Thursday, September 18, 2025
Homeयशकथालातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी

लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अधिकारी झालेल्या आणि आता लोकाभिमुख, कार्यक्षम सेवा बजावित असलेल्या अधिकाऱ्यांच्या यश कथा असलेल्या “आम्ही अधिकारी झालो” या श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या – संपादित केलेल्या आणि न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने प्रकाशित केलेल्या, राज्यपाल श्री रमेश बैस यांनी गौरविलेल्या पुस्तकातील “लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी” ही यश कथा पुढे देत आहे.
– संपादक

मी औरंगाबाद येथे २०१७-१८ या कालावधीत माहिती संचालक या पदावर कार्यरत होतो. मराठवाडा विभागाचे सर्वात महत्वाचे अधिकारी म्हणून माझा सततचा संबंध हा विभागीय आयुक्तांशी अथवा विभागीय आयुक्त कार्यालयाशी येत असे. त्यात, त्यावेळचे विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर सर हे अतिशय संवेदनशील, प्रोॲक्टिव अधिकारी असल्याने तर खूपच संपर्क येत असे.

खरं म्हणजे, विभागीय आयुक्त कार्यालय हे विभागातील जवळपास सर्वच चांगल्या, वाईट घटनांशी संबंधित असते. मग त्या घटना म्हणजे दुष्काळ असो, पाणी टंचाई असो, कुठे रोगराईचा उद्रेक असो, आंदोलने असो, अती महत्वाच्या व्यक्तींचे दौरे असो, विभागीय स्तरावरील बैठका, कार्यक्रम, दिन विशेष, अशा विविध कारणांनी तेथील वातावरण खूप गजबजलेले तर कधी खूप तणावग्रस्त असते.

अशा या वातावरण एक अधिकारी नेहमीच तणावमुक्त राहून, सदैव हसतमुख राहून काम करीत असायच्या. या त्यांच्या स्वभावाचे मला फार कौतुक वाटायचे आणि प्रत्येक अधिकारी, कर्मचारी असाच असायला हवा, असे मला वाटायचे. म्हणून मी त्या अधिकाऱ्याची मुलाखत घेतली आणि मथळा दिला, “सदैव हसतमुख राहून काम करणाऱ्या उपायुक्त वर्षा ठाकूर घुगे.”

विशेष म्हणजे, त्यावेळी उपायुक्त म्हणजे उपजिल्हाधिकारी श्रेणीतील वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या वर्षा ठाकूर घुगे मॅडम आता लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. असे असूनही त्यांच्या स्वभावात काहीही बदल झालेला नाही. त्या लातूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ठरल्या आहेत.

जिल्हाधिकारी होऊनही कामाकडे अत्यंत सकारात्मकपणें पाहणे, सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या मध्ये टीम स्पिरीट निर्माण करून काम करणे, येणाऱ्या, भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने बोलणे, विचारपूस करणे, अहंकाराला अजिबात थारा न देणे असे सर्व ठाकूर मॅडम मधील गुण शासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी अंगी बाणविले तर सर्व सामान्य नागरिकांना हे आपले शासन आहे, असा विश्वास नक्कीच वाटत राहील.

तर जाणून घेऊ या वर्षा ठाकूर-घुगे यांची प्रेरणादायी जीवन कहाणी…

वर्षा ठाकूर घुगे यांचा जन्म औरंगाबाद येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील जिल्हा परिषदेत कार्यरत होते.त्यांचे शालेय शिक्षण औरंगाबाद येथील प्रख्यात सरस्वती भुवन प्रशालेत झाले. मुळच्याच ड्याशिंग स्वभावाच्या असल्याने त्यांनी शालेय शिक्षणानंतर नेहमीचे अभ्यासक्रम न निवडता नाशिक येथील भोसला मिलिटरी कॉलेज मध्ये बी ए (डिफेन्स स्टडीज) हा अभ्यासक्रम निवडला. हा कठीण अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांना त्याच विषयात एम ए करण्याची खूप इच्छा होती. पण तो पर्यंत महाराष्ट्रात हा अभ्यासक्रम कुठल्याच विद्यापीठात सुरू झालेला नव्हता म्हणून त्यांनी नाईलाजाने परत औंरंगाबाद येथे येऊन लॉ ला प्रवेश घेतला. लॉ चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी डिप्लोमा इन सायबर लॉ हा अभ्यासक्रमही पूर्ण केला.

इथेच मॅडमची ओळख व मैत्री पुढे त्यांचे भावी पती झालेले श्री गणेश घुगे यांच्याशी झाली. श्री गणेश घुगे यांनीच त्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देऊन त्या परीक्षा देण्यास प्रेरित केले. तसेच लहानपणापासून त्या वडिलांच्या सोबत दौऱ्यांमध्ये जात असत. त्यामुळेही सरकारी नोकरीचे सुप्त आकर्षण त्यांच्या मनात निर्माण झाले होते. या सर्वांचा परिपाक म्हणून त्यांनी एम पी एस सी ची परीक्षा द्यायचे ठरविले. त्यासाठी विषय घेतले, इतिहास आणि समाजशास्त्र. या परीक्षेचा त्यांनी कसून अभ्यास केला आणि याचे फळ म्हणजे त्या पहिल्याच प्रयत्नात 12 जुलै 1995 रोजी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी उपजिल्हाधिकारी म्हणून निवडल्या गेल्या. मराठवाडा विभागातील पहिल्या महिला उपजिल्हाधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला.

उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक पैठण येथे परिविक्षाधीन तहसिलदार म्हणून झाली. तिथे त्यांनी ४ महिने काम केले. त्यावेळी एक महिला तहसिलदारपदी कार्यरत आहे, याचे अप्रूप वाटल्यामुळे त्यांना नुसते पाहण्यासाठीच लोक कार्यालयात गर्दी करायचे. त्यानंतर परिविक्षाधीन प्रांताधिकारी, म्हणून खुलताबाद येथे त्यांची नेमणूक झाली.

वर्षा ठाकूर घुगे यांची प्रथम नियमित नेमणूक जिल्हा पुनर्वसन अधिकारी, औरंगाबाद म्हणून झाली. तेथे 2 वर्षे काम केल्यावर महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणात विशेष कार्य अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, सिल्लोड म्हणून काम करण्याची त्यांना आव्हानात्मक संधी मिळाली. प्रचंड पाणी टंचाई असताना, रात्री, बेरात्री सुध्दा व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा म्हणून त्यांनी फार परिश्रम घेतले. या त्यांच्या कामाची सर्वत्र दखल घेतली गेली. हा उपक्रम “सिल्लोड पॅटर्न” म्हणून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात लागू केला. या कामाचे खुप समाधान लाभले, असे त्या आवर्जून म्हणतात. त्यांनी भूसंपादन अधिकारी, औरंगाबाद म्हणून काम करताना त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय मंजूर संघटना आणि भारत सरकार यांचा बालकांसाठी असलेल्या प्रकल्पाच्या प्रमुख म्हणूनही लक्षणीय कामकाज केले.

मॅडम नी मुख्याधिकारी, म्हाडा म्हणून काम करीत असताना धडाडी दाखवत अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यासाठी लॉटरी पद्धतीने औरंगाबाद येथे १४९४ तर नाशिक येथे ९९५ घरे बांधली.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे राबविल्या गेलेल्या बाल कामगार प्रकल्प प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. याची दखल घेऊन त्यांची मध्य प्रदेशातील ५ जिल्ह्यांच्या बाल कामगार प्रकल्पांवर रिसोर्स पर्सन म्हणून नेमणूक करण्यात आली. आय ए एस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र असणाऱ्या मसुरी येथील प्रशिक्षणात सुध्धा या प्रकल्पाची विशेष नोंद घेण्यात आली, ही मोठीच अभिमानाची बाब आहे.

पुढे मॅडमची नियुक्ती उपायुक्त (पुरवठा) या पदावर विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे झाली. त्या पदावर दोन वर्षे काम करून त्या जुलै-२०१७ पासून उपायुक्त (सामान्य) या पदावर कार्यरत होत्या. या पदावर कार्यरत असताना त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द वेरुळ महोत्सवाचे उत्कृष्ठ आयोजन केले. अध्यक्ष, महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

पुढे उत्कृष्ट सेवेमुळे वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांची नामनिर्देशनाद्वारे भारतीय प्रशासकीय सेवेत निवड होऊन त्यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड या पदावर करण्यात आली. या पदावर असताना त्यांनी अतिशय कल्पक, लोकोपयोगी उपक्रम राबविले. त्यातील काही ठळक म्हणजे “माझी मुलगी, माझा अभिमान”, “गाव तिथे खोडा”, “गाव तिथे स्मशानभूमी” “जिल्हा परिषद शाळा सक्षमीकरण”, “माझी शाळा,सुंदर शाळा”, “आई बाबांची शाळा”, “बियांचे बॉल्स”, “भोसी पॅटर्न”, “ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण”, “आदिवासी पाडे, तांडे यांच्या पर्यंत जाऊन शासनाच्या विकास योजनांचा त्यांना लाभ देणे” असे उपक्रम राबवून प्रशासन गतिमान केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नांदेड या पदावरील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मॅडम ची नेमणूक आय ए एस सेवेतील सर्वात महत्वाचे पद समजल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी पदावर ऑगस्ट २०२३ मध्ये लातूर येथे झाली. या पदावर नेमणूक झालेल्या त्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ठरल्या, हे विशेष. या पदावर देखील त्या अत्यंत धडाडीने काम करीत आहेत.

मॅडम ना त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील प्रमुख पुरस्कार म्हणजे, भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागातर्फे फ्रान्स मध्ये “लोकल सेल्फ गवर्नमेंट” या विषयावरील तर सिंगापूर येथे “ईसेंशियल ऑफ पॉलिसी डेव्हलपमेंट” या विषयावरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचा मान, सर्वोत्कृष्ट महसूल अधिकारी २००२, उत्कृष्ट कार्यकर्ता अधिकारी २००३, जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च २००८ रोजी गरवारे कम्युनिटी सेंटर तर्फे गौरवचिन्ह देवून गौरव, बालमजूर व
पाणी टंचाई कार्यात उल्लेखनीय सेवा बजाविल्या बद्दल जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार, उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार २०१०, जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च २०१२ रोजी सखी बहूउद्देशीय महिला मंडळ, औरंगाबादतर्फे स्वर्गीय मीनाताई ठाकरे सन्मान, सन २०१३ मध्ये उत्कृष्ठ प्रशासक, कलादर्शक पुरस्कार, उपायुक्त (पुरवठा) पदावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट अप्पर जिल्हाधिकारी पुरस्कार २०१५-१६, कोविड काळातील उत्कृष्ट सेवेमुळे शासनाचा कोविड योद्धा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

मॅडम याना लेखन, पदभ्रमण, निसर्ग पर्यटन असे छंद आहेत. लेखनाच्या छंदातून त्यांनी नांदेड जिल्हा पर्यटन पुस्तिकेचे लेखन केले असून पुरातत्व विभागाच्या अनेक पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले आहेत. तसेच त्यांनी समाज माध्यमांतून लिहिलेल्या “औरंगाबाद जिल्ह्यातील विविध स्थळांविषयाचे लेख आणि स्वानुभवही” खूप लोकप्रिय ठरले.

मॅडम, आपल्या यशाचे श्रेय आईवडिलांना तर देतातच पण पती श्री गणेश घुगे आणि सासरच्या मंडळींनाही देतात. विशेषत: बदलीची नोकरी असल्याने पती आणि सासरची मंडळी यांचा पाठिंबा, २ मुलींकडे बघणे यामुळेच आपण आपली सेवा निश्चिंतपणे बजावू शकतो असे त्या कृतज्ञता पूर्वक नमूद करतात.मॅडम ना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. एस. बी. वराट, रेशीम विकास अधिकारी, लातुर/ बीड एस. बी. वराट, रेशीम विकास अधिकारी, लातुर/ बीड

    थक्क करणारा प्रवास

  2. प्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणजे मुलींना प्रेरणा आहे.
    आ.संपादक देवेंद्र भुजबळ साहेब यांनी प्रेरणादायी पुस्तक संपादीत केले आहे.

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा