“प्रशासन” भाग 1.
“प्रशासन” या पुस्तकाचे लेखक डाॅ.मनोहर जोशी हे १९६८ पासून २०१२ पर्यंत नगरसेवक, आमदार (विधानपरिषद), महापौर मुंबई मनपा., आमदार (विधानसभा), विरोधी पक्ष नेता,१९९५ ते १९९९ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय स्तरावर १९९९ ते २००२ केंद्रीय अवजड व सार्वजनिक उद्योग मंत्री, २००२ ते २००४ लोकसभेचे अध्यक्ष, २००६ ते २०१२ राज्यसभा खासदार, असा राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात डॉ .मनोहर जोशी सरांचा प्रवास उत्तम प्रशासन कौशल्यामुळे अत्यंत यशस्वी झाला. याखेरीज क्रिकेटचा छंद असल्याने ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे चार टर्म अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष होते.त्यांनी आतापर्यंत १४ पुस्तके लिहिली असून त्यांच्यावर विविध साहित्यिकांनी मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेतील १७ पुस्तके लिहिली आहेत.
डॉ.मनोहर जोशी सरांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पुर्णतः कारकीर्दीत मला राज्य शासनाचा माहिती संचालक म्हणून अतिशय जवळून सहवास लाभला. त्यांच्यामुळे खुपचं शिकता आले.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231226-WA0014-761x1024.jpg)
माझ्या हाती आताचं त्यांचे २०१८ मध्ये प्रकाशित झालेलं ‘प्रशासन’ हे पुस्तक आलं. त्यांचे आतापर्यंत ‘स्पीकर्स डायरी’ हे दोन भागातील पुस्तक, तसेच ‘राज्यसभेत खासदार डॉ.मनोहर जोशी’ ‘अवघे पाऊणशे वयोमान’, ‘पुढची पिढी’, ‘आयुष्य कसे जगावे’ ही पुस्तके मी यापूर्वी वाचून काढली आहेत. ‘प्रशासन’या पुस्तकात सरांनी ब-याच मान्यवरांच्या फक्त प्रशासन विषयावर स्वतः मुलाखती घेतल्या आहेत, त्यात न्यायदान, प्रशासनातील अंतिम निर्णय, प्रशासक, राज्याचे रक्षणकर्ते, देशाचा- संरक्षण- अभिमान, शिक्षण, स्वाभिमानी शेतकरी, जिद्दी उद्योजक, यशासाठी सहकार साधना, दिव्यांग समस्या, प्रशासन पीडित व्यक्ती व संघटना, प्रशासन ढिलाई, इत्यादी विषयांवर नामवंत व्यक्तींच्या मुलाखती प्रश्नोत्तरे स्वरुपात घेतल्या आहेत. त्यांत निवृत्त न्यायाधीश भीमराव नाईक, निवृत्त मुख्य सचिव दिनेश अफझलपूरकर, माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, शिक्षण तज्ञ विश्वास देशपांडे, आय ए एस अधिकारी तुकाराम मुंढे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, सहकार तज्ञ विनय कोरे, जिद्दी उद्योजक गिरीश व्यास यांच्यासह दिव्यांग समस्येवर यशवंत पाटील, सूर्यकांत लांडे, सुभाष कदम, चंद्रकांत चव्हाण, यांच्या तर प्रशासन पीडित व्यक्ती मनोहर भोसले, कुमारी सोनी सिंह, प्रशासन पीडित संघटनांवर डबेवाले व मुंबईचे फेरीवाले यावर मुके व सहकारी व शरद साईल व सहकारी यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231226-WA0015-684x1024.jpg)
प्रशासन ढिलाई वर ‘क्रिस्टल टाॅवर आग दुर्घटना’वर संबंधितांच्या मुलाखती घेऊन प्रशासन विषय ढवळून काढला आहे. प्रशासन ढेपाळल्यामुळे अनेकांना अपयश आल्याने प्रशासन सांभाळणे हे ये-यागबाळ्याचे काम नाही असेही या मुलाखतीतून आढळून आले आहे.
स्वत: मुख्यमंत्री असताना डॉ.मनोहर जोशी सरांचा प्रशासकीय वकूब अनन्यसाधारण असा होता याचा प्रत्यक्ष अनुभव मी स्वतः देखील घेतला असल्याने या पुस्तकातील मान्यवरांच्या मुलाखती बद्दल बरेच कुतहूल होते. त्यामुळे त्यांचा परामर्ष मी पुढील दोनतीन लेखात क्रमशः घेणार आहे.
क्रमशः
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/10/IMG_20211020_115512.jpg)
— परीक्षण : सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
सुधाकर तोरणे सरांचं पुस्तक परिक्षण अप्रतिम असतेच. जोशी सरांनी लिहिलेले हे पुस्तक खरोखरच वाचण्यासाठी योग्य आहे. प्रशासनाचे बारकावे व कौशल्य कसे असतात याचा प्रत्यय येतो.