Home पर्यटन सफर इंग्लंड ची : 1

सफर इंग्लंड ची : 1

0
Westminster

“बाथ”

आपल्या वेब पोर्टलचे नियमित लेखक प्रा. डॉ. सतीश शिरसाठ हे सध्या इंग्लंड मध्ये आहेत. त्यांनी नुकत्याच केलेल्या तेथील सफरीत आपण पुढील चार दिवस सहभागी होऊ या…
— संपादक

इंग्लंड मधील बाथ हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला युनेस्कोच्याचा जागतिक वारसा स्थान दर्जा मिळाला आहे. जिथे दोन हजार वर्षांपूर्वीही लोकशाही नांदत होती, त्या बाथ येथे आम्ही पोहोचलो तेव्हा दुपार झाली होती. रोमनांनी इथे बराच काळ राज्य केलं. आज शहराने आधुनिक वस्त्रं परिधान केली आहेत, तरी पिवळसर दगडांची जुन्या रोमन शैलीची घरं आणि भव्य इमारती डौलात उभ्या आहेत.

अंग भाजणारं ऊन असूनही, त्या इमारतींच्या सावलीत थंडावा वाटत होता. इंग्लिश जीवनातील नियोजनबद्धता, स्वच्छता, शिस्त इथल्या प्रत्येक इमारतीतून दिसते. विस्तीर्ण रस्त्यावरून चालताना फुलांच्या रंगांची उधळण मन मोहून घेते.

रोमन लोकांना इथे गरम पाण्याचे झरे मिळाले होते. त्यांना ते ‘Aqua Sulis’ म्हणत. इ.स. ७० मध्ये त्यांनी सार्वजनिक स्नानगृह बांधलं. ते खऱ्या अर्थाने आरोग्यधाम होतं. जवळपास प्रार्थना स्थळ, व्यायामशाळा पण होती. सामान्य माणूस अल्प शुल्कात अंघोळ करू शकत होता. पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगळी वेळ असायची.

मध्ययुगात हे शहर विस्मृतीत गेलं. पण १८व्या शतकापासून गरम पाण्याचं महत्त्व लक्षात येऊन लोक पुन्हा इथे येऊ लागले. २० व्या शतकापासून स्वच्छतेचं महत्त्व समजलं आणि सरकारी स्नानगृहं निर्माण झाली.

मात्र रोमन काळात लोकशाही तत्त्वावर सर्वांसाठी बांधलेल्या या स्नानगृहांच्या अवशेषांमुळेच बाथला युनेस्कोचं जागतिक वारसा केंद्राचं स्थान मिळालं. आरोग्याचं सार्वजनिकीकरण आणि लोकशाहीकरण इथे दिसलं.

शतकानुशतकं वाहणाऱ्या हिरवट-पिवळ्या पाण्याकडे पाहताना वाटलं – २००० वर्षांपूर्वीच्या रोमन माणसांची, आरोग्याची काळजी आणि माझी एकच नाही का ?

“अव्हॉन”च्या काठावर : –
रोमन बाथ पाहून आम्ही ‘सर्कस’ या गोलाकार रस्त्यावरून चालत अव्हॉन नदीच्या काठावर गेलो. सायंकाळ झाली होती, पण समर ऋतूमुळे उजेड भरपूर होता. निसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध मानवी विकासाच्या खुणा शहराच्या सौंदर्यात भर घालत होत्या.

नदीच्या पुलावर उभं राहून, खळाळतं पाणी डोळ्यांनी पीत होतो. प्रेमाची दोन रूपं दिसली- काही तरुण-तरुणी आवेगात एकमेकांची चुंबन घेत होते. दुसरीकडे एक तरुण, त्याच्या सोबत आलेल्या तरुणीच्या कानाजवळची, जखम हलक्या हाताने स्वच्छ करत होता. तिला वेदना होऊ नये याची काळजी घेत कापसाचे बोळे पिशवीत ठेवत होता.

बागेत टॅक्सीची वाट पाहत बसलो. हिरव्या विविध छटांनी भरलेल्या झाडांतून वारा वाहत होता. पानांची सळसळ प्रवासाचा शिणवटा घालवत होती. लुसलुशीत हिरवळ थकलेल्या पायांना सुखद वाटत होती.

एका कोपऱ्यात मुलींचा घोळका ‘हॅप्पी बर्थडे’चा फुगा घेऊन वाढदिवस साजरा करत होता. डोक्यावर कागदी टोपी घातलेली मुलगी ‘बर्थडे गर्ल’ होती.

दुसऱ्या कोपऱ्यात एका झाडाखाली एक वृद्ध माणूस तोंड उघडं करून गाढ झोपला होता. त्याला सभोवतालच्या उधाणलेल्या आनंदाशी काही देणंघेणं नव्हतं.

पाश्चात्य विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वृद्धांचं एकाकी जीवन असतं हे ऐकलं होतं. हा झोपलेला माणूसही भग्न कौटुंबिक जीवनाचा बळी असेल का ? असा विचार माझ्या मनात चमकून गेला.

शहर फिरून रात्री उशिरा हॉटेलवर पोहोचलो. सकाळी ब्रिस्टलला जायचं होतं. पण त्या बागेत झोपलेल्या वृद्धाने माझी झोप उडवली होती, हे मात्र खरे !
क्रमशः

सतीश शिरसाट

— लेखन : प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version