Thursday, February 6, 2025
Homeबातम्याहरिभाऊ विश्वनाथ : शंभरी निमित्त सुरेल संगीत संध्या संपन्न !

हरिभाऊ विश्वनाथ : शंभरी निमित्त सुरेल संगीत संध्या संपन्न !

मुंबई येथील प्रख्यात हरिभाऊ विश्वनाथ ग्रुप ऑफ म्युझिकल कंपनी शंभराव्या वर्षात पदार्पण करीत असल्याच्या निमित्ताने आयोजित ताल वाद्यांच्या जुगलबंदी ने संगीत रसिकांनी नुकताच एक अप्रतिम, अविस्मरणीय कार्यक्रम अनुभवला. संगीताची ही सुरेल मैफिल उत्तरोत्तर रंगतदार होत गेली आणि आलेल्या रसिकांना आपण आल्याचे सार्थक झाले असे वाटू लागले.

संपूर्ण वातावरण तीन तास अगदी स्वरमग्न झालं होतं. कार्यक्रमामध्ये फक्त ताल वाद्यांचे स्वर नाचत होते, गात होते आणि अभिनय देखील करत होते.

“जादूची पेटी” खरच जादूची पेटी होती. श्री. सत्यजित प्रभू यांनी पियानोवर तर आदित्य ओक यांनी हार्मोनियमचे सूर धरुन त्यांच्या जादूई बोटांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. इतर वेळेस जेव्हा आपण कोणत्याही संगीताच्या कार्यक्रमाला जातो, तेव्हा आपण धरून चालतो कि, तिथे मुख्य रुपात गायक तर असतीलच आणि त्यांना साथ देणारे इतर कलाकार किंवा वादक असतील. पण हा कार्यक्रम तसा नव्हता, तिथे सेन्टर स्टेजला वादक मंडळी होती आणि त्यांनीच संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या कलेने आणि ‘हरिभाऊ विश्वनाथ’ यांनी बनवलेल्या वाद्यांनी खुलवला.

हार्मोनियम (पेटी) आणि पियानोच्या जादू नंतर वेळ होती, ती ढोलकीच्या तालाची. श्री. निलेश परब आणि श्री. कृष्णा मुसळे यांच्या ढोलकीवरची जुगलबंदीने कार्यक्रमात नवा रंग भरला.

प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतूर वादक चिरंजीव पंडित राहुल शर्मा यांनी संतूरच्या तारा छेडल्या .श्री. ओजस अधिया यांनी त्यांच्या सोबत तबल्यावर ताल धरला.

या कार्यक्रमाचे अतिथी होते विख्यात संगीतकार श्री.अशोक पत्की आणि श्री. कौशल इनामदार. श्री. पत्की यांनी त्यांच्या मनोगतात त्यांची संगीतातल्या करिअरची सुरुवात कशी झाली, ह्याचा सुंदर किस्सा सांगितला. जेव्हा त्यांनी ठरविले कि, त्यांना संगीत शिकायचे आहे, तेव्हा त्यांनी त्यांची धाकटी बहीण मीना कडून काही पैसे घेतले आणि स्वतःकडचे काही पैसे गोळा केले, ते मिळून ३६.५० रुपये इतकेच भरले. ते पैसे घेऊन ते हरिभाऊ विश्वनाथ ह्यांच्या दुकानात गेले. तिथे त्यांना एक पेटी आवडली, पण तिची किंमत ५० रुपये इतकी होती. त्यांच्याकडे पैसे कमी पडत होते, त्यांनी विचारले सेकंडहॅन्ड पेटी मिळेल का ? किंवा दुसरी कोणती तरी स्वस्तातली पेटी आहे का ? काहीच नव्हे तर ट्रेन मध्ये जे गातात तशी तरी पेटी मिळेल का ? ह्या सगळ्याला उत्तर ‘नाही’ असेच येत होते. मग ते हताश मनाने त्या दुकानाची पायरी उतरू लागले, तितक्यात पाठून आवाज आला “घेऊन जा ती पेटी” तेव्हा पत्की यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हरिभाऊ विश्वनाथ कंपनीच्या माणुसकीमुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचलो, अशी कृतज्ञेची भावना श्री पत्की यांनी शेवटी व्यक्त केली.

श्री. कौशल इनामदार यांनी देखील त्यांच्या आयुष्यातील सर्वात पहिली पेटी हरिभाऊ विश्वनाथ यांच्याकडूनच घेतल्याचे सांगून ती आजतागायत त्यांच्यासोबत कायम असते, असे अभिमानाने सांगितले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विघ्नेश जोशी यांनी सुंदररित्या सांभाळले.

अल्प परिचय

हरिभाऊ विश्वनाथ हे संगीत विश्वातले एक विख्यात नाव. जगभरातील प्रत्येक संगीत प्रेमी आणि कलाकाराची पहिली पसंतीत म्हणजे ‘हरीभाऊ विश्वनाथ’ यांची वाद्ये. शंकर महादेवन ते अवधूत गुप्ते अशा सर्वच गायकांचे आणि संगीतकारांचे आवडते आणि हक्काचे ठिकाण म्हणजे ‘हरिभाऊ विश्वनाथ’ होय.

१९२५ साली सुरु झालेले हे दुकान आज १०० वर्षात पदार्पण करीत असून ते लाखो कलाकारांच्या यशाचे सोबती झाले आहेत. अतिशय बारकाईने प्रत्येक पेटी आणि इतर वाद्ये इथे बनवली जातात. तज्ज्ञ मंडळी आणि उत्कृष्ट कारिगर मंडळी ह्यासाठी काम करतात. तीन पिढ्यांचा हा दिवाणे कुटुंबीयांचा पेटी आणि इतर वाद्यांचा व्यवसाय फक्त एक व्यवसाय नसून माणुसकी आणि कला आणि कलाकारांना जपणारं एक शंभर वर्षीय वटवृक्ष आहे आणि त्याच्या फांद्या ह्या कलाकार असून फळं हे त्यातून उत्पन्न झालेलं सुंदर संगीत आहे.

शतक महोत्सवाचा हा कार्यक्रम सर्व दिवाणे कुटुंबीय आणि संगीतप्रेमीनी, कलाकारांनी अगदी आनंदात दिमाखदाररित्या साजरा केला.

कार्यक्रम संपल्या नंतर न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्सचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ आणि निर्मात्या सौ अलका भुजबळ यांनी या शतक महोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या प्रसिद्धीचा, “माध्यम प्रतिसाद”तिन्ही दिवाणे बंधूंना भेट दिला.

या अनोख्या बद्दल तिघांनाही आश्चर्य आणि आनंद व्यक्त करून भुजबळ दाम्पत्याचे मनःपूर्वक आभार मानले.

— लेखन : सौ रचना लचके बागवे
— चित्रीकरण : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. हरिभाऊ विश्वनाथ कंपनीच्या शतक महोत्सवी कार्यक्रमांचा प्रारंभ दिमाखदार संगीत उत्सवाने झाला हे वाचून अतिशय आनंद झाला. मध्यंतरी खोट्या वावड्या उठवत लोकांनी शतक पूर्तीआधी कंपनी बंद पडत असल्याचे सांगून गळा काढला होता, पण “दिवाणे परिवाराने” ते वृत्त चुकीचे आहे, हे ठामपणे सांगून आमच्या सारख्या रसिक श्रोत्यांना दिलासा दिला होता.
    खरंतर मी गायक नाही आणि वादकही नाही, पण ह्या कलेविषयी अपरंपार प्रेम असलेली एक दर्दी श्रोता आहे.आयुष्यात कधीतरी हार्मोनियम शिकण्याची संधी मिळेल ह्या आशेवर हरिभाऊ विश्वनाथ कंपनीच्या दादर स्टेशनसमोरील दुकानाच्या बाहेर उभी राहून त्यांच्या वाद्यांकडे आशाळभूतपणे पाहाणा-या माझ्या सारख्या स्त्रीचा दुकानातील वाद्यांशी नव्हे, तर दुकानाच्या तीन मालकिणींशी अचानक परिचय घडला होता, आणि मला स्वर्ग दोन बोटांवर असावा, इतका आनंद झाला होता.
    आम्ही तीन फडणीस बहिणी १९७८ साली हिमालयन ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे काश्मीर सहलीला जायला निघालो, तेव्हा आमच्या कुटुंबीयांना मुलींना एकटे पाठवताना मनात थोडीफार धास्ती होती, पण सहलीच्या प्रारंभालाच विख्यात दिवाणे परिवारातील तीन सुना एकत्र (आणि एकट्याच) सहलीला निघाल्याचे पाहून आमचे सर्वांचे आई-वडील सुखावले आणि त्या क्षणापासून त्या तीन जावांनी आमचा “लेकी” म्हणून स्वीकार केला. सहल फक्त १५ दिवसांची होती, पण जुळलेले स्नेहबंध अनेक वर्षे टिकले. पुढे माझ्या जमशेदपूर येथील वास्तव्यामुळे विरळ होत गेले, पण आठवणी कायम राहिल्या. त्यांच्या चौकशीच्या निमित्ताने हरिभाऊ विश्वनाथ कंपनीच्या दुकानात पाऊल टाकण्याचे सौभाग्य लाभत होते, हे मी कधीच विसरणार नाही. आज ह्या व्यवसायाचे कर्तेधर्ते जे कोणी असतील, त्यांना माझे हार्दिक अभिनंदन आणि व्यवसायाची वाटचाल आणि लोकप्रियता वृद्धिंगत होत राहावी, म्हणून मनःपूर्वक शुभेच्छा.
    प्रेषक… सौ मृदुला राजे, जमशेदपूर
    दिनांक… ८ जानेवारी, २०२५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी