‘तुझ्यामुळेच मी इथे…. विजयामुळे रामाचे वैभव…’ पत्नीबद्दल असे उद्गार काढणारी व्यक्ती म्हणजे गुरुवर्य राम शेवाळकर! या वाक्यातून विजयाताईंचे राम शेवाळकर ह्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान होते याची कल्पना येते.
दाते कॉलेजमध्ये राम शेवाळकर प्राध्यापक होते. परीक्षा सुरू होती. शेवाळकर एका खोलीत परीक्षक म्हणून काम करत होते. विद्यार्थी आपापल्या उत्तरपत्रिका लिहिण्यात मग्न होते तर पर्यवेक्षक शेवाळकर खुर्चीवर बसून स्वतःचा एम.ए.चा अभ्यास करत असताना अचानक त्यांच्या कानावर ‘घट डोईवर, घट कमरेवर’ हे शब्द पडले. कदाचित ते गीत गुणगुणत असलेल्या विद्यार्थीनीची उत्तरपत्रिका सोडवून झाली होती आणि सर्व प्रश्नांची उत्तरे आली असल्याने ती खुशीने ते गीत पुटपुटत होती. शेवाळकर यांनी तो आवाज कुठून येतोय ह्यांचा अंदाज घेतला आणि दुसऱ्याच क्षणी त्यांची नजर एका मुलीवर स्थिरावली आणि त्यांच्या ओठावर नेहमीचे सुपरिचित हास्य आले. ते पाहून तिकडूनही स्मित झळकले. शेवाळकर तो क्षण वर्षानुवर्षे स्मरणात ठेवून सांगतात, ‘त्या क्षणाने आमूलाग्र बदल झाले.’ गाणं गुणगुणत असलेली विद्यार्थीनी होती… विजयाताई !
कळत नकळत दोघांमध्ये एकमेकांबद्दल वेगळीच भावना निर्माण झाली परंतु कुणी प्रकट करीत नव्हते. काही दिवसांनी ती अव्यक्त प्रेमाची गोष्ट विजयाताई यांचे मामा अच्युतराव यांच्या लक्षात येताच त्यांनी नारायणराव नावाच्या एका गृहस्थाला सरळ शेवाळकरांकडे पाठवले. नारायणरावांनी कोणतीही प्रस्तावना न करता सरळ विषयाला हात घालताच शेवाळकर सुरुवातीला गोंधळले परंतु लगेच सावरून म्हणाले, “तिकडून काही हरकत नसेल तर मी तयार आहे.” तरीही एक वर्ष परिस्थिती जैसे थे होती. शेवाळकर सुवर्णपदकाचे मानकरी होत एम.ए. झाले. दोघेही दररोज महाविद्यालयात आणि वर्गात भेटत परंतु त्यांच्या एकूण हालचालीवरून तसे काही असेल असे कुणालाही वाटत नव्हते. शेवटी सौ. दातेबाई यांनी पुढाकार घेतला. त्यांनी विजयाताईला घरी बोलावून सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे शेवाळकर यांचे घराणे कीर्तनकार असल्यामुळे घरातील वातावरण धार्मिक ! आर्थिक परिस्थिती तोलामोलाची ! सारे ऐकून विजयाताईंनी त्यांचा निर्धार पक्का असल्याचे सांगितले. ही बाब शेवाळकर यांना समजताच त्यांनीही त्यांच्या घरी सविस्तर पत्र लिहून सारे काही कळवले तरीही विजयाताईंना आपल्या घरचे स्वीकारतील का नाही याबाबत ते साशंक होते. काही दिवसांनी खुद्द भाऊसाहेब यवतमाळ येथे आले. विजयाताई त्यांना भेटायला आल्या. त्यांनी भाऊसाहेबांना वाकून केलेला नमस्कार विजयाताईंवर झालेल्या संस्काराचे प्रतिक होता. भाऊसाहेबांनी आशीर्वाद देताना एकच प्रश्न विचारला, “केव्हा येणार ?” दोन शब्दातील पाच अक्षरे परंतु दोन प्रेमींच्या जीवनात जणू पंचप्राण फुंकले.
विजयाताईंच्या घरी मात्र काहीसे साशंक वातावरण होते कारण विजया यांचे माहेर तसे सुधारलेल्या विचारसरणीचे होते तर शेवाळकर घराणे कर्मठ आणि सनातन विचारांचे होते. त्यामुळे त्या घरात असलेले धार्मिक वातावरण आणि सोवळे ओवळे विजयाला झेपेल का ही चिंता सर्वांना लागली होती. तशात राम शेवाळकर ह्यांनी एक सविस्तर पत्र विजयांना लिहिले. पत्र असावे तरी किती मोठे तर चक्क एक वही भरुन ! दोघेही तरुण होते, लग्न जवळपास ठरले होते परंतु पत्रात तारुण्यसुलभ भावना नव्हत्या तर पोक्त विचारांचे मुक्त चिंतन होते. वर्तमान आणि भविष्यात उद्भवू शकतील अशा संभाव्य परिस्थितीची जाणीव करून दिली होती. विजयाताई ह्यांनी त्या पत्राचा बारकाईने अभ्यास केला परंतु घेतलेल्या निर्णयावर त्या ठाम राहिल्या.
लग्न झाले. विजयाताईंनी शेवाळकर घराण्यात सून म्हणून प्रवेश करताना एक दृढनिश्चय केला की, परिस्थितीशी जुळवून घेत संसार करायचा आहे आणि शेवटपर्यंत त्या त्यांच्या निर्णयाशी प्रामाणिक राहिल्या. प्रसंग, परंपरा, वातावरण सर्वांशी संयमाने, शांतपणे जुळवून घेताना कुटुंबातील सर्वांचे मन आणि विश्वास जिंकला. त्याचा परिणाम असा झाला की, अल्पावधीत सासरे भाऊसाहेब सुनबाईचा सल्ला घेऊ लागले. सुरुवातीला राम शेवाळकर ह्यांचा पगार अत्यल्प होता. शिवाय व्याख्यान देण्यासाठी त्यांना गावोगावी जावे लागे. कुठे मानधन मिळत नसे तर कुठे मिळालेल्या मानधनापेक्षा केलेला खर्च अधिक असे तेव्हा विजयाताईंची होणारी तारेवरची कसरत त्यांनाच माहिती असायची. घरात सातत्याने लेखक, कार्यकर्ते ह्यांची वर्दळ असायची त्यांचा यथोचित पाहुणचार करताना विजयाताईंना वेगळाच आनंद मिळत असे. शेवाळकर प्राचार्य असताना त्यांनी एक निश्चय केला होता की, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना एक तारखेला पगार मिळायलाच हवा, भलेही शासकीय अनुदान अप्राप्त असले तरीही ! अनेकदा एक तारखेला सकाळी सकाळी शेवाळकर विजयाताईंच्या समोर उभे राहायचे, त्यांचा हेतू ओळखून विजयाताई स्वतःचे दागिने काढून देत आणि पतीचा प्रण खाली जाऊ देत नसत.
राम शेवाळकर चांगले खवय्ये होते. नानाविध पदार्थांची त्यांना आवड होती. थालीपीठ आणि पुरणपोळी हे त्यांचे आवडते पदार्थ ! विजयाताई पुरण जास्त करून ठेवत. पुढील काही दिवस दररोज कधी दूध, कधी तुप, कधी सायीसोबत पुरणपोळी खाताना पतीला होणारा आनंद पाहून विजयाताईंना मनस्वी समाधान लाभत असे. शेवाळकर ह्यांना विजयाताई ह्यांच्या हातचा स्वयंपाक अतिशय आवडत असे. घरी असलेला स्वयंपाकी सुट्टीवर गेला की, शेवाळकरांना खूप आनंद होई, कारण त्या काळात त्यांना विजयाताईंनी केलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद घ्यायला मिळत असे. ते नेहमी म्हणत, “मी खूप वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलांमध्ये जेवलो आहे. पण घरी आल्यावर तुझ्या हातचं साधं वरण, भात, कढी खाऊन जी तृप्ती मिळते, ती मला इतरत्र कुठेही मिळत नाही.” वक्ता दशसहस्त्रेषु असणाऱ्या पतीकडून होणारे कौतुक फार मोठ्या पुरस्कारासम ! खरेतर हे कौतुक नसे, खुश करण्यासाठी केलेले आर्जव नव्हते तर ते वास्तव होते कारण विजयाताई स्वयंपाक घरात गेल्या की, त्या अन्नपूर्णेच्या रुपात काम करत हे सर्वांना माहिती होते.
राम शेवाळकर ह्यांना व्याख्यानाच्या निमित्ताने अनेकदा विदेशात जावे लागे तेव्हा विजयाताई सोबत असत. तेव्हा अनेकदा तिथली मराठी माणसं उभयतांना आग्रहाने आणि हट्टाने आपल्या घरी मुक्कामाला नेत असत. तिथे पोळ्या बाहेरून विकत आणाव्या लागत. ही गोष्ट लक्षात येताच यजमानांच्या विरोधाला न जुमानता विजयाताई त्यांच्या स्वयंपाक घराचा ताबा घेऊन पोळ्या, फोडणीचा भात, पोळीचे तुकडे असे पदार्थ करून त्या घरातील सदस्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेत.
विजयाताई सांगत, “विकतच्या पदार्थांमध्ये काही मजा नाही आणि आम्हाला अशी शिकवण होती की, घरच्याला पुरवठा असतो, बाहेरच्याला पुरवठा नसतो. घरी जे केलेलं असतं ते आपण भरपूर करतो आणि खाऊही शकतो. विकतचे लगेच2 संपते आणि मनसोक्त खायला मिळत नाही.” किती वास्तव विचार आहेत हे !
विजयाताई शेवाळकर यांनी राम शेवाळकर ह्यांच्या जीवनात अनेकविध भूमिका सशक्तपणे साकारल्या आहेत. त्यात प्रामुख्याने मैत्रीण, पत्नी, मदतनीस, लेखनिक आणि अनेक प्रसंगी आई आणि शिक्षिकेची भूमिका बजावताना त्यांनी पतीला वेळोवेळी खंबीरपणे साथ दिली आहे. हे स्वतः राम शेवाळकर कबूल करत. परंतु विजयाताई कधीच स्वतःकडे श्रेय घेत नसत. त्या एवढेच म्हणत, ‘सुगंधी फुलासोबत राहून मी देखील सुगंधी फुलं झाले बरं का !’
राम शेवाळकर ह्यांच्या बायपास शस्त्रक्रियेचा प्रसंग ! लीलावती हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. प्रसंग गंभीर नि भावना ओल्या करणारा होता. विजयाताई अत्यंत बेचैन, अस्वस्थ होत्या. शस्त्रक्रिया सुरू असताना मन शांत राहावं म्हणून विजयाताई दवाखान्यातील सातव्या मजल्यावर श्री गजानन महाराजांची पोथी शांतपणे वाचत बसल्या, जवळपास साडेसहा तासानंतर शस्त्रक्रिया आणि पोथी दोन्ही एकदाच संपले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि विजयाताईंच्या आनंदाश्रूंचा बांध फुटला. त्यांना पितृतुल्य असणाऱ्या नानाजी देशमुख यांच्या गळ्यात पडून त्या रडायला लागल्या.
गुरुवर्य राम शेवाळकर ह्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी सोबत असूनही कोणतेही श्रेय स्वतःकडे न घेणाऱ्या विजयाताई ह्यांचे दि. दोन मे रोजी दुःखद निधन झाले. योगायोग असा की, तीन मे, हा राम शेवाळकर ह्यांचा स्मृतिदिन आणि दोन मे रोजी विजयाताई हे जग सोडून गेल्या. विधिलिखित अंतिम सत्य ! विजयाताईंना भावपूर्ण आदरांजली !
— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
शेवाळकर सरांची हृदयाला भिडणारी जीवनकहाणी.