अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांत आणि छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण आयोजित एक दिवसीय महिला साहित्यिक संमेलन २०२४ नुकतेच नवी मुंबईत संपन्न झाले. या संमेलनाच्या निमित्ताने “साहित्यातून महिलांचे सक्षमीकरण” या विषयावर आयोजकांनी लेख स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत आपल्या न्यूज स्टोरी टुडे च्या लेखिका – कवयित्री सौ. वर्षा भाबल यांच्या लेखास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार, प्रशस्तीपत्र नि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.तर दुसऱ्या सत्रात काव्य सादरीकरण करण्याची संधी त्यांना मिळाली.
सौ वर्षा भाबल यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
त्यांचा पुरस्कार प्राप्त लेख पुढे देत आहे.
– संपादक
स्त्रीवरील अत्याचार, त्यांना मिळत असणारी निकृष्ट वागणूक, हे सर्व पाहून वाटते की, या राष्ट्रात तिने जन्म घेऊच नये, घेतला तर तिने सुंदर असू नये, सुंदर असेल तर तरुण होऊ नये, तरुण असेल तर दरिद्री असू नये आणि हे सारे असले तरी उघड्यावर अब्रूचे रक्षण करीत भटकण्याचे दुर्दैव तरी तिच्या नशिबी येऊ नये.
महिलांना हक्क आणि समानतेची संधी मिळण्यासाठी महिला सक्षमीकरणच महत्त्वाची भूमिका बजावू शकते. कारण महिला सक्षमीकरण महिलांना केवळ उदरनिर्वाहासाठीच तयार करत नाही तर स्त्रीचेतना जागृत करून, सामाजिक अत्याचारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तयार करते. महिला सक्षमीकरणाचे अनेक फायदे महिलांना होतात, होतील व होत राहतील. सक्षमीकरणाशिवाय स्त्रीला, देश आणि समाजात कदापि, तिचे स्थान मिळू शकत नाही. महिला सक्षमीकरणाशिवाय ती, जुन्या परंपरा आणि वाईट गोष्टींना सामोरे जाऊ शकत नाही. बंधनात अडकल्याने ती स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही. महिला सक्षमीकरणअभावी तिला, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि तिच्या निर्णयांवर अधिकार मिळू शकत नाही.
महिला सक्षमीकरणासाठी संसदेने पारित केलेले कायदे व सरकारी योजना आणि आरक्षणामुळे तसेच बदलत्या काळानुसार, आधुनिक युगातील स्त्रिया लिहिण्यास व वाचायला मोकळ्या झाल्या आहेत. शिक्षण व रोजगारी प्रशिक्षण घेऊ लागल्या आहेत. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होऊ लागली आहे. ती स्वतःचे निर्णय घेत आहे. घराचा उंबरठा ओलांडून, राष्ट्रासाठी व स्व:उदरनिर्वाहासाठी बाहेर पडू लागली आहे. आजची स्त्री घर आणि संसाराची जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने पेलवू लागली आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे.
राष्ट्राची सामाजिक व आर्थिक प्रगती, महिलांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीवर अवलंबून आहे. महिला सक्षमीकरण महिलांना बळ देते. त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यास मदत करते. सर्वांनी महिलांचा आदर केलाच पाहिजे. त्यांना प्रगतीची संधी दिलीच पाहिजे. एकविसावे शतक हे स्त्रीच्या जीवनातील आनंदाचे शतक आहे. आजची स्त्री सक्रिय व जागृत झाली आहे. म्हणूनच कुणी तरी म्हटले आहे, ‘जेव्हा एखादी स्त्री, तिच्यावर लादलेल्या बेड्या आणि बंधन तोडायला लागते, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तिला थांबवू शकत नाही’
स्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते. मानव जातीचे अस्तित्व स्त्रीपासून आहे, असे मानले जाते. महिला सक्षमीकरणाचा अर्थ या निर्मितीच्या शक्तीचा विकास आणि परिष्कृत करणे आणि तिला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, स्वातंत्र्य, श्रद्धा, धर्म आणि उपासना अश्या संधीची समानता प्रदान करणे होय.
आजच्या आधुनिक काळात महिला सक्षमीकरण हा विषय चर्चेचा झाला आहे. आपल्या आदिग्रंथांमध्ये स्त्रियांचे महत्त्व लक्षात घेऊन असे म्हणतात की, “यंत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता” याचा अर्थ, जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवता वास करतात.
महाराष्ट्रातील पहिला शास्त्रशुद्ध स्त्रीमुक्तीचा विचार महात्मा फुले यांच्या विचारात, साहित्यात व कृतीमध्ये प्रकट झाला. म्हणूनच म्हणतात….
‘पहिले नमन करू ज्योतिबाला,
ज्याने स्त्री मुक्तीला जन्म दिला’
सर्व स्त्रियांचे दुःख एकाच साच्यात मोजमाप करणे चुकीचे वाटते. स्त्रीवाद संकल्पना ८०-९० च्या दशकातील आहे. मराठी
वाङ्ममयातील स्त्रीवादाची परंपरा, संत मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई यांच्यापासूनच सुरू झाली. एकोणविसाव्या शतकात ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे यानंतर पंडिता रमाबाई, काशीताई कानिटकर, गिरजा केळकर, रमाबाई रानडे या थोर स्त्रियांनी त्यांच्या लेखनातून व कृतीतून, स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, विधवांच्या समस्या, केशवपन या समस्यांना वाचा फोडली. सन १८३७ मध्ये मराठीतील पहिली कादंबरी “चंद्रप्रभावर्णन” लिहिण्याचा मान, साळूबाई तांबेकर यांच्याकडे जातो. १९ व्या शतकात स्त्रीसमस्यांची पहिली सामाजिक कादंबरी “यमुना पर्यटन” ही बाबा पदमजी यांनी लिहिली. अनेक पुरुष लेखकांनीही स्त्रीसमस्यांचा, आपल्या साहित्यातून वेध घेतला. ह. ना. आपटेंनी मराठी कादंबरीला स्त्री प्रश्नाकडे वळविले. वा.म. जोशी, ग.त्र्य. माडखोलकर, वि. वि. बोकील यांनीही स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमधून, स्त्रियांचे आंतरिक विश्व उलगडण्याचा प्रयत्न केला.
साहित्यातून महिला सक्षमीकरण या विषयावर लिहिताना, मला अण्णाभाऊ साठे यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. साहित्यातून परिणामकारकरीत्या स्त्रीचे दुःख मांडणाऱ्या साहित्याला, स्त्रीवादी विचारांची नवी वाट निर्माण करून, स्त्रीला आपल्या दास्याची, दैन्याची जाणीव करून देणारे, तसेच स्त्रीला स्वतःच्या अस्तित्वाविषयी, विचार करू लावणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे, यांच्या पस्तीस कादंबऱ्यांपैकी सोळा कादंबऱ्या नायिका प्रधान म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या या साहित्यातून गावकुसाबाहेरील व आतील स्त्री जीवनाचा संघर्ष, समस्या स्त्रीप्रधान कादंबरीत मांडल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक स्त्रीप्रधान कादंबरीतून स्त्रियांचे विविध प्रश्न त्यांनी रेखाटले. त्यांच्या नायिका दुर्दम्य, साहसी आहेत. ‘त्या रडत नाहीत तर लढतात.’ प्रत्येक संकटातून मार्ग काढतात. त्यांच्या नायिकेत ‘आत्मनिर्भरता’ दिसून येते. त्यांच्या साहित्यातून रणमर्दानी, धाडसी, शीलसंपन्न स्त्री दिसून येते. त्या कुटुंबवत्सल, पुरोगामी विचाराच्या, स्वाभिमानाने जगणाऱ्या, स्वतः जगणाऱ्या व दुसऱ्यांना जगण्याची हिंमत देणाऱ्या दिसतात.
साहित्य ही धारदार तलवार आहे. स्त्रीच्या अंतरमनात घुसमटत असलेल्या तिच्या किंवा ती पाहत असलेल्या समाजातील काही स्त्रीव्यथा, आजची सुशिक्षित नारी साहित्यासारख्या धारदार लेखणीने एका कोऱ्या कागदावर उमटवू शकते. साहित्याचे अनेक प्रकार आहेत. जसे की ललित काव्य, गझल, चारोळी, भावगीत काव्य, अभंग, कीर्तन आटोळी, ओवी अश्या काव्यरचनेचा वापर करून आपण महिला, आपले मनोगत मांडू शकतो. तर काही लेख लिहिण्याचे सातत्य ठेवून, आपण आपल्या मनातील स्त्रीप्रति खूपश्या गोष्टी लिहू शकतो. आजकाल वर्तमानपत्र हे प्रसार माध्यम तसेच पोर्टल माध्यम, सतत तुमच्या आमच्या सर्वांच्या हातात असणारा भ्रमणध्वनी, अश्या विविध माध्यमाद्वारे आपले साहित्य विश्वाच्या कानाकोपऱ्यात पोहचू शकते. आजच्या साक्षर महिलांपर्यंत हे संदेश नक्कीच पोहचतात. माझेच उदाहरण घ्या ना ! मला लेखनाची आवड असल्याने, निवांत वेळेचा उपयोग करून मी माझे आत्मकथन पुस्तकरूपात आणले. कित्येकांना भेटरूपात माझी पुस्तके दिली. तर शाळा आणि महाविद्यालयातील वाचनालयात ठेवण्यासाठी दिली. माझ्या पुस्तकातून, प्रेमविवाहानंतर होणारे घटस्फोट थांबावेत, हा स्त्रीचा नाजूक विषय मांडला आहे. साहित्यातून स्त्रीच्या नाजूक भावना सखोल मांडणे नि त्या सर्वांसमोर आणणे, हाच उद्देश्य महत्वाचा आहे, असे मला वाटते. स्त्रीमधील अबलापणा समूळ नष्ट व्हावा नि सबलापणा यावा, हेच साहित्यातून महिलांचे सक्षमीकरण होय.
अशा साहित्याच्या वाचनातून प्रत्येक महिला स्वतःमध्ये स्व:सामर्थ्याची जाणीव निर्माण करू शकतील. स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस दाखवू शकतील. शीलरक्षणासाठी वाटेल त्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकतील. अन्याय व करमणुकीविरुद्ध बंड करू शकतील. गुलामगिरीची बंधने झुगारून देऊ शकतील. स्वातंत्र्य व्यक्तिमत्त्वाच्या अनिष्ट रूढी, परंपरांना नाकारू शकतील. अन्यायाचा प्रतिकार करण्याची शक्ती महिलांमध्ये जागृत होऊ शकते.
सक्षमीकरण ! सक्षमीकरण ! म्हणजे काय ?
तर दुसरे-तिसरे काही नसून, मैत्रिणींनो ! अण्णाभाऊ साठेंच्या स्त्रीप्रधान कादंबऱ्या आवर्जून वाचा आणि स्वतः सक्षम व्हा. साहित्यातून स्वतःला आणि इतर महिलांना, विविध पर्यायातून, परिस्थितीतून विचारशील व निडर बनवा. स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवा. लेखन परंपरेला उजाळा द्या.
अन्यायाला न घाबरता जीवन व व्यवस्थेशी देणाऱ्या झुंजेला लेखणीचे हत्यार करा. शब्दांना शस्त्राचे रूप द्या. स्त्री-पुरुष समानतेचा आपल्या साहित्यातून सतत आग्रह धरा.
उचला लेखणी
मांडा विचार
उघडा वाणी
नको आता माघार
— लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल. जुईनगर, नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
धन्यवाद ! पूर्णिमा.
लेख चांगला आहे, प्रत्येक स्त्रीने वाचावा, विचार करावा असा आहे