Thursday, January 2, 2025
Homeलेखया चिमण्यांनो…

या चिमण्यांनो…

२० मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून २०१० पासून साजरा केला जातो. चिमण्यांची नोंद करून गणना केली जाते, “चिमणी वाचवा“ मोहिम राबवली जाते. चिमण्या कमी होत आहेत, ह्याची जाणिव नागरिकांना करून दिली जाते. या निमित्ताने हा विशेष लेख…
– संपादक

अमेरिकेतल्या न्यूयॅार्कच्या थंडीत मला ४ पक्षी, आता पर्यंत दिसले. कबुतर , सीगल , आपल्या इथल्या  साळुंकीसारखा छोटा पक्षी , आणि चिमण्या !

इथल्या थंडीत आमची बोलती बंद होते , पण ह्या चिमण्यांचा चिवचिवाट मात्र चालूच असतो ! इतर पक्षी थंडीला घाबरून पळून जातात आणि हा छोटासा जीव इथे मजेत बागडतोय , ह्याचे मला आश्चर्य वाटायचे. त्यांचा आपल्या ओळखीचा चिवचिवाट!तोच आवाज इथे रस्त्यातून जाताना नेहमी सोबत असतो !

लहानपणापासून सतत चिमणी आपल्या बरोबर असायची. (आताच्या मुलांबरोबर नसते) “इथे इथे बस ग चिऊ” ,”उठा उठा चिऊ ताई “.”एक होता काऊ ,एक होती चिऊ” अशी ती लहानपणीच भेटायची. “एक घास चिऊचा” आजी, आई सांगायची. बिरबलच्या न संपणाऱ्या गोष्टीतही चिमणी होती.
”एक चिमणी आली , दाणा घेऊन गेली.

मोठेपणी मंगेश पाडगावकरांच्या कवितेत, भा रा तांबे कुसुमाग्रज यांच्या कवितेतही चिमणी आपल्याला भेटते.
सकाळी उठल्यापासून घरी वाकुल्या दाखवत , चिमणी आनंदात आपल्या समोर मिरवत असते .आपण आपल्याच तंद्रीत तिची बिचारीची दाखलच घेत नाही . तरी पण ती आपली सोबत सोडत नाही . अमेरिकेत  इथे आल्यावर मी रोज तिला पहाते आणि मला मैत्रीण भेटल्यासारखा आनंद होतो.   मी मनातल्या मनात तिच्याशी गप्पा पण मारते . इथल्या थंडीत चिमणी कशी ?

मला थोडेसे कळले ते असं कि पक्ष्यांचे , शरीराचे तपमान आपल्या पेक्षा जास्त असते .
१०५ डिग्री F . इतके !तसेच ते सभोवतालच्या तपमानाला अनुकूल असे आपले तपमान ठेवू शकतात . त्यांचे पंख म्हणजे थंडीच्या विरुद्ध insulation असते . काही पक्ष्यांमध्ये जास्तीची पिसे पण येतात . तपमान योग्य ठेवण्यासाठी  ,काही पिसे  फुगवून ,air -pokets तयार करून , insulation तयार करतात . 
पिसांच्यावर वर एक तेलाचा थर असतो ज्यामुळे थंडीपासून आणि पाण्यापासूनही त्यांचे रक्षण होते. त्यांच्या उघड्या पायांवर स्पेशल खवले असतात, ज्यामुळे heat loss होत नाही . काही पक्षी metabolism कमी करून ,calories कमी वापरून ,उष्णता राखू शकतात . TORPOR स्थिती म्हणतात त्याला . तर अशी ही आपली चिमणी ,द ग्रेट ! थंडीत राहू शकते . 

चिमणी जास्त करून कच्च धान्य खाते. छोटे किटक खाते. कौलारू घराच्या फटीत, खिडकीवर घरटं करते. ती ३ ते ५ वर्ष जगते. (जास्तीत जास्त १३ वर्ष जगलेली चिमणी आहे.)

चिनचा माओ आणि “चिमण्या मारा” हे त्याचे फर्मान मागे वाचले होते. माणूस इतका क्रूर कसा काय होऊ शकतो ? चिमणी सरासरी ४ ते ५ किलो शेतातले धान्य खाते , म्हणून “चिमण्या मारा“असा त्याने हुकूम केला . चीनमध्ये लोकांनी तो आदेश तंतोतंत पाळला. क्रूरपणे दिसेल ती चिमणी मारली.

जगातला प्रत्येक जीव हा अन्नसाखळीत महत्वाचा असतो. नाहीतर निसर्गाचा तोल बिघडतो. तसेच झाले चीनमध्ये. चिमण्या गेल्या आणि २ वर्षानी जेव्हा टोळधाड पिकांवर आली तेव्हा त्यांना खायला चिमण्या नव्हत्या . पिकांचे नुकसान झाले. दुष्काळ पडला आणि त्यात कोट्यावधी लोकं मेली . तेव्हा चिमण्यांचे महत्व कळले आणि मग बाहेरच्या देशांतून चिमण्या मागवल्या गेल्या.

आपण आपल्याच वाढत्या वयाच्या चिंतेत एव्हढे अडकतो कि आपल्या या आजूबाजूच्या जगाची साधी माहिती मिळवावी असे ही आपल्याला वाटत नाही, मग त्यांची काळजी करणे , त्यांना वाचवणे तर दूरच रहाते . इतके कसे आपण स्वार्थी झालो आहोत ?

चिमणी वर केलेली माझी कविता पुढे देत आहे.

चिऊ ताई ,चिऊ ताई
रूसलीस का?
अंगणी तू येईनाशी
झालीस का?

आमच्या चुकीला
तू क्षमा करशील का?
आमच्या सोबतीला
तू येशील का?

माझ्याशी दोस्ती
तू करशील का?
चिव चिव करत,
अंगणी तू हिंडशील का?

पाणी मी ठेवले
तर पिशील का?
दाणे मी दिले
तर तू खाशील का?

चिऊताई चिऊताई
तू आम्हाला हवीस ग,
फक्त गोष्टीतच नाही
घरातही हवीस ग!

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका. ह. मु.मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pratibha Saraph on नव वर्ष ..
आशी नाईक on कवी
विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !