Wednesday, January 15, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : 36

मी वाचलेलं पुस्तक : 36

न पाठवलेलं पत्र

अनेक पुस्तकातून यावेळी मी ‘न पाठविलेलं पत्र’ या २०१३ साली प्रकाशित झालेल्या ‘Unposted Letter’ या ‘द व्हाॅइस रा’ यांच्या मराठीत अनुवादित झालेलं पुस्तक निवडलं. हेमलता अंतरकर यांनी या पुस्तकाचा छानपैकी अनुवाद केला आहे. संपूर्ण पुस्तक वाचल्याचा आणि त्यातील मार्गदर्शनाचा मला जो अद्वितीय आनंद आणि समाधान झाले त्याची तुलना करता येणार नाही.

प्रथम या गुरूस्थानी असलेल्या व त्यांच्या नावाचा परिचय मी सुरूवातीलाच करून देत आहे. लेखक ‘द व्हाॅइस रा’ म्हणजे पूर्वाश्रमीचे टी.टी.रंगराजन आणि ‘अल्मा मेटर’चे संस्थापक. त्यांनी लाखो लोकांच्या आयुष्यात महत्वाचे साक्षात्कार घडवून त्यांचं परिवर्तन केलं आहे. उच्चस्थानावरचे व्यावसायिक, जागतिक नेते, संगीतकार, खेळाडू, विद्यार्थी अशा अनेकांना उत्कृष्टतेकडे नेणारं आंतरिक चैतन्य मुक्तप्रवाही करता आले आहे. जगामध्ये नव्या जीवनसरणीची भूक प्रज्वलित झाली आहे हे ओळखून त्यांनी आता ‘अनंतत्त्ववाद’ या नव्या मार्गाचा आविष्कार केला आहे. इंग्रजीत त्यास ‘Infinitheism’ म्हटले आहे. विशेष म्हणजे आपल्या प्रिय वाचकांनाही हे पुस्तक अर्पण केले आहे. इतकेच नव्हे तर वाचकांनी जे प्रश्न त्यांना विचारलेत, त्यांचीच उत्तर लेखकाकडून उलगडत गेल्याने वाचक एकप्रकारचे सहलेखक झाल्याचे म्हटले आहे.

या पुस्तकात साधारण दोन पृष्ठांची जवळपास ६० प्रकरणे आहेत. त्यातील कांहीं प्रकरणांची शिर्षके मुद्दाम देत आहे त्यावरून पुस्तकाचा नेमका आशय आपल्या लक्षात येईल.
ती अशी आहेत.-
‘आज’ हा त्यांचा तुम्हाला उपहार आहे. शिखराकडे नेणारा रस्ता सोपा नसतो. ‘तुम्हाला सर्वाधिक महत्वाचं वाटणारं नातं’. ‘तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक ‘वस्तू’ पेक्षा महत्वाचे आहात ते तुम्ही’. ‘मार्गदर्शनाच्या गरजेपेक्षा सन्मान पूर्वक वागवलं जाण्याची गरज फार मोठी’. ‘माणसाचं उत्तर दायित्व संपतं तिथे दैवीशक्तीचं उत्तर दायित्व सुरू होतं” आयुष्यानं पाठविलेला आहे एक शिक्षक, जो अनुभवाचा वेळ घेऊन आला आहे’. ‘प्रश्न बरोबर की चूक यांचा नसतो, प्रश्न असतो परस्पर पटवण्याचा’. ‘सुयोग्य हातांकरवी घडलं जाण्यासारखे दुसरं भाग्य नाही’. ‘तुमचं बहुमोल साधन आहातच तुम्ही स्वतः’, तुम्ही स्वतः वापर पुरेसा करताहात का ? एक तर करू नका किंवा निष्ठापूर्वक करा. मधलंअधलं कांहीं नको’. ‘तुमची कार्यशक्ती वाढवा, कार्यक्षमता वाढवता-तीच तर प्रगती’. तुम्हाला ज्ञान दिलं जातं ते भविष्य उभारण्यासाठी’. ‘सातत्यपूर्वक आणि न संपणारी आत्मसुधारणा हाच एकमेव मार्ग आहे’. ‘माहिती बनला आहे पाया, विश्वासाला आणि म्हणून नात्यांचा’. ‘जग ज्याला अपयश समजतं त्याला मी परिवर्तनाचा बिंदू मानतो’. ‘सुखाकडे नेणारा मार्ग नसतो, सुख हाच मार्ग असतो’. ‘जेंव्हा अहंकार जातो तेंव्हा बाकी सगळं येतं’. ‘तुमचा जन्म अनुकरणासाठी नाही, नेतृत्वासाठी आहे’. ‘निस्वार्थ भावनेनं कोणतंही कर्म परमेश्वराचं कार्य बनतं’. ‘शांततेचा दरवाजा फक्त विश्वासाच्या किल्लीनंच उघडतो’. ‘तुम्हाला तुमचा ‘आज’, ‘उद्या’च्या परिपक्वतेसह जगावा लागतो’. ‘परिवर्तनावर लक्षणं ठेवलं आणि ते टिकवलं, तर संस्कृती निर्माण होते’. इत्यादी.

निदान या प्रकरणावरून आपल्या लक्षात आलेच असेल त्यांत काय तत्वज्ञान भरलेलं आहे. तसं या पुस्तकात किमान ३-४ प्रकरणानंतर ठळकपणे ‘सार’ देखील दिलं आहे. प्रत्येक प्रकरणात अगदी आपल्या घरातील नात्यांच्या जीवनात घडलेल्या घटनांची उदाहरणे दिल्याने लेखकाचे तत्वज्ञान वा शिकवण सहजगत्या समजते हे या पुस्तकाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य मला वाटते.

या पुस्तकातून ते आपल्या मनात, अंत:करणात शिरू इच्छितात आणि “मला त्यात येऊ द्या” असेही सांगतात.

परिवर्तनातून संस्कृतीची निर्मिती कशी होते त्यांचं एक उदाहरण दिलं आहे. काही काळापूर्वी चेन्नई मध्ये कायदा करून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी घालण्यात आली. कोणाला पर्वा आहे ? अजूनही जिकडे तिकडे तुम्हाला लोक धूम्रपान करतांना दिसतात. सिंगापूरमध्ये कांहीं दशकांपूर्वी कचरा रस्त्यावर टाकण्यास प्रतिबंध करणारा कायदा केला गेला. प्रत्येकजण तो कायदा पाळतो.

काय फरक आहे ? कायद्याच्या अंमलबजावणीवर चेन्नई मध्ये देखरेख केली जात नाही पण सिंगापूरमध्ये ती केली जाते. त्यामुळं परिवर्तन टिकलं आणि आज त्याचं रूपांतर सिंगापूरच्या संस्कृतीत झालं आहे. चेन्नईत सक्त पालनावर देखरेख करणा-या यंत्रणेचं पाठबळ नाही त्यामुळे कायदा पुस्तकातच रहातो. परिवर्तनावर देखरेख ठेवली आणि ते दीर्घकाळ टिकवून ठेवलं तर त्याचं संस्कृतीत परिवर्तन होतं. परिवर्तन हे आव्हान नसतं तर त्या परिवर्तनाचं संस्कृतीत रूपांतर होतं हे आव्हान असतं. ते टिकवलं तर तुमचं आयुष्य सतत वर चढणारी चक्राकार गती पकडतं. नाहीतर ते दुष्ट चक्रात सापडतं असंही त्यांनी सांगितलं आहे.

पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगताना प्रत्येक तीन-चार पानांवर त्यांचं सारं लेखकांनी ठळकपणे सांगितलं आहे. त्यापैकी हे एक..
“आयुष्य म्हणजे बुध्दीबळाचा खेळ आहे आणि तुम्ही ‘त्याच्या’बरोबर खेळत असतात. तुमच्या प्रत्येक चाली नंतर पुढची चाल तो करतो. तुमच्या खेळीची नाव आहे ‘निवड’ आणि त्याच्या खेळीचे नाव आहे ‘परिणाम’. तुमची परीक्षा घेतली जाईल. तुमचा अगदी कडेलोट व्हायची वेळ येईल पण तुम्ही तुमचा खेळ चांगला खेळलात तरी ‘तो’ जिंकेल, तुम्हाला जिंकण्याची परवानगी देऊन.”

पुस्तकात प्रत्येक पान नि पान प्रेरणा देणारे आहे. त्यातील अनुभव, मार्गदर्शन सर्वांना घेण्यासारखे आहे. शेवट त्यांनी उपदेशात्मक केला आहे. ‘जे एक माणूस करू शकतो ते सर्वांना करता येतं, खरं तर जास्त चांगलं करतां येतं. तुम्ही अनुकरण करण्यासाठी जन्माला आलेला नाही. तुम्ही नेतृत्व करण्यासाठी जन्माला आलेला आहात. तुम्हाला जो वारसा मिळाला आहे त्याला साजेसं जगा’ असे सांगून समारोप करताना एक छान सुभाषित त्यांनी लिहिलंय..
“यश मोठ्या गोष्टीत असतं.
समाधान छोट्या गोष्टींत असतं
ध्यान शून्यात असते
ईश्वर सर्व गोष्टीत असतो
हेच आयुष्य आहे”.

अशी ही ‘न पाठविलेलं पत्र’ पुस्तकाची अतिशय सुरेख व मार्गदर्शक, बोधप्रद भुमिका आहे ती नव्या पिढीने पूर्णपणे वाचली पाहिजे. समजून घेतली पाहिजे व आत्मसात केली पाहिजे, एवढेच मला या पुस्तकाचे निमित्ताने सांगावेसे वाटते.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. पुस्तक परीक्षण उतम केले आहे सरजी

    गोविंद पाटील सर जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments