जीवन सुंदर आहे
मन…
मन असं अनावर असतं ना…
वा-याच्या वेगाने धावणारं..
आभाळात मनमुक्त विहरणारं..
तर कधी खोल खोल डोहात आत्मभान जागवायला बुडी घेणारं…
मन …
स्वप्नात रमणारं..
वास्तवाला सामोरं जाताना बिचकणारं.. दचकणारंही…
मन…
कधी निश्चयी तर कधी कणखर..प्रसंगानुरूप आपलं मन सतत बदलत असतं….
मन …
मायेचा पाझर होतं आणि वात्सल्यात चिंब भिजवतं …
आई होऊन…
तर कधी पोटात जिव्हाळा असूनही कर्तव्यकठोर बाप होऊन…
मन ….
एक हळवी भावना, संवेदना घेऊन अधीर प्रेयसी होतं तर कधी वेड्यागत तिची वाट ठरल्या वेळी, ठरल्या जागी बघणारा वेडा प्रियकर…
मन ….
तप्त सूर्य ही बनतं, सकाळचं कोवळं ऊन तर दुपारचं भाजून काढणारं ऊन …
आणि हळू हळू सांजावतं …तसं मनही हळूवार आणि शांत होत जातं, आपोआप…..
कुठलंच किल्मिष उरत नाही मग….मनात…
सर्व सर्व विसरून डोंगराआड जाणा-या शांत, क्लांत, क्षितिजापल्याड विलीन होणा-या दिनमणीसारखंच होतं …मनही.
कधी अवखळ अल्लड तर कधी, संथ शांत कधी धडपडं तर कधी शहाणं शहाणं……
होय ! मनच असतं ना, जे बुध्दीशी व्यवस्थित सांगड घालतं.बुध्दी त्याला आंजारून गोंजारून ताळ्यावर आणते. म्हणून मन समजूतदारही….
यासाठी कधी कधी मनामधे येणा-या गोष्टींचं ऐकावंही….
फिरावं, गावं, लिहावं…
आवडेल ते रुचेल ते….
आणि मनाला सदाच प्रफुल्लित ठेवावं. कारण ….
“जीवन सुंदर आहे”.
— लेखन : अरुणा दुद्दलवार. दिग्रस, यवतमाळ
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800