Friday, January 3, 2025
HomeUncategorized"माध्यम पन्नाशी" - १२

“माध्यम पन्नाशी” – १२

ऐन दिवाळीचे दिवस! आकाशवाणीतून फोन आला. एक बाह्य ध्वनीमुद्रणाचा कार्यक्रम अर्जंट करायचा आहे. स्पेशल फीचर आहे. जमेल तुला करायला ?
आता असे कार्यक्रम करण्यात खूपच रस वाटत होता. दरवेळी नवा अनुभव आणि तो घेण्याची अपार उत्सुकता ! त्यादिवशी चहुकडे दिवाळीचा रंगीबेरंगी माहौल, दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, छान छान कपड्यांतली हसत खेळत मौजमजा करणारी तरुणाई असं आनंदी उत्सवी वातावरण होतं. माझ्या मित्र-मैत्रिणींनीसुद्धा आज दिवाळीच्या गेट-टुगेदरचा मस्त बेत आंखला होता. पण आकाशवाणीतून आलेल्या एका फोनने क्षणांत मी बेत बदलला. मित्र मैत्रिणींच्या गेट-टुगेदरकडे निग्रहाने पाठ फिरवून मी थेट निघाले वरळी इथल्या “नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड” या संस्थेत बाह्यध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमासाठी !
भविष्यात या माध्यमांच्या जगात मनापासून रमायचं असेल, तर आपल्याला प्राधान्यक्रम बदलावाच लागेल ! तशी वेळ आल्यास स्वतःची हौसमौज बाजूला सारून, आंखलेले बेत बदलून, वेळेला अनेक खाजगी प्रसंगांकडे निग्रहाने पाठ फिरवून कार्यक्रमांनाच प्राधान्य द्यावं लागेल अशी अटकळ मी त्या दिवशी मनाशी बांधली. पुढच्या काळांत अशा प्रसंगांची पुनरावृत्ती अनेक वेळा झाली. त्याची जणू नांदीच “नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड” या संस्थेच्या त्या कार्यक्रमाने केली.

एका हातात जड रेकॉर्डर आणि दुसऱ्या हातांत पर्स सावरत मी वरळीच्या “नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड” या संस्थेच्या इमारतीत पाऊल टाकलं. आवार ओलांडून आत जाताच मला अचानक कॅरीडॉरमध्ये माझ्या आजूबाजूला अनेक पांढऱ्या काठ्या दिसू लागल्या. कॅरीडॉर मध्ये बरीच अंध मुलं-मुली घोळक्याने फिरत होती. त्यांना धक्का लागू नये म्हणून स्वतःला सावरत मी पुढे चालू लागले. पण अखेर त्या घोळक्यातून पुढे कसं जावं या विचारांत मी कडेला थांबून राहिले. मला असं थांबलेलं “पाहून” एक अंध मुलगा त्याच्या हातांतली पांढरी काठी ठक ठक वाजवत माझ्या जवळ आला. मला म्हणाला, “दीदी कुठे जायचंय ?” मी म्हटलं, “ऑफिसमध्ये !” काही कळायच्या आंत चाचपडत त्या मुलाने माझा हात धरला. मी दचकले. संकोचले. तो म्हणाला, “चल तुला ऑफिस दाखवतो”. सभोवतालच्या अंध मुलामुलींच्या घोळक्यातून तो सराईतपणे मला ऑफिसच्या दिशेने नेऊ लागला.
त्यावेळी मला स्वतःची लाज वाटली. मनांत आलं, किती निर्व्याजपणे ह्याने माझा हात धरलाय ! त्याला कुठे दिसत होतं माझं वय, रूप, रंग ? त्याने माझा असा हात धरला नसता तर त्याला कसं कळलं असतं मी त्याच्यासोबत चालतेय की नाही ? त्या क्षणी मनांत अनेक नव्या जाणीवा जागृत झाल्या. अंधत्वाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी गवसली आणि मनांत सहज विचार चमकला. खरंच नक्की अंध कोण आहे ? ही मुलं मुली की मी ? ही मुलं दृष्टीहीन असूनही यांची “नजर” स्वच्छ आहे आणि मी बाह्यत: डोळस असूनही माझी “नजर” गढूळलेली आहे. “दृष्टीहीन” ही मुलं नाहीत. “दृष्टीहीन” मी आहे !
त्या मुलाने मला ऑफिसच्या दारांत आणून सोडलं. एकूण धक्क्यातून सावरून त्याला थँक्स म्हणेपर्यंत तो मुलगा घोळक्यात दिसेनासा झाला.
मी ऑफिसमध्ये गेले. संचालकांसोबत कार्यक्रमाची चर्चा केली. त्यांनी एक शिक्षिका माझ्यासोबत दिली आणि अंध मुलांच्या एका गटाकडे पाठवलं.

ती अंध मुलं वेगवेगळ्या मशीन्सवर काम करत होती. अतिशय सराईतपणे! ते पाहून मीच दचकत होते. यांचा हात मशीन मध्ये सापडला, जायबंदी झाला तर ? पण तसं काहीही होत नव्हतं. त्या मुलांशी बोलताना खरं तर मीच चाचपडत होते. अडखळत होते. अवघडून कसेबसे त्यांना प्रश्न विचारत होते. बाह्यचक्षुंनी नव्हे, तर अंत:चक्षुंनी जग पाहणारी ती मुलं, मोकळेपणाने माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होती. मी त्यांना म्हटलं, “या एवढ्या मोठ्या मशीन्सवर काम करताना तुम्हाला काही अडचण येत नाही का ?” माझ्या प्रश्नावर ती मुलं छान हसली. (कदाचित माझ्या लघुदृष्टीला ती हसली असावीत!) म्हणाली, “दीदी मशीनचा असा खट्ट आवाज आला की आम्हाला कळतं आता यामध्ये मटेरियल घालायचं. मशीनचा आवाज हळूहळू कमी होत चालला की आमच्या लक्षात येतं, टाईम अप झालाय. आता मशीन हळूहळू थांबेल. मग तयार माल आम्ही मशीन मधून बाहेर काढतो. मशीन समोर कुठे, कसं, किती अंतरावर उभं राहायचं त्याचेही आमचे अंदाज असतात !”

अंदाज ! किती महत्त्वाचा शब्द ! त्यांची तीव्र ग्रहणशक्ती त्यांना परिस्थितीचं नेमकं आकलन करण्यास सहाय्य करते. धोक्याची घंटा वेळीच वाजवून त्यांना सावध करते. त्यांचा सिक्स्थ सेन्स त्यांना प्रत्येक गोष्टीचा अचूक अंदाज देत असतो. खरंच, उभं आयुष्य अंदाजाच्या पायावर अचूक जगणारी ही माणसं! खरोखर डोळस माणसांचेच त्यांच्या विषयीचे अंदाज खोटे ठरवतात.
मी संस्थेच्या प्रत्येक विभागात फिरत होते. मुलांशी बोलत होते. त्यांच्या शिक्षकांशी चर्चा करत होते. त्या सगळ्यांच्या मुलाखती रेकॉर्ड करत होते. आता मी थोडीशी सावरले होते. सरावलेही होते.
‌एका शिक्षिकेने मला अंध महिलांच्या एका मोठ्या गटाकडे नेऊन सोडलं आणि ती आपल्या कामाला निघून गेली. तिथे सगळ्या अंध मुली. विशीतल्या. माझ्याच वयाच्या. बहुतेक जणी विवाहित. माझ्या मनांत प्रश्नांचं मोहोळ उठलेलं ! या संसार कसा करत असतील ? मुलांना कसं वाढवत असतील ? यांना नवऱ्याची, सासरच्या माणसांची किती मदत घ्यावी लागत असेल ? माझ्या प्रश्नावर सगळ्याजणी एका सुरात हंसल्या. म्हणाल्या, “आम्हाला कोणाचीही मदत घ्यावी लागत नाही. आम्ही घरातली सगळी कामं करतो. बाहेरच्या नळावरून पाणी भरतो. धुणं भांडी करतो. आम्ही स्वयंपाक सुद्धा करतो !” मी आश्चर्याने विचारलं, “तुम्ही गॅस जवळ जाता ? एकट्याने स्वयंपाक करता ?” “त्यात काय अवघड आहे ?” एक चुणचुणीत मुलगी पटकन उत्तरली. त्यांची शिक्षिका म्हणाली, “आम्ही या मुलींना स्वयंपाकाचं रीतसर प्रशिक्षण देतो. आमच्या सूचना बरोबर लक्षांत ठेवून या मुली काम करतात. अगदी गॅसच सिलेंडर कसं बसवायचं त्याचंही प्रशिक्षण आम्ही देतो. गॅस पेटवताना किती अंतरावर उभं राहायचं, गॅसवर भांड कधी आणि कसं ठेवायचं, स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यायची त्याच्या टिप्स आम्ही त्यांना देतो आणि त्या अगदी तसंच वागतात !”

“Practice makes a man perfect !” एक जण उत्साहाने सांगू लागली. तसं एक दोनदा आम्ही चुकतोही! पण हळूहळू अनुभवाने आणि प्रॅक्टिसने आम्हाला सगळी कामं जमू लागतात. साधी गोष्ट ! भाजी फोडणीला घालताना तेलांत जिरे, मोहरी घातली आणि ती तडतडली की आम्हाला कळतं, फोडणी तयार आहे. त्यावर कांदा टाकला की काही वेळाने त्याचा खरपूस वास नाकात जातो. मग कळतं की कांदा परतून झालाय. आता भाजी टाकायची. भाजी कालथ्याने परतताना सुरुवातीला ती जड असते. पण ती शिजत आली की हलकी होते. भाजी शिजत आलेय हे वासावरून आम्हाला बरोबर कळतं !”
मी ह्या मुलींचं वाक्य न वाक्य रेकॉर्ड करत होते. त्यांचे अनुभवाचे बोल होते ते !
आता आणखी एक जण सांगू लागली, “आता तुम्ही म्हणाल भाजी आमटीत हळद, तिखट, मीठ घालायला आम्हाला कसं जमतं ? आम्ही काय करतो ? आम्ही भांड्याच्या साधारण मधोमध एक उभा चमचा ठेवतो. त्याच्या टोकाला धरून मीठ, मसाले भांड्यात हळूहळू सोडतो. मग ते भांड्याच्या नेमके मधोमध पडतात. समजा आम्हाला भजी तळायची आहेत. तर आम्ही काय करतो ? कढईत भजी सोडतो. पण ती कढईतून काढताना झाऱ्याने आम्ही नाही काढू शकत. कारण कढईत भजी नेमकी कुठे तरंगतायत ते आम्हाला दिसत नाही ना ! मग त्यासाठी कढईच्या आतल्या साईजचा स्ट्रेनर आम्ही वापरतो. त्या स्ट्रेनरने एकाच वेळी सगळी भजी बाहेर काढतो. आहे की नाही गंमत !”
तिची “गंमत” ऐकून माझ्याच अंगावर सरसरून काटा आला !

“काम करताना आम्हाला काही मर्यादा जरूर येतात. पण आम्ही छान कल्पना शोधून काढतो. उदाहरणार्थ ; चहा थेट कपात नाही गाळता येत आम्हाला. आमचा अंदाज चुकू शकतो. मग आम्ही काय करतो ? चहा छोट्या भांड्यात गाळतो. त्यातून मग कपात अंदाजाने बरोबर चहा ओततो. कधी कधी कांदे, बटाटे खराब झालेले असतात. वासावरून आम्हाला ते बरोबर कळतं. नुसत्या स्पर्शानेही आम्हाला वस्तू नेमक्या ओळखता येतात. डोळस माणूस दृष्टीनेच सगळ्या गोष्टी करतो. इतर Sensory Organs चा वापर डोळस माणसं करत नाहीत. आम्ही दृष्टीहीन. त्यामुळे आम्ही इतर Sensory Organs चा प्रभावी वापर करतो. नाक, कान, त्वचा यांच्या आधारे आम्हाला सगळ्या गोष्टींचं नेमकं आकलन होतं. बघा ना ! तुम्ही चहा उकळताना थेट पाहता. पण आम्हाला ते दिसत नाही ना ! मग चहा उकळायला लागला की त्याचा विशिष्ट आवाज येतो. तो आवाज आम्ही कानाने टिपतो आणि गॅस बंद करतो.”
प्रत्येक मुलगी कमालीच्या आत्मविश्वासाने बोलत होती. यातल्या बऱ्याचशा मुलींचे नवरेही अंध होते. तरी ते आपल्या बायकांना घरकामात व्यवस्थित मदत करत होते. या जोडप्यांचं कुठेही काहीही अडत नव्हतं. सगळ्या मुली स्वावलंबी होत्या. स्वाभिमानी होत्या. त्यातली एक जण म्हणाली, “दीदी आज दिवाळीचा दिवस! आम्ही दिवाळीचा फराळसुद्धा घरीच करतो. बाजारातून विकतचा फराळ आम्ही आणत नाही.”

मी हादरले.” करंज्या, चकल्या तळणं तुम्हाला जमतं ?”
माझ्या प्रश्नावर त्यांना हसू फुटलं. “सोप्प आहे दीदी ! कढईत तेल टाकलं आणि ते तापलं की वासावरून आम्हाला बरोबर कळतं. मग आम्ही तळण सुरू करतो. तेल किती तापलय, करंजीत सारण किती भरायच ते अंदाजाने आम्हाला कळतं.”
त्या सगळ्या अंध मुली प्रांजळपणे बोलत होत्या आणि मलाच लाज वाटत होती. आपण डोळस असूनही आपल्या हातून वस्तू सांडतात. हात कापतो. भाजतो. भाजी करपते. दूध उतू जातं. या अंध मुली मात्र सराईतपणे सगळं करतायत !
या अंध मुला-मुलींनी जणू माझ्याच डोळ्यांत झणझणीत अंजन घातलं आणि माझी दृष्टी स्वच्छ केली.
आपले सगळे अवयव ठाकठीक असूनही, आपण धडधाकट असूनही आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या उणिवांचं केवढं अवास्तव स्तोम माजवतो !

क्षुद्र दुःखाचं केवढं भांडवल करतो ! या सगळ्या मुला- मुलींनी अंधत्वासारख्या व्यंगावर जिद्दीने मात करून, ते पालांडून केवढी उंच झेप घेतलेय ! शेवटी कर्तृत्वाचे मापदंड व्यक्तीसापेक्ष आणि परिस्थितीनिहाय ठरत असतात, नाही का ? आणखी एक सत्य ठळकपणे मला जाणवलं. यशाचा आणि कर्तृत्वाचा परीघ मोजताना बाह्य दिखाऊ गोष्टींपेक्षा आंतरिक गोष्टी वेगळ्या असू शकतात. अधिक मौलीक असू शकतात. त्या टिपण्यासाठी दृष्टी मात्र मोकळी स्वच्छ असायला हवी आणि ती अंतर्मनाकडे वळवायला हवी.

अंधशाळेच्या या कार्यक्रमाने विशीतल्या अबोध तरुणीचं प्रगल्भतेच्या दिशेने पहिलं पाऊल पडलं होतं.
क्रमशः

माधुरी ताम्हणे

— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मितीचा : ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. या सर्वांचं खूप कौतुक करायला हवं. सर्व गोष्टी या अगदी सहज करतात. तुम्ही हे सर्व खूप छान शब्दबद्ध केलं आहे.

  2. आपल्या अंधत्वावर मोठ्या धैर्याने मात करुन जिद्दीने आयुष्यात पुढे जाणार्‍या अंध मुला मुलींचा हा प्रकाशमय जीवन प्रवास थक्क करणारा आणि त्या मुलांकडून बरेच काही शिकण्यासारखा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pratibha Saraph on नव वर्ष ..
आशी नाईक on कवी
विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !