Friday, December 27, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ६४

मी वाचलेलं पुस्तक : ६४

‘स्वप्न पहा उघड्या डोळ्यांनी’ !

पुस्तकाच्या शोधात यावेळी भारतीय उद्योगाच्या क्षेत्रात चैतन्याचे प्रतिक असलेल्या राॅनी स्क्रूवाला यांचे “स्वप्न पहा.. उघड्या डोळ्यांनी” हे पुस्तक हाती आले. यु टीव्ही’चे जनक म्हणून त्यांची ओझरती माहिती होती.त्यामुळे उत्सुकतेपोटी मी हे पुस्तक वाचून काढलं.मुळ इंग्रजीतील २०१५-१६ मधील या पुस्तकाचा मराठी अनुवाद धनश्री बेडेकर यांनी केला आहे.

सर्वात प्रथम म्हणजे मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्ती म्हणून राॅनी स्क्रूवाला जगाला परिचित आहेत. त्यांनी केलेला उद्योजकतेचा २५ वर्षांचा प्रवास प्रथम आपण जाणून घेऊ या. १९८० दशकाच्या सुरुवातीला भारतात त्यांनी प्रथम केबल टीव्ही च्या व्यवसायाचा श्री गणेशा केला. तो त्यांचा उद्योग क्षेत्रातील पहिला ठोस प्रयत्न होता. त्यानंतर काही काळानंतर टूथब्रश तयार करण्याच्या उद्योगात अचानक पाऊल ठेवलं. छंद म्हणून नाटक आणि मनोरंजन उद्योगात ते ओढले गेले. १९९० च्या सुरुवातीला त्यांनी यूटीव्ही वाहिनीचा प्रारंभ केला. विविध वाहिन्यांसाठी टीव्ही कार्यक्रम तयार करण्यापुरतीच त्यांची यामागे कल्पना होती. याच बरोबर राॅनी यांनी विविध कंपन्यांसाठी यूटीव्ही उद्योगातर्फे जाहिरातपट, माहितीपट तयार करण्यापर्यंतच्या सर्व कामांचा समावेश होता. या खेरीज मनोरंजक कार्यक्रमही ते तयार करायला लागले.

नव्वदच्या मध्यावर त्यांनी आपल्या व्यवसायाचे मॉडेल बदलले. व्यवसायाच्या विस्तारासाठी अधिक भांडवलाची गरज होती म्हणून त्यांनी रूपर्ट मर्डाक यांच्याशी करार केला.नंतर तीनचार जागतिक स्तरावरील कंपन्यांशी करार केले. २००० च्या प्रारंभी राॅनी स्क्रूवाला यांनी टीव्हीचे कार्यक्रम सुरू करण्यासाठी आग्नेय आशियात विशेषतः सिंगापूर आणि मलेशियामध्ये यू टीव्हीचा विस्तार केला. तिथे एक वाहिनी सुरू केली. अमेरिकेतील सॅम वाॅल्टन आणि वाॅलमार्ट तसेच होमशाॅपिंग नेटवर्क HSN आणि QVC या वाहिन्यांची स्फूर्ती घेऊन ‘होम शाॅपिंग’ आणि ‘टीव्हीवर जसे पाहिले तसे’चा भारतात पाया घातला. विजय टीव्ही ही दक्षिण भारतातील तामिळ वाहिनी खरेदी केली. नंतर स्टार टीव्हीवर भागीदारी करून संयुक्तपणे चारही दक्षिण भारतीय भाषांमधून प्रसारण करण्याचा प्रयत्न केला. २००६ पर्यंत त्यांनी उंच भरारी घेण्याचे ठरवून ब्राॅडकास्ट टेलिव्हिजन नेटवर्क, चित्रपट स्टुडिओ, आणि अंतिमतः गेम्स आणि मोबाईल या क्षेत्रात विस्तार केला. मुलांसाठी ‘हंगामा’ वाहिनी आणि युवा साठी ‘बिंदास’ वाहिनी सुरू केली. त्याचबरोबर तीन चित्रपट वाहिन्याही त्यांनी सुरू केल्या. ‘चलते चलते’ ‘स्वदेश’ ‘लक्ष्य’आणि ‘रंग दे बसंती ‘चित्रपट निर्माण केले. नंतरच्या दशकात साठाहून अधिक चित्रपटांची निर्मिती, वितरण, आणि सहनिर्मिती केली.

राॅनी स्क्रूवाला यांनी सगळ्याच गोष्टींची पायाभरणी पासून सुरुवात करुन स्वबळावर उभारणी केली. त्यांच्या कार्याचा परिचय मुद्दामहून बराच मोठा झाला असला तरी त्यांचे गेल्या २५ वर्षातील उद्योगातील यश, अपयश, विविध अनुभव यातून तरुण उद्योजकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून आता या पुस्तकात नेमके त्यांनी काय सांगितले आहे हे आपण थोडक्यात पाहू या !

उद्योजकता हा एक प्रवास आहे, उगाच गंमत म्हणून करायची गोष्ट नव्हे. “मी ही गोष्ट दोन वर्ष करून बघतो” मग बघू, असे म्हणून चालत नाही. स्वतः ठरलेल्या अटीवर स्वतः आयुष्य जगणं म्हणजे उद्योजकता. मोठे स्वप्न पहा, आणि ते पाहताना आपले डोळे उघडे ठेवा !

तुम्ही जेव्हा शून्यातून सुरुवात करता तेव्हा तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नसतं. जेव्हा तुम्ही नवखे असता तेव्हा अनेक आव्हान असतात, पण तुम्ही आधी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देण्यासाठी कधी कधी लोकांची पर्वा न करता तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील, यातून जास्तीत जास्त वाईट काय होईल तर लोक तुम्हाला ‘नाही’ म्हणतील. तेंव्हा तुमची अढळ इच्छाशक्ती आपल्या ध्येयावर केंद्रित करता, त्यावेळी मनात निर्माण झालेली भीती, असुरक्षितता, खोट्या नाट्यशंका तुमच्या स्वप्नांच्या आड येत नाहीत. तुम्ही तसं घडू देऊ नका. संधी आली आहे तर चला, पुढे व्हा !

तुमच्या मनात हेतू आणि ध्येय स्पष्ट असेल, आणि तुमच्या मनाजोग्या गोष्टी घडत असतील तर कुठल्याही चर्चेत तुम्ही उत्तम नियंत्रण राखू शकता. ‘कम्युनिकेशन’ हा यशाच्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे, यामुळे पारदर्शक मनमोकळी आणि कुठल्याही प्रकारची उच्चनीचता नसलेल्या संस्कृतीची स्थापना होत असते. त्याला खुल्या मनाने प्रतिसाद द्या‌. आपल्या रोजच्या कार्यक्रमांच्या बाबतीतलं अद्यावत ज्ञान मिळवा. चांगल्या कल्पना सगळीकडेच असतात आणि तुम्हाला कुठली संधी कधी मिळेल हे काही सांगता येत नाही. अशी संधी मिळाल्यास तिच्यावर ‘झडप’ टाका.’!

आपणाला प्रोत्साहन देणारी, तुम्हाला आव्हान देणारी, तुमच्या कौशल्यांना एक दिशा देणारी टीम तयार करा. त्या टीमला वेळीच तुमच्या महत्त्वाकांक्षेत सहभागी करून घ्या. कोणत्याही उद्योजकाला आपला स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी कच्चामाल हा त्याच्या अंतरंगातूनच येत असतो हे लक्षात घ्या. प्रगतीच्या संधी शोधून काढा, कठोर परिश्रम, उत्तम तयारी, नियोजन, आणि दुर्दम्य इच्छा यांच्यासाठी सज्ज व्हा !

काही गोष्टी चुकीच्या झाल्यामुळे ज्याप्रमाणे अपयश येते, त्याप्रमाणे संधी हुकल्या, अंदाज चुकला, निर्णय लांबणीवर टाकले, तरी तेही अपयशच असतं ! अपयशाकडे एक तडाखा किंवा फटका म्हणून पहा ! अपयशा शी दोन हात केल्यानंतर मनाला दिलासा मिळाला पाहिजे, त्यामुळे अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करा, परंतु मोडून पडू नका ! काहीही झाले तरी अपयश हा स्वल्पविराम असतो. तो कधीच पूर्णविराम नसतो. आत्मविश्वासाने, दृढनिश्चयाने, चिकाटीने त्यावर मात करून यशस्वी व्हा !

राॅनीच्या आयुष्याच्या त्या वळणावर चोखंदळ राहण्याची चैन त्यांना परवडणारी असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या डावात एकदम हटके आणि आयुष्य बदलून टाकणारे परिणाम करणारं काहीतरी करायचं होतं. त्यांच्या स्वदेश फाउंडेशनची तीव्र बांधिलकी होतीच.. त्याशिवाय ते इतर आघाड्यांवर काम करीत होते. त्यांनी दुसऱ्या डावात ‘कबड्डी’ या खेळाकडे लक्ष वळविले. सर्वच दक्षिण आशियाई देशांमध्ये कबड्डी हा प्राचीन खेळ माहिती आहे. गेल्या शतकापासून सर्वच स्थानिक क्लब मध्ये तो खेळला जात आहे. परंतु हा खेळ उपेक्षित राहिला. आणि त्याला त्याचे योग्य स्थान ही मिळालेले नाही. हा खेळ कमी वेळाचा, जलद गतीचा, आणि जोश पूर्ण असल्यामुळे टीव्हीवरून त्याचं प्रक्षेपण करण्याचं त्यांनी ठरवलं. ‘त्यांच्या नवीन क्रीडा विभागासाठी ‘यूस्पोर्ट’ नावाची निवड केली आणि महिंद्रा ग्रुपच्या आनंद महिंद्रा यांच्याबरोबर त्यांनी खेळाच्या दुनियेत सुरुवात केली. आठ संघ आणि त्यांचे आठ मालक, लीगचे प्रवर्तक, आणि ‘स्टार टीव्हशी करार करून या वाहिनीवर या प्राचीन खेळावर राष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोत टाकला. देशाच्या गल्ली गल्लीत हा खेळ खेळला जावा आणि पुढच्या पिढीने आपणहून खेळ स्वीकारावा हा त्यामागचा त्यांचा हेतू होता. दोन महिन्याच्या अल्पकाळात कबड्डी विषयी राष्ट्रीय पातळीवर उत्सुकता निर्माण झाली. आणि तो भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ बनला. ज्यावेळी एवढी गंमत असलेलं काहीतरी आपण हाती घेता आणि त्याचा व्यवसाय करता त्यावेळी उद्योजकतेचे चित्रवलय पूर्ण होत असतं असंही त्यांनी नमूद केलं आहे.

राॅनी स्क्रूवाला यांनी या २७८ पानांच्या पुस्तकात अनेक बारीकसारीक तपशील, आठवणी, व्यावसायिक प्रवास, गमतीजमतीचा, द्राविड प्राणायामाच्या, ब-याचवेळा निराशाप्रद आणि कांहीं बेभान पणाच्या, सतत आव्हानात्मक आठवणी प्रामाणिकपणे, सचोटीने सांगितल्या आहेत. त्या सर्व पुस्तकातच वाचलेल्या चांगल्या! मी मात्र त्यांचे प्रदिर्घ उपायांची माहिती विस्तारभया पोटी अति संक्षेपाने वर दिली आहे. त्यांनी उद्योजकाची विचारधारा आणि त्यांचे अनुभव यांचे तसेच यश-अपयश यांचे या पुस्तकात स्पष्ट शैलीत वर्णन केले आहे. त्यामुळे टोकाच्या संकटातही परिस्थितीशी दोन हात कसे करायचे आणि आपले स्वप्न विझू द्यायचे नाही याची प्रेरणा देणारे हे पुस्तक ‘हे शक्य आहे’ या मानसिकतेचे आहे. ‘मी हे केलं’ हे सांगणारे पुस्तक तर मुळीच नाही. सगळे काही ‘शक्य’ आहे फक्त स्वप्न पहा, जेव्हा स्वप्न पहाल तेव्हा ते स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पहा ! आपली महत्त्वाकांक्षा वाढवेल आणि अधिक मोठा विचार करायला भाग पाडेल असे याचे एकूण स्वरूप आहे.या क्षेत्रातील वेगाने बदलत असलेल्या घडामोडींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. उद्याच्या भारतात असलेल्या उद्योजकतेच्या ठोस भूमिकेचे ते समर्थन करतात जर तुमच्याकडे व्यवसायाची एखादी अद्भुत कल्पना असेल तर हे पुस्तक आपल्यासाठीच आहे. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या पुस्तकाची प्रशंसा केली असून “भारतातील तरुणांना आपल्या स्वप्नांचा वेध घेण्यास प्रेरणा मिळेल आणि भारतीय लोकांच्या आयुष्य उभारणी करण्यासाठी ते अधिक चांगल्या नाविन्यपूर्ण पद्धती शोधून काढतील” अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. याबरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी “राॅनी हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत.ऊर्जा, उमेद, उत्कट इच्छा आणि जोखीम पत्करण्याची त्यांची क्षमता, याबद्दल आपण त्यांचे नेहमीच कौतुक करतो. या पुस्तकातून नवीन पिढीच्या उद्योजकांना बरेच काही शिकता येईल आणि त्यांना त्यापासून स्फूर्ती मिळेल त्या दृष्टीने हे पुस्तक म्हणजे नव्या दमाच्या उद्योजकांच्या पिढीची मार्गदर्शक पुस्तिका आहे असे म्हटले आहे या पुस्तकात रतन टाटा, नंदन नीलकेणी, जेम्स मर्डोक आणि इतर अनेक नामवंत आतंरराष्ट्रीय उद्योगपतींचे अभिप्राय देखील यात आहेत. इतकच नव्हे तर उद्योजकांना भेडसावणाऱ्या १७ प्रश्नांची प्रदीर्घ उत्तरे राॅनी यांनी एका परिशिष्टात दिली आहेत. यातच या पुस्तकाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आणि महत्त्व लक्षात येते. यात तीळमात्र शंका नाही. नव्या पिढीतील उद्योजकांना तर हे पुस्तक फारच उपयोगी आणि मौल्यवान मार्गदर्शक आहे.

या पुस्तकाच्या संदर्भात मला एका गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की आपल्या सेवानिवृत्ती नंतर माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी ज्याप्रमाणे “उघड्या डोळ्यांनी स्वप्न” पाहून भारतासह सुमारे ९० हून अधिक देशातून आपली ‘न्युज स्टोरी टुडे’ ही माध्यम क्षेत्रातील सर्व सामाजिक, साहित्य- सांस्कृतिक विश्वातील पोर्टल वाहिनी चार वर्षांपासून अखंडपणे सुरू केली आहे. अनेक विषयांवर त्यांनी अनुबोधपटांची निर्मिती केली आहे आणि अलीकडेच पुस्तक प्रकाशनाचे एक नवीन दालन उभे केले आहे. ते सर्व पाहून असे वाटते की त्यांनी यापूर्वीच या पुस्तकाचा मागोवा घेऊन आपला नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे ‘की काय” असे मला तरी म्हणावेसे वाटते. त्यांचा स्फूर्तीदायक आदर्श नव्या पिढीने राॅनी स्क्रूवाला यांच्या प्रमाणेच घेतला पाहिजे.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 986984800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सुधाकर तोरणे यांचे प्रत्येक लेख (पुस्तक परिक्षण) हा माहितीपूर्ण आणि वाचनीय असतो.
    स्क्रूवाला ह्यांच्या स्वप्न पहा उघड्या डोळ्यांनी हे पुस्तक वाचनीय आणि मार्गदर्शक.
    मनोरंजन,माध्यमे आणि उद्योजकता अशा क्षेत्रांत चौफेर कामगिरी करणारे स्क्रूवाला यांचे जीवन हे सर्वसामान्य माणसासाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.तोरणे यांनी हे विचारधन या तशाच उत्तम
    पोर्टलच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९