रोजचा दिवस आणि – रात्र !…… कधी उजाडतो आणि संपतो, कधी कधी कळतच नाही. जानेवारी येऊन नवीन वर्ष सुरु होतंय म्हणता म्हणता ३१ डिसेंबर कधी येतो आणि वर्ष संपत कळतच नाही !
ह्या १-१ दिवसाबरोबर, १-१ वर्षाबरोबर आपले वय वाढत असते, ते सुद्धा कळत नाही. फक्त वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला खरी जाणीव होते आणि आपण म्हणतो ……….. “अरे बाप रे, एव्हढी वर्षे झाली ?”
वाढदिवसांची पण मजा असते नाही ? त्यांचे पण दिवस असतात !…नाही का ? साजरे होण्याचे !……. जेव्हा मूल १ वर्षाचे होते, तेव्हा त्याला वाढदिवस म्हणजे काय कळत नसते, पण त्याच्या आई वडिलांच्या दृष्टीने, तो स्पेशल दिवस असतो आणि ते मुलाचा वाढदिवस, आपल्या पध्दतीने थाटात साजरा करतात. म्हणजे ओवाळणे, ग़ोड जेवण, मुलाला नवीन कपडे, खेळ, आजी आजोबांबरोबर फोटो …
२ ते ५-६ वर्षा पर्यंत, वाढदिवसाच्या दिवशी ज्याचा वाढदिवस असेल तो राजा असतो. त्याला आवडेल तो खेळ, कपडे मेनू …। सर्व त्याच्या पसंतीचे. सकाळी घरच्यांच्या बरोबर. संध्याकाळी मित्र परिवाराबरोबर पार्टी …परवडेल तशी घरी, नाही तर हॉटेलात. हॉल मध्ये प्रेझेंटचे जबरदस्त आकर्षण ! सर्व मजाच मजा असते त्या वाढदिवसात !
मग अचानक, मोठेपण आल्याची आणि वाढदिवस साजरे न करण्याची जाणीव पालक करून देतात. शाळा, परीक्षा, अभ्यास ह्याचे महत्व इतके वाढलेले असते कि मग घरच्या घरी, किंवा शाळेत चॉकलेट वाटून किंवा बिल्डींग मधल्या जवळच्या मित्रांना बोलावून वाढदिवस उरकला जातो ! मग १० वा, १६ वा, २० असे उगीचच, नंबराचे महत्व दर्शवणारे वाढदिवस हॉटेलात रात्री जावून, केक कापून साजरे केले जातात. पण त्यात खूप दम नसतो.
ह्या वाढदिवसाबरोबर येतो थोडा इगो, रुसवा -फुगवा, नाराजी. म्हणजे आधी कोणी विश केलं ? कोण विसरले, कोणी आवडीची गिफ्ट नाही दिली, मनासारखे पिक्चर ला नाही जाता आले, आई बाबा बिझी होते ……इ.इ.इ……।
नंतरचे कॉलेजातले वाढदिवस म्हणजे खरे वाढदिवस ! कोणाबरोबर कसे साजरे करायचे हयाचे थोडे स्वातंत्र्य मिळालेले. मनासारखे ठरवणारे. बिनधास्त, मोकळे !
नोकरी लागल्यावर मग सुरु होतात रात्री १२ ला केक कापून साजरे होणारे वाढदिवस ! कारण दिवसा एकत्र यायला वेळ नसतो, रजा नसते. इ..इ..
लग्नानंतरचे पहिले सरप्राईज, देण्याघेण्यातले, मग विसरलेल्या नाराजीतले वाढदिवस ! आणि मुले झाल्यावर मधले काही वाढदिवस तर विसरायलाच होते. मुलांचे वाढदिवस साजरे होतात आणि त्यात आपले वय ही विसरायला होते !
आणि मग …..परत आपल्या वाढदिवसाचे दिवस येतात ! पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा करण्याचे बेत ठरतात. आपल्याला नको असताना, वयाची जाणीव करणारे सगळे वाढदिवस मग रात्री १२ वाजता केक कापून “साजरे” करायला लागतात !
आणि मग येतो साठावा वाढदिवस ! आयुष्यातला सर्वात महत्वाचा ! सिनियर सिटीझन अशी गोंडस पदवी तुम्हाला देणारा ! बाल, कुमारी, तरुण, प्रौढ आणि आता शेवट चे हे वृध्द ठरवणारे वय ! जबाबदाऱ्या संपल्यात सांगणारे वय. आता स्वत:ला जपा सांगणारे वय ! काहीना आता नवीन, वेगळ, स्वत:साठी, बिनधास्त मनासारखे जगा असा संदेश देणारे हे साठावे वर्ष ! तर काहीना आता आपल्या जबाबदाऱ्या संपल्या, कार्य संपलं, आता शांत, हरी हरी म्हणायला मोकळे असा दिलासा देणारे हे वय ! काहीना करायच्या राहून गेलेल्या गोष्टी करायाला परत एक संधी आता मिळेल म्हणून आनंदी वाटत असेल ! तर काहीना आपण आता म्हातारे झालो म्हणून ह्या दिवशी वाईट ही वाटत असेल !
आनंदी रहाणे, की वाईट वाटून घेणे हे प्रत्येकाच्या स्वभावावर आहे शेवटी ! माझ्या वाचनात आले होते की कोणी तरी म्हातारा ह्या शब्दाची व्याख्या महा-तारा आणि वृध्द म्हणजे वृद्धिंगत होणारा अशी केलेली आहे. मला ती आवडली. मला वाटते, फक्त वय वाढल्यामुळे, म्हातारे होणे समजण्यापेक्षा, असा “महा -तारा” होऊन रहाण्यासाठी प्रयत्न करणे, आणि फक्त वयाने वृध्द न होता, उत्साह, कार्य, ज्ञान, वेगवेगळे अनुभव ह्याने वृद्धिंगत व्हावे, ह्या साठी ह्या ६० व्या वर्षाचे महत्व जास्त आहे. मला पुढील आयुष्य तसेच जगता यावे असेच मी ६० व्या वर्षी ठरवीन ! पुढचा प्रत्येक दिवस, मला वाढदिवसा सारखा आनंदात साजरा करता आला पाहीजे असेच मी मागीन असे माझ्या साठाव्या वर्षी मी हे लिहीले होते.
आणि पहाता पहाता २९ तारखेला माझा सत्तरावा वाढदिवस झालाही. कशी गेली ही १० वर्षे ? मस्त !
पहिल्या ६० वर्षांपेक्षा मी खूप वेगळ्या पध्दतीने आयुष्य जगले असे वाटले. थोडं मोकळेपण, थोडं रिकामपण .. पण काहीतरी नविन करायला योग्य..
या काळात काही जवळचे पाठीवरून फिरणारे हात थांबले, काही गळ्यात पडणारे, कुशीत विसावणारे चिमुकले जवळ आले.
नविन जगाशी ओळख झाली. नविन माध्यम, नविन आव्हानं, नविन संधी, नविन द्रृष्टीकोन समोर आले. इतके दिवस घराच्या चौकटीत होते, आता थोडे मोकळे आकाश भरारी घ्यायला खुणावते आहे असे वाटायला लागले. काही राहून गेलेल्या गोष्टी जमायला लागल्या, बकेट लिस्ट वाढायला लागली. नविन मित्र मैत्रिणी मिळाल्या. आयुष्य जास्तच सुंदर झालं असं वाटायला लागलं. शारिरीक वय १० वर्षांनी वाढलं, पण मनानी १० वर्षे वय कमी झाल्यासारखे वाटले. एक तृप्ततेची भावना, समाधानाची भावना मनांत जाणवायला लागली.
७० वर्षांनंतरही पुढची वर्षेही अशीच जावीत इतकीच इच्छा ह्या क्षणी मनांत आहे. मला वाटतं तुम्हालाही असेच वाटत असणार. हो ना ?
— लेखन : चित्रा मेहेंदळे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800