भाग – २ : “साने गुरुजींच्या मनातील आदर्श शाळा“
प्रत्येक शिक्षकाच्या मनात एक आदर्श शाळेचे चित्र असते. गुरुजींनी ते चित्र कसे रंगवले होते याची मोठी रंजक माहिती हाती आली.
स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली तरी या देशातील शिक्षणाची दुर्दशा काही संपली नाही. बजेटमध्ये शिक्षणाला महत्व कमी, सर्वात शेवटचे स्थान. आता तर महाराष्ट्र शासनाने हजारोंवर शाळाच कायमच्या बंद केल्या आहेत. या सर्व गदारोळात मूळ शिक्षणाचा आत्माच हरवला आहे. शिक्षणाचा बाजार झाला आहे. हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी मौलिक आणि उच्च शिक्षणापासून वंचित रहात आहेत. त्यांच्या मनातील समाजाप्रती असलेली घृणा गुन्हेगारीत परावर्तीत होत आहे. या विषमतेमुळे समाज-देश एकसंघ राहण्यास पोषक वातावरण नाही. असा असणार आहे कां आपला भविष्यातील बलसागर भारत ?
शिक्षण व्यवस्था इतकी खिळखिळी झालेली असतांना भारत महासत्ता होणे ही कल्पनाच हस्यास्पद ठरेल. या परिस्थितीत साने गुरुजींच्या मनातील आदर्श शाळा जर खऱ्या अर्थाने अस्तित्वात आल्या तरच हा विशाल भारत देश समृद्ध होईल. कारण एखाद्या राष्ट्राची सर्वांगीण प्रगती तेथील नागरिकांच्या शिक्षणावर आधारित असते. आणि शालेय शिक्षण घेणारी मुले म्हणजे तर त्या देशाचे भविष्य असते.
१५ जानेवारी १९४५ रोजी साने गुरुजींची नाशिकच्या सेन्ट्रल जेल मधून सुटका झाली. सुटल्यावर नाशिकमध्ये आयोजित एक दोन सभाना संबोधित करून गुरुजी ठाणे जिल्ह्यातील बोर्डी गावी गेले. तेथे त्यांचे थोरले बंधू गजानन दादा अर्धांग वायूने आजारी होते. गुरुजींनी त्यांची जवळपास दोन वर्षे मनोभावे सेवा केली. या काळात गुरुजींचे वाचन व लेखन सतत चालूच होते. कोणत्याही कामात असले तरी गुरुजी सतत विद्यार्थी , शाळा आणि शिक्षण पद्धती यावर सखोल विचार करत असत.
सानेगुरुजी एक उत्तम निबंधकारही होते. त्यांनी “माझ्या मनातील आदर्श शाळा “ या विषयावर एक दीर्घ निबंध लिहिला. गुरुजींच्या स्वप्नातील शाळा म्हणजे त्यांना अति प्रिय असलेल्या “आंतरभारती” संकल्पनांचा मुळ गाभा होता. हा निबंध दीर्घकाळ दुर्लक्षित आणि अप्रकाशित राहिला. परंतु गुरुजींच्या साहित्याचे अभ्यासक डॉ.पितांबर सरोदे यांनी हा निबंध पुस्तकरूपात २००१ साली प्रकाशित केला. त्यात गुरुजी अतिशय विनम्र भावनेने लिहितात …
“He who opens a School closes a Prison“ Victor Hugo चे हे विचार मला फार प्रिय आहेत. मी काही शिक्षण शास्त्राचा व्यासंग केला नाही की शिक्षण शास्त्रातील अमुल्य ग्रंथांचा अभ्यासही केलेला नाही. परंतु जो काही काळ मी शाळेत शिकवत होतो आणि पूर्वी मी जेंव्हा शिकत होतो तेंव्हा सतत विद्यार्थी – शिक्षक – शाळा – आणि शिक्षण पद्धती यावर विचार करीत असे आणि तेच विचार मी या निबंधात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
शिक्षणाचा अर्थ : शांततेच्या किंवा अशांततेच्या काळात आपले वैयक्तिक व सामुदायिक कर्तव्य सचोटीने, चातुर्याने आणि उदात्त रीतीने पार पाडण्याचे सामर्थ्य ज्यामुळे प्राप्त होते ते शिक्षण ! मनुष्य जातीच्या समुन्नतीसाठी आपण जे सामर्थ्य मिळवतो ते शिक्षण ! मुलांची मनःप्रवृत्ती आरंभी सद्गुणांकडे नंतर उद्योगाकडे व शेवटी ज्ञानार्जनाकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय.
इंग्रजीतील “Education” या शब्दाचा धात्वर्थ पाहिला तर मानवी सुप्त शक्ती प्रकट करून दाखवणे हा शिक्षणाचा उद्देश असा अर्थ होतो. पूर्वीच्या काळी शिक्षण या शब्दाला “विनय” किंवा “विनयन” हा शब्द होता. शिक्षणास “विनय” हा शब्द जास्त योग्य आहे.“ विनी “ म्हणजे विशिष्ठ पद्धतीने नेणे. ज्या प्रमाणे एखाद्या बीजास अंकुर फुटून त्याचा सुंदर वृक्ष व्हावा यासाठी माळ्याकडून विशिष्ठ तऱ्हेने, विशिष्ठ खताने, विशिष्ठ जमिनीतच, विशिष्ठ पाणी देण्याच्या पद्धतीने त्या बीजाची जोपासना करावी लागते, त्याप्रमाणे विद्यार्थ्याच्या मनाला – त्याच्या मनात बीज रुपाने असणाऱ्या अनेक शक्तींना – गुणांना विशिष्ठ तऱ्हेने वाढवणे याचा अर्थ “विनय” म्हणजेच “शिक्षण”.
शाळा व शाळेची जागा : शाळा जेथे असेल ती जागा शहराच्या मध्यभागी दाट वस्तीत जेथे नानाप्रकारचा गोंगाट असेल अशा ठिकाणी नसावी. जागा रमणीय, सुंदर, सुखकर परिणाम होईल अशी परिस्थिती तेथे असावी. शाळेची जागा आणि शहरातील वस्तीची जागा यांच्या तुलनेने, डोळ्यात भरणाऱ्या फरकाने, मोकळी व मुबलक हवा, प्रकाश, टापटीप, यांचे महत्व मुलांच्या मनावर बिंबले जाईल व त्याप्रमाणे ते आपापली राहण्याची ठिकाणे – वस्ती पुढे सुधारतील.
शाळेची इमारत : शाळेची इमारत मोठी सुंदर असावी, शाळेतील वर्ग, खोल्या स्वच्छ हवेशीर असाव्या, प्रत्येक वर्गात सुंदर निसर्ग चित्रे, सुवाक्षारात लिहिलेल्या अर्थपूर्ण म्हणी आणि सुविचार असावे, प्रत्येक वर्गात एक फळा, घड्याळ, थर्मामीटर असावे. शाळेचा मुख्य दिवाणखाना नीट सजवलेला ऐतिहासिक प्रसंगाची व निसर्गातील अद्भुत चमत्कारांचे देखावे, निरनिराळे नकाशे, तक्ते यांनी युक्त असावा. जवळ जवळ ८० वर्षांपूर्वी साने गुरुजींच्या कल्पनेतील शाळा नदीकिनारी अथवा समुद्र किनारी असावी. परिसरात नैसार्गीक शोभा नसेल तर झाडे लावून सुंदर बाग फुलवून परिसर नयनरम्य करावा असे गुरुजी म्हणत. “शुचिर्भूतपणा देवत्वाच्या मोलाचा गुण आहे” हा सुविचार केवळ न शिकवता विद्यार्थ्यांनी अंगीकारावा असे त्यांचे म्हणणे असे.
शिक्षक : शिक्षक विद्याव्यासंगी उत्साही असावे. शिक्षकास आपण वृद्ध झालो असे कधी वाटता कामा नये, तो नेहमी मनाने तरुण, निरलस, उत्साह्मुर्ती, चपळ, तेजस्वी, हजरजबाबी असावा. शिक्षक आपल्या विषयात पारंगत – प्रवीण तर असावाच परंतु त्याला इतर सर्व विषयांचे ज्ञान असणे गरजेचे. विद्यार्थ्यांचा “शिक्षक सर्वज्ञ आहे” असा समज असतो. त्यांचा भ्रमनिरास होऊन त्यांच्या मनातील गुरुजींचे – शिक्षकाचे आदरणीय स्थान कधी ढळू नये असे साने गुरुजींचे विचार होते. त्यांच्याच शब्दात शिक्षक म्हणजे “ विद्यार्थ्यांची मने फुलवणारा माळी, देशप्रेमी, देशाभिमानी, संवेदनशील, कुशल समन्वयक, प्रभावी संघटक.“
अभ्यासक्रम : स्वतःचे व समाजाचे कल्याण करण्यास लायक असलेले विद्यार्थी आपल्या शाळेतून बाहेर पडावेत असा अभ्यासक्रम असावा. त्यात व्यवसायशिक्षण, मूल्यशिक्षण, आणि ज्ञानार्जन या तिन्ही गोष्टींचा अद्भुत समन्वय असावा. प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करणारा, कार्यक्षम, असा जागरूक आणि आदर्श नागरिक या शिक्षणातून आपल्याला निर्माण करता यायला हवा असा अभासक्रम साने गुरुजींच्या मनात होता. गुरुजी म्हणत “ प्रत्येक राष्ट्राला स्वतःच्या राष्ट्रीय शिक्षण पद्धतीची आवश्यकता असतेच. आपल्या राष्ट्राचे जीवन विषयक तत्वज्ञान, सांस्कृतिक परंपरा, ध्येये, आदर्श, मुल्ये, गरजा, सामाजिक समस्या या सर्वांचे नेमके भान ठेऊन राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना निश्चित करायला हवी . ज्या प्रांतात शाळा असेल त्या प्रांताचा भूगोल आणि इतिहास त्या शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्णतः ज्ञात असावा मुखोदगत असावा. ” आज अशी परिस्थिती आहे की इंग्लंड – अमेरिकेचा इतिहास भूगोल जाणणारे तरुण आपल्या देशाचा – जवळपासच्या प्रदेशाचा खराखुरा इतिहास जाणत नाहीत. आज संपूर्ण देशात एक समान अभ्यासक्रम आणि एक शिक्षण बोर्ड असायला हवा.
शिक्षणाचे माध्यम : माध्यम भाषा, राष्ट्रभाषा, संपर्क भाषा, आणि संस्कार भाषा अश्या चार सूत्रांनी साने गुरुजींनी स्वतःची शिक्षण संकल्पना निबद्ध केली होती. त्यातून शिक्षणाची दोन्ही उद्दिष्टे – मनाची प्रगल्भता आणि अर्थार्जन – साधता येतात असे त्यांचे मत होते. थोडक्यात याचा अर्थ असा की महाराष्ट्रात सर्व शालेय शिक्षण मातृभाषेतून म्हणजे मराठीतून असावे, राष्ट्रभाषा म्हणजे हिंदी भाषेचे सखोल ज्ञान असावे, संपर्क भाषा म्हणजे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावे, आणि संस्कार भाषा म्हणजे संस्कृत भाषा प्रत्येकाला अवगत असावी.
शिस्त आणि सुधारणा : सानेगुरुजी म्हणतात “ शाळेत शिस्त राखण्यासाठी छडीचा उपयोग होता होईतो करण्यात येणार नाही. मुलाना शिक्षा देऊन शिस्त लावण्याऐवजी बक्षिसे देऊन सुधारावे. शाळेची शिस्त राखण्यासाठी शिक्षा Vindictive नसाव्यात, Reformative असाव्यात. शिक्षा देतांना विद्यार्थ्याचा स्वभाव, त्याची नेहमीची वर्तणूक, कौटुंबिक परिस्थिती हे सर्व लक्षात घ्यावे. कठोरपणा पेक्षा मृदुत्वाने पुष्कळ कामे होतात.”
या सर्व मुद्यांबरोबर शिक्षकांचे सहजीवन, भाषेचा अभिमान, ऐच्छिक विषय, शास्त्रज्ञान, पंचेन्द्रीयांचा उपयोग, गुणांचा गौरव, शाळेचे व्यवस्थापन, नियामक मंडळ, सर्वांगीण विकास, शाळेची योग्य वेळ, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा प्रणाली, वसतिगृह इत्यादी महत्वाच्या मुद्यांवर साने गुरुजींचे विवेचन आजही मार्गदर्शक आहे.
क्रमशः
— लेखन : आशा कुलकर्णी. विलेपार्ले, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800