Friday, December 27, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : ५८

साहित्य तारका : ५८

कथनात्म साहित्यात केवळ स्त्रियांच्याच लेखनात नव्हे तर एकूण मराठी साहित्यात अत्यंत महत्त्वपूर्ण लेखन करणा-या प्रसिद्ध लेखिका म्हणजे सानिया होत.

सानिया या आगळ्यावेगळ्या टोपणनावाने लेखन करणाऱ्या मराठीतील लेखिका सुनंदा कुलकर्णी बलरामन यांची आज ओळख करून घेऊया…

मराठी साहित्यात सिद्धहस्त लेखिका म्हणून ओळखल्या जाणा-या पूर्वाश्रमीच्या सुनंदा कुलकर्णी विवाहानंतर सुनंदा कुलकर्णी-बलरामन पण सानिया या टोपण नावानेच सारे लेखन करणा-या सानिया यांचा जन्म १० नोव्हेंबर १९५२ रोजी सांगली इथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक येथे झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून बी. काॅम ची पदवी घेतली तर मुंबई विद्यापीठातून त्या एम. कॉम झाल्या. पुढे त्यांनी नॅशनल लॉ स्कूल, बंगळुरू येथून मानवाधिकार कायदा ही पदविकाही संपादन केली.

सानिया यांनी मुंबईतील व्होल्टास कंपनीत काही काळ नोकरी केली. त्या स्वयंसेवी समुपदेशक व प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत होत्या. त्या शाळेत असल्यापासूनच लेखन करीत. शालेय मासिकात त्यांचे लेखन छापून येत असे. सुरुवातीच्या काळात त्यांनी कविताही लिहिल्या. १९६८ मध्ये “हरवलेली पाऊलवाट” ही त्यांची पहिली कथा श्री साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी सातत्याने कथालेखन केले. १९६८ ते १९७५ या काळात त्यांच्या कथा सत्यकथा, स्त्री, मनोहर किर्लोस्कर, युगवाणी, आदी नियतकालिकांत प्रकाशित झाल्या. पण १९७५ नंतर त्यांनी सत्यकथा, मौज या मासिकातून केलेले कथालेखन लक्षणीय ठरले.
पुढे हंस, दीपावली, मिळून सा-याजणी, माहेर, अनुभव कालनिर्णय, अक्षर, इ. नियतकालिकांमधून त्यांच्या कथांना विशेष प्रसिद्धी मिळाली.

सानिया यांनी सुरुवातीला कथा हा वाङ्मयप्रकार हाताळला. १९८७ मध्ये मौज प्रकाशनने प्रकाशित केलेला “शोध” हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर खिडक्या, भूमिका, वलय, परिमाण, प्रयाण, पुन्हा एकदा इ. कथासंग्रह, दिशा घराच्या, ओळख, आपण आपले हे त्यांचे दीर्घकथा संग्रह तर “स्थलांतर” (या कादंबरीला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा पुरस्कार लाभला) स्थलांतर या कादंबरीचे लेखन त्यांनी पत्रात्मक निवेदनपद्धतीने केले आहे. आवर्तन, अवकाश या त्यांच्या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या आहेत.

“शोध” हा त्यांचा पहिला कथासंग्रह धारवाडच्या पाठ्यक्रमात समाविष्ट केलेला आहे तर “प्रतीती” हा कथासंग्रह मुस्लिम विश्वविद्यालयाच्या मराठी एम.फिल.च्या पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.

सानिया यांनी कथा, कादंबरी, दीर्घकथा लेखनाबरोबरच  काही अनुवादही केले आहेत “वाट दीर्घ मौनाची” हा स्वैर अनुवाद व “सानिया की कहानियाँ” हा त्यांचा दीर्घकथा संग्रह हिंदीमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यांच्या अनेक कथांची कन्नड, गुजराती, उर्दू, बंगाली, इंग्लिश बरोबर जर्मन भाषेत भाषांतरे झाली आहेत.

सानिया यांची प्रकाशित पुस्तके संपादन :—
अवकाश (कादंबरी); अशी वेळ (कथासंग्रह); आवर्तन (कादंबरी); ओमियागे (कथासंग्रह); ओळख (कथासंग्रह); खिडक्या (कथासंग्रह); दिशा घरांच्या (कथासंग्रह); परिणाम (कथासंग्रह); पुन्हा एकदा (कथासंग्रह); प्रतीती (कथासंग्रह); प्रवास (ललित लेखन); प्रयाण (कथासंग्रह); भूमिका (कथासंग्रह); वलय (कथासंग्रह); वाटा आणि मुक्काम (ललित लेखन- सहलेखक आशा बगे, भारत सासणे, मिलिंद बोकील); शोध (कथासंग्रह); स्थलांतर (कादंबरी) (डाॅ. अलका कुलकर्णी यांचे याच नावाचे एक पुस्तक आहे); स्त्रीचे अस्तित्व, तिची महत्त्वाकांक्षा, तिचे व्यक्ती म्हणून जगणे, स्वत:च्या अस्तित्त्वाचा शोध घेणे या दृष्टिकोनातूनच कलात्मक पातळीवर त्यांनी सारे चित्रण केले आहे इतकेच नाही तर स्त्री व्यक्तिरेखा सुशिक्षित, कमवत्या, स्वत:च्या अस्तित्वाचे भान असलेल्या, स्वातंत्र्याची आस धरणार्‍या आहेत. स्वत: प्रती सजग होत जाणारी स्त्री सानिया यांच्या कादंबर्‍यात विशेषत्त्वाचे भेटते. स्त्रीच्या भूमिकेतून ‘ती एक माणूस’ म्हणून सहजपणे मांडणे हेच त्यांच्या लेखनाचे वेगळेपण आहे. काळानुसार बदलत्या जीवनप्रणाली तसेच विचारसरणी यांना अनुसरुन त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे जगताना आपल्याला दिसतात.

सानिया यांची लेखनशैली काहीशी त्रोटक, संदिग्ध आहे. जिवंत व्यक्तिचित्रे, तरल, काव्यात्म भाषा आणि जीवनाविषयीचा प्रगल्भ दृष्टिकोन यामुळे त्यांचे लेखन एक वेगळीच उंची गाठते.
सानिया यांच्या या संवेदनशील, स्त्रीप्रती सजगता व्यक्त करणार्‍या साहित्याची दखल घेतली गेली असून त्यांना राज्यशासन पुरस्कार, साहित्य परिषद पुरस्कार, वर्टी पुरस्कार, वि. स. खांडेकर स्मृती पुरस्कार, जयवंत दळवी स्मृती पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने गदिमा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य मंडळाचा शंकर पाटील पुरस्कार, कमलाबाई ओगले पुरस्कार, सौ. वासंती गाडगीळ पुरस्कार “ओमियागे” या कथासंग्रहासाठी, महाराष्ट्र सरकारचा दिवाकर कृष्ण पुरस्कार अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
साठोत्तरी मराठी कथेच्या परिघात सानिया यांनी स्वतःचा एक अमीट असा ठसा उमटवला असून स्त्री विषयक कथा कादंबऱ्यां लिहूनही त्यांच्या साहित्यावर स्त्रीवादी साहित्य असा शिक्का बसलेला नाही हे विशेष.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९