Wednesday, February 5, 2025
Homeलेखसायबर गुन्हे कसे टाळावे ? - 3

सायबर गुन्हे कसे टाळावे ? – 3

आभासी दुनियेत सावध रहा…!”

आपण सायबर गुन्हेगारीचा विचार करताना समाज माध्यमांचा गैरवापर हा लक्षात ठेवला पाहिजे. समाज माध्यमांचा वापर करून महिलांना आर्थिकदृष्ट्या फसवले तर जातेच सोबतच अनेक प्रकरणांमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होताना आपणास दिसते.

“वय वेडं असतं, असं म्हणतात .पण आपण वेड होऊ नये” हे महत्त्वाचं. इंस्टाग्राम वर ओळख झाली आणि त्या व्यक्तीने भेटायला बोलावलं म्हणून भेटायला गेले आणि अत्याचार झाला अशा तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये वारंवार होत आहेत. तसेच तोच प्रकार फेसबुकबाबत सांगता येईल. हे असं का घडतं ? याचा सर्वांनीच विचार करावा.

भाजी आणायला गेल्यावर साधी कोथिंबीर जुडी घेताना आपण पारखून घेतो तर असे मित्र जोडताना आपण पडताळणी, खात्री का नाही करून घेत ? इंटरनेटची दुनिया ही आभासी जग आहे. त्यात प्रत्येक व्यक्ती खरी माहिती देईलच याची खात्री नाही. त्यातही गुन्हेगारी वृत्ती असणारे तर दंडुका खाल्ल्याशिवाय खरं बोलत नाही मग ते या आभासी जगात खरी माहिती देणारच नाही. त्यामुळे आपण सतर्क रहाणे हाच चांगला मार्ग आहे.

चित्रपटातलं ते गाणं आठवतच असेल की ‘लाख छुपाओ छुप ना सकेगा असली नकली चेहरा’ अर्थात मनातले भाव चेहऱ्यावर उमटल्याशिवाय राहत नाहीत. आभासी जगात तर सारं ‘छुपाने’ ची अर्थात लपवायची पूर्ण मुभा आहे. इथं कुणी आधार कार्डच्या आधारे आपलं खातं उघडत नाही. त्यामुळे पावला पावलावर फसवणुकीचा धोका असतो.

वाढती सायबर गुन्हेगारी लक्षात घेऊन आता देशात सायबर गुन्ह्यांची नोंद सुरू झाली आहे .सोबतच महाराष्ट्र पोलिसांनी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे देखील प्रत्येक जिल्ह्यात सुरू केलेले आहे. सायबर गुन्ह्यांचा शोध घेण्याचे विशेष प्रशिक्षण पोलिसांना देत आहे. अर्थात हा गुन्हा नोंदवल्यावर आपण सतर्क राहिलो तर गुन्हा घडणार नाही हे महत्त्वाचं.
सायबर गुन्ह्याची वाढ अतिशय धक्कादायक आहे. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अनेक प्रकरणी पैसे परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.

सायबर गुन्ह्याची तक्रार आपल्याला सायबर पोलीस ठाण्यात करता येते .तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हा नोंदणी पोर्टलवर देखील आपण घरबसल्या तक्रार नोंदवू शकता https://cybercrime.gov.in हा त्या पोर्टलचा पत्ता आहे.
सायबर गुन्ह्याचा तपास करण्यात मदत होईल अशी अद्ययावत नॅशनल सायबर फॉरेन्सीक लॅब (तपास) दिल्लीत सुरू करण्यात आलेली आहे.
देशपातळीवर जुलै 2024 पर्यंत 7.5 (साडेसात) लाख तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्वाधिक तक्रारी आर्थिक फसवणुकीच्या होत्या.

आपण लक्षात ठेवा सायबर गुन्हे आपणास 1930 या टोल फ्री क्रमांक वर देखील नोंदवता येतील पण तक्रार करायची वेळच येऊ नये हे उत्तम.

क्रमशः

— लेखन : प्रशांत विजया अनंत दैठणकर. बीड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी