जंगल मंगल विद्यापीठ : नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण
भारतात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सालीच आले. पण कोरोना संकटामुळे त्याची अम्मल बजावणी इतर विद्यापीठात लांबली. अजूनही दर महिन्या आड केवळ सेमिनार वर्कशॉप आयोजित करणे, अन् अडचणीचा पाढा वाचत कधी सरकारला तर कधी कुलगुरूंना दोष देत बसणे यापेक्षा फारशी काही प्रगती झालेली दिसत नाही. अनेक जणांनी तर मूळ धोरणाचे डॉक्युमेंट वाचले देखील नाही.
या पार्श्वभूमीवर जंगल मंगल विद्यापीठाने मात्र या धोरणाची पुरेपूर अम्मलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ कागदावर न राहता त्यातील सर्व मुद्दे, नीती नियम समजून घेत प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या देखील निश्चित करण्यात आल्या.
राज्यपाल हत्ती यांनी त्याबाबत कुलगुरू सिंह, उप कुलगुरू वाघ, अधिष्ठाता म्हैस अन् कुलसचिव गाय यांना बोलावून हे नवे उपयोगी धोरण सर्व प्राणी, पक्षी, जलचर सर्वासाठी कसे उपयोगाचे ठरेल, तसेच जंगलातील नव्या उमलत्या पिढी साठी त्याचा किती लाभ होऊ शकेल याविषयी सर्वांचे चिंतन शिबिर घेतले.
वानर हा पूर्व मानव वंशज असल्या मुळे या धोरणातील महत्वाचे मुद्दे समजून घेत त्यासाठी सर्व प्राणीमात्रांना कसे सामावून घेता येईल यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली. यात सर्व वर्गाना सामावून घेत जंगल मंगल विद्यापीठाने स्वतःचे असे नवे शैक्षणिक धोरण कार्यान्वित करण्या साठी पाच वर्षाचा कृती आराखडा तयार केला.
या कृती आराखड्याला “प्रकल्प नियोजन म्याट्रीक्स” असे नाव देण्यात आले. ही एक अभिनव योजना होती. त्यात कुणी वरून आदेश देण्या ऐवजी आपण प्रत्येक जण काय करू शकतो, या धोरण अम्मलबजावणीसाठी नेमके काय योगदान देऊ शकतो हे ठरवायचे होते.
केवळ कृती ठरवून उपयोग नसतो. त्या कृतींचे अंतिम उद्दिष्ट काय, ते सफल झाले की नाही हे ठरविण्याचे परिमाण काय, त्याचा नेमका कालावधी काय, अन् त्याच्या परिपूर्ती ची टेस्ट, म्हणजे परीक्षा काय हेही ठरविणे गरजेचे असते. एरवी धोरणे, निर्णय केवळ कागदावर राहतात. फायली मध्ये धूळ खात पडून असतात.
तसेही जंगल मंगल विद्यापीठात परीक्षेला अवास्तव महत्व कधीच दिले गेले नाही. सगळे काही कृतीतून शिकत जायचे. आपण शिकले ते इतरांना शिकवीत जायचे. प्रश्न विचारायचे. शंका काढायच्या. आपण जे काही करतो, शिकतो ते कशासाठी, कुणासाठी हे आधी नीट समजून घ्यायचे. काही प्राणी पक्षी यांच्या सल्ल्यावरून या विद्यापीठाचे नवे धोरण हे सर्व समावेशक असावे यावर भर देण्यात आला. कारण इथे प्रत्येक वर्गाचे प्रश्न वेगळे, समस्या वेगळ्या. वाघ, सिंह, हत्ती अशा आक्रमक प्राण्याचे एकूणच वन्य जीवन वेगळे. तर मासे, बदक, हंस,यांच्या समस्या वेगळ्या. खाणे पिणे वेगळे. झाडावर उड्या मारणारी बंदरे, आकाशात उंच उंच भराऱ्या घेणारे गरुड, कावळे चिमण्या यांचे राहणीमान अगदीच भिन्न. याउलट सर्प, विंचू, मुंगूस, मुंग्या, मुंगळे यांची राहणी एकदम वेगळी..आता बदललेल्या जगात यांच्या समस्यात मानव प्राण्याने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणिकच भर घातली.
आता हेच बघाना माणूस प्राणी स्वतःच बातम्या देतो की, वाघ,बिबट्या शहरात शिरला ! कबुतर मंडळींनी मोठमोठ्या कॉलनीत घाण पसरविण्याचे कंत्राट घेतले. कोल्हे, बंदर, उंदीर, घुशी यांनी शेतकऱ्याच्या शेतात उच्छाद मांडला!पण हे करायला याच माणूस प्राण्याने अन्य प्राण्यांना भाग पाडले, याचा त्याला सोयीस्कर विसर पडतोय ! आणि यालाच म्हणतात, चोराच्या उलट्या…. तर असो. या माणूस प्राण्याने जंगलातला निसर्ग ओरबाडून ऋतू चक्र च बदलून टाकले. गायींना, म्हशी ला ही माणसे इंजेक्शन द्यायला लागली. प्राणी संहार करायला लागली. यातले धन दांडगे जंगलात येऊन आपल्यावर आक्रमण करायला लागले कायदा मोडून! कायद्याच्या न्यायाच्या कचाट्यातून कसे सुटायचे हे या भ्रष्टाचारी मानव समाजाला चांगले समजले आहे.
आपल्याला आनंदाने जगायचे असेल तर या राक्षसी मानव जातीला धडे शिकवावे लागतील. हे आपल्या नव्या शैक्षणिक धोरणाचे एक उद्दिष्ट असेल ! आपले पोटा पाण्याचे प्रश्न देखील आपल्याला यापुढे नवीन मार्गांनी सोडवावे लागतील. आपल्यालाही सवयी बदलाव्या लागतील. मानवाने प्रगती केली ती सहकार्याच्या भावनेतून. त्याची उद्योग क्रांती बघा.. कुठलाही उद्योग कुणा एकाच्या खांद्यावर उभा नसतो. त्याला हजारो कृतिशील, सृजनशील मेहनती हात लागतात. प्रत्येक उद्योगात हजारो, लाखो स्त्री पुरुषाचा सहभाग असतो. संशोधन अनेक जण, अनेक राष्ट्रे मिळून करतात.
आपण नाही म्हंटले तरी आपापल्या कळपापुरते मर्यादित राहतो. वाघ, सिंहांना मासे, साप, पक्षी यांचे प्रश्न माहिती नसतात ! बंदर, कोल्हे, उंट यांना कावळा चिमण्यांच्या, पोपट, मैना च्या अडचणी ची कल्पना नसते.
आता निसर्ग देखील बदलला आहे. ऋतू चक्राचे वेळापत्रक पार कोलमडले आहे. मुंग्या वारुळात अन्न कुठे कसे साठवतील ? आता त्यांना वाघ, सिंहाच्या गुहेत जागा द्यावी लागेल. नद्या, समुद्र पार दूषित झाले आहेत. तिथल्या जलचर प्राण्यांना शुध्द हवा, अन्न आपल्याला पुरवावे लागेल. आकाशात धुळीचे, धुव्या चे साम्राज्य आहे माणसाने निर्माण केलेले. पक्षी मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत हवेत. त्यासाठी आपल्याला नवे उपाय शोधावे लागतील. त्यासाठी ए आय सारखे नवे तंत्रज्ञान पण आपल्या जगाच्या संदर्भात, शोधावे, निर्माण करावे लागेल. आपले शिक्षण, आपला अभ्यासक्रम, आपले कृती आराखडे या दिशेने वाटचाल करतील .आपल्या प्राथमिकता या उद्दिष्टा प्रमाणे ठरतील.
बंदर, कोल्हे, उंट अन् इतर सहभागी सभासदाच्या सब कमिटीने तयार केलेला कृती आराखडा कुलसचिव गायीने तातडीने कुलगुरू सिंहाकडे पाठवला. त्यावर चर्चा होऊन उपकुलगुरू यांनी तो सिनेट मधून तातडीच्या बैठकीत एकमताने मंजूर करून घेतला. इतर विद्यापीठासारखी कसलाही गोंधळ, गाजावाजा न होता ही बैठक गंभीर वातावरणात पार पडली. या बैठकीत नव्या शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संबंधी सर्व निर्णयांना राज्यपाल हत्ती महोदयांनी बिना विलंब संमती देखील दिली.
दोन पायावर चालणाऱ्या माणसाच्या विद्यापीठांना चार पायांच्या जंगल मंगल विद्यापीठाने चांगलाच धडा शिकवला अशा ब्रेकिंग न्युज टिव्ही च्यानेलस वर झळकल्या. जंगल मंगल विद्यापीठाने देशातील इतर विद्यापीठांना एक नवा आदर्श घालून दिला ! आता शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव कुलगुरूंना काय जाब विचारतात हा प्रश्न हातात दंडुका घेऊन व्हिडिओ बाईट घेणाऱ्या पत्रकारांना पडला ! नव्या वर्षाच्या प्रारंभीच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा संबंधी बाजी मारून जंगल मंगल विद्यापीठाने A++ + हा विशेष दर्जा मिळवला !!
— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. हैदराबाद
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.