दूरदर्शनचे निवृत्त संचालक, निवृत्तीनंतर ४० मराठी हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारणाऱ्या सदा बहार याकूब सईद यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने “माध्यमभूषण” या लवकरच प्रकाशित होणार असलेल्या पुस्तकातील त्यांची जीवन कहाणी पुढे देत आहे. याकुबजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
भारतात १९९२ पर्यंत दूरदर्शन ही एकमेव दूरचित्रवाणी वाहिनी होती. त्यामुळे घराघरात दूरदर्शन ची प्रचंड क्रेझ होती. सर्वांचे डोळे दूरदर्शन वर खिळलेले असायचे. थोडी जरी काही चूक झाली तरी दूरदर्शन च्या ड्युटी रूम चा फोन खणखणायचा. त्याची चर्चा दुसऱ्या दिवशीच्या सकाळी साडे दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रम बैठकीत व्ह्यायची. त्यामुळे या बैठकीत आपला “पंचनामा” होऊ नये म्हणून सर्व निर्माते, सहायक निर्माते फार दक्षतेने कार्यक्रम निर्मिती करीत असत.
अशा या ताणतणावाच्या परिस्थितीत एक व्यक्ती कधी विचलित होत नसे. ती व्यक्ती म्हणजे त्यावेळी उप संचालक असलेले श्री याकूब सईद साहेब. ते वरिष्ठ अधिकारी असून ही टिपिकल “बॉस” म्हणून न वागता सर्वांशी मित्रत्वाने, आपुलकीने वागायचे, बोलायचे. अडीअडचणी समजून घ्यायचे. त्यामुळे सर्व स्टाफ त्यांना साहेब, सर म्हणायच्या ऐवजी प्रेमाने “याकुबजी” असेच म्हणत असे.

याकूबजींचा ९० वा वाढदिवस गेल्यावर्षी पुणे येथील पूना क्लब मध्ये कुटुंबीय, आप्त आणि दूरदर्शन ची मित्रमंडळी यांच्या समवेत अतिशय अनौपचारिक, उल्हासाच्या वातावरणात साजरा. कुठलीही भाषणबाजी नाही, काही आखीव रेखीव कार्यक्रम नाही तर एकमेकांना भेटणे, बोलणे, गप्पागोष्टी असं सर्व छान स्वरूप होतं. नव्वदीतही माणूस किती, कसा क्रियाशील राहू शकतो हे याकूबजीनी दाखवून दिलं. त्यांच्या कडून हीच प्रेरणा घेऊन आम्ही तिथून निघालो.

याकूबजींचा जन्म १४ जुलै १९३४ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मात्र सहजासहजी झाले नाही. त्यांच्या शाळेसमोर असलेल्या ‘शालिमार फिल्म स्टुडिओ’ मध्ये शाळा शिकून ते काम करत. डब्ल्यू. झेड. अहमद हे त्या स्टुडीओ चे मालक होते. त्या मुळे मोतीलाल, श्यामा, पृथ्वीराज कपूर हे सगळे थोर कलाकार, कृष्णा चन्दर, अली सरदार जाफरी, जोश मलिहाबादी, अख्तुरल इमाम, असे लेखक-कवी तिथे नियमितपणे येत असत. शाळा शिकून काम करतो म्हणून याकुब हा अहमद यांचा आवडता नोकर होता. संध्याकाळी काम करण्याचे आठ आणे किंवा रुपया मिळत असे. हे झाल्यावर रात्री ‘शिरीन’, ‘अपोलो’, ‘ऑडियन’, ‘कॅपिटल’ या थिएटर्सवर चित्रपटांच्या गाण्यांची पुस्तकं ते विकत असत.‘बरसात एक आणा, बरसात एक आणा’ असं करता करता ते एम.ए. झाले.
पुढे याकूब सईद १३ डिसेंबर १९५८ रोजी कार्यक्रम अधिकारी म्हणून पुणे आकाशवाणीत रुजू झाले. दूरदर्शन सुरू करण्याच्या सुमारास त्यांची सेवा आकाशवाणी मधून दूरदर्शन कडे वर्ग करण्यात आली. दिल्ली येथे त्यांनी या नव्या माध्यमाचे रितसर प्रशिक्षण घेतले आणि मुंबई दूरदर्शन केंद्रात ते निर्माते म्हणून रुजू झाले.
२ ऑक्टोबर १९७२ रोजी सुरू झालेल्या दूरदर्शन केंद्राच्या पहिल्या दिवसाची धांदल, गडबड ही त्यांच्या कडून ऐकण्यासारखी असते. त्यांनी सतत बहारदार कार्यक्रमांची निर्मिती केली. बबन प्रभू यांच्या सोबत त्यांनी १९७३ ते ७६ या दरम्यान “हास परिहास” हा अत्यंत विनोदी कार्यक्रम सादर केला. या दोघांच्या भूमिका जुन्या प्रेक्षकांच्या अजून लक्षात आहेत!पुढे बबन प्रभू यांच्या अकाली निधनाने हा कार्यक्रम बंद झाला.
याकूबजी सहायक केंद्र संचालक, उपसंचालक म्हणून प्रशासकाच्या भूमिकेत शिरले. कलकत्ता दूरदर्शन केंद्रातून ते संचालक म्हणून १९९४ साली निवृत्त झाले.
निवृत्तीनंतर याकूबजींची दुसरी इनिंग तर आणखीन जोरदार ठरली. ‘लगे रहो मुन्नाभाई’ पासून चित्रपटात अभिनय करायला सुरुवात करून बघता बघता आजवर हिंदी-मराठी मिळून ४० चित्रपटांत त्यांनी विविधरंगी, आशयपूर्ण भूमिका केल्या. ‘नटरंग’, ‘जॉली एल एल बी -२’ ‘हॅटट्रिक’, ‘कॉर्पोरेट’. या हिंदी तर ‘नटरंग’, ‘अडगूळ मडगूळ’, ‘राक्षस’, ‘सेट्रीका’,’येरे येरे पैसा’,’एकविरा देवी’, ”भानामती” या मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

याकूबजींचे ‘मुंगीची सावली’ हे आत्मचरित्र, ‘हास परिहास’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. याकुबजीना एक मुलगी असून त्या डॉक्टर आहेत. तर नात ही माध्यम क्षेत्रात कार्यरत आहे.

याकूबजींचा ९० वा वाढदिवस गेल्यावर्षी पुणे येथील पूनाक्लब मध्ये कुटुंबीय, आप्त आणि दूरदर्शन ची मित्रमंडळी यांच्या समवेत अतिशय अनौपचारिक, उल्हासाच्या वातावरणात साजरा. कुठलीही भाषणबाजी नाही, काही आखीव रेखीव कार्यक्रम नाही तर एकमेकांना भेटणे, बोलणे, गप्पागोष्टी असं सर्व छान स्वरूप होतं. नव्वदीतही माणूस किती, कसा क्रियाशील राहू शकतो हे याकूबजीनी दाखवून दिलं. त्यांच्या कडून हीच प्रेरणा घेऊन आम्ही तिथून निघालो.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
याकूबजी म्हणजे दूरदर्शनच्या सोनेरी क्षणांमधील पान असच म्हणावं लागेल. याकुबजी दूरदर्शनशी एव्हढे एकरूप झाले होते की दूरदर्शनचा इतिहास पाहता याकुबजींना न ओळखणारी व्यक्ती सापडणं अशक्य आहे. आम्हा कर्मचारी वर्गाला त्यांचा प्रचंड अभिमान आहे. ह्या वयातील त्यांचा उत्साह पाहता ते आम्हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. खुर्ची आली की माज येतो असे अधिकारी पाहिलेत आम्ही पण याकुबजी त्या पलीकडे जाऊन एक मित्र आणि चांगली व्यक्ती होती हेच त्यांच्या सुंदर जीवनाच रहस्य असावं असं मला वाटतं.आम्हाला त्यांच्या कार्याचा सहवास लाभला नाही मात्र आजही त्यांच्या मागून त्यांच्या बद्दल छानच बोललं जातं हाच त्यांनी दूरदर्शनला केलेल्या कार्याचा गौरव आहे 🙏 याकुबजी असेच इतरांना आनंद देत जगा.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏💐💐💐💐
दूरदर्शनचे सेवानिवृत्त संचालक आदरणीय याकूबजी यांना 90 व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ज्येष्ठ अभिनेते, निर्माते म्हणून त्यांनी अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी भुजबळ साहेबानीं एका कार्यक्रमात त्यांची ओळख करून दिली होती. त्यांचे विषयी तपशीलवार कार्याची माहिती वाचून खूप अभिमान आणि आनंद वाटला आहे. त्यांच्या कार्यापासून सर्वांनीच प्रेरणा घेणे अत्यंत आवश्यक आहे असे मला वाटते.. त्यांच्या कार्याची तपशीलवार माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.. पुनश्च एकदा सरोदे परिवारा मार्फत वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..