येत्या बुधवारी, १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी आहे. लाखो वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. या निमित्ताने वारी चे माहात्म्य सांगणारा, संत साहित्याचे अभ्यासक श्री मधुकर ए निलेगावकर यांनी अतिशय साध्या सोप्या, रसाळ भाषेत लिहिलेला लेख आपल्याला निश्चितच आवडेल.
श्री निलेगावकर यांचे न्युज स्टोरी टुडे परिवारात स्वागत आहे.
….संपादक
माणसाच्या पूर्वसंचित सत्कर्मांच्या पुण्यामुळे माणसाला माणसाचा जन्म मिळतो. त्यानंतर, माणूस मोठा झाल्यावर जीवनी सन्मार्गाने चालू लागल्यानंतर त्याचं जीवन सुखासमाधानाचं होत राहतं.
परंतु, माणसास स्वार्थ आणि मोहाचा लोभ सुटल्यास त्याच्या चित्तवृत्तीत बदल होऊ लागतो. मग, तो माणूस बहकल्यासारखा वागू लागतो. तो अधिकाधिक मोहाच्या आहारी जाऊ लागतो. व्यसन लागल्यासारखा तो धन,सोने, दागिने, जडजवाहीर, इस्टेट इत्यादी गोष्टींच्या आहारी जातो. तसेच, सत्तेच्याही मोहाचा रोग त्याला जडतो आणि इथेच माणूस सत्कर्मे सोडून दूष्कर्माच्या मार्गाला लागतो. इथपासूनच त्याच्या अध:पतनाला सुरुवात होते. तसेच, त्याचे हे प्रमाण इतके वाढते की, माणसातील माणुसकी नष्ट होवून त्याच्यात राक्षसी वृत्तीचे प्रमाण वाढू लागते.
माणसाच्या असुरी वृत्तीला लगाम हा घातला गेलाच पाहिजे. ख-या अर्थाने माणसाला “माणूस” म्हणून जगता आले पाहिजे. माणूस म्हणून जगण्यासाठी माणसाने धार्मिक सात्विक वृत्ती अंगिकारली पाहिजे. त्यासाठी, प्रत्येक शतकातील संतांनी, महात्म्यांनी दूष्ट माणसांना सन्मार्गावर आणण्यासाठी शर्थीचे खूप प्रयत्न केले आहेत. त्यासाठी, थोर अशा संतांनाही खूप, अतोनात असा त्रास, हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत.
थोर संत, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरीची वारी सातशे वर्षांपूर्वी सुरु केली, त्यांचाच व त्यांच्या भावंडांचा, त्या काळातील दूष्ट लोकांनी अतोनात छळ केला. त्यांना खूप त्रास दिला. पण, त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी अखंड विश्वाचे कल्याण व्हावे आणि संपूर्ण विश्वाच्या सुखासाठी परमात्म्याकडे “पसायदान” मागितले. श्री चक्रधर स्वामी, संत श्री तुकाराम महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री गोरा कुंभार, संत जनाबाई अशा सर्व संतांना त्यांच्या त्यांच्या काळात दूष्ट लोकांकडून खूप त्रास झाला आहे.
या सर्व संतांनी सर्व लोकांच्या कल्याणासाठीच आयुष्यभर सत्कार्य केले. सर्व संतांची मांदियाळी श्री ज्ञानेश्वर माऊलींसोबत विठूरायाच्या पालखीसोबत विठ्ठलाचा नामघोष करीत पंढरीची वारी करीत असे. ही सर्व संतमंडळी जशी विठ्ठलदेवाला अनन्य भावाने शरण जात असे, तसे, सर्वांनी अंत:करणातून त्या पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे. जसे, विठ्ठल देवाचे खरे भक्त कायिक, वाचिक व मानसिक भावनेने पांडुरंगाला शरण जातात.
संतश्री थोर संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी ते पंढरपूर अशी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पायी वारी सुरु केली. ती परंपरा सातशे वर्षांनंतरही आजतागायत अखंडपणे, अविरतपणे चालू आहे, हे पंढरीच्या वारीचं वैशिष्ट्य आहे.
या पंढरीच्या वारीत अठरापगड जातीचे लोक अत्यंत धार्मिक भावनेने सहभागी झालेले असतात. त्यात आठ वर्षांच्या मुलामुलींपासून सत्तर पंचाहत्तर वर्षांचे आजीआजोबाही आनंदाने सहभागी झालेले असतात. आळंदीतून निघालेल्या पालखीसोबत तरुण माणसे आणि विशेष म्हणजे लहान मुले व सत्तरीच्या पुढील वयाचे वृध्द बायका माणसे हे विठ्ठलदेवाचे वारकरी टाळ, मृदंगाच्या व विठ्ठलनामाच्या जयघोषात पंढरीची वाट चालत असतात. विशेष म्हणजे, सासवडचा अवघड घाट लहान मुले व हे वृध्द वारकरी विठ्ठलाच्या कृपेने लिलया पार करीत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात.
महाराष्ट्रातून शेकडो संतमहंताच्या पालख्या त्यांच्या धार्मिक ठिकाणावरुन पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांच्या औषधोपचारासाठी अनेक डाॅक्टर्स व नर्सेस, कंपाऊंडरची टीम सोबत असते. अनेक मोठे निष्णात डाॅक्टर्स, उद्योगपती, करोडो इस्टेटीचे मालक या वारकर्यांसोबत एकत्र जेवण, खात तसेच, गप्पा मारत, मदत करीत, विठ्ठलाचं नामस्मरण करीत वारीसोबत चालत असतात.तेथे ते आपला सगळा अहंकार,”मी”पणा विसरुन वारीत सहभागी झालेले असतात.
पंढरीची वारी माणसाला माणूस म्हणून जगायला, माणुसकीनं वागायला शिकवते. इथे माणसाचा अहंकार गळून जातो.
थोर संत ज्ञानेश्वर महाराज जेव्हा प्रथम आपल्या भावंडांबरोबर आळंदीला गेले होते तेव्हा, तेथे विठ्ठल देवाचं दर्शन घेतल्यावर श्रीज्ञानेश्र्वरांना खूप आनंद झाला. तेव्हा,सहजच शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताईला ते म्हणाले “रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी! मुक्ताईला ज्ञान देव कौतुकाने साजणी म्हणतात! तेव्हा, मुक्ताई म्हणाली, ज्ञानदादा, तुम्हाला विठ्ठलाला पाहून सुख झाले. पण, इतर सर्व जनांना विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर सुख का बरे मिळत नाही ?
तुम्ही म्हणता,
“तो हा विठ्ठल बरवा !
तो हा माधव बरवा !”
तसं इतर लोकांना का बरे वाटत नाही ?
त्यावर ज्ञानोबा म्हणाले,
अगं मुक्ते! “बहूत सुकृतांची जोडी म्हणूनी विठ्ठले आवडी” म्हणजे, मुक्ता, पूर्वजन्माची काही पुण्याई असेल तरच, ईश्वराबद्दल आवड निर्माण होते. म्हणजे, नीती,धर्माचे आचरण आणि ईश्वराची उपासना मनापासून केली तरच, ईश्वराबद्दल आवड निर्माण होते.
श्रीज्ञानदेव म्हणतात, सर्व सुखाचे आगर विठोबाच आहे. तोच सर्व चराचरात भरलेला आहे. हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला तेव्हा, ते म्हणतात,
“अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू।
हरी पाहिला रे ! हरी पाहिला रे !”
हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते.
संत तुकारामांना हा अनुभव आला तेव्हा, त्यांनी अभंग लिहिला…
“आनंदाचे डोही
आनंद तरंग”!
संत श्री नामदेव महाराजांना अनुभव आला तेव्हा, त्यांनी अभंग लिहिला,
सुखाचे हे सुख श्रीहरी मुख।
पाहता भूक तहान गेली।
विठ्ठलाच्या दर्शनाचा असा अनुभव सर्व संतांना आला, तो त्यांनी त्यांच्या अभंगांतून व्यक्त केला आहे. विठ्ठलाच्या दर्शनानंतर काय स्थिती असेल या संतांची ? असं म्हणतात “ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा” अशी अवस्था संतांची झालेली असते. सर्व देहभान विसरून काया, मने, वाचे ते विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले असतात. ही खरी भक्ती आहे.
अशा विठूरायाच्या दर्शनासाठी सर्व पालख्या आषाढी एकादशीला पंढरपूरला येऊन एकत्र मिळतात. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर…
“सावळे सुंदर रूप मनोहर।
राहो निरंतर हृदयी माझे”
अशी सर्व वारक-यांची भावना असते. तेथील दृश्य, तो आनंद अवर्णनीय असतो. वारक-यांच्या चेह-यावरील आनंद आणि समाधान ओसंडून वाहत असते.
असा हा अलौकिक सोहळा असतो. आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला एकत्र जमतात. पंढरपूरला आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने वारकरी येतात. त्यामुळे, विठ्ठलाचं दर्शन होण्यास त्यांना त्या दिवशी पंधरा ते वीस तास लागतात. म्हणून, त्यामुळे बहुतांश वारकरी त्यादिवशी विठ्ठल माऊलीच्या मंदिराच्या कळसाचे, आणि नामदेव पायरीचं दर्शन घेऊन विठ्ठलाचं नामस्मरण करीत स्वग्रामी मार्गस्थ होतात. देवाचं दर्शन जरी झालं नाही तरी त्यांच्या तनात व मनात विठ्ठल देव असतो. ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे. सातशे वर्षांपासून ही वारीची परंपरा आजतागायत चालू आहे. या चिरंतन संस्कृतीचेच दर्शन घडविण्याचा प्रयत्न मी खालील कवितेतून केला आहे.
“पंढरीची वारी”
अमृताचे सुख लाभते पंढरीच्या वारीत
नामाचा महिमा कळतो विठू नामगजरात
वारीत नसे कुणी लहान, नसे कुणी थोर
अवघ्यांच्या मुखी असतो नामाचा गजर
उच्च, नीच भाव नसतो कदापिही या वारीत
पांडुरंग नाम असते मुखात, विठ्ठल हृदयात
चालो किती चाले वारीत कधी ना थकती भक्त
कृपादृष्टी चालवे भक्तांसी विठूमाऊली वारीत
नसे भेदभाव वारीत कुणाचा कुणाला
ज्याच्या त्याच्या मुखी असे गजर विठूमाऊलीचा
वर्षानुवर्षे करिती भक्त पंढरीवारीचा हा प्रवास
दूरदूरच्या भक्तांना लाभतो एकमेकांचा सहवास
असता पुण्य पदरी भक्तांच्या निज जीवनात
देते दर्शन विठूमाऊली भक्तांसी मंदिरी पंढरपूरात
सोहळा पुर्ण होतो वारीचा आषाढी एकादशीला
दर्शन घेता गावोगावीचे भक्त जाती निज गावाला
जय जय विठ्ठल !
जय हरी विठ्ठल !
जय जय विठ्ठल !
जय हरी विठ्ठल !
विठ्ठला मायबापा !
तुज नमो! तुज नमो !
तुज नमो! तुज नमो ! तुज नमो !
— लेखन : मधुकर ए. निलेगावकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
पंढरीच्या वारीचे यथार्थ वर्णन आपल्याला वारीच्या वातावरणात घेवून जाते. वाचता वाचता आपणही जय विठ्ठल जय हरी विठ्ठल कधी मनोमन बोलू लागतो हे समजत नाही. माऊलींना पंढरीनाथ भेटल्यावर जणू आपल्यालाच तो दयाघन भेटल्याचा आनंद होतो.
खूप छान निलेगावकर.
प्रवीण देशमुख