Home लेख माझी जीवन नौका : ११

माझी जीवन नौका : ११

18

“देव तारी……”

आमची लोकपालक अजूनही विशाखापट्टण बंदरात जेट्टीला उभी होती. शिप जेट्टीला येऊन जवळजवळ दहा-बारा दिवस होऊन गेले होते. ही जेट्टी मुख्य विशाखापट्टण गावाहून बरीच दूर होती. जहाजाचा गॅंगवे उतरून खाली आलं की जवळंच डॉकचे गेट होतं. त्या गेटमधून बाहेर पडलं की रिक्षा मिळायच्या. पण हे गेट गावापासून बरंच दूर असल्यामुळे रिक्षा मिळायला वेळ लागायचा. क्वचित कधीतरी दिवसा बाहेर जावं लागलं तर रिक्षाने आम्ही या लांबच्या रस्त्याने जायचो. या रस्त्यावर  फारशी रहदारी मात्र नसायची.

शिप वरून गावात लवकर पोहोचण्यासाठी आणखी एक मार्ग होता. आमच्या जेट्टीच्या समोर बंदराचं दुसरं एक गेट होतं. पण या दोन गेटच्या मध्ये समुद्र होता.
आमच्या जेट्टीच्या जवळ खाली पडाव असायचे. धक्क्यावरून तीन चार पायऱ्या उतरून पडावात चढायचं. त्यातून नावाडी समोरच्या जेट्टीला नेऊन सोडायचे.
कामासाठी येणाऱ्या किनाऱ्यावरच्या लोकांना पण हे पडाव जहाजावर  घेऊन यायचे. त्यांच्या या फेऱ्या अगदी लवकर सकाळपासून ते खूप उशिरा संध्याकाळ पर्यंत… जवळजवळ रात्र होईपर्यंत चालायच्या.

हा समोरचा डॉक गावाला अगदी लागून होता. त्या गेटच्या बाहेर गजबजलेला रस्ता होता. लगेच रिक्षा मिळायच्या. त्यामुळे लांबचा फेरफटका वाचायचा.

शिप वरून बाहेर जाताना किंवा परत येताना डॉकच्या गेटमधूनच जावं लागतं. मोठी गेट्स नेहमी बंद असतात. ती मोठे ट्रक्स, कार्स यांच्यासाठी उघडली जातात. आपली जा-ये करण्यासाठी जवळ छोटं लोखंडी गेट असतं. तेही बंदच असतं. गेटवर चोवीस तास सशस्त्र पहारेकरी असतात.
त्यांना gate security किंवा gate guard असे म्हणतात. जहाजाचे लोक त्यांना गेटमन म्हणायचे. बाहेर जाताना किंवा परत आत येताना प्रत्येकवेळी व्यक्ती किंवा वाहनाचा गेट-पास ते तपासतात. मगंच गेट उघडून सोडलं जातं. नंतर लगेच गेट बंद केलं जातं.

अर्थात आम्ही रोज संध्याकाळी गावात जात नव्हतो. तीन-चार दिवसांनी एखादी फेरी व्हायची.

रोज संध्याकाळी मुकुंद इंजिनरूम मधून केबिनमध्ये आले की त्यांची अंघोळ वगैरे झाली की मग आम्ही दोघेच खाली जेट्टीवर फिरायला जायचो.
मला दिवसभर केबिनमध्ये कंटाळा आलेला असायचा. केबिनच्या एसीच्या थंड हवेतून बाहेर डेकवर आलं की हवेतला उष्मा आणि दमटपणा चांगलाच जाणवायचा.
लाल भडक ऑइल पेंटने रंगवलेली त्या विशाल डेकची लोखंडी फ्लोअर प्लेट, कुठे कुठे वेटोळी घालून ठेवलेले पिवळ्या रंगाचे अतिप्रचंड नायलॉनचे दोरखंड, सबंध डेकला सर्व बाजूंना असलेलं पांढऱ्या ऑइल पेंटनी रंगवलेल्या बारचं रेलिंग, शिपवरून बोलार्ड कडे टाकलेले दोरखंड आणि जेट्टीच्या मोठ्या मोठ्या काळ्या टायर्स….. ही रंगसंगती डोळ्यात भरायची.
केबिनमध्ये मंद पण बाहेर आल्यावर स्पष्ट, मोठ्याने ऐकू येणारी यंत्रांची घरघर !

गॅंगवे वरून खाली उतरलो की जेट्टी आणि जहाजावरची मंडळी आम्हा दोघांच्याकडे हळूच कौतुकाने पहात.

केबिन मधल्या कार्पेटवरून आणि जहाजाच्या लोखंडी floor plates वरून आपल्या जमिनीवर उतरलं की फार छान वाटायचं ! मी पायातल्या चपला काढून त्या जमिनीवर थोडावेळ उभी राहायची. खरंच जमिनीचा स्पर्शच विलक्षण असतो. बाबांनी सांगितलेली रवींद्रनाथ टागोरांची गोष्ट हमखास आठवायची.
गुरुदेव अनवाणी पायाने चालायचे म्हणे !
कारण जमीन आपल्याला संदेश देत असते
ते आपल्यापर्यंत  पोहोचले पाहिजेत !

खाऱ्या पाण्याचा आणि पाणवनस्पतींचा एक विशिष्ट गरम वास सगळीकडे भरून राहिलेला असायचा. निरनिराळ्या जेट्टींच्यावर उभी असलेली जहाजं. काही वेळा त्यांच्यातून धान्य यायचं. Loading unloading होताना जेट्टीवर सांडलेलं धान्य टिपण्यासाठी चिमण्या-कावळे यांची गडबड सुरू असायची.
संध्याकाळ गडद होत जाई तशी घरट्याच्या ओढीने ते दूर दूर निघून जात. त्यांची किलबिल हळूहळू बंद होई. एखादं चुकार पाखरू जेट्टीवर भिरभिरून दूरवर निघून जाई.

किनाऱ्यावर हळुवार धडकणाऱ्या समुद्राच्या लाटांचा खsssश्, खsssश् असा आवाज, मंद वाहणारे वारे,आणि मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या किरणांनी रंगणारं, हळूहळू गडद जांभळं होत जाणारं पश्चिमेकडचं आभाळ, समुद्रात दूरवर जाणारी एखादी शिडाची लहानशी बोट, आकाशात एखादी एखादी डोकावायला लागलेली चांदणी, जहाजांच्या डेक्स वर लागलेले दिवे, त्यांची समुद्राच्या पाण्यात पडलेली थरथरणारी प्रतिबिंबं, मालवाहतूक करणाऱ्या ट्रकांची संपत आलेली फेरी…. त्यांचा घर्रघर्र आवाज, किनाऱ्यावरून कामासाठी येणाऱ्या मंडळींची एखादी परत जाणारी कार‌… तिचा सर्रसर्र आवाज….

खरंतर कोणतंही बंदर कधीच झोपत नाही‌. चोवीस तास काही ना काही तरी काम सुरूच असतं.

तरीही जेट्टीवर दिवसभर असणारी गडबड, कामांची धकाधकी संध्याकाळी खूप कमी… कमी… मंद…मंद होत जाई.
दिवसभरच्या भरपूर धावपळीनंतर  श्रमलेलं हे सारंच आवाजांचे जगही हळू हळू अबोल होत असे.
जेट्टीवरचे लांब लांब अंतरावरचे एकेकटे दिवे…आता चांदण्यांनी भरून गेलेलं आकाश आणि अंधाराची चादर घेत पेंगुळलेलं बंदर !

संध्याकाळचं हे तास दीड तास फिरणं खूप छान वाटायचं. दूरवर चालणाऱ्या कामांच्या ठोकठोकीचे वाऱ्याबरोबर खेचले जाणारे मंदसे आवाज त्या गडद्द कातरवेळेला अधिकंच गहिरं करून जायचे. एकमेकाच्या हातात हात गुंफून तिथून चालताना एक अनोखा शांतसा एकांत सगळ्या बंदरालाच व्यापून उरायचा.

केबिनमध्ये गेलं की कपडे बदलून, हातपाय धुवून देवाला उदबत्ती, रामरक्षा आणि जेवायची तयारी.
सगळं आवरलं की बाहेरच्या डे रूम मधले दिवे बंद. बेडरूम मध्ये मंद नाईटलॅंप !
पोर्टहोल मधून आत येणारा चंद्राचा मंदसा प्रकाश….. आणि त्यात न्हाऊन निघालेली बहरत, मोहरत जाणारी केबिन ! 

जहाज आता कलकत्त्याला जाणार, तिथून पुढे कुठे जायचं ते ठरेल वगैरे बातम्या येत होत्या. घरून येणारी पत्रं ऑफिसच्या पत्त्यावर पाठवली जातात. बहुतेक वेळा जहाजावर नव्याने जॉईन करणाऱ्या माणसाकडे ही सगळी मेल दिली जाते. त्यामुळे ती सर्वांना लवकर मिळते.

अशी घरची पत्रं मिळाली की जहाजावर उत्सवाचं वातावरण असतं. भारताच्या निरनिराळ्या प्रांतातून आलेले लोक जहाजावर असतात. प्रत्येकाच्या घरच्या बातम्या एकमेकाला उत्साहाने सांगितल्या जायच्या.

सणावारी घरच्यांनी काढलेली आठवण, कुठे मुलांची प्रगती, त्यांचे वाढदिवस, कोणी बांधायला घेतलेल्या घराचे पुढे सरकलेलं काम, मुलांनी वडिलांच्याकडे मागणी केलेल्या वस्तूंची यादी, कुठे कोणाच्या घरची व्यालेली गाय, तर कुठे कोणाच्या घरच्या आजारपणाची चिंता लावणारी बातमी, कधीतरी एखाद्या नातेवाईकाचं अगर जवळच्या मित्राचं दुःखद निधन…..

त्यात पत्नीचं पत्र तर खास असायचं. त्यावरून एकमेकाची होणारी चिडवा-चिडवी, छान बातमी असेल तर सर्वांनी केलेली मिठाईची मागणी, काही दुःखद बातमी असेल तर एकमेकाला दिलेला आधार….
नव्याने जॉईन झालेल्या लहान कॅडेट्स, फिफ्त इंजिनियर्स यांना घरची पत्रं मिळाली की घरच्या आठवणींनी व्याकुळलेले त्यांचे चेहरे …..

खूप महिने काम झाल्यावर आपला रिलिव्हर कधी येतो आहे याची वाट पाहणं…. आणि रिलिव्हर आला की आनंदाचं फुटणारं कारंजं….
आयुष्याच्या चढ-उताराच्या, अनेक वळणांच्या, सुखदुःखाच्या अनेकविध आवर्तांचा तो एक लहानसा छेदंच !

आम्ही पण आई-बाबा, वहिनी, वृंदा यांच्याकडून येणाऱ्या पत्रांची वाट बघत असायचो. पत्रं हातात मिळाली की दोघेही अक्षरशः अधाशासारखी वाचून काढायचो. त्यांची कितीतरी पारायणं व्हायची. घरी कोण कोण आलं गेलं, भावंडांच्या, शेजाऱ्यांच्या, मित्र-मैत्रिणींच्या….  बातम्या वाचून खूप छान वाटायचं आणि मन तर भरून यायचंच.
माझे बाबा अतिशय सुंदर पत्र लिहायचे. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा तपशील असायचा. त्यांचं वाचन अफाट होतं. त्यामुळे त्यातले ही खूप संदर्भ असायचे. त्यांची अनेक पत्रं मी अजूनही जपून ठेवली आहेत. तो माझा एक अमोल ठेवाच आहे.

कधी गावात गेलो की तिथून घरी शेजाऱ्यांच्या फोनवर STD Call करायचा. त्या चार-पाच मिनिटात दादा, वहिनी, वृंदा यांच्याशी किती बोलून घेऊ असं आम्हा दोघांनाही व्हायचं. दादा तर, “अगं बापूचा फोन आहे. लवकर लवकर या” जोरात हाका मारायचे. त्यांचा आनंद आणि उत्साह फोन मधून जाणवायचा.

त्यावेळी अमिताभ बच्चनचा काला पत्थर हा सिनेमा खूप गाजत होता. तो विशाखापट्टणमधे लागला होता.
एकदा आम्ही पाच-सहा जण  गावात गेलो. बाहेर जेवण वगैरे केलं आणि थिएटर वर जाऊन रात्रीच्या शोची तिकीट मिळतात का बघायला लागलो. प्रचंड गर्दी होती. ब्लॅक मध्ये दोनच तिकीट मिळाली.
हरी म्हणाला, “बापू दो ही टिकीट मिल गयी हैं. तुम दोनो पिक्चर देख के आना. अब हम लोग वापस जाते हैं.” आम्हाला थिएटर वर सोडून उरलेले चौघेजण जहाजावर परत गेले.

तो सिनेमा खूप मोठा होता. रात्री नऊचा शो. बाहेर पडेपर्यंत साडेबारा वाजून गेले होते.
मुकुंद म्हणाले, “आता आपण छोट्या पडावातून जाण्यापेक्षा सरळ रिक्षाने रस्त्याने जहाजावर जाऊया. अंतर बरंच आहे. थोडा जास्त वेळ लागेल, तरीपण ठीक आहे.”
त्या एवढ्या उशिरा रात्री कोणी रिक्षावाला इतक्या लांब यायला तयार होईना. शेवटी कसं बस करून, जास्त पैसे देतो असं सांगितलं आणि एक रिक्षावाला तयार झाला.

आम्ही दोघे रिक्षात बसलो आणि रिक्षा भरधाव वेगाने निघाली. मध्येच मुकुंदना काय वाटलं कुणास ठाऊक, पण पडाव असायचे तिथल्या गेट जवळून रिक्षा जाऊ लागल्यावर त्यांनी अचानक रिक्षावाल्याला थांबायला सांगितलं.
हे मला म्हणाले, “रात्र बरीच झाली आहे. आपण पडावातूनच जाऊया, अजूनही रिक्षाने एक तासभर लागेल. त्यापेक्षा बोटीतून अर्ध्या तासात जहाजावर पोहोचू.”
रिक्षावाला कुरकुर करायला लागला. आम्ही रिक्षातून उतरलो. यांनी ठरवलेले सर्व पैसे त्याला दिले. तो निघून गेला.

आम्ही गेटमध्ये आलो. आमचे पास तपासणारे port security guard  मध्यम चणीचे, सडसडीत अंगाचे साधारण पन्नाशीचे गृहस्थ असावेत.
आम्हाला पाहिल्याबरोबर त्यांनी विचारलं, “इतक्या रात्री तुम्ही दोघेच कुठून येत आहात ?” आम्ही सिनेमाचा वृत्तांत सांगितला. तसंच “खरंतर लांबच्या रस्त्याने रिक्षाने निघालो होतो. पण अचानक इथेच रिक्षा सोडली आणि या गेटला आलो” असं मुकुंदनी सांगितल्याबरोबर त्यांनी करड्या नजरेने आमच्याकडे पाहिलं. म्हणाले, “आज भगवान ने आपकी रक्षा की है| जिस दूर के रास्ते से आप जाना चाहते थे उधर क्या क्या लफडा हो जाता है आपको पता नही |”
आम्ही चमकून त्यांच्याकडे पाहिलं. ते पुढे म्हणाले,
“वह एरिया सुनसान और डेंजरस है | उधर रात मे बहुत लूट लिया जाता है | पैसों की बात छोडो, अगर आप के बीबी को कोई कुछ करता तो आप अकेले कैसे लड सकते थे?”
ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली.
घरच्या वडीलधाऱ्यांनी रागवावं तसं ते म्हणाले,
“जो एरिया मालूम नही है उधर कभी भी इतनी रात गये अकेले मत जाना | हमारी बेटी को ऐसी रात मे कभी बाहर नहीं लेके जाना|”
“पिक्चर देखनी है तो दिन मे देख के शाम तक वापस आना | नही देखोगे तो भी चलेगा |”
आता पडावानंच जायला लागणार होतं. हमारी बेटी हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी तरारलं. बाबांची आठवण आली. मी म्हटलं,
“काका, अब शिप पे कैसे जायेंगे ?”
ते गेटमनकाका म्हणाले, “यह बोटवाला भी दिनभर काम करके  थाका हुआ है | फिर भी उसे जगाना तो पडेगा | डरो मत |आपको छोटी बोट से आपके जहाज तक छोड आयेगा |”
आम्हाला काही सुचत नव्हतं. ते सांगतील ते आम्ही निमूटपणे ऐकत होतो.

तो नावाडी बिचारा दिवसभर पडाव वल्हवून, मर मर काम करून तिथेच  एका बाकड्यावर गाढ झोपला होता. अंगाखाली एक मळकी चादर. तसेच फाटके मळके कपडे अंगावर !
त्या काकांनी त्याला उठवायचे बरेच प्रयत्न केले, पण नावाडी बिचारा इतका दमला होता की त्याला जाग येईना. जवळ जवळ पंधरा-वीस मिनिटानंतर तो कसा-बसा जागा झाला. डोळे चोळत उठला. काकांनी त्याला त्याच्या भाषेत परिस्थिती समजावली. तो यायला तयार झाला.
त्याने पडाव पायऱ्यांच्या जवळ आणून लावला. आम्ही दोघांनी त्या गेटमनकाकांचे आभार मानले. त्यांचं नावही विचारायचं भान आम्हाला राहिलं नाही.  दोघेही गपचूप पडावात बसलो. आम्ही पडावात बसेपर्यंत ते काका गेट सोडून येऊन आमच्यासाठी तिथे उभे राहिले. आम्ही आमच्या जेट्टी वर उतरलो. मुकुंदानी पडाववाल्याला भरपूर पैसे दिले.तो बोट घेऊन परत निघून गेला.
आम्ही गॅंगवे चढून वरती जाईपर्यंत समोरच्या जेट्टीवरून ते गेटमनकाका लक्ष ठेवून होते. आम्ही वर चढून गेलो. वरच्या डेक वरून त्यांना हात केला. नमस्कार केला. आम्ही सुरक्षित पोहोचल्याची खात्री झाल्यावरंच ते गेट कडे परत फिरले.
खरोखर त्या रात्रीचा तो प्रसंग आठवला तरी आजही अंगावर काटा येतो.

तेव्हा आमची ही वयं लहान, अनुभव नव्हता आणि जगाच्या या भयानक वास्तवाची कधी कल्पनाही केली नव्हती.
आम्ही दोघं जहाजावर सुरक्षित  पोहोचावं म्हणून त्या रात्री ते गेटमनकाका  धावून आले….
त्यांनी मला हमारी बेटी म्हटलं, जशी मी त्याची लेकंच होते. पित्याच्या मायेने त्यांनी आमची काळजी घेतली. आमच्यासाठी ते देवदूतंच होते.
त्यांनी मुकुंदांना समजावलं आणि आम्हा दोघांना चांगली समजही दिली.
खरंच तो त्यांचा अधिकार होता ! आणि दिवसभर काबाडकष्ट करून दमलेला तो नावाडी‌…. त्या अपरात्री झोपेतून धडपडून उठून आमच्यासाठी नाव घेऊन बोटीपर्यंत आला. जसा काही तो माझा भाऊच होता.
त्या दोघांनी आमच्यासाठी जे केलं त्याचं ऋण पैशात कधीच मोजता येणार नाही.

त्यांच्या रूपाने गुरु माऊली स्वामी स्वरूपानंद – परमेश्वरच आमच्यासाठी धावून आले होते. त्यांनीच आम्हाला वाचवलं, फुलासारखं जपलं आणि शिकवण ही दिली.

खरंच तो गेटमन, तो नावाडी आमचे कोण होते ?
कोणत्या जन्मीचे हे ऋणानुबंध ?
बंध होते ते फक्त  माणुसकीचे, नीतीचे, मायेचे आणि आमच्या सारख्या  परक्या जोडप्या बद्दल वाटणाऱ्या काळजीचे !
आयुष्यात त्यांच्याशी आमची परत कधीच गाठ पडली नाही. पण ही अनाम माणसं असं विलक्षण देणं देऊन गेली !

आपली आपली म्हणून ज्यांच्यासाठी आपण जीव पाखडतो ती आपलीच, अगदी रक्ताच्या नात्यातली माणसं सुद्धा आपल्याशी अत्यंत खोटेपणानं,  स्वार्थीपणाने, निर्दयपणे वागतात आणि ज्यांचा आपला आयुष्यात कधीच काहीच संबंध  नसतो, ज्यांचं नाव गावही ठाऊक नसतं ती माणसं आपल्यासाठी कसलीच अपेक्षा न ठेवता खूप काही करून जातात.
हे सारं विलक्षण आहे. ही फक्त परमात्म्याची कृपा आहे.
क्रमशः

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले-पूर्व, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

18 COMMENTS

  1. वैजू ताई, मिलिंद दादा, सतीश, चित्राताई भारती सुप्रिया, कल्याणी, कांचन,स्मिता वहिनी,प्रतिभा, डॉ सुरेखा, सुजाता मेहंदळे, राजश्री, सीमा, जगदीश तुम्हा सर्वांची मी अत्यंत आभारी आहे.
    तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप स्फूर्ती देणाऱ्या उत्साह वाढवणाऱ्या असतात. तुमचं प्रेम सदैव असंच मिळत राहू दे.
    🌷🙏
    स्मिता वहिनी ,
    तुम्ही पण माझ्यासारखीच वायझॅक मध्येच पहिल्यांदा शिप जॉईन केली. आपलं दोघींचं विशाखापट्टणम् म्हणजेच वायझॅकशी काहीतरी खास नातं असावं असं वाटतं.

  2. वेदवती, सगळे वर्णन वाचताना अंगावर अगदी काटा आला. जहाजावरचे जीवन डोळ्यांपुढे शब्दश: आले. खूप छान लिहीतेस तू. एका वेगळ्या जीवनाचा परिचय होत आहे. असेच लिहित रहा.

  3. खरच गेटवरचे काका म्हणजे भगवंतच तुम्हाला भेटले म्हणायला पाहिजे.बोटीवर पोहोचेपर्यंत मनाची काय अवस्था झाली असेल त्याची कल्पना करणे कठिण.

  4. Your vivid portrayal of adventurous stories in such detail Is exciting to read….looking forward for next article 😀

  5. वेदवती ताई
    तुमचे जहाजावरील जीवन आणि विशाखापटणम् गाव
    यांच्यातील दुवा खूपच महत्त्वाचा आणि रंजक आहे.
    सर्वांनी सिनेमा बघायला जायचे ठरवले परंतु दोनच तिकिटे मिळाल्यानंतर ती तुम्हा दोघांना देऊन आनंद देण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे खरंच स्पृहणीय आहे.
    परंतु त्यानंतरचा अनुभव मात्र थरारक आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन तुम्ही जहाजावर सुखरूप पोहोचलाय
    त्यासाठी मिळालेले रिक्षावाला आणि पडाव चालक यांच्या रूपात ईश्वराने तुमची मदत केली . तसेच पोर्ट सिक्युरिटी गार्डच्या रूपात वडिलांची माया मिळून *बेटीला आशीर्वाद मिळाला* त्या वेळचा तुमचा आनंद अ वर्णनीय असणार आणि नक्कीच तुमच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले असतील. आपण किती नशीबवान आहोत हा विचार नक्कीच मला मध्ये आला असणार.
    तुम्ही दोघेजण या सर्वांशी आपुलकीने नाते जोडल्यामुळेच हे सर्व शक्य झाले हे निश्चितच.
    हा अनुभव तुमच्याच नव्हे तर आमच्याही कायम स्मरणात राहील. असे अनुभव आल्यानंतरच आपण घरामध्ये किती सुरक्षित जीवन जगतो याचे मोल कळते. जीवनात अशा गोष्टी खूप काही शिकवून जातात आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद कसा मिळवावा याचा एक वस्तू पाठवत आपल्याला मिळतो.
    पुढील लेखाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
    *डॉ. सुरेखा विवेक जोशी*

  6. वेदवती, खूप छान लिहितेस. तरुण वयातला रात्री उशिरा परत येण्याचा अनुभव आणि रिक्षातून उतरण्याचा घेतलेला योग्य निर्णय वाचताना मजा आली. (आणि आमचे पण दिवस आठवले).
    तुझ्यामुळे जहाजावरचे आयुष्य कसे भयानक सुंदर असते ते समजून येते.(भयानक अनुभव, जबाबदारी वगैरे आणि सुंदर पण तेवढेच. निसर्ग, अभिमान आणि तरुण वयातील सहवास,… सुंदर)

  7. Rightly said, Pradnya!!! What might have been a frightening experience, was converted to a lifetime memory by just one small decision. Look at the positive it brought for you!!! This memory of the kind security guard, who you remember as a father figure. The boatman who was kind enough to ferry you across and a life lesson learned.
    Although I too joined the ship in Vizag, we sailed for Calcutta almost immediately after we boarded.
    As usual a very well written detailed report.

  8. You have indeed inherited your Baba’s descriptive skills! A wonderful description of your surroundings, the clear skies overhead and the Ship that had become your House during that time! Loved it! Waiting for more👍

  9. वेदवतीताई मी तुमचे माझी जीवन नरकाचे सगळे भाग वाचले आहेत.
    तुम्ही सांगत आहात हे जग आम्ही पाहिलं नाही, अनुभवलं नाही , पण तुमचे लेख वाचत असतांना , तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसर आमच्या डोळ्यासमोर उभा रहातो आणि आम्ही ते वाचतांना , सर्व प्रत्यक्ष अनुभवत आहोत असा भास होतो . इतकी ताकद तुमच्या सोप्या , ओघवत्या भाषेत आहे.
    खूप छान. असेच लिहीत रहा .

  10. किती सुंदर अनुभव कथन आहे. रात्री उशीरा परततानाचा अनुभव तर केवळ मनाला स्पर्शून जाणारा होता. गेटमनकाका आणि नावाडी. बाबांसारखी काळजी घेणारे ते दोघेही विलक्षणच. लिहीत राहा.

    • जगदीश
      माझ्या प्रत्येक लेखावर किती मनापासून लगेच प्रतिक्रिया लिहितोस रे. तू तर माझा भाऊच आहेस पाठचा असं मला वाटतं.

  11. खूपच छान 👌👌 अखंड आणि लयबद्ध लिखाण! माणुसकीचे दर्शन घडवणारा प्रसंग, अप्रत्यक्ष असणाऱ्या भगवंताच्या कृपेची जाणीव, भविष्यात आवश्यक असणारी अनुभवाची शिदोरी अशा सगळ्याच गोष्टींचं अगदी अचूक आणि भावनापूर्ण वर्णन🙏

    असा प्रसंग खरंतर घडून गेल्यावर कळतं की नेमकं काय झालं?
    त्या प्रसंगातून जेव्हा आपण जात असतो तेव्हा मात्र काय घडतंय हे कळतंच नसतं. पण त्यानंतर होणारी जाणीव खूप महत्त्वाची असते आणि खूप काही शिकवून जाते 🙏

  12. स्वामींची कृपा आणि मुकुंददादांच्या अंतर्मनाचा कौल यामुळेच तुम्ही सुखरूप जहाजावर पोहोचलात, खूप छान शब्दबद्ध केलयसं

  13. तुम्ही सगळेजण इतक्या आवर्जून लगेच प्रतिक्रिया पाठवता,मला फार छान वाटतं.
    हे लेख लिहीत असताना माझंच आयुष्य एका वेगळ्या पातळीवरून मी परत बघतीये .
    हा माझ्यासाठी ही एक विलक्षण अनुभव आहे.
    तुम्हा सर्वांचे प्रेम असंच अखंड मिळत राहू दे ही विनंती. 🌷🙏

  14. घरापासून दूर असलं की एखादा प्रेमाचा, मायेचा ओलावा देणारा शब्द अनोळखी manasahi आपलीशी करून जातो.
    खूप बोलके अनुभव आहेत तुझे.

  15. The term Sixth Sense is experienced by Mukund. Lots of thanks to him. Also his practice approach to situation and spontaneous decision helped you to overcome the incident. Like you I am also waiting for your Calcutta trip.

  16. प्रसन्न वाटलं तिऱ्थलं लाईफ रुटीन वाचल्यावर, एक अनोखी दुनिया समोर साकारली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version