लेखन ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यात आपल्या मनातील भावना एक विचार रुपाने व्यक्त करु शकतो. वास्तविक लेखन ही एक कला असून ती पार करण्यासाठी अनेक पायर्या पार कराव्या लागतात.
आपण लेखन करु शकू ही भावना मनी उतरवायची असेल तर सुरुवातीस काही निरिक्षणांंची आवश्यकता आहे. या निरीक्षणांतून जे विचार प्रकट झाले आहेत, ते गद्य वा पद्य या माध्यमातून प्रकट झाले आहेत, शब्दसंच कसा आहे या सारख्या अनेक गोष्टींचे निरिक्षण करुन आपल्याकडील शब्दसंच वाढवून शब्दप्रभू कसे तयार होतात याचा प्रयत्न करुन तशी वाटचाल आवश्यक आहे.
ही निरिक्षणं करण्यासाठी न कंटाळता वाचन प्रक्रिया सक्रिय ठेवावी लागते व विविध प्रकारच्या पुस्तकांचं वाचन आवश्यक असतं. हे वाचन करत असताना त्यातील काही महत्वाचे भाग, उतारे किंवा रचना यांच्या नोंदी आपल्या डायरीत असणे फार आवश्यक असते. या प्रक्रियेमुळे आपला शब्दसंच वाढू लागतो, व असे शब्द कधी, कसे, कुठे उपयोगात आणावेत याचे ज्ञान येते व ते हळुहळू वाढीस लागते.
आपण जे वाचलं आहे ते आपल्या मनात रुजलं गेलं पाहिजे. त्याला ह्रदयाच्या कोंदणात वसवलं तर ते चिरकाल टिकतं, म्हणून यासाठी आपण जे वाचलं आहे, त्याचं चिंतन होणं आवश्यक असतं.
चिंतन याचा अर्थ असा आहे की, स्वतःला आयुष्यात काय हवे हे आपल्यापेक्षा अधिक कोणीच सांगू शकत नाही, म्हणून दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा आपल्या मनाचं ऐका. रोज थोडं थोडं ऐकत गेलात तर, आपण काय मिळवलं याची जाणीव होते आणि हे चिंतनानेच शक्य आहे. चिंतन याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा सखोल अर्थ काय असू शकेल, त्यातून आपल्याला काय घेता येईल व काय अनावश्यक आहे ते त्वरित मनातून विसर्जित करता येईल. म्हणून कोणत्याही विचाराला अधिक सहाय्य करण्यासाठी चिंतन प्रक्रिया ही गरजेची आहे. महत्त विचारांनी आपले जीवन बदलू शकते, व त्यासाठी सगळ्यांनाच वेळ मिळू शकतो; पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नसते; म्हणूनच विचारांना चिंतनाची गरज असते. विचार व चिंतन यांच्या सहवासाने शब्दप्रभू हे अपत्य मिळते; व लेखन प्रतिभेला सालंकृत बनवते.
विचारांचे चिंतन केले असता, त्याचा मनावर परिणाम होऊन ते अधिकाधिक चांगले रुजावे यासाठी जी प्रक्रिया आवश्यक असते, तिला मनन म्हणतात.
निरिक्षण, वाचन, चिंतन, मनन या क्रमवार साखळीतून अंतिम टप्पा यशस्वी होण्यासाठी भावना प्रभावितपणे कागदावर उतरवणे याला लेखनाविष्कार म्हणतात. या अविष्काराने हळूहळू विविध साहित्य प्रकारात लेखन होऊ शकते.
या लेखनात कादंबरी, लघुकथा, कथा, भयकथा, कविता यासारख्या अनेक मार्गाचा प्रवास करणे शक्य होते, पण हे वाटतं तितकं सोपं काम नाही. त्याला अफाट प्रयत्नांची जिद्द असावी लागते . संयम असावा लागतो. प्रभावी लेखनासाठी शिस्त असावी लागते. नियमित वाचन, विविध प्रसंगांचं लेखन, त्यासाठी ठराविक जागा आणि सर्वात महत्वाचं माझ्या दृष्टीने म्हणजे सरस्वती कृपा असणं आवश्यक आहे व त्यासाठी सरस्वतीला वंदन करुन आपली लेखन दिनचर्या निश्चित करावी यातच उत्तम लेखनाचे यश आहे असे मला वाटते.
आपले विचार लेखनातून प्रकट झाले असता व त्याला पुस्तकरुप मिळाले असता, त्यातून मिळणारा आनंद हा परमानंद असतो. याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. पुस्तकाचं प्रतिबिंब म्हणून त्याचं शीर्षक ही तसं समर्पक असावं म्हणजे एक प्रतिथयश लेखक होण्याचा मार्ग हा राजमार्ग होऊन तो यशोमार्गाकडे नक्कीच जाईल यात शंका नाही.
म्हणून लिहिते व्हा…!!
— लेखन : अरुण पुराणिक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800