मातीतल्या बीजाला
अंकुर फुटतो
धरणीला होतो आनंद
पावसाचे शिंपण होते
अन् रोप उलगडते
हळुहळु त्याचा वृक्ष होतो
तो बहरतो, फुलतो, फळतो
आनंदाची सर्वत्र पखरण करतो
मग आयुष्याचा तो क्षण येतो
पानगळीचा…
एक एक पान गळू लागते
फांदीला सोडून धरणीवर उतरते
त्याचवेळी आभाळाची ओढ सरते
ज्या मातीतून उगवले
तिथेच परतीची पाऊले
विलग पानांचा होतो पाचोळा
वार्यावर उडतो कचरा सोनसळा
वृक्ष होतो बोडका
तरी भासतो योग्यासारखा
गळणार्या पर्णांना निरोप देताना
उभा ताठ, ना खंत, ना वेदना
कर्मयोगी निवृत्तनाथ
ऋतुचक्राशी असे बद्ध
एकाकी हा कातरवेळी
संवाद करी पानगळी
हा शिशिर सरेल
पुन्हा वसंत फुलेल
नव्या जन्मी नवी पालवी
हिरवाईने पुन्हा नटेल..
— रचना : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
*कर्मयोगी निवृत्तीनाथ* सुरेख शब्दांकन 🌷🌷