नापास मुलीची गोष्ट…
आजही तिची गोष्ट सांगताना माझे डोळे पाणावतात…
गोष्ट कशी हवी असते ?
गोड ! शेवट गोड आणि सुखान्त हवा. शोकांतिका सहसा लोकांना आवडत नाही.
कारण बहुदा रोजचे आयुष्य हे नीरस, साचेबंद असते.आपल्या दुःखाने लोकं कंटाळलेले असतात.त्यांना नवीन काही हवे असते. जे त्यांच्या आयुष्यात नाही तेच त्यांना हवे असते.
म्हणून शांताबाई म्हणतात..,
“सहज मिळे त्यात जीव
तृप्तता न पावे
जे सुधुर, जे असाध्य
तेची मन धावे” असो…
तर विषय असा आहे, की आपल्या आजच्या कथेंची नायिका आहे, ती छोटी मुलगी…
ती, तुमच्या आमच्यातलीच आहे. एक आवडती, एक नावडती. या कहाणीतल्या मुली सारखी.. ती एकुलती एक. लाडाची लेक. आई वडील शिक्षक, मोठे घर, नोकर चाकर. ती परी सारखी लहानपणी वाढत होती. तिला शाळा मात्र आवडत नसे. तो कोंडवाडा वाटे.
निळे आभाळ, हिरवा माळ, वाहता वारा, पावसाच्या धारा, फुलती फुलं, लहान मुलं, उडती फुलपाखरे, मोकळा वारा, चांद तारा तिला आवडे.
कथा, कहाण्यात ती रमे. तिला कविता आवडे. कवितेतली निळीपरी, सोनुली बाहुली, खेळभांडी, खेळगडी ह्यात ती रमे.
तिच्या घरासमोर एक वडाचे झाड होते. त्याच्या पारंब्याना पकडून ती उंच झोका घ्यायची. कानात वारं भरलेल्या वासरागत ती हुंदडायची. तिचे खेड्यातले घर तिला भारी आवडे. ती बाबांची परी होती.
चवथी पर्यंत मजेत आयुष्य गेलं. नंतर पाचवी. नवी शाळा. आई वडिलांचे फारसे लक्ष नाही. ती कधी शाळेत जाई तर कधी बुट्टी मारे. अभ्यासात फारसे लक्ष नसे. तिच्या शाळेच्या अर्ध्या भिंतीला अर्धा तट्टा लावला होता. त्याला बरीच भोकं पडलेली असत. त्यातून दिसणारे नीळेभोर आकाश, उडणारे पक्षी ह्यात तिचं मन रमे. गणिताची अक्षरं, संख्या डोळ्यासमोर गोल फिरत. शब्द मेंदू पर्यंत पोहचतच नसत.
गणिताचा तास आला की तिला धडकी भरे. ती पहिल्या बाका वरून मागल्या बाकावर लपे. वहीत डोकं खुपसून लिहिण्याचे नाटक करी. मराठी व इतिहासाचा तास तिला विलक्षण आवडे. कारण त्यात कथा, कविता असत. गोष्टीरूप कहाण्यामध्ये ती रमत असे.
सर आणि बाईच्या ही गोष्ट लक्षात आली. ती मस्तीखोर होती. पळापळी, खेळ गप्पा मस्ती हेच तिला आवडे. खरे तर ती एकपाठी होती. पण पुढे पाठ मागे सपाट अशी गत होती.
ढकलगाडी सुरू होती. खालच्या वर्गातून वरच्या वर्गात जात होती. शिक्षक रागवत पण ते हवेत उडून जाई.
ह्याच काळात तिला कविता आवडू लागल्या. तीही काहीबाही लिहू लागली. ग्रेस ह्याचं मितवा नावाचे सदर तिला खूप आवडे. ते फारसे समजत होते अस नाही. पण आतून काही जाणवे, ती ते वाचायची. त्यात रमायची.
हळूहळू “ती” एक लाडावडलेली, वाया गेलेली मुलगी ठरली. आई, वडील मास्तर आणि पोरगी मात्र “ढ” असे ही लोक म्हणत. परिणाम असा झाला की, ती नवव्या वर्गात नापास झाली. आणि मग मात्र आभाळ कोसळलं..
सगळी कडून लाटा, वादळ यावं आणि त्यात फसावं अशी तिची गत झाली. तिची नाव कोलमडून पडली. तिचं सारं विश्व उध्वस्त झालं.
आपणास कथेत ती कोण ? हे सांगितले नाही. तर ”ती” म्हणजे “मी”.
पूर्वाश्रमीची कुंचन देशपांडे. आताची सौ.अनुपमा मुंजे.
तर ही कहाणी इथच संपली नाही. आई बाबांनी ह्या जखमी पाखराला पुन्हा बळ दिलं. उभारी घ्यायला शिकवलं. मी जानकीबाई कन्या शाळेतून त्यांचीच दुसरी शाखा असलेल्या सिटी हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. वर्गात फक्त मूलच होती. मी केवळ एकटी मुलगी. अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले. पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात. हेच खरे.
ही ठेच लागताच मी पुन्हा दुप्पट उभारीने अभ्यासाला लागले आणि दहाव्या वर्गात 68 टक्क्याने पास झाले.
मग मात्र मी पुन्हा वळून पाहिले नाही. सतत प्रथम श्रेणीत पास होत गेले.
बारावी नंतर कला शाखेत प्रवेश घेतला. मराठी साहित्य, इतिहास, राज्यशास्त्र हे विषय आवडते. नवी वाट गवसली. पण बी ए च्या प्रथम वर्षात लग्न झाले. संसार, मुली ह्यात काही दिवस रमले. मग पुन्हा शिकायचे ठरवले. ह्याला दहा वर्ष झाली होती. मी बही:श्याल विद्यार्थी म्हणून अर्ज केला.
लहान लेकीला अक्षरशः मांडीवर घेवून अभ्यास केला. हळु हळू बी ए झाले. छान श्रेणीत पास झाले मग एम ए. झाले. Ph d करायचा विचार केला. पण पुन्हा आमची बदली आड आली.
मुलींच्या शिक्षणासाठी मला नागपुरात राहावे लागले. पुन्हा तडजोड.
मग मी माझे शिक्षण सोडून मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. घरी दहावी बारावी चे मराठी चे वर्ग घेतले. तेही छान चालले.
बरेच विद्यार्थी मेरिट आले. सोबत लिखाणही सुरू होते. घर, संसार, वर्ग छान चालू होते.
पुन्हा एक वादळ आले. माझं घरकुल उधळून गेले. मी खचले….
पण पुन्हा नव्याने सावरले. लिहिती होते. पण ते स्वांत सुखाय…
हळुहळू एकेक करता चार पुस्तकं प्रकाशित झाली. अनेक पुरस्कार लाभले. खूप सत्कार झाले. वृत्तपत्र, आकाशवाणी, मासिक, दिवाळी अंक.. ह्यातून लेखणीस सातत्याने जाग आली.
ही गोष्ट ह्या साठी की अपयशाने मुलं खचतात, निराश होतात. त्यांची पंख कापल्या जातात. कधी कधी खचून आत्महत्या करतात. हे होऊ नये.
चाळणीतले सकस गहू चाळणीत राहतात. पण बारके, हलके गहू खड्या सोबत गळतात. सकस गव्हाचे कौतुक होते. पण बारीक गव्हाचे काय ?
ह्याही गव्हाचा पुन्हा उपयोग होतो. जे त्या सोबत जग उभे असते.
पण पराजित पाखरू एकले पडते. दुखावते.
पण असेही पाखरू मनात जिद्द ठेवली तर पुन्हा पंखात बळ येऊन आकाश कवेत घेऊ शकते.
म्हणून आज एका नापास मुलीची खरी गोष्ट सांगायचा शब्द प्रपंच…
— लेखन : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अनुपमा the great.. असेच म्हणावेसे वाटते.
…नीला बर्वे,
सिंगापूर.