Thursday, January 2, 2025
Homeलेखस्वार्थ

स्वार्थ

हे तर जगजाहीरच आहे की आपण सारे (काही सन्माननीय अपवाद वगळता) स्वार्थी आहोत. प्रत्येकाची स्वार्थीपणाची कारणं‚ गोष्टी‚ जागा‚ वेळ‚ कोणाच्या बाबतीत करायचा व कोणाच्या बाबतीत नाही याची गणितं वेगवेगळी असतात व वेळोवेळी बदलणारी असतात.

आपण स्वत:ला स्मार्ट‚ चतुर व उत्तम संधिसाधू समजत असतो आणि वेगवेगळया तऱ्हेने स्वार्थीपणा जोपासत असतो. आपली मुलंबाळं हे सर्व करताना आपल्याला पहातच असतात. त्यांना वेगळं शिकवावं लागत नाही. ती पण आपोआप स्वार्थी होत असतात.

मनुष्यात हा गुणधर्म उपजतच असतो आणि त्यातून मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती, वाढती महागाई, वाढती स्पर्धा, वाढत्या अपेक्षा, न थांबणारी वाढती हाव ! इतकं सगळं इंधन असल्यावर स्वार्थाचा अग्नी न धगधगला तरच नवल!

या सर्व बेभान पळापळीत काही नि:स्वार्थीपणाचे दीपस्तंभ आपल्याला नेहेमी दिसतात. कित्येक सामाजिक संस्था‚ कित्येक त्यागी वृत्तिच्या व्यक्ती आपल्या वैयक्तिक गरजा कमीत कमी करून इतरांसाठी झटताना दिसतात. वैयक्तिक लाभाची किमान किंवा शून्य अपेक्षा ठेवून काही माणसे हा वसा पुढे नेत असतात. पण कित्येकदा इतर काही लोक किंवा संस्था अशा माणसांना मदत होईल असं काही करण्याच्या ऐवजी या कामात अडथळा कसा होईल किंवा हे काम कसे होणारच नाही याच्या खटपटीत असतात. या सर्वांवर मात करून त्यागी माणसे आपले काम करीतच रहातात.

मी खूपदा विचार करीत होतो की अशा त्यागाची प्रेरणा यांना मिळते कशी ? असे उच्च कोटीचे त्याग सोडा‚ पण साधी साधी माणसे त्याग करतात त्या मागची प्रेरणा त्यांना कशी मिळते ? असं काय आहे की त्यांना एखाद्या गोष्टीसाठी त्याग करावासा वाटतो ? किंबहुना अतिरेकी लोक आपलं घरदार विसरून जीवावर उदार होऊन इतरांची हत्या करायला तयार होतात. कोणती प्रेरक गोष्ट याच्या पाठीमागे आहे ?

मी विचार केला, ज्या क्षणी माणसाच्या मनात साधीशीच का होईना पण एखादी गोष्ट करण्याची इच्छा निर्माण होते त्या क्षणी ‘मी ही गोष्ट करून मला समाधान मिळणार आहे. ’हा स्वार्थी विचारसुद्धा तयार होतो. त्यामुळे अक्षरश: प्रत्येक कॄती च्या मुळाशी ‘मी ही गोष्ट करून मला समाधान मिळणार आहे.’ हा स्वार्थी विचारसुद्धा असतो. याचाच अर्थ मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वत:च्या मनाच्या समाधानासाठी म्हणजेच स्वार्थासाठी करत असतो. मग भले ती गोष्ट मुलं जन्माला घालणे असो‚
आईवडीलांची किंवा कोणाचीही सेवा असो‚ एखाद्या कौटुंबिक‚ सामाजिक समारंभाला हजेरी लावणं असो‚ भिकाऱ्याला भीक घालणं असो‚ खोटं बोलणं असो‚ काहीही असो‚ हे सर्व मनुष्य स्वार्थापोटीच करतो. समाधान मिळवणे हा तो स्वार्थ ! त्यामुळे मुलांनी जर आईबापाला म्हटलं की तुम्हाला सांभाळण्याची माझी जबाबदारी नाही, जन्माला घाला म्हणून मी म्हटलं नव्हतं. तर हे चुकीचं म्हणणं आहे असं नाही म्हणता येणार. कारण आईबापानी त्यांच्या सुखासाठी लग्न केलं‚ त्यांच्या सुखासाठी मुलं जन्माला घातली. त्यांना म्हातारपणाची काठी हवी म्हणून मुलं जन्माला घातली.

आपण दया येऊन एखाद्याला पैसे उधार किंवा दान देतो तेव्हा आपल्यातल्या ‘मी’चा अहं आपण नकळत गोंजारत असतो. एक प्रकारचं सूक्ष्म सुख मिळत असतं की हा माणूस माझ्यापेक्षा हीन आहे‚ त्याला माझ्यापेक्षा काहीतरी कमी आहे आणि त्याच्यावर उपकार म्हणून मी त्याला उधार किंवा दान देणार आहे. अर्थात कळकळीची दयाभावनासुद्धा असते. एखादा माणूस दीनदुबळयांची निरपेक्ष सेवा करताना दिसतो. पण ती खरोखरच निरपेक्ष म्हणता येईल का ? आपण एखाद्या सेवेला निरपेक्ष म्हणतो तेव्हा आपल्याला म्हणायचं असतं की त्या सेवेचा कोणताही आर्थिक किंवा इतर स्वरूपात मोबदला दिला वा घेतला जात नाही. पण अशी ‘निरपेक्ष’ सेवा तो करताना पाहून आपण हे विसरतो की त्याला समाधान मिळत असतं आणि त्याला असं समाधान हवं असतं म्हणून तो हे करत असतो‚ म्हणजेच ‘समाधान हवं’ या त्याच्या स्वार्थासाठी तो ‘निरपेक्ष’ सेवा करत असतो असं म्हटलं तर वावगं ठरेल का ?

अशा वेळी गीतेतल्या उपदेशाचा फोलपणा अगदी अधोरेखित होतो. गीता म्हणते ‘फळाची अपेक्षा करू नका. केवळ कर्म करीत रहा. तरच तुम्हाला मोक्ष मिळेल.’ ज्याला इंग्रजीत सेल्फकॉन्ट्रडीक्टरी म्हणतात तसे हे विधान आहे. विरोधाभासयुक्त. म्हणजे कर्माच्या फळाची अपेक्षा न करता कर्म केलं की मोक्षाची अपेक्षा पूर्ण होईल ! म्हणजे मोक्षाची तरी अपेक्षा ठेवूनच कर्म करायचं आहे ना. म्हणजे र्इथेसुद्धा स्वार्थ आलाच. ‘मोक्ष हवा’ हाच तो स्वार्थ. स्वार्थाची भावना शून्य असणारा माणूस अजून जन्माला यायचाय !

अजून एका वेगळ्या दृष्टिकोनातून ‘स्वार्थाकडे’ पहाता येतं. स्वार्थ ही मनुष्याच्या प्रत्येक कृतीमागची प्रेरक शक्ती आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. स्वार्थ ही माणसातली एक अत्यंत नैसर्गिक अंतःप्रेरणा आहे. प्राण्यांमध्येसुद्धा ती आढळते. स्वार्थ असल्यामुळेच मनुष्य कामं करतो, शोध लावतो, समारंभ करतो, सत्ता मिळवतो, उपदेश करतो, हातमिळवणी करतो, शत्रुत्व करतो, मैत्री करतो, दुटप्पी वागतो, प्रामाणिकपणे वागतो. सर्व काही स्वार्थाच्या प्रभावाने होत असते.

स्वार्थाला आपण अगदीच तुच्छ ठरवू शकत नाही. तो चांगलाही नाही आणि वाईटही नाही. तो केवळ एक प्रेरक शक्ती आहे. या प्रेरणेमुळे माणसं माणसांना फसवत असतील, मारून टाकत असतील, युद्धे करीत असतील, तर त्याचा विचार माणसांनी करायला हवा. त्यांनी लक्षात घ्यायला हवं की स्वार्थ तर काही मला सोडणार नाही पण त्यामुळे मनुष्यजातच दुःखात, धोक्यात जात असेल तर मला या प्रेरकशक्तीचा विधायक उपयोग कसा करता येईल ? विधायक उपयोग केल्याने समाधान मिळण्याचा ‘स्वार्थ’ तर नक्कीच साधला जाणार आहे, नाही का ?

हेमंत साने

— लेखन : हेमंत साने. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. लेख वाचला…आवडलाही…पण म्हातारपणी मुलांनी आपल्याला सांभाळावं ही अपेक्षा होऊ शकते. त्याला स्वार्थ म्हणता येणार नाही….आजची पिढी त्याला स्वार्थ म्हणत असेलही कदाचित पण लहानपणी मुलाची शी शू काढण्यात आणि त्याचं ढुंगण धुणं, त्याला आंघोळ घालणं, स्वच्छ ठेवणं यामध्ये कुठल्या आईचा स्वार्थ असतो? हे विधान काही पटलं नाही….बाकी लेख उत्तम… विचार करावा असाच आहे…. धन्यवाद सर 🙏

  2. सर, खूप सरळ आणि सोप्या भाषेत लिहिले आहे मानवी स्वभावा बद्दल आणि खुप वैचारिक आहे. असेच लेख लिहित जा आणि आम्हाला जीवना विषयी नव्याने विचार करायची संधी द्या. खूप खूप शुभेच्छा

  3. Very nice msg but now a days people r more practical if I not getting what I want leave that person or ignor type mentality.
    It give pain to person who is more sensible.

  4. 100% agree that selfishness has good and bad intentions. Currently bad side of selfishness is more than Good side. It will be important to brain storm that how can we change this equation? Though it won’t wipe out bad side of selfishness intentions but at least can be subsided. May be including some chapters in Civic science like helping elderly, importance of following rules etc

  5. स्वार्थ लेख वाचला, उत्तर नाही मिळालं. अजून प्रश्न निर्माण झाले. बरेच विचार असमर्थनीय वाटले. काही योग्य वाटले.
    वाचल्यावर मला एक किस्सा आठवला. मी माझ्या मित्रा कडे कॉलेज डेज मधे संध्याकाळी भेटायला गेलो. तर त्यांनी विचारलं कसा काय किरण आज काय काम काढलंस माझ्या कडे?
    मी म्हणालो काही काम नाही सहज आलो. तरी तो थोड्या वेळानी परत तोच प्रश्न विचारायचा. मला समजेना याला काय झाले. मी म्हणालो अरे कोणाला भेटलो की बरं वाटतं, माहिती असते एकमेकांची. एक चेंज म्हणून आलो बाकी काही नाही.
    तर पठ्ठा मला म्हणतो कसा अच्छा म्हणजे तुला हें काम होतं म्हणून आलास. मला भेटून तुला छान वाटतं हॆ काम आहे…..🤦
    स्वार्था पलीकडे पण काही असतं ते म्हणजे जबाबदारी, कौटुंबिक, सामाजिक. आपुलकी, जिव्हाळा प्रेम असते किंवा असावी नात्यात, मित्रानं मधे.
    प्रत्येक गोष्टीला वेगळं नाव, शब्द असतो असं मला वाटतं. ते फक्त स्वार्थ नसतं….🙏

  6. रोख ठोक…. एकदम परखड लेख …. प्रत्येक कृती मागे स्वार्थ आलाच… फक्त दुसर्‍याला फसवून, लुबाडून किंवा त्याला नुकसान पोहचवून केलेली कृती वाईट……ग्राहकाला सेवा देताना दोन पैसे अधिक मिळवताना स्वार्थ आला… पण मला वाटते जर ती सेवा निकृष्ट दर्जाची देऊन पैसे मिळवले तर ते वाईट… पण मस्त… वेगळा विषय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pratibha Saraph on नव वर्ष ..
आशी नाईक on कवी
विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !