाती प्रेमाची आहेत.
अकरावी झाल्यानंतर ताई भाईंकडे म्हणजे आजोबांकडे (आईचे वडील) राहायला गेली. संध्या तर जन्मापासूनच भाईंकडे राहत होती. तेव्हा मम्मी (आजी) होती आणि भाईंची बहीण तिला आम्ही आत्या म्हणत असू तीही त्यांच्या समवेत राहायची. आत्या हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं व्यक्तिमत्त्व होतं जिच्या विषयी मी नंतर लिहिणार आहेच.
संध्या या तिघांसमवेत अत्यंत लाडाकोडात वाढत होती यात शंकाच नाही पण माझ्या मनात मात्र आजही तो प्रश्न आहेच की मावशी बंधूंचं (म्हणजेच संध्याचे आई-वडील..) संध्या हे पहिलं कन्यारत्न. पहिलं मूल म्हणजे आयुष्यात किती महत्त्वाचं असतं ! याचा अर्थ नंतरची मुलं नसतात असं नव्हे पण कुठेही कधीही पहिल्याचं महत्व वेगळंच असतं की नाही ? मग संध्याला आजी आजोबांकडे जन्मापासून ठेवण्यामागचं नक्की कारण काय असेल ? कदाचित आजीचाच आग्रह असेल का ? आजी ही आजोबांची तिसरी पत्नी होती. अतिशय प्रेमळ आणि नात्यांत गुंतणारी होती. तिने आई -मावशींना कधीही सापत्न भाव दाखवलाच नाही पण तरीही तिला स्वत:चं मातृत्व म्हणजे काय हे अनुभवता आलं नाही आणि लहान मुलांची तिला अतिशय आवड होती म्हणून असेल कदाचित.. तिने जन्मापासूनच संध्याला आजी या नात्याने मांडीवर घेतले आणि तिच्यावर आजी आणि आई बनून मायेचा वर्षाव केला. अर्थात हा माझा तर्क आहे प्रत्यक्ष परिस्थितीचे आकलन मला आजपर्यंत झालेलं नाही आणि या घटनेमागची मावशीची भूमिका ही मला कळलेली नाही.
हे लिहीत असताना मला एक सहज आठवलं तेही सांगते. आम्हा तीन बहिणींच्या नंतर जेव्हा उषा निशा या जुळ्या बहिणींचा जन्म झाला तेव्हा दोन पैकी एकीला आजोबांकडे काही वर्षं ठेवावं असा एक विचार प्रवाह चालू होता. त्याला दोन कारणे होती. एकाच वेळी दोन बाळं कशी वाढवणार आणि दुसरं म्हणजे आमचं घर लहान होतं, फारसं सोयीचं नव्हतं, आठ माणसांना सामावून घेण्याची एक कसरतच होती पण त्याचवेळी हाही एक अनुभव आला की रक्ताची नाती ही एक शक्ती असते. अरुंद भिंतींनाही रुंद करून त्यात सामावून घेण्याचं एक दिव्य मानसिक बळ त्यात असतं. काही काळ आमचं कुटुंब काहीसं हादरलं असेलही पण आम्हाला बांधून ठेवणारा एक पक्का, चिवट धागा होता. जीजीने विरोध दर्शविला म्हणण्यापेक्षा जबाबदारीच्या जाणिवेनं डळमळणाऱ्या मानसिक प्रवाहाला धीर देत सांगितलं, ”कशासाठी ? माझ्या नाती याच घरात मोठ्या होतील, छान वाढतील” आणि त्याच आभाळमायेच्या छताखाली आम्ही साऱ्या आनंदाने वाढत होतो.
मात्र मॅट्रिक झाल्यानंतर ताई भाईंकडे कायमची राहायला गेली. त्यावेळी भाईंच्या घरात आजी नव्हती. ती देवाघरी निघून गेली होती. संध्या आणि ताई दोघीही उच्च गुण मिळवून मॅट्रिक झाल्या. आमच्या घरात या दोघींच्या मॅट्रिकच्या यशाचा एक सोहळा साजरा झाला. आजोबांनी टोपल्या भरून पेढे गणगोतात वाटले होते.
ताईने आणि संध्याने एकत्र मुंबईच्या त्या वेळच्या नामांकित म्हणून गाजलेल्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला होता आणि ठाण्याहून ताई इतक्या लांब फोर्टस्थित कॉलेजात कशी जाणार म्हणून तिने भाईंकडेच राहावे हा प्रस्ताव बिनविरोधात मंजूर झाला होता.
ताई आणि संध्याच्या जोडगोळीत तेव्हापासून वेगळेच रंग भरले गेले. आजोबांच्या शिस्तप्रिय, पाश्चात्य जीवन पद्धतीचा संध्याला अनुभव होताच किंबहुना ती त्याच संस्कृतीत वाढली होती. आम्ही आई बरोबर भाईंकडे फक्त शाळांना सुट्टी लागली की जायचो.दिवाळीत, नवरात्रीत जायचो.पण आम्ही मुळचे धोबीगल्लीवासीयच. ईश्वरदास मॅन्शन, नाना चौक ग्रँड रोड मुंबई. इथे आम्ही तसे उपरेच होतो. सुट्टी पुरतं सर्व काही छान वाटायचं पण ताई मात्र कायमस्वरूपी या वातावरणात रुळली आणि रुजली. आता ती ठाण्याच्या आमच्या बाळबोध घरातली पाहुणी झाली होती जणू !
एकूण नऊ नातवंडांमध्ये संध्या आणि अरुणा म्हणजे आजोबांसाठी दोन मौल्यवान रत्नं होती. त्या तिघांचं एक निराळंच विश्व होतं. आजोबांच्या रोव्हर गाडीतून आजोबा ऑफिसात जाता जाता त्यांना कॉलेजमध्ये सोडत. अगदी रुबाबात दोघी काॅलेजात जायच्या. त्या दोघींच्या साड्या, केशरचना, केसात माळलेली फुले रोजच एकसारखी असत. एलफिन्स्टन कॉलेजच्या प्रांगणात संध्या- अरुणाची ही जोडी या एका कारणामुळे अतिशय प्रसिद्ध झाली होती. शिवाय दोघीही सुंदर, आकर्षक आणि हुशार.
दोघींच्या स्वभावात मात्र तसा खूप फरक होता. पायाभूत पहिला अधोरेखित फरक हा होता की ताई मराठी मीडीअममधली आणि संध्या सेंट कोलंबस या कॉन्व्हेंट स्कूल मधली. सरळ केसांची संध्या तशी शांत, मितभाषी, फारशी कोणात चटकन् मिसळणारी नव्हती. तिचं सगळंच वागणं बोलणं एका ठराविक मीटर मध्ये असायचं आणि या विरुद्ध कुरळ्या केसांची ताई ! ताई म्हणजे एक तुफान, गडगडाट. कुणाशीही तिची पटकन मैत्री व्हायची. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा तिला प्रचंड उत्साह असायचा. मला आजही आश्चर्य वाटतं की संध्याच्या पचनी ताई कशी काय पडायची ? त्या दोघींची आपसातल्या या विरोधाभासातही इतकी मैत्री कशी ? इतकं प्रेम कसं ?
एखाद्या बस स्टॉप वर दोघी उभ्या असल्या आणि बसला येण्यास वेळ झाला की ताईची अस्वस्थतेत अखंड बडबड चालायची. त्याचवेळी संध्या मात्र शांतपणे बसच्या लाईनीत उभी असायची. बसची प्रतीक्षा करत. कधीतरी ताईला ती म्हणायची ! ”थांब ना अरू ! येईल नं बस.”
पण ताईचं तरी म्हणणं असायचं, “आपण चालत गेलो असतो तर आतापर्यंत पोहोचलोही असतो.” “जा मग चालत” कधीतरी संध्याही बोलायची.
पण त्या दोघींचं खरोखरच एक जग होतं. आणि भाईंच्या सधन सहवासात अनेक बाजूने ते बहरत होतं हे नक्कीच. शिस्त होती, धाक होता पण वाढलेल्या गवताला मॅनिक्युरिंग केल्यानंतर जे वेगळंच सौंदर्य लाभतं तशा पद्धतीने या दोघींची जीवनं फुलत होती.
अंतर्महाविद्यालयीन नाट्य महोत्सवात त्या दोघी भाग घेत. संध्याची एकच प्याला मधील सिंधूची भूमिका खूप गाजली. ताईने ही प्रेमा तुझा रंग कसा मध्ये बल्लाळच्या पत्नीची भूमिका फार सुंदर वठवली होती. दोघींनाही पुरस्कार मिळाले होते. दोघींमध्ये अप्रतिम नाट्यगुण होते आणि त्यांना चांगला भावही या माध्यमातून मिळत होता.
आमच्या ज्ञातीच्या इमारतीसाठी निधी गोळा करण्याच्या निमित्ताने एक व्यावसायिक पद्धतीने नाटक बसवण्यात आलं होतं. मला नाटकाचे नाव आता आठवत नाही पण या नाटकातही ताई आणि संध्याच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या आणि या नाटकाच्या तालमी भाईंच्याच घरी होत. सुप्रसिद्ध अभिनेते रामचंद्र वर्दे यांच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक बसवले जात होते. भारतीय विद्या भवनात या नाटकाचा प्रयोग झाला. शंभर टक्के तिकीट विक्री झाली होती आणि प्रयोग अतिशय सुंदर झाला होता.इतका की भविष्यात ताई आणि संध्या मराठी रंगभूमी गाजवणार असेच सर्वांना वाटले. मात्र या नाटकाच्या निमित्ताने “विलास गुर्जर” नावाचा एक उत्तम अभिनेता मात्र रंगभूमीला मिळाला होता.
ताई आणि संध्या यांचं बहरणं असं वलयांकित होतं. आमच्या परिवारात या दोघी म्हणजे नक्कीच आकर्षक केंद्रं होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांचं हे असं मैत्रीपूर्ण बहिणीचं नातं सुंदरच होतं. एकमेकींची गुपितं एकमेकीत सांगणं, आवडीनिवडी जपणं, कधी स्वभाव दोषांवर बोलणं, थोडंसं रुसणं, रागावणं पण तरी एकमेकींना सतत सांभाळून घेणं समजावणं, एकत्र अभ्यास करणं मैत्रिणींच्या घोळक्यात असणं वगैरे वगैरे अशा अनेक आघाड्यांवर या दोघींचं हे नातं खरोखरच आदर्शवत आणि सुंदर होतं.
आम्ही जेव्हा सुट्टीत भाईंकडे जायचो तेव्हा मला प्रकर्षाने जाणवायचं ते म्हणजे संध्या, ताई, आजोबा आणि आत्या यांचा एक वेगळा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये आम्ही नव्हतो. कारण बऱ्याच वेळा संध्या, ताई आणि आजोबा हे तिघंच खरेदीला जात, नाटकांना जात, आजोबांच्या ऑफिसमधल्या पार्ट्यांनाही जात. व्ही शांताराम च्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रीमियर शोचे भाईंना पास मिळत. बहुतेक हे चित्रपट ऑपेरा हाऊसला लागत आणि या प्रीमियर शोज ना ही भाई फक्त ताई आणि संध्यालाच बरोबर नेत. म्हणजे तसे भाई आम्हालाही कुठे कुठे न्यायचे पण त्या नेण्यात ही “स्पेशॅलिटी” नव्हती. खास शिक्का नसायचा. ते सारं सामुदायिक असायचं, सर्वांसाठी असायचं. ”सगळीकडे सगळे” हा साम्यवाद भाईंच्या शिस्तीत नव्हता.
एकदा भाईंनी घरातच, वामन हरी पेठे यांच्या एका कुशल जवाहिर्याला बसवून ताई आणि संध्यासाठी अस्सल हिरे आणि माणकांची कर्णफुले विशिष्ट घडणावळीत करवून घेतली होती. कर्णभूषणाचा तो एक अलौकिक सौंदर्याचा नमुना होता. आणि एक मोठा इव्हेंटच होता आमच्या अनुभवातला. नातेवाईकांच्या लग्नसमारंभात त्या दोघी ही सुंदर कर्णफुले घालून मानाने मिरवायच्या फार सुरेख दिसायच्या दोघीही !
माझ्या मनात कुठलीच आणि कोणाशीही स्पर्धा नव्हती. जितकं प्रेम ताई वर होतं तितकंच संध्यावरही होतं. संध्या आजही आवडते आणि तेव्हाही आवडायची. कुणाही बद्दल द्वेष, मत्सर, आकस काही नव्हतं पण त्या त्या वेळी आजोबांच्या सहवासात हटकून एक उपरेपणा मात्र कुठेतरी जाणवायचा आणि तो माझा बाल अभिमान कुरतडायचा. डावललं गेल्याची भावना जाणवायची. अशावेळी मला माझी आई, आजी, पप्पा आणि धाकट्या बहिणी रहात असलेलं धोबी गल्लीतलं ते लहानसं, मायेची ऊब असलेलं, समान हक्क असलेलं घरच हवं असायचं. माझ्यासाठी ते आनंदघर होतं.
खरं म्हणजे “भाई” आजोबा म्हणूनही आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनही त्यांचा प्रचंड प्रभाव माझ्या जडणघडणीवर आहेच. त्यांनी दिलेल्या आयुष्याच्या अनेक व्यावहारिक टिप्स मला जगताना कायम उपयोगी पडल्यात. मी त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करूच शकत नाही पण त्या बालवयात मी प्रचंड मानसिक गोंधळ त्यांच्या पक्षपाती वागण्यामुळे अनुभवलेला आहे हे खरं.
आजोबांकडच्या वास्तव्यात मला आणखी एक जाणवायचं की आत्याचा संध्याकडे जास्त ओढा आहे. ते स्वाभाविकही होतं. ताई ही कितीतरी नंतर त्यांच्यात आली होती. आत्याला ताई पेक्षा संध्याचं अधिक कौतुक होतं आणि कित्येकवेळा ती ते चारचौघात उघडपणे दाखवत असे. “असले उपद्व्याप अरुच करू शकते ..संध्या नाही करणार.” यात एकप्रकारचा उपहास असायचा. पण तो फक्त मलाच जाणवत होता का? ताईच्या मनात असे विचार येतच नव्हते का? एक मात्र होतं यामुळे ताईच्या आणि संध्याच्या नात्यात कधीच दरी पडली नाही हेही विशेष.त्यावेळी मला मात्र वाटायचं.. “का आली ताई इथे? का राहते इथे? कशाचं नक्की आकर्षण तिला इथे वाटतं.? आपल्या घरातल्या सुखाची चव हिला कळत नाही का?
मी माझ्या मनातले प्रश्न ताईला कधीही विचारले नाहीत. मी तेव्हढी मोठी नव्हते ना! आणि हे प्रश्न कदाचित गैरसमज निर्माण करू शकले असते. त्यातील अर्थांची, भावनांची चुकीच्या पद्धतीने उकल झाली असती. पण आज जेव्हा मागे वळून मी त्या वेळच्या माझ्या मनातल्या गोंधळांना तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करते तेव्हा एकच जाणवते.. मला माझी स्वतंत्र विचारशक्ती होती. मी कधीही कुणालाही “का ?” ” कशाला ?” विचारू शकत होते जर कोणी माझ्या वैयक्तिक बाबतीत ढवळाढवळ केली तर. मला माझ्यातला एक गुण म्हणा किंवा अवगुणही असू शकेल पण मी कधीही कुणाची संपूर्णपणे फॉलोअर किंवा अनुयायी नाही होऊ शकणार. माझ्यातल्या विरोधी तत्त्वाची मला तेव्हा जाणीव होत होती आणि त्याला कदाचित माझ्या आयुष्यातल्या या दोन सुंदर व्यक्तीच कारणीभूत असतील. केवळ संदर्भ म्हणून.. ताई आणि संध्या…
क्रमश:
— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
क्रमश: