काही तांत्रिक अडचणीमुळे, मागचा भाग अर्धवट प्रसिद्ध झाला होता. म्हणून आता पूर्ण भाग पुढे देत आहे.
– संपादक
सुहासिनी मुळगावकरांची मुलाखत माहेर मे १९८१ च्या अंकात छापून आली आणि “अनोळखी पाऊलवाटा” या दीर्घकाळ चालणाऱ्या सदराचा शुभारंभ झाला. ज्या अंकात मुलाखत छापून आली तो अंक त्यांना देण्यासाठी मी दूरदर्शनच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेले. सुहासिनीबाईंनी माझ्यासमोरच मुलाखत वाचली. त्यांना ती खूप आवडली. एक-दोन सूचनाही त्यांनी परखडपणे केल्या. मी जायला उठले तसं पुनश्च मला बसवत त्या म्हणाल्या, “पुढच्या अंकात कोणाची मुलाखत घेत आहेस तू ?”
“अजून नक्की ठरलं नाही पण ——-“
”मी नुकतीच लष्करी अधिकारी नीला पंडित यांची मुलाखत ‘सुंदर माझं घर ‘मध्ये घेतली आहे. सैन्यातील त्या पहिल्या फळीतील अधिकारी ! त्यांचे अनुभव अतिशय रोमहर्षक आहेत. मी त्यांचा फोन नंबर देते तुला. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना माझा रेफरन्स दे. देतील तुला त्या मुलाखत !”
मी अक्षरशः खुर्चीत खिळून बसले. माझ्या डोळ्यांसमोर एक दोन नांवं होती. पण मी अद्याप कोणाशीच संपर्क साधला नव्हता. कालच पुढच्या मुलाखतीची विचारणा करणारं बेहेरे साहेबांचं पत्र आलं होतं. त्यांना काय उत्तर द्यावं या विचारात असतानाच सुहासिनीबाईंनी लष्करी अधिकारी नीला पंडित यांचे नांव सुचवले.
परीटघडी कडक शिस्तीच्या सुहासिनीबाई मनाने किती उमद्या आहेत ते जाणवलं आणि त्यांच्या विद्वत्तेविषयी मला असलेला आदर आता द्विगुणीत झाला.
नीला पंडितांची मुलाखत छापून आली. कृतज्ञ भावनेने सुहासिनी बाईंना अंक देण्यासाठी मी दूरदर्शनला गेले. सुहासिनीबाईंना माझी ही कृती मनापासून आवडली. त्यांनी तसं बोलून दाखवलं .आता त्यांचा माझ्याशी बोलण्याचा स्वर आणि सूर थोडा मवाळ आणि ऋजु झाला होता.
त्या स्वतःहून मला म्हणाल्या, आकाशवाणी दूरदर्शन ही दोन वेगळी माध्यमं आहेत. रेडिओला तुमचा फक्त आवाज कळतो. तुम्ही दिसत नाही. आम्हाला ते ही ध्यानात घ्यावं लागतं. मी असं म्हणत नाही की आम्हाला त्रिभुवनसुंदरी मिळायला हव्यात. तुमच्या ज्ञानाचं जे तेज असतं ते तुमच्या चेहऱ्यावर येतच. पण नाक, डोळे जरा तरी बरे नको ? म्हणूनच मी नेहमी म्हणते, आकाशवाणीत कार्यक्रम करणं निराळं आणि दूरदर्शनसाठी कार्यक्रम करणं निराळं ! कॅमेराची एक लेन्स समोर येते आणि बाकी स्टुडिओ रिकामा. लाखो न दिसणारे लोकं आपल्याला बघत आहेत. हा जो एक जबरदस्त तणाव मनावर येतो तो झेलणं सोपं नाही. तिथेच तुमच्या आत्मविश्वासाची खरी कसोटी लागते. मी जे मघाशी तुला म्हणाले की आत्मविश्वास ही फार मोठी गोष्ट आहे. मोलाची गोष्ट आहे.मी गाणाऱ्या लोकांना नेहमी सांगत असते की तुम्ही सात सूर आळवताना एक आठवा सूर महत्त्वाचा असतो. आत्मविश्वास हा पहिला सूर आणि तिथून सप्तक सुरू करा. सा रे ग म प ध नी सा. कोणत्याही गोष्टीत शब्द, वाङ्ममय, कला सर्वच प्रांतात हा स्वर पहिला ! मग बाकी सर्व. आत्मविश्वास विलक्षण महत्त्वाचा आणि तो आत्मविश्वास ज्ञानाने येतो. त्यासाठी त्या ज्ञानाची प्रचंड उपासना तेवढ्याच निष्ठेने करावी लागते. तेवढी तपश्चर्या तुम्ही केलेली असली, ते ज्ञान मिळवलेलं असलं की तुम्हाला त्याची परिपूर्ण माहिती असते. शहाण्या माणसाला ठाऊक असतं एवढ्या निष्ठेने आणि कष्टाने आपण जी विद्या मिळवलेली आहे ती खोटी नाही.
मी अत्यंत भक्तिभावाने त्यांच्या विचारांची अमृतधारा जणू प्राशन करत होते. किती खरे विचार होते त्यांचे! हे विचार आत्मसात केले, तर यशाच ध्येय गाठणं बिलकुल अवघड नाही. पण तशी संधी तर मिळायला हवी! आणि ती सहजगत्या मिळत नसेल तर खेचून आणायला हवी.
मी आजूबाजूला नजर टाकली. चार-पाच निर्मात्यांच्या त्या प्रशस्त दालनात फक्त मी आणि सुहासिनीबाई दोघीच जणी होतो. मी हळूच म्हटलं, “बाई ‘सुंदर माझं घर ‘ मध्ये मला निवेदनाची संधी द्याल का ?”
बाई क्षणभर गप्प बसल्या. मग उसासा सोडत त्यांच्या स्टाईल मध्ये उतरल्या, “अगं माझ्या ‘सुंदर माझं घर’ कार्यक्रमातल्या सगळ्या संचालिका पस्तीशीच्या गृहिणी आहेत. तू विशीतली तरुण मुलगी. तू ‘सुंदर माझं घर’ ऐवजी तरुणांच्या कार्यक्रमासाठी प्रयत्न कर ना !”
सुहासिनीबाईंनी विषय आवरता घेतला. त्यांचा स्पष्ट नकार हसऱ्या मुद्रेने स्वीकारत खट्टू मनाने मी त्यांच्या खोलीच्या बाहेर पडले. बाहेर निघण्याच्या वाटेवरील एका खोलीच्या दारावर युवकांच्या कार्यक्रमाचा आणि त्या कार्यक्रमाच्या निर्मात्यांचा बोर्ड होता. मी बेधडक आंत घुसले. आंत एक निर्माता बसले होते. त्यांना भेटले. त्यांनी माझा अनुभव ऐकून घेतला आणि म्हणाले, “आकाशवाणीसाठी लिहितेस ना ? मग माझ्या एका कार्यक्रमातल्या डॉक्युमेंटरीसाठी तू स्क्रिप्ट लिही. ते कसं लिहायचं ते मी तुला सांगेनच !”
माझा चेहरा फुलला. निवेदन नाही मिळालं तरी स्क्रिप्ट रायटर म्हणून या क्षेत्रात चंचू प्रवेश तर झाला ! स्क्रिप्ट आवडलं तर कदाचित पुढे निवेदनाचं काम सुद्धा नक्की मिळेल ! आपण जीव ओतून प्रयत्न करायला हवा.
मी दूरदर्शनसाठी कसं लिहायचं ते त्यांच्याकडून समजून घेतलं. दुसऱ्या दिवशी त्यांच्या भेटीला गेले. मी लिहिलेल्या स्क्रिप्ट मध्ये त्यांनी थोड्या दुरुस्त सुचवल्या आणि कॉन्ट्रॅक्टवर माझी सही घेतली.
दूरदर्शनच्या अशा अनेक कॉन्ट्रॅक्टवर पुढे आपल्याला सह्या करायच्या आहेत असा एक अवखळ विचार मनांत चमकून गेला. मी निघाले. तेवढ्यात निर्माते महाशय म्हणाले, “आपल्याला कधी कधी बाहेर हॉटेलमध्ये जाऊनही कार्यक्रमांची चर्चा करावी लागेल बरं का ! पुढच्या कार्यक्रमांचा तपशील मी लवकरच तुला कळवेन !”
माझे कान ताठ झाले. डोक्यात घंटा वाजली. आईची आठवण झाली. आकाशवाणीच्या कार्यक्रमांची परवानगी देताना आई नाराज होती. आपली तरणीताठी मुलगी या मोहमयी दुनियेत हरवेल की काय या शंकेने ती धास्तावली होती. त्यावेळी मी तिला म्हटलं होतं, “आई माध्यमातील हे कार्यक्रम माझी रोजी रोटी नाही. त्यावर आर्थिक दृष्ट्या आपण अवलंबून नाही आणि ग्लॅमरच्या मागे लागून नको त्या तडजोडी करण्यात मला स्वतःला स्वारस्य नाही. तेव्हा तू नि:शंकपणे मला परवानगी दे. तू दिलेल्या स्वातंत्र्याचा मी मुळीच गैरफायदा घेणार नाही याची खात्री बाळग.”
मला आईला दिलेल्या वचनाची आठवण झाली. निर्मात्याच्या सूचनेतला गर्भित अर्थ मी जाणला होता. या वाटेने कधीही जायचं नाही हा निश्चय पक्का होता. तेव्हा पहिलं स्क्रिप्ट रायटिंग चं काम पूर्ण झाल्यावर अत्यंत जड अंत:करणाने मी दूरदर्शनचा निरोप घेतला. क्षमता आणि प्रामाणिक कष्टांची तयारी असूनही आपल्याला पुढच्या संधीकडे पाठ फिरवावी लागते या विषादाने मन काठोकाठ भरून आलं होतं. व्यवहारी दुनियेतील अवाजवी अपेक्षांमुळे अन्यायाला बळी पडावं लागतय याचा संताप मनात दाटून आला होता. दूरदर्शनच्या त्या गेटमधून बाहेर पडताना पाय जडशीळ झाले होते. पण मन प्रक्षुब्ध झालं असलं तरी शांत होतं. शॉर्टकट घेण्याच्या निर्णयापासून मी स्वतःला सावरलं होतं. सांभाळलं होतं. ज्या संस्कारांची मनाच्या मातीत आई-वडिलांनी रुजवण केली होती, त्या संस्कारांशी मी इमान राखलं होतं या विचारांनी मन खूप शांत झालं होतं.
आता आकाशवाणी आणि लिखाण यावरच लक्ष केंद्रित करायचं असा निश्चय करून मी कामाला लागले. महिना उलटतो नाही तोच सु.मुळगावकर अशी लफ्फेदार सही असलेले एक पोस्ट कार्ड माझ्या पत्त्यावर आलं. त्यावर फक्त दोन शब्द “भेटून जा !”
मी काहीशा संभ्रमित अवस्थेत सुवासिनीबाईं समोर जाऊन बसले. आता ह्यांनी कशासाठी बोलावलं असेल ? निवेदनाची संधी तर त्या देणार नाहीत असं स्पष्टपणे सांगितलय त्यांनी ! मग कोणत काम असेल ?
सुहासिनी बाईंनी त्यांच्या समोरील काम संपवलं आणि त्या माझ्याकडे वळल्या. म्हणाल्या, “अगं सचिवालयातल्या काही मुली भारतातल्या अत्यंत दुर्गम प्रदेशात एकट्या दुकट्या फिरायला जातात. (त्यावेळी लेडीज स्पेशल टूर्सची संकल्पना नव्हती) त्या ग्रुपमधील मुलींच्या भ्रमंतीच्या अनुभवांवर मी एक कार्यक्रम करणार आहे. तो ग्रुप तरुण मुलींचा आहे म्हणून मी ठरवलं की त्या कार्यक्रमात संचालिका म्हणून तुलाच बोलवावं”.
मी अवाक् झाले. शरद जांभेकर म्हणाले होते, “बाई गुणग्राहक आहेत. त्यांना योग्य वाटलं तर कोणत्याही ओळखीदेखी शिवाय त्या संधी देतात. खरंच त्या मुलाखतीत बोलल्या होत्याच की मी नेहमी नव्या संचालिकांना संधी देते. गुणग्राहकता हेही निर्मात्याच एक लक्षण आहे. त्यांनी नवे नवे कलाकार शोधलेच पाहिजेत”
पण एखादा नवा कलाकार अयशस्वी ठरला तर ? यावर बाईंनी दिलेलं उत्तर मासलेवाईक होतं. त्या म्हणाल्या होत्या, “मी नव्या संचालिकेला स्पष्ट सांगते की तू प्रथम कार्यक्रमात भाग घेऊन बघ. तू कशी बघतेस, तू कॅमेऱ्याला कशी दिसतेस, कॅमेराला तू किती आत्मविश्वासाने आणि कसं सामोरं जातेस, इतरांशी खेळीमेळीने बोलून तू कार्यक्रम कसा फुलवतेस हे मी आधी पाहते. मग मला वाटलं की बुवा ठीक आहे. या बाई मध्ये टॅलेंट आहेत. तर मग मी तिला निवेदन देते आणि पहिल्याच वेळेला निवेदन यशस्वी होईल असं काही नाही. कारण कॅमेरा फ्राईट ही फार मोठी गोष्ट आहे”.
त्यामुळे बाईंनी जरी कार्यक्रम दिला असला तरी तो त्यांच्या पसंतीस उतरला पाहिजे असा मी मनाशी निश्चय केला. आता त्यांचे कार्यक्रम मी अधिक बारकाईने पाहू लागले. त्यांचा अभ्यास करू लागले. एक मनाशी नक्की केलं होतं की काहीही झालं तरी त्यांची हुबेहूब नक्कल करायची नाही. आपलं स्वतंत्र अस्तित्व व कलात्मकता आपल्या कार्यक्रमातून दिसली पाहिजे. जाणवली पाहिजे. या संधीचं सोनं केलं पाहिजे. त्यासाठी या फिरस्त्या मुलींची मुलाखत थोडी हटके वेगळी व्हायला हवी. मी मनातल्या मनात प्रश्नांची जुळणी करत होते आणि त्यांच्याकडून काही वेगळी माहिती मिळावी असा प्रयत्नही करत होते. मध्यंतरी सचिवालयाच्या कॅन्टीनमध्ये सर्वांशी अनौपचारिक गप्पा ही मारून आले. त्या गप्पांमध्ये मी त्यांना हे आवर्जून सुचवलं की प्रश्न आणि उत्तर असा साचेबद्ध कार्यक्रम न करता आपण सगळ्याजणी मस्त गप्पा मारूया. कार्यक्रम फिरता ठेवूया. म्हणजे तो रटाळ आणि एकसूरी होणार नाही. आकाशवाणीचा अनुभव गाठीशी असल्यामुळे आणि या मुली स्वतंत्रपणे फिरणाऱ्या बहुश्रुत असल्यामुळे त्या मोकळेपणाने बोलतील याची खात्री होती.
लवकरच “सुंदर माझं घर” मध्ये हा पहिला कार्यक्रम सादर झाला. आता प्रतीक्षा होती प्रतिसादाची !
प्रेक्षकांनी माझ्या कार्यक्रमाची खूप प्रशंसा केली. पण त्यापेक्षा एक मोठी गोष्ट घडली. त्यावेळी महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात श्री. श्याम तारे हे साप्ताहिकी सदरा अंतर्गत आठवडाभरातील दूरदर्शनवरील कार्यक्रमांवर परीक्षण लिहीत असत. त्या आठवड्यात साप्ताहिकी मध्ये “सुंदर माझं घर” मधील या कार्यक्रमावर त्यांनी लिहिलं होतं, “बीबीसीच्या तोडीचा कार्यक्रम!” त्यांची ही पोचपावती वाचून माझं मन हवेत तरंगायला लागलं. आता आपण “सुंदर माझं घर” च्या रितसर संचालिका होणार अशी स्वप्न दिवसाढवळ्या पडू लागली. पण म्हणतात ना घी देखा बडगा नही देखा त्यातली गत !
या कार्यक्रमानंतर सुहासिनीबाईंना भेटायला मी दूरदर्शनला गेले. मोठ्या खुशीत त्यांच्यासमोर जाऊन बसले. सुमारे अर्धा तास बाईंनी मान वर करून माझ्याकडे पाहिलंही नाही. अर्ध्या तासाने त्यांनी खाडकन टेबलाचा ड्रॉवर उघडला आणि पत्रांचा एक मोठा गठ्ठा माझ्या दिशेने टेबलावर भिरकावला. तीव्र स्वरात त्या बोलल्या, “ही सगळी स्पॉन्सर्ड लेटर्स आहेत. तू दुसऱ्यांकडून लिहून घेतलेली आणि महाराष्ट्र टाइम्स मधलं ते परीक्षण सुद्धा तू लिहून घेतलंय. महाराष्ट्र टाइम्स मध्ये तू लेख लिहितेस ना ! त्या ओळखीवर असं परीक्षण तू लिहून घेतल आहेस.”
मला धक्काच बसला. क्षणभर काय बोलावं कळेना. डोळे पाण्याने भरून आले. आपण यातलं काहीही न करता केवढा अन्याय होतोय आपल्यावर ! पण म्हणतात ना कर नाही तर डर कशाला ? मी ताडकन उभी राहिले. सुहासिनी बाईंच्या डोळ्यांना डोळा भिडवला आणि थेट म्हटलं, “माफ करा बाई पण मी या दोन्ही गोष्टी केलेल्या नाहीत आणि करणारही नाही.”
ताड ताड पावलं टाकत मी त्यांच्या खोली बाहेर पडले.
दूरदर्शनच्या चौकी बाहेर भर रस्त्यात उभ राहून मी ढसाढसा रडत होते. दूरदर्शनची संचालिका बनण्याचं माझं स्वप्न माझ्या डोळ्यां देखत चक्काचूर झालं होतं.
क्रमशः
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2024/11/Screenshot_20241121-1600422-1.png)
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
ह्या भागातून सुवासिनीबाई मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे,स्वभावाचे विविध पैलू निदर्शनास आले.विविध माध्यमांतून आलेल्या निरनिराळ्या अनुभवांतून तुम्हाला खूप काही शिकता तर आलेच पण त्याबरोबर काही वेळा तुम्ही सावधपणे निर्णयही घेतलेत हे प्रशंसनीय आहे.
खूप छान लिहिलं आहे. हे सर्व आपल्या डोळयांसमोर घडलं आहे असंच वाटलं.
Madhuri, khup khup sunder. Tu khup chaan lihites. You write very lively. I love it. It’s a treat reading your writings. All the best to you.